Wednesday, 18 January 2012

चार मीटर कपडवाला..........

चार मीटर कपडवाला.

मुंबईत सातरस्त्याजवळ ऑर्थर रोडला लागून एक छोटेसे दुकान आहे ‘प्रीती आर्ट्‍अस’ नावाच्या या दुकानात सुंदर मूर्ती, चित्र, शोपीस व स्टीलचे फर्निचर मिळते. पण आश्चर्य असे की, हे दुकान कधी चालू तर कधी बंद असते. शेजारच्या पानवाला सांगतो, ग्राहक दुकानाबाहेर उभे राहतात दुकान उघडण्याची वाट पाहत, पण मालक मात्र आपल्या मर्जीने येतो आणि जातो. याचे कारण या दुकानाच्या मालकाचे एकवेगळेच वेड. मुंबईसारख्या ‘फास्ट लाइफ’ ने झपाटलेल्या जीवनात जिथे जिवंत माणसांसाठी वेळ काढता येत नाही तिथे किशोरचंद्र भट आपला कामधंदा बाजूला ठेवून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील वेगवेगळी स्मशाने पालथी घालत असतात आपल्या दुकानात बसून ते फक्त कामाचेच फोन न घेता शवगृहांचे, इस्पितळांचे व पोलीस ठाण्याचेही फोन सतत घेत असतात. हेच लोक त्यांना बेवारशी शवांची माहिती बोलावून देतात. १९६८ पासून त्यांनी हे कार्य सुरू केले. त्याच वर्षी सुरतमध्ये पूर आला होता. खाद्यवाटप करणाऱ्या एका संस्थेसोबत १७ वर्षीय किशोर भटही गेले होते. माणसं आणि जनावरांना एकत्र मरून पडलेले पाहून त्यांना खूप अस्वस्थ वाटले. शेवटी थाटात आणि तोऱ्यात जगणाऱ्यांचीही मातीच होते हे त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले व तेव्हाच सुरू झाली त्यांची मृत्यूशी मैत्री. विविध इस्पितळांमध्ये जाऊन त्यांनी सांगितले की, ‘बेवारस मृतदेह मिळाले तर मला कळवा’ हे ऐकून अनेकांना संशय वाटायचा. सुरुवातीला तर हा मृतदेहांवरील गोष्ती चोरत असेल अशी शंकाही व्यक्त करण्यात आली, पण सत्य व चांगल्या हेतूला पुरावे लागत नाहीत. किशोर यांनी आपल्या निःस्वार्थ कार्याने हे सिद्ध केले आहे. आजपर्यंत त्यांनी जवळ जवळ २६०० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कारकेले आहेत. १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा किशोर यांनी अनेकांची मदत केली. देहाच्या चिंध्या बॅगेत भरून त्यांना अग्नी दिल्याचे त्यांना आठवते. यावर ते म्हणतात, मृत्यू हा कधीही आणि कुठेही येऊ शकतो. पैशांसाठी धावणारे व साम्राज्याचे कर्तेदेखील मृत्यूपुढे भिकारीच असतात. मृत्यूबद्दल सर्वात महत्त्वाचे काही सांगायचे झाले तर तुम्ही काय सांगाल? हा प्रश्न तसा साधारणच होता. पण त्यांच्या असाधारण उत्तराने मला थक्क केले, ‘कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती.’ हे ऐकून अंगावर काटा आला, पण त्यांच्यासाठी हा आयुष्याचाच एक भाग आहे. त्यांच्या दुकानात कापडचे तागे, अगरबत्ती, गंगाजळ, मडके... सर्व काही एका कोपऱ्यात ठेवले आहे. कापडाचे चार मीटरचे तुकडेदेखील वेगळे काढले आहेत. म्हणजे तातडीने जावे लागले तर आयत्या वेळी त्रास नको. याच कपड्याच्या तुकड्यांनी शव बांधले जातात. बोलावणे आले की, भट हे तुकडे घेऊन पोहोचतात. म्हणूनच त्यांना ‘चार मीटर कपडावाला’ असे ओळखले जाते.

हिंदू मुसलमान, शीख, ख्रिश्चन .... कोणत्याही जातीची व्यक्ती असली तरी भट त्यांना शेवटचा विधी संपन्न करून देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हिंदूना संपूर्ण विधीप्रमाणे जाळले जाते. मुसलमानांना त्यांच्या शास्त्रांचे पालन करून पुरले जाते व मृत व्यक्तीच्या जातीचा मन ठेवनूच अंत्यसंस्कार केले जातात. ‘रद्गती’ नावाचा त्यांचा एक ट्रस्ट त्यांनी बनवला. ‘डोनेशन घेण्यासाठी हा ट्रस्ट नाही स्थापन केला मी. माझ्यानंतर हे कार्य सुरू राहावे व लोकांनी यात सहभाग घ्यावा हाच या स्थापनेचा हेतू आहे’ असे ते सांगतात. दुकानाबाहेर दोन व्हॅन सतत उभ्या असतात. फुकट शव नेण्याची सुविधा हा ट्रस्ट सामान्य माणसांसाठी देतो व मयताचे सारे सामानही फुकट वाटले जाते. सर्व इस्पितळे आता किशोर भट यांना ओळखतात. काही गरीबांकडे उपचारांवर खर्च झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे उरत नाहीत. अशा वेळी किशोरजींचा नंबर दिला जातो. अशीच एक घटना त्यांनी सांगितली. एका बाईची छोटी पोर नायर हॉस्पिटलमध्ये आजाराने मेली. मेलेल्या मुलीला ती सोडून चालली होती. कारण स्मशानाचा व अंत्यसंस्कारांचा खर्च तिला परवडणारा नव्हता.‘देव नाही!’ असे म्हणून ती रडत रडत बाहेर पडत होती. तेवढ्यात किशोरजी तिथे पोहोचले. तिला थांबवून ते म्हणाले, ‘मी सर्व करीन. मला देवाने पाठवले आहे.’ त्या आईचे काळीज भरून आले असेल आणि कदाचित देवाचीही तीच अवस्था असेल. खंर तर हे कार्य म्हणजे चांगले पणाचा व देवावरच्या विश्वासाचाच प्रचार आहे, असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडत असतात.
एकदा तर त्यांच्या दुकानाबाहेर झाडाखाली एक माणूस पडला होता. विचारपूस केल्यावर ‘मला टीबी आहे. दूर जा’, असे तो म्हणाला. किशोरजींनी त्याला टाटा इस्पितळात दाखल केले व त्याचा संपूर्ण खर्च ते करीत होते. एका आठवड्यात हा माणूस टॅक्सीने दुकानासमोर आला. किशोरजींना टॅक्सीचे पैसे द्यायला सांगितले. ‘मला वेळ नाही. तुम्ही माझ्यासाठी खूप केले, धन्यवाद’ असे म्हणून तो कोसळला. फक्त त्यांना भेटण्याकरिता त्या माणसाने श्वास धरून ठेवला होता. माझ्यावर लोक असेच प्रेम करतात, हे सांगून त्यांनी हा किस्सा बंद केला.
अनेकांचे आशीर्वाद आणि देवाची कृपा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यांच्या दुकानात पाच मिनिटे बसलात तरी प्रसन्न वाटते. लोक मृत्यू, त्रास आणि जनसेवेपासून पळतात हे त्यांना फारसे आवडत नाही.गेल्या वर्षी एका इस्पितळातील सहा एड्सचे रुग्ण मेले. किशोरजींनी शिवडीतील स्मशानातत्यांचे अंत्यसंस्कार केले. तेथील एकाने त्यांना सहानुभूती देण्याकरिता म्हटले, मी मदत करायला येत होतो. आपले संबंधी होते का मृत? किशोरजींनी ‘ ते एड्सचे पेशंट होते’ सांगितल्या क्षणी, ‘बरं झालं, मी नाही आलो’ असे म्हणाला. हे ऐकून किशोरजींना दुःख झाले. माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्यासारखा वागतो कधी कधी, असे म्हणाला. हे ऐकून किशोरजईंना दुःख झाले. माणूसच माणसाचासर्वात मोठा शत्रू असल्यासारखा वागतो कधीकधी, असे ते म्हणतात. मुंडके नसलेल्या, किडे पडलेल्या, तुकडे झालेल्या, झडलेल्या, जळालेल्या विचित्र परिस्थितीतल्या शवांना हात लावून, त्यांचे विधी व संस्कार करूनही त्यांना कधी घाण नाही वाटली किंवा कोणता रोग नाही झाला. ते या ढोंगी समाजातील कुचकट भीतीचा व कुटीलविचारांचा निषेध करतात. त्यांच्यासाठी सगळे एकच आहे. हल्लीच ताजमधीलप्रकरणांत मेलेले १८ शव कस्तुरबा इस्पितळात आणले गेले. किशोरजींना फोन करून बोलावले गेले. ‘सतरांनाच कापड बांधा’ हा आदेश ऐकून त्यांनी ‘का?’ असे विचारले. ‘तो एक आतंकवादी होता. आता तो फक्त एक मृतदेह आहे.’ सर्व इस्पितळांचे व पोलिसांचे लाडके किशोर भट फारच आनंदी व्यक्ती आहेत. ‘सर्व संस्कार केलेले आत्मे माझी काळजी घेतात’ हे त्यांचे म्हणणे आहे. या पिढीला आत्मे आणि संस्कार हेशब्द जरी जरा जड वाटले तरी एक मात्र शिकण्यासारखे आहे, चांगल्यावर विश्वास ठेवा, चांगले करा आणि चांगलेच शोधा, म्हणजे चांगलेच सापडेल. खरं तर हा ‘चार मीटर कपडावाला’ आठवड्याचा माणूस नसून, आयुष्याचाच माणूस आहे. दुकानातील शंकराची थ्रीडी मूर्ती आणि किशोरभाईची कीर्ती प्रत्यक्षच पाहायला हवी.

जमल्यास नक्की पहा.

No comments:

Post a Comment