चार दिवस माझे.. माझ्यासाठी
जागतिकीकरणाच्या या युगात संधीची विपुलता निर्माण झाली, पण आव्हानं वाढली. मी, माझं कुटुंब, माझं कार्यक्षेत्र, माझे नातलग- यांचं व्यवस्थापनही एक दैनंदिन आव्हान बनू लागलंय. ते पेलताना महिला तर इतक्या अडकून जातात की, त्यांच्या मनाची दारं किलकिलत्या फटीतून डोकवणाऱ्या संधींचंही स्वागत करू शकत नाहीत. अनेकविध व्यवधानांनी जखडून गेलेल्या तिला, स्वत:च्या मनाची मुक्त हाक अनेकदा ऐकू येत नाही किंवा ऐकू आली तरी त्याकडे कानाडोळा करत ती आपल्या कर्तव्यतत्परतेत व्यग्र राहते. तिच्या स्वत:च्या वर्तुळातलं हे चक्राकार घुमत राहणं चालूच असतं, पण तरीही तिच्या मनाचा एक कप्पा धुंडाळत असतो नवं क्षितिज. नव्या अनुभवांचे मन प्रसन्न करणारे क्षितिजरंग. अशा उत्सुक महिलांसाठी ‘दिशा’ नामक एक शिबीर गोव्याच्या निसर्गरम्य कुशीत भरवलं जातं. ‘दिशा’चं हे दहावं वर्ष. तिला तिचं शरीर आणि मन यांच्या हाका ऐकण्याचं, त्यांना योग्य प्रतिसाद देण्याचं तंत्र आत्मसात करण्याची संधी तेथे मिळते. आपापला पैस विस्तारत, विकसित करत जाण्याचं नवं जीवनकौशल्य शिकण्याची पर्वणी तिथे लाभते. सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या व वेगवेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या प्रेरणादायी महिलांचा सहभाग आणि सहवास हे या शिबिराचं मुख्य वैशिष्टय़. उज्ज्वला आचरेकर एडवणकर या उत्साही महिलेची ही संकल्पना. ‘रस्टीक रिट्रीट’वर निसर्गसुंदर निवास आणि उज्वलाचं काटेकोर व आस्थेवाईक आयोजन हे या शिबिराचं विशेष आकर्षण. हे शिबीर १० ते १३ फेब्रुवारी २०१० या काळात भरतंय. यंदाच्या या शिबिरात संवादक आहेत- डॉ. राणी बंग, डॉ. श्यामला वनारसे, विद्या बाळ, सुषमा दातार आणि शुभदा चौकर. मनाच्या किलकिलत्या खिडक्या सताड उघडायची संधी स्वत:ला निग्रहाने मिळवून दिली तर त्या क्षितिजरंगांचं, त्या झुळकांचं मनभरून स्वागत करण्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. चार दिवस स्वत:साठी सवड काढली तर जीवन समृध्द करणारी अनुभूती मिळू शकते.
No comments:
Post a Comment