Friday 13 January 2012

वयनीमाय


 हवेतला गारवा उगाचच अंगाला झोंबत होता. न्याहारीची वेळ झाली तरी उन वर यायचं नाव घेत नव्हत. पण शेवन्ताच्या अंगणाला आज निराळाच रंग होता. तसं पहिल तर अंगण घराच्या आतल वातावरण कस आहे याचच प्रतिबिंब! स्वच्छ सारवलेला ओटा, उजव्या हाताला छपरात दोन गाया एक वासरू टाकलेली मक्याची कुटी चघळत होती. घासाच ओझ ओट्याजवळच्या बदामाच्या झाडाखाली पडलेल. शेवंता घरातलं काम उरकून बाहेर गुरांना पाणी ठेवायला आली. गायांच्या पुढ बादली ठेऊन ती जरा झाडाच्या सावलीत ओट्यावर टेकली. मागच्या आठ दिवसाची तगमग आता कुठ शांत होती. मनाच्या पाखराला सदान चांगलीच येसण घातली, ती पण प्रेमाने समजावून! आणि विशेष म्हणजे थोडाही धाक न दाखवता. सदाची हीच सामंजस्याची भाषा, प्रेमाचे शब्द शेवंता आणि त्याला आता पर्यंत एकमेकांशी घट्ट बांधून आहेत. नवरा बायकोच नातं असच जितक लांब ढकलू तेवढ जोरात परत एकमेकांजवळ ओढून आणत. पृथ्वी जस सूर्याभोवती गुरुत्व-आकर्षानामुळ फिरत राहते तस! एक अशीच ओढ यांनाही बांधून होती.
         मोटर चालू होती म्हणून शेवंता आज विहिरीवर कपडे धुवायला गेलेली. शेजारची ताईबाई संग होतीच. त्यांच्या दोघींमधी शेजारणी असून कधी भांडण नव्हती, एकमेकीची मदतच करायच्या! हौदाच्या कडांवर मोठाल दगड असल्यान कपडे धुवायला सोप जायचं. वीजमंडळाच्या कृपेची फक्त गरज असायची!
'' शेवन्ते परभू लई दिस झाल आला नाय ग.''
'' ताई, मास्तर हाय त्यो, सवड तर पायजेन, त्यामधी माधुरीची बी शाळा असतीया, एक दिस सुटी असली तरी आठ दिसाचा राडा आवरायला अख्खा दिस संपतो. लागून सुट्या आल्या कि येत्यानच कि !''
''बघ शेवन्ते, तुमी पाठच्या दीर ,नंदला मोठ करायच म्हनुनशान पोटपाणी पिकू दिल न्हाय! म्हातारपणी ह्यांनी सांभाळ केला तर ठीक न्हायतर अवघड होऊन जायचं!''
''न्हाय ताई, माजी पोर तशी न्हायत ,ती कावा बी अंतर नाय देयची.''
''परभू हाय तुजा पर माधुरी हाय का ?''
''नाय ग ताई गुणी पोर हाय ती बी .''
''चांगल हाय पर तू आपली जपून आस . काय कुणाचा भरवसा नाय बग कुणाची मती कवा बदलल सांगण अवगड हाय, चल येते मी झाल माज .''
      ताईबाई गेली पण शेवन्ताच डोक मात्र बधीर झाल. संशयाची ठिणगी एकदा पडली कि वनवा पेटवल्याशिवाय   गप्प होत नाही. एकदा का वनवा पेटला कि घरच्या घर उध्वस्त झालीच म्हणून समजा. कळत असूनही संशयाच्या या वारूला कुणी लगाम घालू इच्छित नाही हि सगळ्यात मोठी शोकांतिका! मग या संशयाने अगदी आई मुलाच्या नात्याचा बळी घेतला तरी यांना चालतो. आणि या विखारी रोपाला खत पाणी घालायला बाकीचे टपलेले असतातच. माणूस क्षणाच नात वर्षानुवर्षे जपलेल्या नात्याला गिळंकृत करताना पाहूच कसा शकतो? शेवंता मात्र गलबलून गेली होती. जेवानावरच मन उडून गेल होत. सदा येई पर्यंत तिचा जीव शांत होणार न्हवता. कारण त्याने लग्नाआधी नसबंदी केली नसती तर एखाद पोर मला बी झाल असत माझा खरा गुन्हेगार तोच आहे. शेवन्ताच अंग थरथर कापत होत. सदा आल्यावर त्याला किती दोष देऊ नि किती नको अस तिला झाल होत. हातान या माणसान आपल्या आयुष्याच वाटोळ करून घेतलय आता म्हातारपणी कुणाच्या तोंडाकड बघायचं? एक न अनेक शंका तिला घायाळ करत होत्या. दु:खाची नुसती चाहूल माणसाला हतबल का बनवत असेल? ते होणार कि नाही हेही त्यांना माहित नसत, पण मरण यायच्या आधीच खड्डा घेण्याची सवयच बनून गेली आहे. उद्याच्या दु:खाच्या चाहुलीने आपण आपल आज संपवतो आहे हेही यांना का कळत नाही देवच जाणो?
      सदा आला पण शेवंता एक शब्दहि का बोलत नाही याचा काही अंदाज त्याला येईना. थोडा गोडीन तिच्याजवळ गेला पण तीन असा काही त्याला झिडकारला कि त्याच डोकच बधीर झाल. जाताना तर सगळ ठीकठाक होत मग अस अचानक दोन तासात काय घडल? आता काय करायचं? ओरडल तर परस्थिती आणखी बिघडणार थोड कुरवाळच पाहिजे हे त्याने उमजून घेतलं.
''शेवन्ते काय न सांगता तू आजूक माजा किती जीव जाळणार हैस? सांगती का जाऊ लांब कुठतरी? परत त्वांड नाय दाखीव्णार तुला.''
आता मात्र जीव्हारी बाण लागला. शेवंती ढसाढसा रडायला लागली त्याच्या गळ्यात पडून आणि विहिरीवर झालेली हकीगत सांगितली. सदा लागला हसायला. ''हे तुज ना शेवन्ते उद्याच्याला जेवण मिळल का नाय ह्या विचारांनी आजच उपाशी राहण्यासारक झाल! तुला ग कश्याला काळजी पायजे याची. मी हाय ना कुणी नसाल तरी, आन समजा तू आजच मरून गेल्यावर?''  सदा परत मोठ्यान हसायला लागला. शेवंती मात्र जास्तच भडकली,''माज डोक तळ्याव नाय आन तुमालाव कश्याची मस्करी सुचती ? जावा तीकड नका बोलू माज्यासंगत.'' सदान तिला जवळ घेत तिला समजावल.
''शेवन्ते आग कुत्र्याच्या पिलाला जीव लावला त ते बी आपल्या माग पळत! ह्यो तर माजा पाठचा भाऊ हाय. आणि मला सांग तू बी पोटच्या पोरापरीस जास्तच जीव लावला नव्ह परभुला मंग तुज्या संस्काराव तुज इस्वास का त्या ताय्बायवर सांग बर मला? आन माधुरी बद्दल बी तू शंका कशी घेऊ शकती तीन बी तुजी किती सेवा केली बर तू आजारी होती तवा! लोकाची असली तरी चार बुक शिकल्याली समंजस पोर हाय ती ! आशी उगाच डोक्यात राख कश्यापरीस घालती, येवड सांगून तुला पटत नसल चल चार दिस त्येन्च्यासंग राहून तू अनुभव घेऊन बग मंग तर झाल. उरिक लवकर आजच या शंकला चुलीत घालू .''
   शेवंता लगबगीने उठली, परभूकड जायचं म्हणून ती गरबडीने  मळ्यात जाऊन मिरच्या, वांगी, शेपू-चुक्याची भाजी, पेरू ,आन बरच काही घेऊन आली. दोनच्या गाडीने दोघ पर्भूकड रवाना झाली. पोहचायला पाच वाजले. माधुरी नुकतीच आली होती. दादा नि वयनीमायला बघून तिला तिचा आनंद लपवता येन अवघड होऊन बसल, आत येताच ती दादाच्या पाया पडली आणि वयनीला जाऊन बिलगली, लई दिवसांनी आई दिसल्यावर जस लेकरू बिलगत तशी! सदा शेवन्तिकड बघत होता, नजरानजर होताच शेवंती वरमली. त्यांना  चहा पाणी देऊन माधुरी स्वय्पाकाला लागली, शेवंता लुडबुड करू लागली पण माधुरीन तिला हाताला धरून बाजूला बसवल. तासाभरात परभू आला त्याला अचानक आलेले दादा, वयनीमाय बघून इतका आनंद झाला कि दोघांना कुठे ठेऊ कुठे नको अस झाल . त्याचं ते प्रेम बघून शेवंता मात्र आतल्या आत खजील होत होती. तिला धरणी माय ठाव दे अस झाल तिची चुलबुल बघून सदा मनातल्या मनात हसत होता पण त्याला ते लपवता येत नव्हत. जेवण आटोपल्यावर ती माधुरी जवळ बोललीच,''तुला कधी अस वाटल नाय आपल्या नवऱ्याची दादा वयनी आपण कश्यापरीस त्येंच करायचं .''
''वयनीमाय, तुमाला  जर तवा वाटल असत तर मला आता तस वाटल असत. ज्या मावलीने बारीक दीर,नणंद सांभाळण्यासाठी आपल् पोट पाणी पिकू दिल नाही त्या माउलीची अशी अवहेलना केली तर प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा माझी पाप धुऊ शकणार नाही !''
''बस बस माधुरी, तुला हे सांगितलं कुणी?''
''तुमच्या लाडक्या पर्भून! आणि हो लग्नाआधीच कबुल करून घेतल कि माझ्या दादाला आणि वयनीमायला अंतर द्यायचं नाही! या अटीवर तर यांनी लग्न केल माझ्याबरोबर!''
आज शेवन्ताला जन्मच सार्थक झाल अस वाटायला लागल. सगळ भरून पावलो आता देवाकड काही मागण नाही! माणूस सुख शोधत उर फुटेपर्यंत धावतो पण त्याच्याजवळ लपलेल सुख त्याला दिसत नाही त्या कस्तुरी मृगसारख!
   शेवंतान सगळ सदाला सांगितलं! तिचे डोळे तिच्या नकळत वाहत होते पण आनंदाने !
''पण परभू सारख तुमी लगणा आधी मला इस्स्वसात घेतलं असत त जमल नसत का ?'' लाडिक गुश्यात शेवंता बोलली.
''तवा आजाच्यासारक लग्नाआगुदार भेटली आसती तर सांगितलं आसत कि!'' मिस्कीलपने सदा बोलला. लाजत शेवंती त्येच्या कुशीत शिरली. ति आता निश्चिंत झाली!
         बदामच्या झाडाखाली बसून एक निश्चय शेवन्ताने आज केला,'' परत आसा येडेपणा नाय करायचा, माज्या पर्भूबद्दल शंका म्हंजी देवाबद्दल शंका!''

No comments:

Post a Comment