Tuesday 10 February 2015

इच्छामरण

मी माझ्या अर्ध्या भारतीय आणि अर्ध्या अमेरिकन कुटुंबासह नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या धांदलीमध्ये होतो. त्यातच पूर्वीच्या परिचितांशी पुन्हा धागेदोरे जोडण्याचाही प्रयत्न चालू होता. पण तरीही रहीमच्या लगबगीवर माझं लक्ष होतं. त्याच्या अंगात नेहमीच धावपळीचं भूत संचारलेलं असायचं. कितीतरी वेळा मला वाटलं की त्याला बोलावून विचारावं की अरे, तुला नेहमी एवढी घाई कशाची झालेली असते? पण जेव्हा जेव्हा हा विचार मनात आला तेव्हा तेव्हा काही तरी कारणानं ते राहून गेलं. कधी कोणी पेशंट सीरियस व्हायचा, कधी कोणी बाहेरचे डॉक्टर आलेले असायचे, कधी ऑक्सिजनची सिलिंडरं येऊन पडली आहेत असा निरोप यायचा आणि मग ती आणण्याची  व्यवस्था करायला लागायची तर कधी आणखी काही.

त्याचं घर जवळच होतं. आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक दोन-तीन खोल्यांचं आऊटऱ्हाऊस होतं, साधारणपणे सगळ्या बंगल्यांमध्ये असतात तसंच. त्याच आऊटऱ्हाऊसमध्ये त्याचे आजोबा पण रहात होते. माझ्या लहानपणाच्या आठवणींमध्ये त्यांच्या आठवणी खूप आहेत. ते मला बग्गीतून शाळेत सोडत असत आणि पुन्हा शाळेतून घरी घेऊन येत असत. त्यांच्या रिकाम्या वेळात कधी कधी ते मला उर्दू लिपी देखील शिकवत असत. बंगल्याच्या भोवती असलेल्या झाडांना ते पाणी देत. फक्त फुलझाडांनाच नाही तर आंबा, चिंच अशा झाडांनाही ते पाणी घालत असत. मोठ्या झाडांना पाणी घालताना पाहून मी त्यांना विचारलं होतं, "जंगलातल्या मोठ्या वृक्षांना कुठे पाणी घालतात, मग ह्यांना कशाला घालायचं?" त्यावर ते म्हणाले होते, "हो, तुझं बरोबर आहे, पण हे बघ, माणसाला सुद्धा दोन दिवसातून एकदा जेवण आणि दोन पेले पाणी एवढंच दिलं तरी तो काही मरणार नाही. पण ते जगणं निराळं! खरं तर दिवसातून एकदा पाणी मिळणं हा प्रत्येकाचा हक्कच आहे. निसर्गाला झाडं काय, माणसं काय सगळे सारखेच."

काही दिवसांतच बाबांनी पोलिस खात्यात वरच्या हुद्द्यावर असलेल्या आपल्या एका मित्राला सांगून त्यांना पोलिस खात्यात नोकरी मिळवून दिली होती. मग त्यांच्या जागी रहीमचे वडील खालिद मियॉं आमच्याकडे काम करायला लागले. खालिद मियॉं मध्यम बांध्याचे होते. त्यांना टापटिपीची आवड होती. व्यवस्थित कापलेली छोटीशी दाढी त्यांना खूपच शोभून दिसायची. दिवसातून दोन वेळा नमाज पढणं आणि स्वतःची कामं करणं यांना लागणारा वेळ सोडून ते जवळजवळ चोवीस तास कामावर असायचे. 

मी डॉक्टर होऊन हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा सगळ्यांना आनंद झाला. मी बाबांच्या टेबलाजवळच खुर्ची घेऊन बसायचो. सुरुवातीला लोक मला ’छोटे डाक’ म्हणायचे. ते त्यांना अजिबात पसंत नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की अशी नावं एकदा चिकटली की कायम चिकटूनच राहतात. ते सांगायचे "’छोटे डाक’ नाही, ’नवे डॉक्टरसाहेब’ म्हणा." 

बाबांच्या बरोबर काम करायला सुरुवात करून थोडेच दिवस झाले होते, तेवढ्यात माझ्यापुढे एम.डी. करण्याची संधी चालून आली. मी पुन्हा महाविद्यालय आणि वसतिगृह ह्या विश्वात आलो. तेव्हा   फास्टर नावाचे एक डॉक्टर आम्हाला शिकवत असत. त्यांच्या शेवटच्या तासाला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, "एका उत्तम डॉक्टरला एक चांगला मानसशास्त्रज्ञ देखील असावं लागतं. ज्या पेशंटजवळ स्वतः बरं होण्याची फारशी इच्छा नसते, जो निराशा किंवा नकारात्मक विचारांनी ग्रासलेला असतो त्याला बरं करणं जवळजवळ अशक्यच असतं. पण ज्याच्याजवळ जिवंत राहण्याची तीव्र इच्छाशक्ती असते त्याच्याकडून डॉक्टरला चांगलं सहकार्य मिळतं. असे पेशंट बरे होण्याचं प्रमाण खूप असतं. अर्थात विज्ञानालाही आपल्या मर्यादा आहेत."

एम.डी.ची शेवटची परीक्षा संपली न संपली तोच आई गेली. घरातल्या कुणाचा मृत्यू मी प्रथमच पाहात होतो. बाबा पहाडी भागातल्या आमच्या छोट्याश्या गावातील सर्वात व्यग्र डॉक्टर होते. आईने अनेक वेळा सांगूनही ते माझ्या वाढदिवसाला कधी वेळेवर घरी आले नव्हते. इतकंच नाही तर सणाच्या दिवशी पूजेलासुद्धा ते कधी वेळेवर येऊ शकत नसत. त्यामुळे माझी त्यांच्याशी जवळीक अशी कधी झालीच नाही. ते त्यांच्या कामात अतिशय व्यग्र असल्याने अशा कार्यक्रमांतील त्यांची अनुपस्थिती आम्ही चालवून घेत होतो. तसं पाहिलं तर त्यांचं वागणं अगदी सौजन्यपूर्ण होतं आणि आम्हाला काय हवे असेल ते देण्याच्या बाबतीत ते अगदी उदार अंतःकरणाचे होते. घरगुती गोष्टी, नातलगांकडे जाणंयेणं, देणंघेणं ह्या बाबतीत त्यांनी आईला कधीही विरोध केला नाही. पण आईला ह्याहीपेक्षा आणखी काही तरी जास्त महत्त्वाचं वाटत होतं. तिला बाबांचा वेळ हवा होता, स्वतःसाठी, माझ्यासाठी आणि घरासाठीही! पण तो तिला कधीच मिळाला नाही. त्यामुळे आई गेल्यावर माझ्या मनातली घर नावाची वस्तू धडाधड कोसळून गेली. मी तेव्हा तसा मोठा होतो आणि पहाडी भागातल्या छोट्याश्या गावातल्या डॉक्टरवर केवढी जबाबदारी असते याची मला पूर्ण कल्पना होती. पण रात्री अकरा-अकरा वाजेपर्यंत वाट बघणाऱ्या आणि तेव्हा अन्न गरम करून बाबांना वाढणाऱ्या आईची आठवण झाली की बाबांचं वागणं क्षम्य वाटत नसे. आईचे सगळे अंत्यविधी पुरे करून मी परत वसतिगृहात आलो.

त्यावेळी महाविद्यालयाला सुट्टी लागली होती आणि विद्यार्थी आपापल्या घरी गेले होते. प्राध्यापक  निवासात फक्त डॉ.फास्टर होते आणि विद्यार्थी वसतिगृहात मी एकटा. हे माझ्या पथ्यावर पडलं आणि सरांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीत वेळ घालवायला साधन मिळाल्यासारखं झालं. त्यांनी आपले कितीतरी अनुभव त्यावेळी मला सांगितले. नवी औषधं, नवे शोध, नवनवे प्रयोग आणि त्यांचे समाजाला उपयोग ह्याबद्दलचं ज्ञान त्यांनी मला दिलं. ते नेहमी संगणकासमोर बसून आंतरजालावर वैद्यकीय माहिती वाचत असत. त्यांच्या नेहमीच्या वर्गात मी शंभर मुलांमधला एक असायचो पण आता मात्र एकट्याने त्यांच्याकडून शिकण्याचं भाग्य मला मिळालं.

एम.डी.च्या निकालानंतर मला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. बाबांना हे सांगितल्यावर त्यांनी आनंदानं परवानगी दिली. त्यावेळी ’फॉरेन रिटर्न  डॉक्टर’ची क्रेझ होती. पण मी एकदा तिथे पोहोचल्यावर तिथल्या आयुष्यात इतका गुरफटलो की फक्त ’क्रेझ’ राहिली आणि ’रिटर्न’ विसरलो! मधल्या काळात मी माझी अमेरिकन सहकारी डॉक्टर नॅन्सी हिच्याशी विवाह केला. नॅन्सी तिथली स्त्रीरोगतज्ञ होती. शहरातल्या सगळ्या पंजाबी, गुजराती लोकांशी ती हिंदीत बोलायची. त्यांनाही ते आवडायचं. खरं तर त्यांना स्वतःला हिंदी फारशी फारशी येत नसे. कारण त्यांची मातृभाषा वेगळी होती, अमेरिकेत रहायचं तर इंग्रजी यायला पाहिजे म्हणून ते इंग्रजी शिकले होते. हिंदी त्यांच्यासाठी तिसरी भाषा होती. तिथे गेलेल्या आधीच्या पिढीतल्या भारतीयांना तर डॉ.नॅन्सी सारख्या अमेरिकन डॉक्टरनं आपल्या भारतीय डॉक्टरशी लग्न केलं आणि ती हिंदी बोलते ह्याचाच आनंद व्हायचा. ते बोलूनही दाखवायचे, "वुई आर सो ग्लॅड बिकॉज यू स्पीक हिंदी सो फ्लूएंटली. बट वुई कान्ट अंडर्स्टॅंड हिंदी."

इथलं मोठं घर, फार्म हाऊस, सर्वांच्या पासबुकात जरुरीपेक्षा किती तरी जास्त डॉलर्स! दहा वर्षं कशी गेली कळलंच नाही. बाबा गेल्याचा फोन आला आणि एखाद्या गुंगीतून बाहेर यावं तसं माझं झालं. माझं पहाडातलं गाव, तिथलं माझं घर, आमचं  नर्सिंग होम आठवलं. मागचं आउट हाऊस, परसातल्या आंब्याच्या मोहोराचा सुगंध, मला शाळेत नेणारी बग्गी, ती बग्गी ओढणारी पांढरी घोडी- हे सर्व डोळ्यांसमोर आलं. आणि ह्याबरोबरच आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट - आता नर्सिंग होमवर अवलंबून असलेल्या जवळजवळ चाळीस कुटुंबांचं काय होणार? 

माझ्या मनात चाललेली खळबळ नॅन्सीच्या लक्षात आली होती आणि त्यामुळे ती पण जरा  घाबरली होती. खरं तर तिनं भारत फक्त नकाशातच पाहिला होता आणि एकदा दूरचित्रवाणीवर एका कार्यक्रमात विधानसभेच्या अधिवेशनातील काही भाग दाखवत होते तेव्हा
एका आमदारानं एका मंत्र्याचं धोतर खेचलं होतं तो प्रसंग तिच्या पाहण्यात आला होता. घाईघाईत काही तरी निर्णय घेऊन तिला अडचणीत टाकायची माझी इच्छा नव्हती. आमची मुलं आता अशा वयाची होती की हा बदल त्यांच्या भविष्यकाळावर मोठा परिणाम करणारा ठरणार होता. इथे त्यांना चांगलं शिक्षण मिळणार होतं, अनेक संधी उपलब्ध होत्या. मला ग्रीन कार्ड मिळालं होतं. आम्हा दोघांना कामाचं समाधान आणि पैसा- दोन्ही भरपूर मिळत होता. आमचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही उज्ज्वल म्हणावेत असे होते. इथल्या सुखासीन, सुरक्षित आयुष्याची आम्हाला सवय झालेली होती. 

आठवडाभर मी उलटसुलट विचार करत होतो पण काही निर्णय घेऊ शकलो नव्हतो. माझं रोजचं काम नेहमीसारखं चालू होतं. नॅन्सीशी मी ह्या गोष्टीवर काहीच चर्चा केली नव्हती. पण बहुतेक तिच्या मनात पण हेच विचार चालले होते. रविवारी सकाळी मी तिला पंजाबी ड्रेस मध्ये पाहिलं आणि ती आज चर्चमध्ये जाणार नसावी असा मी अंदाज केला. माझ्यासमोर नाश्त्याची बशी ठेवत ती म्हणाली, "आयुष्यात भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणं बरोबर नाही पण केवळ बुद्धीच्या आधारावरही आयुष्य जगता येत नाही."

मी म्हटलं, "तू काय म्हणतीयस?"

"आपण भारतात जायचं. मी हॉस्पिटलला फोन केला आहे. आपल्या दोन मुलांच्या भविष्यासाठी पहाडात राहणाऱ्या त्या हजारो लोकांची जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही."

तिनं हे सगळं इतकं चटकन आणि सहजपणे सांगितलं की मी अवाक झालो. जरा थांबून मी विचारलं, "तुला आज चर्चमध्ये जायचं नाही का? आज रविवार आहे!" 

त्यावर ती म्हणाली, "नाही. मी प्रॉपर्टी डीलरला फोन करून त्याला भेटायची वेळ ठरवली आहे. त्याचं ऑफिस रविवारी देखील चालू असतं."

जेमतेम एका आठवड्यानंतर आम्ही दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरलो. तिथून आमच्या पहाडी गावापर्यंत जाण्यासाठी आम्ही टॅक्सी ठरवली. सबंध रस्त्यात माझ्या डोक्यात हॉस्पिटलशिवाय दुसरे विचार नव्हते. मुलं पण गप्प गप्प होती. नॅन्सी गंभीर होती. तिच्याही डोक्यात तिच्या स्त्रीरोगविभागाबद्दल काही योजना चालू असाव्यात. सोनोग्राफीला लागणारी आणि इतर काही उपकरणं तिनं बरोबर आणली होतीच. 

घरी पोहोचल्यावर पाहिलं तर वातावरण बदललेलं होतं. बंगल्याचं कौलारू छप्पर जाऊन तिथे कॉंक्रीटची स्लॅब आली होती. हॉस्पिटलची बिल्डिंग आधुनिक झाली होती आणि इतरही सुधारणा झाल्या होत्या. बाबा एक चांगले आणि जबाबदार डॉक्टर होते. सगळ्या विभागांचं काम स्वतः बघत असत. शिवाय आठवड्यातून काही दिवस डेहराडूनहून स्पेशालिस्ट येत असत. काही जणांचे ऑपरेशनचे वारही ठरलेले होते. एक जोशी नावाचे ज्युनियर डॉक्टर नियमित यायला लागले होते. ते मुख्यत्वे पेशंटचा फॉलो-अप बघत असत. 

रहीम बंगल्याच्या मागच्या त्याच आऊटऱ्हाऊसमध्ये रहात होता. त्याच्या वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. रहीम कॉलेजमध्ये जात होता आणि हॉस्पिटलमध्ये कामही करत होता.  त्याची आजी पण तिथे होती. आजीला आजोबांची पेन्शन मिळत होती. वडिलांनी हॉस्पिटलमध्ये कुटुंब नियोजनाचा प्रचार आणि प्रसार  करता करता  स्वतः मात्र रहीमच्या मागे मुलांची पलटण उभी करून ठेवली होती! एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी आजीची पेन्शन आणि रहीमचा पगार एवढंच होतं. रहीमची आई पडद्याची प्रथा बाजूला सारून परसात भाज्या वगैरे लावायची. मुलांपैकी मुलगे शाळेत जायचे, मुली घरीच असायच्या.

रहीमचे वडील खालिदमियॉं हॉस्पिटलमध्ये जे काम करायचे, साधारण तेच काम रहीम करायचा. स्वयंपाकी, पाणक्या, शिपाई- थोडक्यात पडेल ते काम तो करायचा. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधी माझं आणि नॅन्सीचं टेबल नीट लावून ठेवायचा, झटकण्यानं धूळ साफ करायचा.

थोड्या दिवसांपूर्वी तो आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. आजी खूप वृद्ध, कमरेत वाकलेली असूनही मोठ्या हिमतीची वाटत होती. ती आपल्या तब्बेतीला जपून असायची. बहुतेक ह्या वयातले लोक असंच वागतात. एखादा कंजूस माणूस आपल्याजवळ असणारा थोडाफार पैसा सुद्धा कसा सांभाळून ठेवतो तसंच हे लोक आपलं उरलंसुरलं आयुष्य जपतात. त्यामुळे ती तशी हॉस्पिटलात बऱ्याचदा यायची. सिस्टर्स, कंपाउंडर तिच्याशी प्रेमादराने वागत. काल आली होती तेव्हा सिस्टर राबिया तिला गमतीत म्हणाली, "काय आजी, अल्लाच्या घरी जायचं नाही का?" तेवढ्यात रहीम कुठूनतरी एकदम टपकला आणि म्हणाला, "आजी, मी बी.एस्सी. होईपर्यंत जायचं नाही हं. नाहीतर आमचं सगळं संपलंच!"  आजी विश्वासानं म्हणाली, "नाही जाणार बाबा, मला पण काळजी आहे नं! पण एकदा तुझं शिक्षण झालं की मग मात्र मला अडवू नकोस. आता कंटाळा आला ह्या जगण्याचा." रहीम पण अगदी विश्वासानं  म्हणाला, "आजी हे शेवटचं वर्ष आहे. त्यानंतर तुला अडवणार नाही. बी.एस्सी.चा निकाल आणता आणताच कब्रस्तानात जागा बघून येईन."

आमच्याकडे रविवारच्या संध्याकाळला ’थॅंक्यू अवर इविनिंग’ म्हणतात. ह्यावेळी हॉस्पिटलचे कर्मचारी आणि त्यांचे आईवडील बाळ-बाळंतिणीला दाखवायला घेऊन येत असत. ह्याच वेळी मी हॉस्पिटलची काही प्रशासनिक कामं पण बघायचो. कर्मचारी आपल्या काही अडचणी सांगायला येत असत. सुट्ट्या मंजूर करणं, ड्यूट्यांचं वेळापत्रक ठरवणं ही कामं पण तेव्हा होत. एकूण वातावरण जरा सैल असायचं. खाणंपिणं, गप्पाटप्पा पण व्हायच्या. इतर दिवशी हे शक्य नसायचं. 

नॅन्सी बीझी असायची. त्या भागात सोनोग्राफीची सोय फार थोडया ठिकाणी होती. शिवाय हिंदी बोलणारी अमेरिकन स्त्रीरोगतज्ञ म्हटल्यावर तिच्याकडे पेशंटांची नेहमी गर्दी असायची. पण तरीही ती त्रासलेली नसायची. अमेरिकेतल्यासारखी तिला इथे ठराविक वेगाने गाडी चालवावी लागत नव्हती. रोजच्या जरुरीच्या वस्तूंसाठी लांब लांब जायला लागत नव्हतं. तिला इथलं निसर्गसौंदर्य, छोटेछोटे धबधबे, देवदार वृक्ष आणि समोर हिमालयाची पवित्र शिखरं हे सगळं आवडत होतं. मुलांना आम्ही बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं होतं. 

आमच्या बंगल्याची खिडकी आऊटऱ्हाऊसच्या बाजूलाच उघडत असे. मला तिथून रहीमच्या घरात काय चाललंय ते दिसायचं. रहीम आजीची जरा जास्तच काळजी घ्यायचा असं मला वाटायचं. खरं म्हणजे त्याच्या आईची तब्बेतही यथातथाच होती. पण मुलांचा ओढा बहुधा आजीकडे जास्त असतो असं मला वाटतं. कदाचित त्याच्या सुप्त मनात आजीच्या पेन्शनचाही विचार येत असेल. आजी गेली की पेन्शन बंद! मग एवढ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार असेही विचार त्याच्या मनात येत असावेत. परवाच त्याला आजीशी बोलताना ऐकलं होतं, "आजी, अल्मोड्याला चाललोय अर्ज भरायला. आजोबांनी दिलेला शब्द मोडला. पण तू तसं करायचं नाहीस बरं का. सांगून ठेवतोय." मला कुणी तरी सांगितलं होतं की रहीमच्या आजोबांनी त्याला दिलेला शब्द मोडला होता! रहीम दहा वर्षांचा होता तेव्हाची गोष्ट. आजोबा तेव्हा रजा घेऊन घरी आले होते. तेव्हा त्यांनी रहीमला पुढच्या वेळी तुझ्यासाठी खेळातली बंदूक नक्की घेऊन येईन असं सांगितलं होतं. पण ते आलेच नाहीत! आली ती त्यांची पेन्शन आणि एक भली मोठी काळी पेटी!        

रहीम खूप दिवस आजोबांवर रागवून बसला होता. त्याच्या आजोबांना आपली ड्यूटी करताना दहशतवाद्यांची गोळी लागून मृत्यू आला. मग ते आपला शब्द कसा काय पाळणार? हे काही कुणी रहीमला किती तरी वर्षं पटवून देऊ शकलं नव्हतं. असो. रहीमचा आजीवर मात्र विश्वास होता. आजीची तब्बेत जरा इकडे तिकडे झाली की तो आजीला आठवण करून द्यायचा. म्हणायचा, "आजोबांच्या सारखं काही करायचं नाही!" त्यावर आजीबाई पण आत्मविश्वासानं सांगायच्या, "अरे, माझ्यावर विश्वास ठेव. मी  तुझ्या आजोबांसारखी नाहीये. शिवाय देव जरी मला ओढून न्यायला लागला तरी डॉक्टरसाहेब मला जाऊ देतील का?"

आज सकाळी आजीचा रक्तदाब खूप वाढला होता. तिला हॉस्पिटलात भरती केलं आणि मी काही इंजेक्शनं दिली. डेहराडूनहून एक हृदयरोगतज्ञ आठवड्यातून एकदा हॉस्पिटलमध्ये यायचे. शेवटी त्यांच्याशी पण बोललो. त्यांनी रक्तदाब पाहिला तेव्हा तो अगदीच खाली गेला होता. त्यांनीही दुसरी इंजेक्शनं दिली पण त्याला आजीच्या शरीरानं काहीच प्रतिसाद दिला नाही. 

मला वाटलं रहीमच्या मनाची आता तयारी केली पाहिजे. मी त्याला माझ्या खोलीमध्ये बोलावलं आणि म्हणालो, "हे बघ रहीम, आजी आता सीरियस आहे. आपल्याला ह्या गोष्टी स्वीकारायला पाहिजेत. आजीनं मला शब्द दिला होता, तरी असं झालं, तसं झालं ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. तू आता लहान नाहीस. इतकी वर्षं हॉस्पिटलमध्ये काम करतोयस. तर हे समजून घे. शिवाय तुझ्या शिक्षणाची काळजी करू नकोस.  कोणत्याही परिस्थितीत तुझं शिक्षण चालू राहील. आम्ही आहोत नं त्यासाठी!"

रहीम दरवाज्याच्या जवळच उभा होता, तो लगेच बाहेर सटकला. त्याला माझं बोलणं पटलं असावं. कुठे तरी एका कोपऱ्यात बसून रडत असेल. मी खोलीतून बाहेर पडून मागे वॉर्डच्या बाजूला गेलो तर रहीम नेहमीसारखा तिथे काम करत होता.

घरी जाण्यापूर्वी मी पुन्हा आजीला पहायला अतिदक्षता विभागात गेलो. सिस्टर ऑक्सिजनचं सिलिंडर बदलत होती. मी रक्तदाब पाहण्याचा प्रयत्न केला पण तो घेताच येत नव्हता. मी पत्नीला बोलावणं पाठवलं. ती  हॉस्पिटलच्या दुसऱ्या टोकाला होती. आज तिला एक ऑपरेशन होतं आणि भूल देण्यासाठी अल्मोड्याहून एक डॉक्टर आले होते. तरी ती धावत आली. आम्ही दोघांनी मिळून आजीला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. ती तिच्या ऑपरेशनसाठी गेली आणि मलाही दुसरीकडून बोलावणं आलं. 

मधल्या वेळात सिस्टरनं नाडी पाहिली. पूर्ण खात्री करून घेऊन  मी न सांगताच ऑक्सिजनचं सिलिंडर वगैरे काढून टाकलं. एवढ्या वेळात रहीम मला भेटला नाही. हा रहीम म्हणजे एक वेगळाच माणूस होता. खरं तर मला त्याला भेटणं नकोच वाटत होतं! त्याची समजूत कशी घालायची? तेवढ्यात अकाउंटंट म्हणाला, "तो पुस्तक आणायला गेलाय." नॅन्सी आणि भूल देणारे डॉक्टर पण आले. थोड्याच वेळात इतर सिस्टर्स, कंपाउंडर, अकाउंटंट, आया -सगळेच तिथे जमा झाले. सगळे माझ्याकडे बघत होते आणि मी त्यांच्याकडे! दोन मिनिटांनी मी जरा जोरात म्हटलं, "सगळे आपापल्या कामाला जा बघू!"     

ते गेले आणि आणि दोनच मिनिटांत रहीम आला. वेटिंग रूममध्येच सिस्टर्सनी त्याला घेरलं आणि सांगायला लागल्या, "रहीम, मन घट्ट कर, धीरानं घे...." रहीम म्हणाला, "काय बोलताय राबिया आंटी, माझी आजी आपला शब्द कधीही मोडणार नाही. तुम्ही रडताय कशाला? कमाल आहे. लोकांचा माझ्यावर विश्वासच नाही." असं बोलत बोलत तो आजीच्या बिछान्याजवळ गेला. मी पण तोपर्यंत तिथे पोहोचलो होतो. रहीमनं आजीच्या खांद्याखाली अलगद हात ठेऊन तिला जरासं उचललं आणि म्हणाला, "चल आजी. आपण जरा वेटिंग रूममध्ये जाऊ. इथे फार कोंदटल्यासारखं होतंय." आणि काय आश्चर्य! त्या विझलेल्या डोळ्यात चमक आली, खोल गेलेले गाल जरासे हलले आणि क्षीण आवाजात दोन शब्द ऐकू आले, "चल बाळा."  दुसऱ्या क्षणाला ती शंभर वर्षांची आजी रहीमच्या आधारानं वेटिंग रूममध्ये चालली होती!

सगळे डॉक्टर्स, सिस्टर्स  आणि मी स्तंभित होऊन ते पाहात राहिलो!

शाप

तिन्हीसांजेच्या संधिप्रकाशात एक कृश आणि अतिजिर्णं असा वृद्ध वटवृक्षाच्या  पारावर विसावलेला होता. 
पारावर एक लहानसे हनुमान मंदिर होते. 
दिव्याला नुकतीच तेलवात केलेली असावी.लोक येतजात होती. 
तितक्यात एका लहान मुलाला घेऊन मोठा जमाव तेथे आला. देवदर्शन करून 
त्यांनी तिथल्या लोकांना प्रसाद वाटला.  
या वृद्धाला प्रसाद देत एकजण म्हणाला, "आशीर्वाद द्यावा बाबा, घरी पुत्र जन्मला". 
"मी असा भणंग.. काय आशीर्वाद देणार?" वृद्ध उत्तरला.
"या मारूतीरायासारखा चिरंजीव हो म्हणा". 
वृद्धाच्या चेहर्‍यावर विलक्षण वेदना उमटली. अबोलपणे हात उंचावत त्याने मनोमन आशीर्वाद दिला. 
सारेजण गेल्यानंतर, आपल्या मस्तकाचे जीर्ण-मलिन वस्त्रं सोडवून, तिथल्या दिव्याचे तेल कपाळावरील जखमेला लावत म्हणाला.. 
"देवा चिरंजीवित्वाचा शाप भोगणारा, मी शेवटचाच असू दे.."  

पाच वाजता

   शेवटची पंगत अडीचला संपली. मी या शेवटच्याच पंगतीत होतो. माझे जेवण जास्त झाले. तसे लग्नातले माझे जेवण नेहमीच जास्त होते. दर रविवारी कोणाचे तरी लग्न असायला पाहिजे असे मला नेहमी वाटते. मी वरपक्षाच्या खोलीत आलो आणि लवंडलो. झोप येत होती पण चष्मिस किरणने लागूच दिली नाही.  गावाकडच्या गोष्टी सांगून तो मला रिझवायचा प्रयत्न करत होता. मी हं हं करत होतो. सांगता सांगता तो कधीतरी सटकला. मलाही डोळा लागला. केव्हातरी अर्धवट झोपेत मिहीर, मुक्ता येऊन मला उठवायचा प्रयत्न करून गेले. 
    चारच्या सुमारास डोळे उघडले. चहा कधी येणार, अशी कुजबूज सुरु झाली होती. कपांचा किणकिणाट ऐकू येत होता पण चहा दिसत नव्हता. या खोलीत जवळचे नातेवाईक तेवढे दिसत होते. बाकीचे पहिल्या दुसऱ्या पंगतीनंतर घरी गेले होते. या खोलीत कुणी झोपले होते, कुणी बाहेर चक्कर टाकायला गेले होते. कुणी नुसतेच जांभया देत होते. मी  बाहेर आलो. बेसिनवर जाऊन तोंडावर पाणी मारले. तेवढ्यात रोहनने मला पकडले. या रोहनला त्याच्या आईने माझ्यावर सकाळपासून सोडलेले होते. दर तासाला त्याच्या मनगटावरचा एक दोरा तरी सुटतो किंवा त्याचा करगोटा तरी तुटतो. तसे झाले की, त्याची आई त्याला माझ्याकडे घेऊन येते. मी त्याचा तो तुटलेला संसार बांधू लागलो. इथून वधूपक्ष खोलीच्या आत जे बोलणे चालले होते, ते पुसट पुसट ऐकू येत होते. मागून प्राजक्ताचा आवाज आला. हिच्याशी माझी आता चांगलीच मैत्री झाली आहे. लग्नात ओळख झाली. नात्यातलीच निघाली. काही जण म्हणतात, लांबून बहीण लागते. संजयदादाने नवी बाईक घेतली आहे आणि त्याने ती आणली आहे, हे सांगायला ती आली होती. एकदम भारी आहे, असे म्हणाली. मी तिच्याबरोबर कार्यालयाच्या खाली गेलो. तिथे मिहीर, मुक्ताही होते. मिहीर, मुक्ताशी आम्ही सकाळी लग्न लागायच्या आधी कार्यालयाखालीच थोडावेळ पकडापकडी खेळलो. फार मजा आली. संजयदादा त्याच्या भावांना बाईकबद्दल सांगत होता. आम्ही पण त्याची बाईक सगळीकडून पाहून घेतली. ‘वा, संजूदादा, आता शायनिंग ना...’ असे बरेच म्हणून झाले. तेवढ्यात मिहीरने बातमी काढली – अजून काही विडे शिल्लक राहिले आहेत. आम्ही पुन्हा वर पळालो. मला जीन्समुळे नीट पळता आले नाही. ही जीन्स तशी मी फार वेळा घालत नाही. दोनच महिन्यांपूर्वी घेतली आहे. सगळ्यांनी हळूच एक एक विडा खाऊन घेतला. लाल तोंडांनी आमची चहाडी केलीच. लगेच वंदूआत्याने प्रत्येकी एक धपाटा घातला. वंदनाआत्याला आम्ही वंदूआत्या म्हणतो. "आत्या, तुला आम्ही वंदू. तुला आम्ही वंदू" असे म्हणत तिची चेष्टा करतो. मग तीही, "अरे पाया पडायला लावीन तुम्हाला, नुसते वंदू नका मला." असे गंमतीत म्हणते. ' ए चला, चहा आला..' असे म्हणत कोणीतरी आले. दोन्ही पक्षांच्या खोलीतून सगळे बाहेर पडले. सगळ्या लोकांनी चहा प्यायला आणि काहींनी दोनवेळा प्यायला. हे जे काही लोक होते, त्यांना मी मागच्या एका लग्नातसुध्दा दोनदा चहा पिताना पाहिले होते. काहींनी बिनधास्तपणे दोनदा मागितला, काहींनी गुपचूप. मलाही दोनदा प्यायचा होता पण मी हल्ली तसे करत नाही. दुसऱ्यांदा घेताना कोणीतरी बघते आणि म्हणते, ‘दोनदा दोनदा ! अजून वेळ आहे तुला एवढा चहा प्यायला.’ पुन्हा सगळा वधूपक्ष घोळक्याने खोलीत गेला. नवऱ्यामुलीला तिघींनी ' घेतलास का गं चहा ’ असे विचारले होते.
     तिच्या चेहऱ्यावर आता सकाळचा रंग नव्हता. बाहरेची उन्हे हळूहळू कलत चालली होती.
     तितक्यात ‘गाडी आली, गाडी आली’ असा ओरडा झाला. नवरा-नवरीला नेण्यासाठी एक खास गाडी असते, तीच बहुतेक. मागच्या एका लग्नातही अशीच एक गाडी होती. या गाडीवर नेहमीच गुलाबाची फुले असतात. कोणीतरी ती छान सजवलेली असते. सजवणारा प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने सजवतो. मला असलीच एखादी गाडी गुलाब सोडून दुसऱ्याच काही फुलांनी सजवायची आहे. कोणते फूल शोभेल ? सजवायला काय कोणतेही फूल चालेल पण कोणालाही दुसरे फूल आवडणार नाही. गुलाबाची सवय झाली आहे सगळ्यांना. मी, प्राजक्ता, मुक्ता, मिहीर, चष्मीस किरण..आम्ही सगळे गाडी बघायला गेलो. हळूहळू एक एक बॅग दोन्ही बाजूंच्या खोल्यांमधून खाली येऊ लागली. मी परत वर गेलो. कार्यालयाचे व्यवस्थापक आणि वधूपक्षाच्या लोकांमधे काहीतरी बोलणे होत होते. एक एक जण तयार होऊन बाहेर पडू लागला होता. मी उगीच वरपक्ष खोलीत जाऊन डोकावले.  दोघे तिघेच होते आत. तेही निघण्याच्या तयारीत होते. मी पटकन बाहेर पळालो. मी असा खोलीत सापडलो की, कोणीतरी मला काहीतरी काम सांगते आणि ते मला अजिबात आवडत नाही. बहुतेक नातेवाईकांनी सकाळपासून माझी चौकशी केलेली होती. अशा वेळी एखादा कोणीतरी राहिलेला येतो आणि चौकशी करतो. आत्ताही असाच एक जण आला आणि खूप प्रश्न विचारले. लोकांची धावपळ चालली होती. ' काही विसरलं का बघा रे...' असे जवळजवळ प्रत्येकजण म्हणत होता. अगदी मोजकेच लोक इथे कार्यालयात राहिले होते. वरपक्षाचे काही आणि वधूपक्षाचे काही. संपूर्ण दिवसभर त्या वधूपक्षाच्या खोलीतले आवाज मोठे असतात. संध्याकाळी मात्र ऐकू येईनासे होतात. संध्याकाळी त्या खोलीचे काहीतरी वेगळे होते. नवरीमुलगी  बाहेर आलेली होती आणि एका घोळक्यात थांबलेली होती. कुणाच्या तरी खांद्यावर तिचे डोके होते. भोवताली चार-पाच बायका होत्या. बरेच रुमाल पर्सेसमधून बाहेर पडलेले होते. कार्यालयातल्या जेवायला वाढणाऱ्या बायका, झाडणारे मुलगे सगळे पाहात होते. त्यांना जवळजवळ रोजच हे दृष्य पाहावे लागते तरीसुध्दा दर संध्याकाळी तितक्याच तन्मयतेने ते हे दृष्य पाहात असतात, याचे मला नेहमी आश्चर्य वाटते. 
    "वरद, काय बघतोस ?" मी जवळ आलेल्या प्राजक्ताकडे पाहिले. 
     कोणास ठाउक, किती वेळ मी पाहात होतो. मलाही आईची हाक ऐकू आली. जाण्यापूर्वी मी त्या रिकाम्या कार्यालयातल्या जमिनींकडे पाहिले. अक्षता, फुले, दोरे असे पसरले होते. भिंतीवरच्या घड्याळात पाच वाजायला काही वेळच बाकी होता. खाली आलो. गाडीत सगळे आपापल्या जागा पटकावून बसले होते. नवरी मुलगी म्हणजे माझ्याच एका भावाची बायको. माझी वहिनी. आज त्याचे तिच्याशी लग्न झाले. ती खाली आली. ते दोघे त्या गुलाबाच्या गाडीत बसले. ती आता काचेच्या आत होती आणि तिच्या माहेरचे लोक काचेबाहेर. ते सगळे चूपचाप पाहात होते. मी इकडचा होतो तरीही मला त्या  लोकांकडे पाहून  कसेतरी झाले. इकडचेही दिवसभर खिदळणारे लोक आत्ता शांतपणे पाहात होते. सकाळी नाश्त्यापासून संध्याकाळचा चहा घेईपर्यंत लग्नाला आलेले सर्व लोक आनंदात असतात. त्यापैकी काही लोक पाच वाजता दुःखी होतात. एरवीही पाच वाजतात पण कार्यालयात वाजलेले पाच फार चमत्कारिक असतात. यावेळी कार्यालय सोडावे लागते आणि ही लग्न झालेली मुलगी जुन्या लोकांना सोडून काही नव्या लोकांबरोबर चाललेली असते.  
     "काय वरद, तुमच्या वर्गात मुलीबिली आहेत की नाही"
     "असणार, असणार."
     " असल्या तरी तो थोडीच सांगणार आहे तुम्हाला ?"
     गाडीत सगळ्यांनी माझी चेष्टा करायला सुरुवात केली.
     आईने सगळ्यांना दटावले, "ए, चावटपणा बास करा रे. इतक्यात काहीही शिकवू नका त्याला, आत्ता कुठे तो नववीत गेलाय."   
     काही मिनिटातच गाड्या सुटणार होत्या. सहा वाजता कार्यालय बंद होणार होते. आणखी काही दिवसांनी पुन्हा एक लग्न होणार होते आणि त्याही दिवशी संध्याकाळचे पाच वाजणार होते.  

बंध

    दा वाजलं म्हणून काकूनं दार उघडलं. समोर साठ पासष्ट वय असणारी एक व्यक्ती उभी होती.
"ओळखलंस का मालती काकू? " तो हसून म्हणाला.
कापऱ्या हातानं काकूनं चष्मा लावला. पाठीचा कणा वाकल्यामुळे तिला त्याच्या उंच देहाकडे नीट बघतासुद्धा येत नव्हतं. तिनी नकारार्थी मान हालवली.
"काकू, मी शरद.. शरद सगरे, साताऱ्यात होतो तुमच्याकडे तीन वर्ष.. आता तरी आठवतंय का काही? "
काकूच्या डोक्यातल्या आठवणींची धावपळ सुरू झाली. 'शरद सगरे' हे नाव आज खूप वर्षांनी कानावर पडलं होतं, आणि फक्त नाव नव्हे तर साक्षात ती व्यक्ती समोर उभी होती. इतक्या वर्षात घडलेल्या अनेक गोष्टी बाजूला करून काकूच्या डोक्यात शरदच्या आठवणी वर यायला लागल्या.

    "ज्योती अग अशी का करतीयेस? काय होतंय तुला.. झपाटलं की काय तुला कोणी.. शरद.. शरद.. अरे हे बघ ना ज्योती कसं करतीये.. बघ ना डोळे पांढरे करतीये.....   "
    काकूची किंकाळी कानावर पडताच शरद हातातलं पुस्तक टाकून धावत खाली आला. ज्योती वेड लागल्यासारखं करत होती. काकूला मारत होती.. डोळे फिरवत होती.. वेडी वाकडी तोंडं करत होती.. शरदला काही क्षण काय सुरू आहे ते कळेना. त्यानं पटकन भैय्याला मदतीला बोलावलं. रिक्षा बोलावली आणि ज्योतीला घेऊन ते थेट हॉस्पिटल मध्ये निघाले.
    ज्योतीला स्ट्रेचरवर झोपवून एका खोलीत नेण्यात आलं. तिला चार सेवकांनी घट्ट धरून ठेवलं होतं. दार बंद झालं तरी तिचा आरडा ओरडा आणि किंकाळ्या बाहेरपर्यंत ऐकू येत होत्या.
शरद, काकूच्या शेजारी बसून तिचे हुंदके झेलत होता. तिच्या डोक्यावरून हात फिरवत "सगळं नीट होईल, देव सगळं नीट करेल" असा आधार देत होता.  नानांना कळवण्यासाठी भैय्या हॉस्पिटलच्या बाहेर पडला होता.
काही वेळानं आतून येणारा ज्योतीचा आवाज शांत झाला. बहुदा डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शन दिलं असावं. त्यानंतर डॉक्टर बाहेर आले.
    "त्यांच्या आताच्या स्थितीवरून असं दिसतंय की त्यांच्या डोक्यात ताप गेला आहे.. परिस्थिती गंभीर आहे. परिणाम मेंदूवर झाला आहे.. तातडीनं काही अद्ययावत चाचण्या आणि उपचार करावे लागतील, जे आपल्या इथे होऊ शकत नाही... आजच्या आज त्यांना पुण्यात ससूनला हालवावं लागेल किंवा जमत असेल तर तिकडच्याच एखाद्या चांगल्या खासगी रुग्णालयात.. "
"ससून ठीक आहे.. मी बघतो कसं करायचं ते " शरदने लगेच हालचाली करायला सुरुवात केली.
काही वेळात नाना हॉस्पिटलामध्ये  पोचले. शरदने घडलेलं सगळं नानांना सांगितलं. दोघांनी ज्योतीला पुण्यात हालवण्याची खटपट सुरू केली.
काकूला नक्की काय चाललंय तेच कळत नव्हतं. ती तर हे ऐकण्याच्या स्थितीतच नव्हती.
    ज्योतीवर ससूनमध्ये उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली. तातडीनं सर्व नातेवाइकांना तार पाठवून, शक्य असेल तिथे फोन करून बोलावून घेतलं गेलं.
देवाच्या कृपेने तिसऱ्या दिवशी ज्योतीने उपचाराला सकारात्मक प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. तिनी डोळे उघडले. आई नानांना तिनी ओळखलं. सर्वांना हायसं वाटलं.
आज आठवडा झाला. ज्योती बरी झाली खरी, पण पूर्णता: नाही. त्या आजारपणाचा तिच्या मेंदूवर परिणाम झाला. ती एखाद्या लहान मुलासारखं वागत होती. बालिश वागत होती. हट्ट करत होती, लाडात येत होती.. आधीची ज्योती आणि आताची ज्योती.. प्रचंड तफावत होती. तिचं ते लहान मुलासारखं वागणं सर्वांनाच खूप विचित्र वाटत होतं.
नाना आणि काकू ज्योतीला आयुष्यभर सांभाळायची मनाशी तयारी करत होते. शरद सुन्न झाला होता. त्याचं काळीज क्षणाक्षणाला भरडून निघत होतं.
    काही दिवस उलटून गेले. ज्योतीला घरी आणलं. ती घरात रुळली. सर्वांना तिच्यामधल्या बदलाची सवय झाली. शरद तिच्याशी खूप गप्पा मारायचा. खूप मजा आणि जमतील तसे लाड करायचा. मग वरच्या खोलीत जाऊन मनातल्या मनात कुढत बसायचा. देवाला दोष देत बसायचा. असं का झालं ह्याचं कारण शोधायचा प्रयत्न करायचा. हाती काहीच लागायचं नाही. मग अश्रूंना वाट मोकळी करून द्यायचा. कित्येक दिवस असंच चालू होतं.
    एक दिवस त्यानं ठरवलं.
    "नाना...   काकू.. येत्या सोमवारी मी निघतोय पुण्याला.. तिकडे जाऊन सैनिक भरतीची परीक्षा असते त्याला नाव देतोय माझं. आता इथून पुढे तिकडेच राहीन मित्राबरोबर. जमेल तशी सातारला चक्कर मारेनच "
    "शरद अरे सांगतोयस काय? असं अचानक निघालास?? आम्हाला थोड्याआधी कल्पना द्यायचीस.. आणि पदवी परीक्षा झाली का तुझी? मध्येच सैनिक भरती कुठून आली? "
    "एक पेपर राहिलाय माझा. बघू ऑक्टोबर मध्ये देऊन जाईन.. त्यात काय.. थोडा अभ्यास कमी पडला ह्या वेळेस त्यामुळे राहिला.. " शरद हसत म्हणाला आणि त्यानंतर त्यानं जमेल तसं विषयांतर केलं.
नाना आणि काकू दोघांना धक्का बसला होता.. खरंतर त्याच्या शिक्षणाच्या काळजीपेक्षा त्यांना शरद आपल्याबरोबर नसणार ह्याच गोष्टीची खंत वाटत होती. गेल्या तीन वर्षात शरदच्या आपल्या आजूबाजूला असण्याची सवय झाली होती. त्याचा एक आधार वाटायचा. त्यांना शरद अगदी मुलासारखा होता. त्यानं दोघांना खूप लळा लावला. काकू आणि नानांनी सुद्धा तितकंच प्रेम केलं त्याच्यावर.
    आता तो ही चालला.
सोमवारी सकाळी शरद ट्रंका आणि त्याहून हजारपट जड अंत:करण घेऊन खाली उतरला. नानांना आणि काकूला नमस्कार केला. ज्योती शेजारीच हसत उभी होती. पुण्यावरून मला खाऊ आण असं त्याला म्हणत होती. शरदचे डोळे पाणावले होते. त्यानं लवकरात लवकर तिथून काढता पाय घेतला.
रिक्शातून निघताना त्याची नजर फक्त ज्योतीवर खिळली होती.

        काही दिवसांनी काकू वरच्या खोलीत आवारावर करत होती. तिची नजर दारामागे चिकटवलेल्या एका कागदाकडे गेली. ते वेळापत्रक होतं. शरदच्या पदवी परीक्षेचं ! काकूनं त्यावरून नजर घातली. शेवटच्या पेपरच्या तारखेनं तिचं लक्ष वेधून घेतलं. ह्याच दिवशी ज्योतीला हॉस्पिटल मध्ये आणि तिकडून पुण्याला हालवण्यात आलेलं. शरद संपूर्ण दिवस आपल्यासोबत होता. त्या नादात त्यानं त्याचा शेवटचा पेपर दिलाच नाही...
काकूच्या मनाला ही गोष्ट समजली आणि तिचे डोळे क्षणार्धात पाणावले. पापण्या घट्ट मिटल्या गेल्या. त्यांचा बांध तोडून डोळ्यातल्या पाण्यानं वाट शोधली.
    तिच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला.. "शरद... "

    किती मोठा झालास रे.. मोठा काय... म्हातारा झालायस.. तेव्हा गेलास तो आलाच नाहीस परत.. आज इतक्या वर्षांनी ह्या म्हातारीची आठवण आली होय रे.... ये आत ये.. बैस.. "
पलीकडेच बसलेली ज्योती कुतूहलानं त्याच्याकडे बघत होती. ह्या व्यक्तीला कुठेतरी पाहिलं आहे आणि ह्याचा आवाज ऐकला आहे इतकंच तिला कळत होतं. 
तिच्या नजरेत बघून शरदनं पिशवीतून आंबा बर्फीचा बॉक्स काढून ज्योतीला दिला आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदात तो हरवून गेला....

चहा











पूर्वी चहा करण्याची पद्धत किती छान होती ना! पाण्यामध्ये साखर घालून मग ती विरघळली की चहाची भुकटी घालायची. चहा करण्यासाठी एक वेगळे भांडे पण असायचे. त्या भांड्याला दोन कान असायचे. हे भांडे गॅसवर ठेवले की बरेच वेळा ते तिरके व्हायचे व त्यातला चहा बाहेर यायचा किंवा चिमट्याने पकडताना चहा गाळायच्या वेळेस एखाद वेळेला सांडायचा. चहाचे हे भांडे मला खूप आवडायचे. सर्व बाजूने गोल गरगरीत  असायचे हे भांडे !





या भांड्यामध्ये चार ते पाच कप चहा होत असे. पाण्यामधली साखर विरघळून चहाची भुकटी टाकली की थोडावेळ उकळू द्यायची. ही उकळी काही वेळा भर्रकन यायची. उकळीमुळे चहा भांड्याच्या बाहेर येऊ नये म्हणून गॅस बारीक करायला लागायचा. चहाच्या भांड्यावर ठेवायला एक झाकणही असायचे. सकाळचे मुख्य दूध तापले की ते नेहमी बाजूला ठेवलेले असायचे. त्यावर झाकण, तेही जाळीचे ! मुख्य दुधातले चहासाठी वेगळ्या भांड्यात दूध काढून ते तापवायचे व नंतर झाकण ठेवून मुरवलेला चहा गाळला जायचा. सकाळी उठून आई जेव्हा चहाच्या पाण्याचे आधण ठेवायची तेव्हा आईच्या आम्हाला उठवण्यासाठी हाका सुरू व्हायच्या. आई म्हणायची चहाचे आधण ठेवले आहे. दात घासून चहासाठी हजर व्हा म्हणजे पहिल्या वाफेचा चहा प्यायला मिळेल. आम्ही पण पटकन उठून हात पाय तोंड धुऊन व राखुंडीने खसाखसा दात घासून फरशीवर पाट मांडून चहा प्यायला बसायचो. बशीत ओतल्यावरही हा चहा कधी थंड झालेला पाहिला नाही. गरम गरम चहा प्यायला की खूप तरतरी येत असे.




चहा कपबशीत ओतल्यावर थोड्यावेळाने घेतला की त्यातली मजा निघून जायची. त्यावर थोडी साय धरायला लागायची. मग असा सायीचा चहा आम्हालाही अजिबात आवडायचा नाही. अगदी सुरवातीला आम्ही दोघी बहिणी चहा करायला शिकलो ते याच जुन्या पद्धतीने. नंतर नंतर बाकीच्या चुलत मामे बहिणींचे बघून आमची चहाची पद्धत बदलली. बाकीच्या सर्व स्टेप्स गाळून चहाचे पाणी, साखर चहा व दूध एकदम एकत्र करून उकळवायला लागलो. नंतर मग तो एकेका कपात गाळण्याने गाळून द्यायचा. अशा पद्धतीने केलेला चहा आईला अजिबात आवडायचा नाही. ती म्हणायची दूध किती नासता गं तुम्ही. अशा पद्धतीने चहाच्या लाल रंगाचा भडकपणा घालवण्यासाठी दूध खूप लागते.






जेव्हा आमच्या घरी पाहुणे येत असत तेव्हा आई मोठ्या पातेल्यातून चहा करायची आणि तो दुसऱ्या पातेल्यात गाळून ठेवायची. याला आई कोरा चहा म्हणायची. एकदा हा कोरा चहा करून ठेवला की ज्याप्रमाणे जो उठेल त्याला वेगळ्या पातेल्यात दूध गरम करून त्यात हवा असेल त्याप्रमाणे कोरा चहा घालून करून द्यायची. आई म्हणते की असा कोरा चहा करून ठेवला की त्याची मूळ चव बदलत नाही. दूध घालून मोठ्या प्रमाणात चहा करून ठेवला आणि नंतर तो गरम करून प्यायला दिला तर चहाची चव पूर्णपणे बदलते.





या कपबश्या पण किती छान असायच्या. ६ कप आणि ६ बश्या असा ठरलेला सेट असायचा. त्यातले काही कप आणि काही बश्या फुटल्या की दुसरा सेट आणि तो सुद्धा बोहारणीकडून ठरलेला असायचा. तिच्याकडे खूप छान छान कपबश्यांचे सेट असायचे. आधीच्या सेटमधल्या उरलेल्या बश्या झाकण ठेवायला उपयोगी पडायच्या. नुसते उरलेले कपही उपयोगाला यायचे. कोणाला अगदी अर्धा कप किंवा घोटभर चहा हवा असेल की मग तो या उरलेल्या कपातून दिला जाई.




कपबश्या जाऊन मोठाले मग आले. मगातून चहा यायला लागले तेव्हा चहाची मजाच गेली पण काही वेळेला एखादे बैठे काम करता करता अधून मधून एकेक घोट करत मगातले चहा बरे वाटायला लागले. या चहाच्या पद्धती पण किती वेगवेगळ्या. जितक्या पद्धती तितक्या वेगवेगळ्या चवी. कोणी जुन्या पद्धतीने चहा करतो, तर कोणी सर्व एकत्र घालून म्हणजे चहा पाणी साखर दूध घालून उकळवतो तर कोणी अर्धे पाणी व अर्धे दूध घालून त्याला उकळी आली की त्यात चहा घालतो. कोणी चहात सदैव आले घालतात तर कोणी चहाचे मसाले. मला आले घालून चहा खूप आवडतो. प्रत्येक घरी चहाचा एक खास ब्रँड ठरलेला असतो आणि त्याचा त्याला खूप अभिमान असतो. आम्हाला दोघांना टाटा चहा खूप आवडतो.



माझे लग्न झाले तेव्हा घरातली  माणसे व शिवाय आला गेला, पाहुणे रावळे असायचे. कोणी आला की प्रत्येकाला विचारायचे कोणी चहा घेणार का? प्रत्येक जण जास्त नको अगदी थोडा, अर्धा कप नाहीतर घोटभर. मला कोणी घोटभर चहा म्हणाले की खूप राग यायचा. घोटभर चहा काय घेता! घ्यायचा तर अर्धा कप घ्या किंवा कपभर नाहीतर घेऊच नका ना ! तर कोणाला एक कप चहा घेतला की अजून आहे का? अशी विचारणा व्हायची. मग मी नेहमीच २ ते ३ कप जास्तीचा चहा करायचे. माझ्या सासरी चहाचे एक भांडे कायम उकळत असायचे. इथे अमेरिकेत आल्यावर मात्र चहाची चव फारशी येत नाही. का कोण जाणे पण इथे ऐन कुडकुडणाऱ्या थंडीमध्येही अजिबात चहा प्यावासा वाटत नाही. याउलट भारतात असताना ऐन रणरणत्या उन्हातही खूप चहा प्यावासा वाटायचा. अभ्यास करताना, घराची पूर्णपणे झाडलोट करताना, आफीसमध्ये चहा हा हवाच. चहाने खूप तरतरी येते व कामाचा उत्साह वाढतो. चहा सर्वांना आवडतोच असे नाही. काहीजण मात्र अट्टल चहा पिणारे असतात. त्यांना कधीही चहा हवाच असतो. अगदी मध्यरात्री उठून जरी त्यांना कुणी चहा हवा का? असे विचारले तर लगेच माना डोलावतील.





तर असा हा चहा ! कपबश्यातून मगात गेला, गॅस व इलेक्ट्रिक शेगड्यातून मायक्रोवेव्ह मध्ये शिरला आहे. न आता चहाच्या भुकट्या राहिल्या न आता ते दाट दूध राहिले. चहा आता फक्त नावाला उरला आहे. 

मातृत्व..................

मातृत्व
मातृत्वाचा एवढा उदो उदो करू नये ज्यामुळे एक दिवस मातृत्वच मातृत्वाला मारक ठरेल. अनेकदा हे वाक्य अनेक लेखकांच्या लिखाणातून किंवा कवींच्या काव्यसंग्रहातून आपल्यासमोर येतं. परंतु आजही या २१व्या शतकात या वाक्याचं गांभीर्य समाजाने लक्षात घेतलं आहे असं आढळून येत नाही. मातृत्व म्हणजे केवळ आई होणं का? आई होणं आणि मूल होणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? मातृत्वाचं आणि पितृत्वाचं समाजातील स्थान, महत्त्व समान आहे का? मातृत्व म्हणजे नक्की काय? मातृत्वाचा उदो उदो म्हणजे नेमकं काय? मातृत्वाबद्दलचे समज आणि गैरसमज कोणते? सुशिक्षित आणि अशिक्षित लोकांमध्ये असलेले मातृत्वाबद्दलचे गैरसमज हे वेगवेगळे असतात का?

दवाखान्यातील (Hospital) गंभीर वातावरण. प्रसूतिची (Delivary) वेळ जवळ आलेली. जिच्या पोटी (मुलगा/मुलगी) जन्म घेणार आहे तिचे वडील Operation Theater समोर येरझार्या मारत आहेत. नवरा Operation Theater च्या दरवाज्याजवळ उभा आहे. मुलीची आई काळजीपोटी एका बाकड्यावर बसली आहे. त्या आईला मुलीची सासू धीर देत आहे. मुलीचे सासरेदेखील त्याच बाकड्यावर शांतपणे बसले आहेत. काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात आणि आनंदाची बातमी देताना म्हणतात, अभिनंदन! मुलगी झाली आहे. सासुबाईंचा चेहरा काहीसा पडतो. कारण त्यांची इच्छा असते की आपल्याला नातू व्हावा. सासरे आनंदाने पेढे आणावयास जातात. आई डॉक्टरांकडे जन्मलेल्या बाळाची (मुलीची) चौकशी करते. ते बाळ सुखरूप आहे हे कळल्यावर आईची चिंता मिटते. नवरा डॉक्टरांकडे उत्साहाच्या भरात मागणी करतो की मी मुलीला बघू शकतो का? त्यावर डॉक्टर म्हणतात थोड्या वेळात नक्की बघू शकता. तेव्हा आतापर्यंत गप्प असलेले मुलीचे वडील पुढे येतात आणि बाळाला जन्म देणार्या स्त्रिविषयी म्हणजेच स्वतःच्या मुलीविषयी विचारतात ती सुखरूप आहे ना?, तिची तब्येत कशी आहे? डॉक्टर म्हणतात, शस्त्रक्रिया (Cesarean) करावी लागल्यामुळे शुद्धीवर यायाला काही वेळ लागेल पण तसा धोका काही नाही. हे ऐकल्यावर पहिल्यांदा वडील बाकड्यावर जाऊन बसतात. मात्र त्यावेळी ते बाकड्यावर एकटेच बसलेले असतात. कारण इतर सगळी मंडळी आनंद व्यक्त किंवा दुःख करण्यात मग्न असतात. दवाखान्यातील सार्वजनिक दूरध्वनीवर (Public Phone) आई, सासरे आणि नवरा यांनी ताबा मिळवलेला असतो. काही काळ उलटल्यावर आधी बाळाला आणि नंतर बाळाला जन्म देणार्या स्त्रिला Operation Theater मधून बाहेर आणण्यात येतं. वडील धावत जाऊन बाळ आणि आपली मुलगी सुखरूप आहेना ते बघतात. खुणेने आपल्या मुलीला विचारतात की, तू बरी आहेस ना? मुलगीदेखील होकारार्थी मान डोलावते. त्यानंतर वडिलांना आनंदाश्रू थांबवणं कठीण होतं आणि मग जाऊन ते दवाखान्यातील सार्वजनिक दूरध्वनीचा ताबा घेतात. सगळ्या नातेवाईकांना ही खुशखबर देताना म्हणतात, आमच्या मुलीला मुलगी झाली आणि दोघंही सुखरूप आहेत.

वरील प्रसंग आपण अनेकदा पाहिला असेल किंवा प्रत्यक्षात अनुभवलादेखील असेल. या प्रसंगातील व्यक्तिंच्या प्रतिक्रिया प्रत्यक्षात आलेल्या अनुभवापेक्षा थोड्याफार प्रमाणात निराळ्या नक्कीच असतील. पण केवळ माणसाच्या विचारसरणीचा आढावा घेण्यासाठी आपण एक उदाहरण म्हणून या प्रसंगाकडे पाहूया. मुलगा/मुलगी जन्माला आल्यावर ज्या काही प्रतिक्रिया असतात त्यातून मातृत्व आणि पितृत्व या शब्दांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा माणसागणिक वेगवेगळा असतो ते वरील प्रसंगातून लक्षात येतं. मुलगा/मुलगी होणं आणि आई /वडील /आजी /आजोबा / काका/काकू/  मामा/मामी इत्यादी होणं यामध्ये बराच फरक आहे. या दोन्ही बाबी/गोष्टी एकमेकांवर अवलंबून असल्या तरी त्यात बरंच अंतर आहे. हे अंतर किती आहे हे वरील प्रसंगातील वडिलांच्या प्रतिक्रियेतून सहज लक्षात येतं. एखाद्या स्त्रिला, मग ती बहीण असो वा सून असो वा मुलगी असो वा भाची असो वा पुतणी असो वा मैत्रीण असो वा अन्य कुणीही असो, मुलगा/मुलगी होणं आणि त्याचा आनंद होणं याला त्या स्त्रिचं मातृत्व स्वीकारणं असं म्हणतात. आपल्याला नातू हवा/नात हवी किंवा आम्हाला आजी-आजोबा व्हायचंय, आम्हाला भाचा हवा/भाची हवी किंवा आम्हाला मामा-मामी व्हायचंय, आम्हाला पुतण्या हवा/पुतणी हवी किंवा आम्हाला काका-काकू व्हायचंय किंवा अन्य काही नात्याच्या अनुषंगाने इच्छा बाळगणं, हट्ट धरणं याला मातृत्व लादणं असं म्हणतात. आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी (किंवा अन्य काही) होण्याचा आनंद होणं स्वाभाविक आहे. पण त्याचवेळी मातृत्वाचा सन्मान, आदर करणं आणि त्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे (मुळात ती मातृत्वाची प्राथमिक गरज आहे).

मुलगा/मुलगी होण्यासाठी जी प्रक्रिया किंवा क्रिया करावी लागते (स्त्री-पुरुष संबंध) ती प्रक्रिया किंवा क्रिया ही जितकी खाजगी, वैयक्तिक (Personal) आहे तितकीच मूल जन्माला येणं किंवा न येणं, मूल होणं किंवा न होणं ही देखील खाजगी, वैयक्तिक (Personal) बाब आहे. एखाद्या स्त्रिने गर्भधारणा करावी, बाळाला जन्म द्यावा यासाठी इच्छा बाळगणं आणि ती इच्छा पूर्ण करणं हा त्या मातृत्वाचा घोर अपमान आहे. या कृती बाबतीत सुशिक्षित महिला आणि अशिक्षित महिला असा फरक करता येणार नाही. कारण सुशिक्षित महिलादेखील नातू/नात/भाचा/भाची/पुतण्या/पुतणी याबद्दल इच्छा बाळगणार्या व्यक्तिंना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देतात आणि पुढे जाऊन तर इच्छा पूर्णदेखील करतात. हा प्रकार किंवा अशी विचारसरणी किती धोकादायक आहे याची अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती/समाजात दिसून येतात. मुळात इच्छा धरणं किंवा ती पूर्ण करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.मूल होणं ही एक शारीरिक प्रक्रिया/क्रिया आहे ज्याला भावनांची जोड असते आणि आई किंवा वडील होणं ही एक भावनिक प्रक्रिया/क्रिया आहे ज्याला शरीराची जोड असते. त्यामुळे ज्या जोडप्याला मूल होत नाही ते आईवडील होऊ शकत नाहीत हा समज चुकीचा आहे आणि त्याचबरोबर ज्या जोडप्याला मूल होतं ते आईवडील होतात हा समजदेखील साफ चुकीचा आहे. पण आजही असे गैरसमज, भावनेच्या आहारी जाऊन, काळजीपूर्वक बाळगले जातात. इतकंच नव्हे तर एखादी स्त्री आई होऊ शकत नाही या गोष्टीचा इतका बागुलबुवा केला जातो की त्याचवेळेस एक पुरुषदेखील पिता होत नाही याचा सरळ सरळ विसर पडतो. समाजाला (एखाद्वेळी पुरुषसत्ताक संस्कृती असल्यामुळे असं घडत असावं). पण सत्य हेच आहे की हा एक मोठा गैरसमज आहे किंवा आपण म्हणूया की ही एक सुशिक्षित लोकांची सोईस्कर अंधश्रद्धा आहे.

एका स्त्रिच्या गर्भात नऊ महिने किंवा साधारण ३८-४० आठवडे मूल प्रगल्भ होत जातं आणि त्यानंतर जन्म घेतल्यावर साधारण सहा महिने स्त्रिच्या शरीरावर अवलंबून असतं. हा साधारण १५ महिन्यांचा काळ म्हणजे आई होणं का? एखादी नवीन नोकरी लागते/मिळते त्याआधी आणि नंतर काय होतं बरं आधी मुलाखत (Interview) होते. त्या मुलाखतीसाठी प्रत्येक व्यक्ती बरेच दिवस तयारी करते. कसं बोलायचं, वागायचं, कुठल्या प्रश्नाला कशी उत्तरं द्यायची, कपडे कुठले घालायचे इत्यादी बाबींची तयारी प्रत्येकजण करतो. मुलाखत झाल्यावर काही काळाने नोकरी पक्की झाल्याचं कळतं आणि मग पुन्हा नव्याने तयारीची सुरुवात होते. ज्याठिकाणी काम करायचं असतं तिथे पहिल्याच दिवशी प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाबरोबर मिसळू शकत नाही. त्या ठिकाणाला एखाद्या नवीन व्यक्तिची सवय व्हायला आणि त्या नवीन व्यक्तिला त्या ठिकाणाची सवय व्हायला काही काळ जातो. असंच काहीसं आहे मूल जन्माला येण्याच्या प्रक्रियेबद्दल. नोकरीच्या पहिल्या दिवसाअगोदर जशी तयारी करावी लागते तशीच स्त्रिच्या गर्भात नऊ महिने मूल वाढत असतं तेव्हा होणार्या आईवडिलांना तयारी करावी लागते. ही तयारी म्हणजे वैचारिकरित्या स्वतःला प्रगल्भ करणं. सोप्या शब्दात सांगायचं तर येणार्या बाळासाठी स्वतःला तयार करणं. स्वतःच्या आचार-विचारांवर प्रभुत्व मिळवणं.

त्यानंतर जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा आतापर्यंत जी काही तयारी केली आहे त्याची उजळणी करण्याचा आणि त्यात आवश्यक बदल करण्याचा काळ येतो. हा काळ म्हणजे साधारण पुढील सहा महिने. त्यानंतर मूल प्रत्यक्षात प्रथमच आईच्या शरीरापासून काहीसं दूर जातं. नेमकं याच वेळेस आईवडील होण्याची प्रक्रिया सुरू होते जी दीर्घकाळ चालणारी क्रिया ठरते. निःस्वार्थी वृत्तीने एखाद्यासाठी आपला वेळ खर्च करणं म्हणजे नेमकं काय याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. या अशा वेळ खर्च करण्याला आपण जबाबदारी घेणं किंवा मातृत्वाचा आणि पितृत्वाचा आदर करणं असंही म्हणू शकतो.

या विषयाचा आरंभ ज्या वाक्याने झाला आहे तोच या विषयाचा शेवटही आहे. मातृत्वाचा एवढा उदो उदो करू नये ज्यामुळे एक दिवस मातृत्वच मातृत्वाला मारक ठरेल. आई होण्याचा किंवा मातृत्वाचा एवढा जयजयकार करू नये की ज्यामुळे स्त्री-भ्रूण हत्या, गर्भपात (Abortion), गर्भवती स्त्रिचा मानसिक आणि शारीरिक छळ, छळामुळे झालेलं गर्भस्रव/गर्भपतन (Miscarriage) अशा अनेक किळसवाणी आणि भयंकर प्रकारासाठी एक आई, एक स्त्रिच कारणीभूत ठरेल. हे सगळं थांबवणं या समाजात अवघड होऊन बसलं आहे. कारण मातृत्व हा पूर्णपणे एक भावनिक मुद्दा बनवल्यामुळे या विषयावर परखड, स्पष्ट मतप्रदर्शन केल्याने भावना सहज दुखावल्या जाऊ शकतात आणि भावना दुखावल्याचे किंवा भावना भडकण्याचे परिणाम काय असतात याची अनेक उदाहरणं आपल्या समाजात म्हणजेच आपल्या अवतीभोवती आढळून येतात. मुळात मातृत्वाबद्दलचं प्रबोधन होणं किंवा प्रबोधन करणं या क्रियेच्या आड येण्यास अवास्तव महत्त्व मिळालेल्या भावना बर्याचदा कारणीभूत ठरतात. यावर सोपा उपाय एकच, मातृत्वाचा आणि पितृत्वाचा आदर राखण्याचा स्वतः सदैव प्रयत्न करणं.

मातृत्वाला मातृत्वाने गुणलं तरच खर्या अर्थाने आई जन्माला येते.