Monday 2 January 2017

एकट असाव अस वाटतएकट असाव अस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

अवती भोवती रान सगळ
मुक मुक असत
वाट दिसु नये ईतक
धुक धुक असत
झाडाखाली डोळ मिटून बसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

येते येते हूल देते
सर येत नाही
घेते घेते म्हणते तरी
जवळ घेत नाही
अशा वेळी खोट खोट रुसावस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

कुठे जाते कुनासठाउक
वाट उन्च सखल
त्यात पुन्हा सगळीकडे
निसरडीचा चिखल
पाय घसरुन आदळल्यावर ह्सावस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत

पाखर जरी दिसली नाहीत
ऐकु येतात गाणी
आभाळ कुठल कळ्त नाही
इतक निवळ पाणी
आपल्या डोळ्यात आपल रूप दिसावस वाटत

ओळीमागुन गाण्याच्या
थरारत जावस वाटत
आभाळतुन रन्गाच्या
भरारत जाव
सुराच्या रानात भुलुन फुलावस वाटत


कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत ............

"आई तुम्ही ..... म्हणून आम्ही..."

 तीन जानेवारी 1831 पासून 10 मार्च 1897 हे त्यांचे आयुष्यमान देशासाठी आधुनिक जगण्याचा, बनण्याचा महामंत्र देणारे ठरले. नायगावच्या सावित्री खंडोजी नेवसे पाटील पुण्याच्या सावित्रीबाई जोतिराव फुले झाला. तेथून त्यांच्या जीवनाला आणि देशाच्या इतिहासाला वेगळे वळण मिळाले. भारतीय समाजात वेगळेच स्थित्यंतर घडून आले. सा-या जगाला वंद्य ठरलेल्या जोतिरावांच्या कार्याला सक्रिय साथ-संगत देत त्यांनी कार्यकर्तृत्व घडवले ही साथसंगत केवळ ‘मम’ म्हणणारी आणि उखाण्यात सांगणारी कधीच नव्हती. अंत:प्रेरणांसह परिवर्तनाचे मैदान त्यांनीही निवडले. परिवर्तनासाठी समाजभूमी तयार करणारी भूमिका घेतली.जात, वर्ण, वंश, लिंग, धर्म या आधारावर विषमता पोसणा-या समाजाला छेद दिला. भेदाभेद करणा-या तथाकथित संस्कृतीला आव्हान दिले. शोषितांच्या उत्थापनाचा ध्यास आणि शोषकांच्या स्वार्थी प्रवृत्तीविरुद्धचे युद्ध जोतिराव गोविंदराव फुले आणि सावित्रीबार्इंनी पुकारले. परिणामी, आज भारतभर अनेक सावित्री विविध क्षेत्रांत आपली मुद्रा उमटवीत आहेत. जोतिराव फुले आणि सगुणाबाई उपाख्य आऊ यांच्या संगतीने सुरू झालेला त्यांचा चैतन्यमयी कार्यप्रवास आश्चर्यकारक आहे. स्त्रियांना कोणतेच स्वातंत्र्य नव्हते त्या काळात स्त्रियांसाठी परिवर्तनाचे प्रशस्त मार्ग त्यांनी निर्माण केले. शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्या सामाजिक, धार्मिक कौटुंबिक स्वातंत्र्यासाठी नवा विचार, नवे कार्य आरंभिले आणि पूर्णत्वास नेले. आपल्या आयुष्यातील पन्नास वर्षे सामाजिक युद्धात घालविली. या युद्धात झालेले आघात, छळ सहन केला. मात्र, आपला मार्ग आणि शेवटी अपले यश कायम ठेवले. सा-या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या. विविध वर्गांसाठी अभ्यासक्रम तयार केले. असंख्य मुलींना प्रेरणा देऊन ज्ञानक्षेत्रात आणले. शिक्षण नव्हे, ज्ञान दिले. त्यातूनच मुक्ता साळवेंचा विद्रोही आविष्कार घडला. आधुनिक भारताच्या शिक्षणाचे नायकत्व सावित्रीबाई फुले यांच्याकडे जाते. वस्ताद लहुजी साळवे, रानबा महार, धुराजी अप्पाजी चांभार, गणू शिवा महार, फातिमा शेख, उस्मान शेख हे त्यांचे शाळेतील सहकारी आधुनिक भारताच्या शिक्षणाचे शिल्पकार ठरले. जोतिराव व सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शाळेत शिकवलेल्या धुराजी अप्पाजी चांभार आणि रानबा महार या दलितांना भारताच्या इतिहासात शिक्षक होण्याचा मान मिळाला. मुलींना शिक्षण देण्याच्या परिश्रमपूर्वक प्रयत्नातून अभूतपूर्व समता पर्व निर्मिण्याचे प्रेरक कार्य त्यांनी केले. शोषितांचे जग बदलायचे आहे म्हणून शिक्षण अपरिहार्य होते. त्यासोबतच शूद्रातिशूद्रांच्या छळाचा इतिहास बदलायचा होता. जातिव्यवस्था संपवायची होती. स्त्रियांचे जगणे माणसात रूपांतरित करायचे होते. शासनयंत्रणेचा जाच संपवायचा होता. सहस्रावधी मार्गांनी होणारे शोषण बंद करण्यासाठी अनेकविध विवेकनिष्ठ चळवळींची मालिकाच त्यांनी उभी केली होती. स्वत:च्या वाड्यातील विहीर पिण्याच्या पाण्यासाठी दलितांना खुली करण्याचे धाडस केले. विधवांच्या पुनर्विवाहाच्या चळवळीत सहभाग दिला. विधवांचे केशवपन होऊ नये म्हणून न्हाव्यांचा संप घडवून आणण्यासाठी नेतृत्व केले. बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करून अशा स्त्रियांची बाळंतपणे स्वत: केली. आधुनिक भारतात जाती संपल्या पाहिजेत म्हणून आंतरजातीय विवाह लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला. काशीबाई या विधवा ब्राह्मण स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत आणि जोतिरावांच्या नंतर हा समाज चालविण्यात महत्त्वाचे योगदान दिले. 1875-1877 या काळातील दुष्काळात दुष्काळग्रस्तांना मदत आणि अन्नछत्रे चालविली. त्यांनी जोतिरावांच्या भाषणांचे संपादन केले. स्वत: काव्यलेखन केले. विविध ठिकाणी भाषणे देऊन समाज जागृतीचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा झाल्या. शेतकरी आणि मजूर स्त्री पुरुषांसाठी रात्रीच्या शाळा काढल्या. ब्राह्मणांशिवाय सत्यशोधकी पद्धतीने विवाह लावण्याची चळवळ उभारली. अशा असंख्य कार्यांची यादी आहे. माणूस, जमीन, नवे प्रयोग (मॅन, लँड, लॅब) यांचा अनुबंध सामाजिक परिवर्तनाच्या प्रयोगशाळेतून घडविला गेला.
1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. डॉ. यशवंत फुले यांच्या दवाखान्यात सावित्रीबाई सेवा करीत होत्या. पांडुरंग बाबाजी गायकवाड यास प्लेगची लागण झाली तेव्हा सावित्रीबार्इंनी त्यास उचलून दवाखान्यात आणले. त्यातच सावित्रीबार्इंना प्लेगने गाठले आणि देशाच्या परिवर्तनाच्या चळवळीतील 50 वर्षे चाललेले वादळ थांबले...आणि तेथूनच समता पर्वाची मागणी करणारे नवे वादळ सुरू झाले. आजही हे वादळ जिवंत आहे. उत्थापनाचा, उन्नतीचा आशय अधिक व्यापक झाला आहे. खोट्या, दांभिक मुखवट्याचे बुरखे फाडले जात आहेत. सामान्यांच्या आशा-आकांक्षांचे, शोषितांच्या संपन्न स्वप्नांचे जग निर्मिण्याची मागणी होते आहे. सावित्रीबार्इंच्या कार्य-विचारांना व्यापक, विशाल, अथांग अर्थ प्राप्त झाला आहे. नवा समाज आणि नव्या समाजाची नवी संस्कृती याचा ध्यास या कार्य-विचारातून प्रकट झाला. त्यासाठीच सावित्रीबार्इंच्या विचारांची, कार्याची वर्तमानाला गरज आहे. त्यातून भविष्य निर्माण होईल. गर्भातच स्त्री संपविणा-या या वर्तमानाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे, विचाराचे सरण अटळ आहे. आज जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!