Friday, 4 May 2012

निर्णय

डोळे पुसत पुसत मानसी घराबाहेर पडली. घरी तिचे बाबा अगदी रागारागाने लाल होऊन तिच्या आईशी बोलत होते. "बघितलंस ना, पुढे शिकवण्याचे परिणाम. म्हणे करू दे ना तिला कॉलेज, करू दे ना नोकरी. बघा आता बाप बोलत असताना समोर थांबायची पण शिस्त राहिली नाही यांच्यात. " आईला कळत नव्हतं की काय बोलावं. दोन्ही बाजूंनी तिलाच त्रास होत होता. आता ही पोरगी गाडीवर जाईल कुठेतरी रागारागात, नीट चालवेल, काय करेल काय माहीत. मानसीने गाडी जी मारली होती ती थेट अभीच्या घरी . दरवाजा अभीनेच उघडला. तिला असं तावातावाने आलेलं पाहून तोही जरा दचकलाच. ती काहीतरी बोलणार इतक्यात अभीची आई बाहेर आली. त्यांना पाहिल्यावर मात्र तिला जाणीव झाली की आपला चेहरा सगळेच भाव सांगतोय. मग आत येऊन तिने कसलंसं कामाचं कारण सांगून अभीला सोबतच घेऊनच त्यांच्या घराबाहेर पडली. अर्थात काय झालं असावं याची कल्पना अभीला होतीच.
रडत रडतच मानसी त्याला विचारत होती, " अरे पण आपल्याला काही तरी निर्णय घ्यावाच लागेल ना?".
" हो गं, मान्य आहे मला. पण असा घाईत कुठलाही निर्णय घेऊन चालणार आहे का?"
"घाई? कसली घाई? पाच वर्षे होऊन गेली आपल्या लग्नाला. याहून अधिक वेळ काय घेणार विचार करायला? तुला माझ्यावर, तुझ्यावर विश्वास नाहीये का?"
"तसं नाही गं. पण आई-बाबांचा पाठिंबा असेल तर गोष्ट वेगळी असते. "
"मला मान्य आहे रे, पण असं किती दिवस चालणार? कधी ना कधी तरी हे सर्व ठरवावंच लागेल ना?".
आता हा संवाद त्या दोघांचा कमीत कमी शंभर वेळा झाला असेल गेल्या काही महिन्यात.गेल्या काही दिवसांपासून दोघांच्याही घरी तणावाचं वातावरण होतं. मानसी-अभीच्या लग्नाला आता पाच वर्षे होऊन गेली. सुरुवातीचे काही वर्षे करियर करायचं म्हणून त्यांनी कुटुंबनियोजनाचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतरही दोन अडीच वर्षं होऊन गेली.आता तर नातेवाईकच काय घरच्यांना, या दोघांनाही काळजी वाटू लागली होती. मग तपासण्या, औषधे, उपास-तापास, नवस सगळं करून झालं पण कशाचाही गुण येईना. थोड्याच दिवसांपूर्वी डॉक्टरनेही 'दत्तक' घेण्याचा उपाय सुचवला होता. मानसीला तर काही कळतच नव्हतं की अशा परिस्थितीत करावं काय?
पण जसजसे दिवस जाऊ लागले तिला अजूनच अस्वस्थ होऊ लागलं. तिला दत्तक घेऊन का होईना बाळ हवंच होतं. तर अभीच्या घरचेच काय, तिचे बाबाही अगदी याविरुद्ध होते. तसे त्यांनी तिला बरचसं स्वातंत्र्य दिलं होतं पण तिचे बाबा थोडे जुन्या विचारांचे होते पहिल्यापासूनच. त्यांच्या दृष्टीने समाज, जात वगैरे गोष्टींचा संसारावर बराचसा प्रभाव असतो. कुठलेही कार्य करताना आपल्या मित्रांची, नातेवाईकांची मान्यता असणे फारच गरजेचं होतं. दत्तक घेतलेलं मूल कुठलं असेल, कुणाचं असेल कसं असेल असे अनेक प्रश्न त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यामुळे तिने आपल्या मताबद्दल सांगितल्यावर घरी साम,दाम,दंड.भेद सगळे प्रयत्न झाले होते. प्रत्येक हिंदी सिनेमात दाखवतात तसे सीनही झाले होते.अगदी निरुपा राय पासून ते पृथ्वीराज कपूरपर्यंत. त्याच्याही घरी सगळं काही सोपं नव्हतं. एकुलता एक मुलगा असा आई बाबांच्या विरोधात गेल्यावर त्यांना वाईट वाटणारच ना? त्यांनाही स्वत:च्या घराला वारस हवाच होता, तोही आपला,सख्खा. त्यालाही माहीत होतं की तोच त्यांचा आधार आहे तर मानसीला होणारा त्रासही त्याला समजत होता. तरीही त्याचा निर्णय काही पक्का होत नव्हता.
भांडणं वाढतंच राहतील म्हणून मानसी आई-बाबांसोबत राहतं होती थोडे दिवस. तिला वाटलं की वेळ दिल्यावर, एकटं असताना नीट विचार करायला अभीलाही मदत होईल. पण तीन महीने होऊन गेले तरी याचा काही निर्णय घेण्याचा निश्चय दिसत नव्हता.मानसीला अभीच्या अशा अधांतरी वागण्याने अजूनच त्रास होत होता. आता जेव्हढं काही हातात होतं ते सगळं करून झालं होतं, मग कशाची वाट बघत होता तो? की सगळे प्रश्न काळावर सोडले की झालं? तिला असं वाटलं की इतक्या वर्षात कधीच कसं जाणवलं नाही मला की हा असा कधी वागेल म्हणून? आजही नेहमीसारखाच तोच तो वाद घालून मानसी घरी आली होती. तिला आता भांडणाचाही कंटाळा आला होता.घरचा विरोध, नातेवाईकांचा कधीच नसलेला सपोर्ट आणि अभीच्या अशा वागण्याला कंटाळली होती ती. तिला निराशपणे घरी आलेलं पाहून आईचा जीव कासावीस झाला. तिचं दु:खं आईला नाहीतर कुणाला समजणार? तिच्या आईने आजपर्यंत तिला सगळ्याच बाबतीत पाठिंबा दिला, जिथे तिला स्वत:लाही माहीत नव्हतं की ती एखादी गोष्ट करू शकते की नाही तिथे आईने तिच्यावर विश्वास दाखविला होता. आज मानसीला असं हरलेलं पाहणं तिच्या आईला अवघड जात होतं.
घरीयेईपर्यंत रोखलेला बांध आईच्या मिठीत आल्यावर मात्र मानसीला आवरता आला नाही. तिला हवं तसं रडू दिल्यावर तिच्या आईने तिला सांगितलं, "हे बघ मनू, मी तुला आजपर्यंत पाठिंबा देत आले आहे आणि यापुढेही देईन पण ज्याचा त्याचा निर्णय त्यानेच घ्यावा लागतो. तू विचार कर तुला काय हवंय/नकोय याचा आणि तू घेशील तो निर्णय योग्यच असेल याची मला खात्री आहे."
मानसी पुढच्यावेळी अभीला भेटली तेव्हा तिने त्याला सांगितलं," अभी मी निर्णय घेतेय. म्हणजे मला असं नको होतं की संसारात कुठलाही निर्णय असा कुणीही एकाने घ्यावा. पण आता मी घेतेय. मला मूल दत्तक घ्यायचंय आणि तुला ते पटत नसेल तर आपल्या दोघांनी सोबत राहणं शक्य नाहीये. मी तुला,आपल्याला पुरेसा वेळ दिला होता विचार करायला आणि तू त्याचा काहीच उपयोग केला नाहीस. तुला सगळ्यांचाच विचार करायचा होता आणि प्रत्येकाला खूश ठेवायचं होतं. का? तर नाखूश माणसाचा रोष घ्यायची हिंमत नव्हती? हे बघ, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला निर्णय घ्यावेच लागतात. त्यातले सगळेच बरोबर असतील असं नाही आणि तुला खरं सांगते माझा हा ही निर्णय कदाचित चुकीचा असेल. पण तो माझा निर्णय असेल. त्याचे जे काही परिणाम असतील तेही भोगायची माझी तयारी आहे, पण ते परिणामही माझ्या निर्णयाचे असतील. त्यामुळे मला परिस्थितीला तोंड देताना, झगडताना वाईट वाटणार नाही की जेव्हा मला संधी होती तेव्हा मी काहीच केलं नाही. जेव्हा आपण काही न करता बघत राहतो ना तेव्हाच आपण दुसऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर आपलं नशीब सोपवतो. आणि मग दुसऱ्यांच्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतात. मला ते नकोय, म्हणूनच मी निर्णय घेतेय ! "

No comments:

Post a Comment