सकाळी आरुष चा फोन आला - "हॅलो मामा, आजी आहे का रे ? दे ना तिला, मला तिला काहीतरी सांगायचंय तिला", त्यानं एकदम गोड आवाजात सुरुवात केली.
"आजी नाहीये इथे, माझ्याशी बोल की रे आरुष" मी म्हणालो.
"नाही, तू आsधी आजीला फोsन देय ..."
"हम्म घ्या, आरश्याचा फोन आलाय, आजीशीच बोलायचं आहे म्हणे" मी खाली जाऊन आईला फोन दिला.
पुढची पाच मिनिटं आजी आणि नातवाचं फोनवर काय खुसुरफुसुर चालू होतं कोणास ठाऊक. फोन झाल्यावर मी आईला विचारलं,
"काय म्हणाले साहेब ? साल्याला म्हणालो आजी नाहीये. माझ्याशी बोल, तर म्हणे मला माहितीये ती आहे घरात. मला आजीशीच बोलायचं आहे".
आई म्हणाली "मला म्हणाला, आजी; मी आणि आई आत्ता जेवायला येतोय थोड्या वेळानं. तू पनीरची भाजी कर हा माझ्यासाठी"
मी आईला ह्यावर "बर" असं उत्तर दिलं.
तितक्यात आई म्हणाली "शेजारच्या डेअरीत मिळेल का रे पनीर ?"
हे ऐकून मला काय झालं कोणास ठाऊक, चिडचीड चालू झाली. एकदम चिडून आईवर ओरडा आरडा सुरू केला
"बरोबर आहे, नातवानं सांगितलं करायला, आता लगेच करशील.. पनीर काय, अगदी पंचपक्वान्न पण करशील .. असली आहेस तू"
"अरे काहीपण काय बोलतोयस, तू सांगितल्यावर काही केलं नाहीये का ? नेहमी जो सांगशील तो पदार्थ करत आलेली आहे मी"
"हम्म , असू दे असू दे. मी कधी काही कर म्हणालो, तर लगेच 'अरे आता होत नाही मला ' असं म्हणत बसतेस. म्हणूनच हल्ली मी तुला काही बनवायला सांगणंच सोडून दिलंय. लहानपणापासून कधी लाड असे झालेच नाहीत. काही मागितलं की नेहमी ओरडे आणि फटकेच मिळत आले."
"अरे काय मूर्खासारखा बोलतोयस, त्या वेळेला होती का आपली परिस्थिती असले लाड पुरवायची ? आता तू कमावता आहेस, घरी पैसे येत आहेत म्हणून हे शक्य होतंय ना ?
तू जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट कर, असं म्हणालास , तेव्हा तेव्हा सगळं करून खायला घातलं आहे. रात्री उशिरा आलास, म्हणालास तांदळाची भाकरी कर. त्या दिवशी तांदळाच पीठ नव्हतं घरी. रात्री दहा ला कुठे कुठे हिंडून पीठ घेऊन आले आणि तुला भाकरी करून खायला घातली. परवाच इडली झाली, त्याआधी एकदा पाणीपुरी झाली. तरीसुद्घा असं कसं म्हणतोयस? आणि स्वतः:ची तुलना तू त्या पाच वर्षांच्या मुलाशी करतोस ?"
"हे बघ आई, त्याचे लाड करायचे नाहीत असं मी म्हणतंच नाहीये, आमचे कधी असले लाड झाले नाहीत ही खंत सांगतोय. आणि आत्ता मी जर असलं काहीतरी बनवायला सांगितलं असतं, तर तू दहा नाटकं केली असतीस"
"हे बघ, मला तुझा आरोप अजिबात मान्य नाही, प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळेला, मागेल तेव्हा मिळाली आहे. इतके दिवस काय हवा खाऊन मोठे नाही झालाय तुम्ही. आणि इतकं शिकलास ते शिक्षण काय फुकटात झालं का रे? मी कसे दिवस काढलेत ते माहितीये मला. सगळे गेले सोडून, एकटीला टाकून. आत्ता तुझा बाप जिवंत असता तर काय हाल झाले असते ह्याची कल्पना तरी आहे का तुला ?"
आता ह्यापुढे काही ऐकायची इच्छाच राहिली नव्हती. तडतडा मी वरच्या खोलीत निघून गेलो. खुर्चीत डोळे मिटून शांत बसलो. दोन तीन मिनिटांनी डोकं हळू हळू ठिकाणावर यायला लागलं.
आपल्यासाठी आईनं किती कष्ट केलेत आणि काय काय सोसलं आहे हे माहीत होतं आणि त्याचा अनुभवही होता. "ह्या बाईला आयुष्यात कधीही दुखवायचं नाही. जे काही जगायचं आणि करायचं ते हिच्यासाठीच" असं वारंवार मनाशी म्हणून पण आज मूर्खासारखा वागलो आणि रागाच्या भरात तिला काय वाटेल ते बोललो.
आम्ही सहा वर्षांवरून आज पंचविशीतले घोडे झालो. खूप शिकलो, चांगल्या ठिकाणी कामाला लागलो. काही वर्षांपूर्वी जे 'वार्षिक उत्पन्न' होतं, ते आज 'मासिक उत्पन्न' झालं. स्वतः:ला 'मोठे' समजायला लागलो.
पण आईसुद्धा आता साठीला पोचली हे आजपर्यंत कधी आमच्या माठ डोसक्यात शिरलंच नाही. आई मात्र चाळिशीमधलीच राहिली. ती त्याच तन्मयतेनं आमच्यासाठी झटत राहिली. हे इतकं सहज चालू होतं की आम्हाला समजलंच नाही.
डोळ्यांच्या कडा अलगद पाणावल्या. आपण काय घोडचूक केली ते लक्षात आलं. 'बागबान' मधल्या अमिताभच्या मुलांमध्ये आणि आपल्यात काही फरक राहिला नाही असं मनाला वाटून गेलं.
चूक तर समजली होती. पण आता माफी कशी मागणार ? -- "'आई' मला माफ कर, चुकलो मी, उगाच बोललो तुला काय वाटेल ते.. परत नाही करणार ..." अशी ? छे छे .. मनातल्या इगोला कुठंतरी हे पटत नव्हतं. पण माफी मागणं महत्त्वाचं आणि जरुरीचं तर होतं.
मनात म्हटलं बघू, आधी इथून खालच्या खोलीत तर जाऊ. मग पुढचं पुढे बघू.
हळूच पायऱ्या उतरत खालच्या खोलीत आलो. ती केर काढत होती. पटकन तिला नमस्कार केला आणि हळूच तिचा हसत हसत लाडात येऊन गालगुच्चा घेतला. 'आय एम शोल्ली आई .. ...'
माझे पाणावलेले डोळे तिच्या नजरेतून सुटले नाहीत.
"हम्म , चूक कळली ना स्वतः:ची, जावा आता, ऑफिस ला उशीर होतोय."
ह्यावर मी फक्त "हो" म्हणालो, चावी आणि हेल्मेट घेतलं आणि जाता जाता म्हणालो "शेजारच्या डेअरीमध्ये पनीर नाही मिळणार, गणपतीच्या मंदिराशेजारी जे दुकान आहे तिथे मिळेल".
No comments:
Post a Comment