Tuesday 15 May 2012

एकटी

एकटी
.हि कथा आहे निकिता आणि संजयची.....आज सात वर्षांनी निकिताच्या चेहऱ्यावर आनंदओसंडून वाहत होता. किती दिवसाची प्रतीक्षा आज संपल्यासारखी तिला वाटत होती.
आधी:
तीच संजयवर एकतर्फी प्रेम होत ते क्लासमध्ये नववीत असल्यापासून, तिला तो खूप आवडायचा पण तिने कधीच त्याला ते सांगायची हिम्मत केली नव्हती. तो तिला फक्त क्लासच्या वेळेतच समोर दिसायचा. तिला बाकी काहीच माहिती नव्हती त्याच्याबद्दल. आणि स्वभावाने खूप लाजाळू असल्यामुळे तिने त्याच्या बद्दल कधी तिच्या मैत्रिणींकडे सुद्धा विषय काढला नाही. पण तिने शेवटी ठरवले कि क्लासच्या शेवटच्या दिवशी त्याला सांगायचं कि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू मला आवडतोस. पण नियतीच्या मनात काही वेगळ होत. क्लासचा शेवटचा दिवस होता २५ मार्च पण त्या आधीच एक आठवडा संजयचा अपघात झाला आणि तो त्या अपघातामुळे ती शेवटची परीक्षा पण देवू शकला नाही. त्यामुळेच त्याच क्लासला येनच काय घरातून बाहेर पडण पण बंद झाल. तिने खूप प्रयत्न केला त्याला contact करण्याचा पत्ता शोधून ती त्याला भेटायला त्याच्या घरीपण गेली. पण आता तिला ते विचारण शक्यच नव्हत.
तिने विचार केला कि हा यातून पूर्ण बारा झाला कि नक्की विचारू. पण त्याच वर्षी संजय ते शहर सोडून दुसरीकडे शिफ्ट झाला. आणि निकिताच्या सर्व अशा-आकांशधुळीत मिळाल्या. ती खूप रडली जमेल तितका प्रयत्न केला त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा. पण एकाही मैत्रिणीला तिने हे न सांगितल्यामुळे तिला कुणाची मदत पण नाही मिळाली. आता त्या गोष्टीला सात वर्षझाली होती अजूनही तिने मनातून संजयलाच आपला life partner म्हणून निवडलं होत. तिने Facebook वर account बनवल होत. तिला मैत्रिणींकडून कळाल होत कि आपले सर्व शाळेतले मित्र-मैत्रिणी facebook वर आहेत. म्हणून तिनेही सर्च केल आणितिला आज संजयचं profile दिसल.तिने त्याला request पाठवली. आणि बरोबर message करून आपली ओळख करून दिली. त्याच दिवशी संजयने requestaccept केली. तिने संजय कडे त्याचा नंबर मागितला होता तो त्याने तिला दिला. मग तिने त्याला कॉल करून खूप गप्पा मारल्या क्लास मधल्या गमती जमतींच्या. आणितिने संजयला भेटायला बोलावल संजयने तिला सांगितल कि तो आज खूप buzy आहे तर आपण उद्या भेटू.
भेटीचा दिवस
"मी तुला ओळखलंच नाही कशी दिसायचीस तू क्लासमध्ये असताना आणि आता totally different "
"हो रे थोडा बदल झालाय खरा, पण तू मात्र अजूनही तसाच दिसतोयस, कस चाललाय?"
"माझ एकदम मजेत, अजून कोणी आहे का तुझ्या contact मध्येक्लास मधले"
"हो रे त्या क्लास मधल्या सर्व मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू तर अचानक गायब झालास"
"हो ग नवीन घर घेतल होत आणि आम्ही शिफ्ट होणारच होतो त्यावर्षी...so झालो एकदम अचानक"
"लग्न कधी करतेयस? का झालपण?"
"नाही रे अजून नाही......कुणाच ीतरी वाट बघतेय म्हणून अजूनथांबलेय लग्नासाठी....पण आता विचार सुरु आहे बघू कदाचित लवकरच.....ये पण तुझ झाल का लग्न?"
"मागच्याच वर्षी झाल 'LOVE MARRIGE ' जरा लवकरच झाल पण जो होता हैं वो अच्हे के लिये होता हैं.......अस विचार केला आणि केल लग्न"
बस त्यानंतर निकिता फक्त रडायची बाकी होती.....तिने कसातरी पटापट तिथून निघण्याचा प्रयत्न केला....संजयला पण थोड विचित्र वाटल पण त्यालाही घाई असल्यामुळे तोही निरोप घेवून तिथून निघाला. त्यानंतर अक्खी रात्र तिने रडून रडून घालवली. आता हाच मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला ज्या प्रेमाची सात वर्ष वाट बघितली त्याचाअंत अस सात मिनिटात का झाला?

Friday 4 May 2012

निर्णय

डोळे पुसत पुसत मानसी घराबाहेर पडली. घरी तिचे बाबा अगदी रागारागाने लाल होऊन तिच्या आईशी बोलत होते. "बघितलंस ना, पुढे शिकवण्याचे परिणाम. म्हणे करू दे ना तिला कॉलेज, करू दे ना नोकरी. बघा आता बाप बोलत असताना समोर थांबायची पण शिस्त राहिली नाही यांच्यात. " आईला कळत नव्हतं की काय बोलावं. दोन्ही बाजूंनी तिलाच त्रास होत होता. आता ही पोरगी गाडीवर जाईल कुठेतरी रागारागात, नीट चालवेल, काय करेल काय माहीत. मानसीने गाडी जी मारली होती ती थेट अभीच्या घरी . दरवाजा अभीनेच उघडला. तिला असं तावातावाने आलेलं पाहून तोही जरा दचकलाच. ती काहीतरी बोलणार इतक्यात अभीची आई बाहेर आली. त्यांना पाहिल्यावर मात्र तिला जाणीव झाली की आपला चेहरा सगळेच भाव सांगतोय. मग आत येऊन तिने कसलंसं कामाचं कारण सांगून अभीला सोबतच घेऊनच त्यांच्या घराबाहेर पडली. अर्थात काय झालं असावं याची कल्पना अभीला होतीच.
रडत रडतच मानसी त्याला विचारत होती, " अरे पण आपल्याला काही तरी निर्णय घ्यावाच लागेल ना?".
" हो गं, मान्य आहे मला. पण असा घाईत कुठलाही निर्णय घेऊन चालणार आहे का?"
"घाई? कसली घाई? पाच वर्षे होऊन गेली आपल्या लग्नाला. याहून अधिक वेळ काय घेणार विचार करायला? तुला माझ्यावर, तुझ्यावर विश्वास नाहीये का?"
"तसं नाही गं. पण आई-बाबांचा पाठिंबा असेल तर गोष्ट वेगळी असते. "
"मला मान्य आहे रे, पण असं किती दिवस चालणार? कधी ना कधी तरी हे सर्व ठरवावंच लागेल ना?".
आता हा संवाद त्या दोघांचा कमीत कमी शंभर वेळा झाला असेल गेल्या काही महिन्यात.गेल्या काही दिवसांपासून दोघांच्याही घरी तणावाचं वातावरण होतं. मानसी-अभीच्या लग्नाला आता पाच वर्षे होऊन गेली. सुरुवातीचे काही वर्षे करियर करायचं म्हणून त्यांनी कुटुंबनियोजनाचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतरही दोन अडीच वर्षं होऊन गेली.आता तर नातेवाईकच काय घरच्यांना, या दोघांनाही काळजी वाटू लागली होती. मग तपासण्या, औषधे, उपास-तापास, नवस सगळं करून झालं पण कशाचाही गुण येईना. थोड्याच दिवसांपूर्वी डॉक्टरनेही 'दत्तक' घेण्याचा उपाय सुचवला होता. मानसीला तर काही कळतच नव्हतं की अशा परिस्थितीत करावं काय?
पण जसजसे दिवस जाऊ लागले तिला अजूनच अस्वस्थ होऊ लागलं. तिला दत्तक घेऊन का होईना बाळ हवंच होतं. तर अभीच्या घरचेच काय, तिचे बाबाही अगदी याविरुद्ध होते. तसे त्यांनी तिला बरचसं स्वातंत्र्य दिलं होतं पण तिचे बाबा थोडे जुन्या विचारांचे होते पहिल्यापासूनच. त्यांच्या दृष्टीने समाज, जात वगैरे गोष्टींचा संसारावर बराचसा प्रभाव असतो. कुठलेही कार्य करताना आपल्या मित्रांची, नातेवाईकांची मान्यता असणे फारच गरजेचं होतं. दत्तक घेतलेलं मूल कुठलं असेल, कुणाचं असेल कसं असेल असे अनेक प्रश्न त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यामुळे तिने आपल्या मताबद्दल सांगितल्यावर घरी साम,दाम,दंड.भेद सगळे प्रयत्न झाले होते. प्रत्येक हिंदी सिनेमात दाखवतात तसे सीनही झाले होते.अगदी निरुपा राय पासून ते पृथ्वीराज कपूरपर्यंत. त्याच्याही घरी सगळं काही सोपं नव्हतं. एकुलता एक मुलगा असा आई बाबांच्या विरोधात गेल्यावर त्यांना वाईट वाटणारच ना? त्यांनाही स्वत:च्या घराला वारस हवाच होता, तोही आपला,सख्खा. त्यालाही माहीत होतं की तोच त्यांचा आधार आहे तर मानसीला होणारा त्रासही त्याला समजत होता. तरीही त्याचा निर्णय काही पक्का होत नव्हता.
भांडणं वाढतंच राहतील म्हणून मानसी आई-बाबांसोबत राहतं होती थोडे दिवस. तिला वाटलं की वेळ दिल्यावर, एकटं असताना नीट विचार करायला अभीलाही मदत होईल. पण तीन महीने होऊन गेले तरी याचा काही निर्णय घेण्याचा निश्चय दिसत नव्हता.मानसीला अभीच्या अशा अधांतरी वागण्याने अजूनच त्रास होत होता. आता जेव्हढं काही हातात होतं ते सगळं करून झालं होतं, मग कशाची वाट बघत होता तो? की सगळे प्रश्न काळावर सोडले की झालं? तिला असं वाटलं की इतक्या वर्षात कधीच कसं जाणवलं नाही मला की हा असा कधी वागेल म्हणून? आजही नेहमीसारखाच तोच तो वाद घालून मानसी घरी आली होती. तिला आता भांडणाचाही कंटाळा आला होता.घरचा विरोध, नातेवाईकांचा कधीच नसलेला सपोर्ट आणि अभीच्या अशा वागण्याला कंटाळली होती ती. तिला निराशपणे घरी आलेलं पाहून आईचा जीव कासावीस झाला. तिचं दु:खं आईला नाहीतर कुणाला समजणार? तिच्या आईने आजपर्यंत तिला सगळ्याच बाबतीत पाठिंबा दिला, जिथे तिला स्वत:लाही माहीत नव्हतं की ती एखादी गोष्ट करू शकते की नाही तिथे आईने तिच्यावर विश्वास दाखविला होता. आज मानसीला असं हरलेलं पाहणं तिच्या आईला अवघड जात होतं.
घरीयेईपर्यंत रोखलेला बांध आईच्या मिठीत आल्यावर मात्र मानसीला आवरता आला नाही. तिला हवं तसं रडू दिल्यावर तिच्या आईने तिला सांगितलं, "हे बघ मनू, मी तुला आजपर्यंत पाठिंबा देत आले आहे आणि यापुढेही देईन पण ज्याचा त्याचा निर्णय त्यानेच घ्यावा लागतो. तू विचार कर तुला काय हवंय/नकोय याचा आणि तू घेशील तो निर्णय योग्यच असेल याची मला खात्री आहे."
मानसी पुढच्यावेळी अभीला भेटली तेव्हा तिने त्याला सांगितलं," अभी मी निर्णय घेतेय. म्हणजे मला असं नको होतं की संसारात कुठलाही निर्णय असा कुणीही एकाने घ्यावा. पण आता मी घेतेय. मला मूल दत्तक घ्यायचंय आणि तुला ते पटत नसेल तर आपल्या दोघांनी सोबत राहणं शक्य नाहीये. मी तुला,आपल्याला पुरेसा वेळ दिला होता विचार करायला आणि तू त्याचा काहीच उपयोग केला नाहीस. तुला सगळ्यांचाच विचार करायचा होता आणि प्रत्येकाला खूश ठेवायचं होतं. का? तर नाखूश माणसाचा रोष घ्यायची हिंमत नव्हती? हे बघ, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला निर्णय घ्यावेच लागतात. त्यातले सगळेच बरोबर असतील असं नाही आणि तुला खरं सांगते माझा हा ही निर्णय कदाचित चुकीचा असेल. पण तो माझा निर्णय असेल. त्याचे जे काही परिणाम असतील तेही भोगायची माझी तयारी आहे, पण ते परिणामही माझ्या निर्णयाचे असतील. त्यामुळे मला परिस्थितीला तोंड देताना, झगडताना वाईट वाटणार नाही की जेव्हा मला संधी होती तेव्हा मी काहीच केलं नाही. जेव्हा आपण काही न करता बघत राहतो ना तेव्हाच आपण दुसऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर आपलं नशीब सोपवतो. आणि मग दुसऱ्यांच्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतात. मला ते नकोय, म्हणूनच मी निर्णय घेतेय ! "

बाप

एका रात्री अचानक तिचा बाप गेला. बातमी कळताक्षणी ती तडक निघाली. नवराही होताच बरोबर. तोच रस्ता तिच्याघरापासून ते तिच्या बापाच्या घरापर्यंतचा. त्यावरून तिने कितीतरी वेळा जा ये केली असेल. पण त्या दिवशी तिला तो वेगळाच वाटला. काय वेगळं होतं त्या दिवशी? फक्त एक जाणीव. आपला बाप गेला आहे ह्याची. आता तो परत कधीही भेटणार नाही ह्याची. एक भयंकर अस्वस्थ करून टाकणारी जाणीव. सैरभैर अवस्थेत ती बापाच्या घरी पोचली. समोर ठेवलेल्या बापाच्या निश्चेतन देहाकडे बघून तिला भयंकर कसंतरी झालं. आपल्यातली सगळी शक्ती निघून गेली आहे असं वाटलं. इतका वेळ धीराने अडवलेले अश्रू बाहेर आले.
केवढा आधार होता तिला नुसता बापाच्या असण्याचा सुद्धा! बापाचं वय ७७. तिचं ५०. ह्या ५० वर्षात किती तरी वेळा बापनं तिला आधार दिला. सल्ला दिला. बाप म्हणून करायचं ते सगळं काही केलेचं पण त्याहीपेक्षा कितीतरी जास्तं. जगायचं कसं ते शिकवलं त्यानं. कधी मित्रं बनून तर कधी बाप बनून.
जेव्हा जेव्हा ती खचली, हरली तेव्हा तेव्हा बापनं तिला धीर दिला. अशावेळी तो साधचं काहीतरी बोलून जायचा आणि तिला त्यातून पुढचा मार्ग दिसायचा. जेव्हा जेव्हा ती जिंकली, यशस्वी झाली तेव्हा तेव्हा बापानं तिचं कौतुक केलं. तिचं छोटसं यशही त्यानं साजरं केलं. त्यापुढे अजून बरचं काही मिळवण्यासाठी तिला सतत प्रोत्साहनही दिलं.
बापचं असणं तिच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. कामाच्या व्यापात दिवसेंदिवस भेट झाली नाही तरीही फोनवरून ५ मिनिटं बोलणं तिच्यासाठी पुरेसं असायचं. जीवनातं काय काय घडतयं ह्याचा तपशील एकदा बापाला दिला की तिला बरं वाटायचं. काही चुका झाल्या असतील तर त्या एकदा बापासमोर बोलून दाखवल्या की तिला हलकं हलकं वाटायचं.
पण आता तो नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिला आणि एकाएकी गेला. त्याचं वय तसं झालेलं होतं पण तब्येत ठणठणीत होती. आज ना उद्या तो जाणार ह्याची तिला कल्पना होती. पण तरीही जेव्हा प्रत्यक्ष प्रसंग आला तेव्हा तो पेलणं फार अवघड गेलं तिला.
त्या दिवशी स्वतःच्या बापाबद्दल ती जे काही बोलली ते माझ्या बापानं मला सांगितलं. त्यावेळी तो तिथेच होता. मला म्हणाला की मी गेल्यानंतर तू माझ्याबद्दल जे काही बोलली असतीस ते आणि तसचं बोलली ती.
मी हादरले. मला अचानक तिच्या दुःखाची खोली जाणवल्यासारखं वाटलं. माझ्यावरचं तो प्रसंग आला आहे असं क्षणभर वाटलं.
मला माझ्या बापाच्या असण्याचा किती आधार आहे हे जाणवलं. आजपर्यंत कितीतरी अवघड प्रसंग आले माझ्या आयुष्यात. प्रत्येक वेळी माझ्या बापानं मला दिशा दाखवली. काय करू काय नको ते ही सांगितलं. मी ही त्याचं ऐकत गेले आणि माझं भलचं झालं.
त्या दिवशी मी त्याला विचारलं, "तू गेल्यावर मी काय करू? खूपच अवघड होउन बसेल सगळं माझ्यासाठी आणि तू ही नसशील नेहमीप्रमाणे मला सावरायला. "
तो हसला आणि म्हणाला, "अगं, मी आहे अजूनही. नाही जाते एव्हढ्यात! "
मी म्हटलं, "थट्टा सुचतीय तुला? तुला बरयं, तू जाशील निघून. मी कायं करू तेव्हा? "
तो म्हणाला, "काय करणार? २ दिवस दुःख कर आणि मग रोजच्या कामाला लाग. सगळे दैनंदीन व्यवहार चालू कर. मग आपोआप सगळं ठीक होइल. "
मी "बरं" म्हटलं. आणखीन तरी वेगळं काय करण्यासारखं होतं? मला फक्त बरं एवढचं वाटत होतं की माझा बाप जाईल तेव्हाच्या अशक्यप्राय वाटणारया प्रसंगाला कशी सामोरी जाउ ह्याचं उत्तर मी माझ्या बापाकडूनच मिळवलं होतं. आजपर्यंत प्रत्येक वेळी त्याचं ऐकत आले त्यामुळे ह्याही वेळी कितीही अवघड वाटलं तरीही त्याचं ऐकेन असं मनाशी ठरवून टाकलं होतं.
मग विचार आला की रोज हजारो जणं मरतात. त्यातले कितीतरी कोणाचे न कोणाचे तरी बाप असतीलच ना?
त्यांच्या मुलांनाही असचं वाटत असेल?

आजची शिकवणी .................

सकाळी आरुष चा फोन आला - "हॅलो मामा, आजी आहे का रे ? दे ना तिला, मला तिला काहीतरी सांगायचंय तिला", त्यानं एकदम गोड आवाजात सुरुवात केली.
"आजी नाहीये इथे, माझ्याशी बोल की रे आरुष" मी म्हणालो.
"नाही, तू आsधी आजीला फोsन देय ..."
"हम्म घ्या, आरश्याचा फोन आलाय, आजीशीच बोलायचं आहे म्हणे" मी खाली जाऊन आईला फोन दिला.
पुढची पाच मिनिटं आजी आणि नातवाचं फोनवर काय खुसुरफुसुर चालू होतं कोणास ठाऊक. फोन झाल्यावर मी आईला विचारलं, 
"काय म्हणाले साहेब ? साल्याला म्हणालो आजी नाहीये. माझ्याशी बोल, तर म्हणे मला माहितीये ती आहे घरात. मला आजीशीच बोलायचं आहे".
आई म्हणाली "मला म्हणाला, आजी; मी आणि आई आत्ता जेवायला येतोय थोड्या वेळानं. तू पनीरची भाजी कर हा माझ्यासाठी"
मी आईला ह्यावर "बर" असं उत्तर दिलं.
तितक्यात आई म्हणाली "शेजारच्या डेअरीत मिळेल का रे पनीर ?"

हे ऐकून मला काय झालं कोणास ठाऊक, चिडचीड चालू झाली. एकदम चिडून आईवर ओरडा आरडा सुरू केला
"बरोबर आहे, नातवानं सांगितलं करायला, आता लगेच करशील.. पनीर काय, अगदी पंचपक्वान्न पण करशील .. असली आहेस तू"
"अरे काहीपण काय बोलतोयस, तू सांगितल्यावर काही केलं नाहीये का ? नेहमी जो सांगशील तो पदार्थ करत आलेली आहे मी"
"हम्म , असू दे असू दे. मी कधी काही कर म्हणालो, तर लगेच 'अरे आता होत नाही मला ' असं म्हणत बसतेस. म्हणूनच हल्ली मी तुला काही बनवायला सांगणंच सोडून दिलंय. लहानपणापासून कधी लाड असे झालेच नाहीत. काही मागितलं की नेहमी ओरडे आणि फटकेच मिळत आले."
"अरे काय मूर्खासारखा बोलतोयस, त्या वेळेला होती का आपली परिस्थिती असले लाड पुरवायची ? आता  तू कमावता आहेस, घरी पैसे येत आहेत म्हणून हे शक्य होतंय ना ? 
तू जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट कर, असं म्हणालास , तेव्हा तेव्हा सगळं करून खायला घातलं आहे. रात्री उशिरा आलास, म्हणालास तांदळाची भाकरी कर. त्या दिवशी तांदळाच पीठ नव्हतं घरी. रात्री दहा ला कुठे कुठे हिंडून पीठ घेऊन आले आणि तुला भाकरी करून खायला घातली. परवाच इडली झाली, त्याआधी एकदा पाणीपुरी झाली. तरीसुद्घा असं कसं म्हणतोयस? आणि स्वतः:ची तुलना तू त्या पाच वर्षांच्या मुलाशी करतोस ?"
"हे बघ आई, त्याचे लाड करायचे नाहीत असं मी म्हणतंच नाहीये, आमचे कधी असले लाड झाले नाहीत ही खंत सांगतोय. आणि आत्ता मी जर असलं काहीतरी बनवायला सांगितलं असतं, तर तू दहा नाटकं केली असतीस"
"हे बघ, मला तुझा आरोप अजिबात मान्य नाही, प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळेला, मागेल तेव्हा मिळाली आहे. इतके दिवस काय हवा खाऊन मोठे नाही झालाय तुम्ही. आणि इतकं शिकलास ते शिक्षण काय फुकटात झालं का रे? मी कसे दिवस काढलेत ते माहितीये मला. सगळे गेले सोडून, एकटीला टाकून. आत्ता तुझा बाप जिवंत असता तर काय हाल झाले असते ह्याची कल्पना तरी आहे का तुला ?"
आता ह्यापुढे काही ऐकायची इच्छाच राहिली नव्हती. तडतडा मी वरच्या खोलीत निघून गेलो. खुर्चीत डोळे मिटून शांत बसलो. दोन तीन मिनिटांनी डोकं हळू हळू ठिकाणावर यायला लागलं.
आपल्यासाठी आईनं किती कष्ट केलेत आणि काय काय सोसलं आहे हे माहीत होतं आणि त्याचा अनुभवही होता. "ह्या बाईला आयुष्यात कधीही दुखवायचं नाही. जे काही जगायचं आणि करायचं ते हिच्यासाठीच" असं वारंवार मनाशी म्हणून पण आज मूर्खासारखा वागलो आणि रागाच्या भरात तिला काय वाटेल ते बोललो.
आम्ही सहा वर्षांवरून आज पंचविशीतले घोडे झालो. खूप शिकलो, चांगल्या ठिकाणी कामाला लागलो. काही वर्षांपूर्वी जे 'वार्षिक उत्पन्न' होतं, ते आज 'मासिक उत्पन्न' झालं. स्वतः:ला 'मोठे' समजायला लागलो.
पण आईसुद्धा आता साठीला पोचली हे आजपर्यंत कधी आमच्या माठ डोसक्यात शिरलंच नाही. आई मात्र चाळिशीमधलीच राहिली. ती त्याच तन्मयतेनं आमच्यासाठी झटत राहिली. हे इतकं सहज चालू होतं की आम्हाला समजलंच नाही.
डोळ्यांच्या कडा अलगद पाणावल्या. आपण काय घोडचूक केली ते लक्षात आलं. 'बागबान' मधल्या अमिताभच्या मुलांमध्ये आणि आपल्यात काही फरक राहिला नाही असं मनाला वाटून गेलं.
चूक तर समजली होती. पण आता माफी कशी मागणार ? -- "'आई' मला माफ कर, चुकलो मी, उगाच बोललो तुला काय वाटेल ते.. परत नाही करणार ..." अशी ? छे छे .. मनातल्या इगोला कुठंतरी हे पटत नव्हतं. पण माफी मागणं महत्त्वाचं आणि जरुरीचं तर होतं.
मनात म्हटलं बघू, आधी इथून खालच्या खोलीत तर जाऊ. मग पुढचं पुढे बघू.
हळूच पायऱ्या उतरत खालच्या खोलीत आलो. ती केर काढत होती. पटकन तिला नमस्कार केला आणि हळूच तिचा हसत हसत लाडात येऊन गालगुच्चा घेतला. 'आय एम शोल्ली आई .. ...'
माझे पाणावलेले डोळे तिच्या नजरेतून सुटले नाहीत.
"हम्म , चूक कळली ना स्वतः:ची, जावा आता, ऑफिस ला उशीर होतोय." 
ह्यावर मी फक्त "हो" म्हणालो, चावी आणि हेल्मेट घेतलं आणि जाता जाता म्हणालो "शेजारच्या डेअरीमध्ये पनीर नाही मिळणार, गणपतीच्या मंदिराशेजारी जे दुकान आहे तिथे मिळेल".