Tuesday, 10 February 2015

इच्छामरण

मी माझ्या अर्ध्या भारतीय आणि अर्ध्या अमेरिकन कुटुंबासह नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या धांदलीमध्ये होतो. त्यातच पूर्वीच्या परिचितांशी पुन्हा धागेदोरे जोडण्याचाही प्रयत्न चालू होता. पण तरीही रहीमच्या लगबगीवर माझं लक्ष होतं. त्याच्या अंगात नेहमीच धावपळीचं भूत संचारलेलं असायचं. कितीतरी वेळा मला वाटलं की त्याला बोलावून विचारावं की अरे, तुला नेहमी एवढी घाई कशाची झालेली असते? पण जेव्हा जेव्हा हा विचार मनात आला तेव्हा तेव्हा काही तरी कारणानं ते राहून गेलं. कधी कोणी पेशंट सीरियस व्हायचा, कधी कोणी बाहेरचे डॉक्टर आलेले असायचे, कधी ऑक्सिजनची सिलिंडरं येऊन पडली आहेत असा निरोप यायचा आणि मग ती आणण्याची  व्यवस्था करायला लागायची तर कधी आणखी काही.

त्याचं घर जवळच होतं. आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक दोन-तीन खोल्यांचं आऊटऱ्हाऊस होतं, साधारणपणे सगळ्या बंगल्यांमध्ये असतात तसंच. त्याच आऊटऱ्हाऊसमध्ये त्याचे आजोबा पण रहात होते. माझ्या लहानपणाच्या आठवणींमध्ये त्यांच्या आठवणी खूप आहेत. ते मला बग्गीतून शाळेत सोडत असत आणि पुन्हा शाळेतून घरी घेऊन येत असत. त्यांच्या रिकाम्या वेळात कधी कधी ते मला उर्दू लिपी देखील शिकवत असत. बंगल्याच्या भोवती असलेल्या झाडांना ते पाणी देत. फक्त फुलझाडांनाच नाही तर आंबा, चिंच अशा झाडांनाही ते पाणी घालत असत. मोठ्या झाडांना पाणी घालताना पाहून मी त्यांना विचारलं होतं, "जंगलातल्या मोठ्या वृक्षांना कुठे पाणी घालतात, मग ह्यांना कशाला घालायचं?" त्यावर ते म्हणाले होते, "हो, तुझं बरोबर आहे, पण हे बघ, माणसाला सुद्धा दोन दिवसातून एकदा जेवण आणि दोन पेले पाणी एवढंच दिलं तरी तो काही मरणार नाही. पण ते जगणं निराळं! खरं तर दिवसातून एकदा पाणी मिळणं हा प्रत्येकाचा हक्कच आहे. निसर्गाला झाडं काय, माणसं काय सगळे सारखेच."

काही दिवसांतच बाबांनी पोलिस खात्यात वरच्या हुद्द्यावर असलेल्या आपल्या एका मित्राला सांगून त्यांना पोलिस खात्यात नोकरी मिळवून दिली होती. मग त्यांच्या जागी रहीमचे वडील खालिद मियॉं आमच्याकडे काम करायला लागले. खालिद मियॉं मध्यम बांध्याचे होते. त्यांना टापटिपीची आवड होती. व्यवस्थित कापलेली छोटीशी दाढी त्यांना खूपच शोभून दिसायची. दिवसातून दोन वेळा नमाज पढणं आणि स्वतःची कामं करणं यांना लागणारा वेळ सोडून ते जवळजवळ चोवीस तास कामावर असायचे. 

मी डॉक्टर होऊन हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा सगळ्यांना आनंद झाला. मी बाबांच्या टेबलाजवळच खुर्ची घेऊन बसायचो. सुरुवातीला लोक मला ’छोटे डाक’ म्हणायचे. ते त्यांना अजिबात पसंत नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की अशी नावं एकदा चिकटली की कायम चिकटूनच राहतात. ते सांगायचे "’छोटे डाक’ नाही, ’नवे डॉक्टरसाहेब’ म्हणा." 

बाबांच्या बरोबर काम करायला सुरुवात करून थोडेच दिवस झाले होते, तेवढ्यात माझ्यापुढे एम.डी. करण्याची संधी चालून आली. मी पुन्हा महाविद्यालय आणि वसतिगृह ह्या विश्वात आलो. तेव्हा   फास्टर नावाचे एक डॉक्टर आम्हाला शिकवत असत. त्यांच्या शेवटच्या तासाला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, "एका उत्तम डॉक्टरला एक चांगला मानसशास्त्रज्ञ देखील असावं लागतं. ज्या पेशंटजवळ स्वतः बरं होण्याची फारशी इच्छा नसते, जो निराशा किंवा नकारात्मक विचारांनी ग्रासलेला असतो त्याला बरं करणं जवळजवळ अशक्यच असतं. पण ज्याच्याजवळ जिवंत राहण्याची तीव्र इच्छाशक्ती असते त्याच्याकडून डॉक्टरला चांगलं सहकार्य मिळतं. असे पेशंट बरे होण्याचं प्रमाण खूप असतं. अर्थात विज्ञानालाही आपल्या मर्यादा आहेत."

एम.डी.ची शेवटची परीक्षा संपली न संपली तोच आई गेली. घरातल्या कुणाचा मृत्यू मी प्रथमच पाहात होतो. बाबा पहाडी भागातल्या आमच्या छोट्याश्या गावातील सर्वात व्यग्र डॉक्टर होते. आईने अनेक वेळा सांगूनही ते माझ्या वाढदिवसाला कधी वेळेवर घरी आले नव्हते. इतकंच नाही तर सणाच्या दिवशी पूजेलासुद्धा ते कधी वेळेवर येऊ शकत नसत. त्यामुळे माझी त्यांच्याशी जवळीक अशी कधी झालीच नाही. ते त्यांच्या कामात अतिशय व्यग्र असल्याने अशा कार्यक्रमांतील त्यांची अनुपस्थिती आम्ही चालवून घेत होतो. तसं पाहिलं तर त्यांचं वागणं अगदी सौजन्यपूर्ण होतं आणि आम्हाला काय हवे असेल ते देण्याच्या बाबतीत ते अगदी उदार अंतःकरणाचे होते. घरगुती गोष्टी, नातलगांकडे जाणंयेणं, देणंघेणं ह्या बाबतीत त्यांनी आईला कधीही विरोध केला नाही. पण आईला ह्याहीपेक्षा आणखी काही तरी जास्त महत्त्वाचं वाटत होतं. तिला बाबांचा वेळ हवा होता, स्वतःसाठी, माझ्यासाठी आणि घरासाठीही! पण तो तिला कधीच मिळाला नाही. त्यामुळे आई गेल्यावर माझ्या मनातली घर नावाची वस्तू धडाधड कोसळून गेली. मी तेव्हा तसा मोठा होतो आणि पहाडी भागातल्या छोट्याश्या गावातल्या डॉक्टरवर केवढी जबाबदारी असते याची मला पूर्ण कल्पना होती. पण रात्री अकरा-अकरा वाजेपर्यंत वाट बघणाऱ्या आणि तेव्हा अन्न गरम करून बाबांना वाढणाऱ्या आईची आठवण झाली की बाबांचं वागणं क्षम्य वाटत नसे. आईचे सगळे अंत्यविधी पुरे करून मी परत वसतिगृहात आलो.

त्यावेळी महाविद्यालयाला सुट्टी लागली होती आणि विद्यार्थी आपापल्या घरी गेले होते. प्राध्यापक  निवासात फक्त डॉ.फास्टर होते आणि विद्यार्थी वसतिगृहात मी एकटा. हे माझ्या पथ्यावर पडलं आणि सरांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीत वेळ घालवायला साधन मिळाल्यासारखं झालं. त्यांनी आपले कितीतरी अनुभव त्यावेळी मला सांगितले. नवी औषधं, नवे शोध, नवनवे प्रयोग आणि त्यांचे समाजाला उपयोग ह्याबद्दलचं ज्ञान त्यांनी मला दिलं. ते नेहमी संगणकासमोर बसून आंतरजालावर वैद्यकीय माहिती वाचत असत. त्यांच्या नेहमीच्या वर्गात मी शंभर मुलांमधला एक असायचो पण आता मात्र एकट्याने त्यांच्याकडून शिकण्याचं भाग्य मला मिळालं.

एम.डी.च्या निकालानंतर मला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. बाबांना हे सांगितल्यावर त्यांनी आनंदानं परवानगी दिली. त्यावेळी ’फॉरेन रिटर्न  डॉक्टर’ची क्रेझ होती. पण मी एकदा तिथे पोहोचल्यावर तिथल्या आयुष्यात इतका गुरफटलो की फक्त ’क्रेझ’ राहिली आणि ’रिटर्न’ विसरलो! मधल्या काळात मी माझी अमेरिकन सहकारी डॉक्टर नॅन्सी हिच्याशी विवाह केला. नॅन्सी तिथली स्त्रीरोगतज्ञ होती. शहरातल्या सगळ्या पंजाबी, गुजराती लोकांशी ती हिंदीत बोलायची. त्यांनाही ते आवडायचं. खरं तर त्यांना स्वतःला हिंदी फारशी फारशी येत नसे. कारण त्यांची मातृभाषा वेगळी होती, अमेरिकेत रहायचं तर इंग्रजी यायला पाहिजे म्हणून ते इंग्रजी शिकले होते. हिंदी त्यांच्यासाठी तिसरी भाषा होती. तिथे गेलेल्या आधीच्या पिढीतल्या भारतीयांना तर डॉ.नॅन्सी सारख्या अमेरिकन डॉक्टरनं आपल्या भारतीय डॉक्टरशी लग्न केलं आणि ती हिंदी बोलते ह्याचाच आनंद व्हायचा. ते बोलूनही दाखवायचे, "वुई आर सो ग्लॅड बिकॉज यू स्पीक हिंदी सो फ्लूएंटली. बट वुई कान्ट अंडर्स्टॅंड हिंदी."

इथलं मोठं घर, फार्म हाऊस, सर्वांच्या पासबुकात जरुरीपेक्षा किती तरी जास्त डॉलर्स! दहा वर्षं कशी गेली कळलंच नाही. बाबा गेल्याचा फोन आला आणि एखाद्या गुंगीतून बाहेर यावं तसं माझं झालं. माझं पहाडातलं गाव, तिथलं माझं घर, आमचं  नर्सिंग होम आठवलं. मागचं आउट हाऊस, परसातल्या आंब्याच्या मोहोराचा सुगंध, मला शाळेत नेणारी बग्गी, ती बग्गी ओढणारी पांढरी घोडी- हे सर्व डोळ्यांसमोर आलं. आणि ह्याबरोबरच आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट - आता नर्सिंग होमवर अवलंबून असलेल्या जवळजवळ चाळीस कुटुंबांचं काय होणार? 

माझ्या मनात चाललेली खळबळ नॅन्सीच्या लक्षात आली होती आणि त्यामुळे ती पण जरा  घाबरली होती. खरं तर तिनं भारत फक्त नकाशातच पाहिला होता आणि एकदा दूरचित्रवाणीवर एका कार्यक्रमात विधानसभेच्या अधिवेशनातील काही भाग दाखवत होते तेव्हा
एका आमदारानं एका मंत्र्याचं धोतर खेचलं होतं तो प्रसंग तिच्या पाहण्यात आला होता. घाईघाईत काही तरी निर्णय घेऊन तिला अडचणीत टाकायची माझी इच्छा नव्हती. आमची मुलं आता अशा वयाची होती की हा बदल त्यांच्या भविष्यकाळावर मोठा परिणाम करणारा ठरणार होता. इथे त्यांना चांगलं शिक्षण मिळणार होतं, अनेक संधी उपलब्ध होत्या. मला ग्रीन कार्ड मिळालं होतं. आम्हा दोघांना कामाचं समाधान आणि पैसा- दोन्ही भरपूर मिळत होता. आमचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही उज्ज्वल म्हणावेत असे होते. इथल्या सुखासीन, सुरक्षित आयुष्याची आम्हाला सवय झालेली होती. 

आठवडाभर मी उलटसुलट विचार करत होतो पण काही निर्णय घेऊ शकलो नव्हतो. माझं रोजचं काम नेहमीसारखं चालू होतं. नॅन्सीशी मी ह्या गोष्टीवर काहीच चर्चा केली नव्हती. पण बहुतेक तिच्या मनात पण हेच विचार चालले होते. रविवारी सकाळी मी तिला पंजाबी ड्रेस मध्ये पाहिलं आणि ती आज चर्चमध्ये जाणार नसावी असा मी अंदाज केला. माझ्यासमोर नाश्त्याची बशी ठेवत ती म्हणाली, "आयुष्यात भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणं बरोबर नाही पण केवळ बुद्धीच्या आधारावरही आयुष्य जगता येत नाही."

मी म्हटलं, "तू काय म्हणतीयस?"

"आपण भारतात जायचं. मी हॉस्पिटलला फोन केला आहे. आपल्या दोन मुलांच्या भविष्यासाठी पहाडात राहणाऱ्या त्या हजारो लोकांची जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही."

तिनं हे सगळं इतकं चटकन आणि सहजपणे सांगितलं की मी अवाक झालो. जरा थांबून मी विचारलं, "तुला आज चर्चमध्ये जायचं नाही का? आज रविवार आहे!" 

त्यावर ती म्हणाली, "नाही. मी प्रॉपर्टी डीलरला फोन करून त्याला भेटायची वेळ ठरवली आहे. त्याचं ऑफिस रविवारी देखील चालू असतं."

जेमतेम एका आठवड्यानंतर आम्ही दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरलो. तिथून आमच्या पहाडी गावापर्यंत जाण्यासाठी आम्ही टॅक्सी ठरवली. सबंध रस्त्यात माझ्या डोक्यात हॉस्पिटलशिवाय दुसरे विचार नव्हते. मुलं पण गप्प गप्प होती. नॅन्सी गंभीर होती. तिच्याही डोक्यात तिच्या स्त्रीरोगविभागाबद्दल काही योजना चालू असाव्यात. सोनोग्राफीला लागणारी आणि इतर काही उपकरणं तिनं बरोबर आणली होतीच. 

घरी पोहोचल्यावर पाहिलं तर वातावरण बदललेलं होतं. बंगल्याचं कौलारू छप्पर जाऊन तिथे कॉंक्रीटची स्लॅब आली होती. हॉस्पिटलची बिल्डिंग आधुनिक झाली होती आणि इतरही सुधारणा झाल्या होत्या. बाबा एक चांगले आणि जबाबदार डॉक्टर होते. सगळ्या विभागांचं काम स्वतः बघत असत. शिवाय आठवड्यातून काही दिवस डेहराडूनहून स्पेशालिस्ट येत असत. काही जणांचे ऑपरेशनचे वारही ठरलेले होते. एक जोशी नावाचे ज्युनियर डॉक्टर नियमित यायला लागले होते. ते मुख्यत्वे पेशंटचा फॉलो-अप बघत असत. 

रहीम बंगल्याच्या मागच्या त्याच आऊटऱ्हाऊसमध्ये रहात होता. त्याच्या वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. रहीम कॉलेजमध्ये जात होता आणि हॉस्पिटलमध्ये कामही करत होता.  त्याची आजी पण तिथे होती. आजीला आजोबांची पेन्शन मिळत होती. वडिलांनी हॉस्पिटलमध्ये कुटुंब नियोजनाचा प्रचार आणि प्रसार  करता करता  स्वतः मात्र रहीमच्या मागे मुलांची पलटण उभी करून ठेवली होती! एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी आजीची पेन्शन आणि रहीमचा पगार एवढंच होतं. रहीमची आई पडद्याची प्रथा बाजूला सारून परसात भाज्या वगैरे लावायची. मुलांपैकी मुलगे शाळेत जायचे, मुली घरीच असायच्या.

रहीमचे वडील खालिदमियॉं हॉस्पिटलमध्ये जे काम करायचे, साधारण तेच काम रहीम करायचा. स्वयंपाकी, पाणक्या, शिपाई- थोडक्यात पडेल ते काम तो करायचा. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधी माझं आणि नॅन्सीचं टेबल नीट लावून ठेवायचा, झटकण्यानं धूळ साफ करायचा.

थोड्या दिवसांपूर्वी तो आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. आजी खूप वृद्ध, कमरेत वाकलेली असूनही मोठ्या हिमतीची वाटत होती. ती आपल्या तब्बेतीला जपून असायची. बहुतेक ह्या वयातले लोक असंच वागतात. एखादा कंजूस माणूस आपल्याजवळ असणारा थोडाफार पैसा सुद्धा कसा सांभाळून ठेवतो तसंच हे लोक आपलं उरलंसुरलं आयुष्य जपतात. त्यामुळे ती तशी हॉस्पिटलात बऱ्याचदा यायची. सिस्टर्स, कंपाउंडर तिच्याशी प्रेमादराने वागत. काल आली होती तेव्हा सिस्टर राबिया तिला गमतीत म्हणाली, "काय आजी, अल्लाच्या घरी जायचं नाही का?" तेवढ्यात रहीम कुठूनतरी एकदम टपकला आणि म्हणाला, "आजी, मी बी.एस्सी. होईपर्यंत जायचं नाही हं. नाहीतर आमचं सगळं संपलंच!"  आजी विश्वासानं म्हणाली, "नाही जाणार बाबा, मला पण काळजी आहे नं! पण एकदा तुझं शिक्षण झालं की मग मात्र मला अडवू नकोस. आता कंटाळा आला ह्या जगण्याचा." रहीम पण अगदी विश्वासानं  म्हणाला, "आजी हे शेवटचं वर्ष आहे. त्यानंतर तुला अडवणार नाही. बी.एस्सी.चा निकाल आणता आणताच कब्रस्तानात जागा बघून येईन."

आमच्याकडे रविवारच्या संध्याकाळला ’थॅंक्यू अवर इविनिंग’ म्हणतात. ह्यावेळी हॉस्पिटलचे कर्मचारी आणि त्यांचे आईवडील बाळ-बाळंतिणीला दाखवायला घेऊन येत असत. ह्याच वेळी मी हॉस्पिटलची काही प्रशासनिक कामं पण बघायचो. कर्मचारी आपल्या काही अडचणी सांगायला येत असत. सुट्ट्या मंजूर करणं, ड्यूट्यांचं वेळापत्रक ठरवणं ही कामं पण तेव्हा होत. एकूण वातावरण जरा सैल असायचं. खाणंपिणं, गप्पाटप्पा पण व्हायच्या. इतर दिवशी हे शक्य नसायचं. 

नॅन्सी बीझी असायची. त्या भागात सोनोग्राफीची सोय फार थोडया ठिकाणी होती. शिवाय हिंदी बोलणारी अमेरिकन स्त्रीरोगतज्ञ म्हटल्यावर तिच्याकडे पेशंटांची नेहमी गर्दी असायची. पण तरीही ती त्रासलेली नसायची. अमेरिकेतल्यासारखी तिला इथे ठराविक वेगाने गाडी चालवावी लागत नव्हती. रोजच्या जरुरीच्या वस्तूंसाठी लांब लांब जायला लागत नव्हतं. तिला इथलं निसर्गसौंदर्य, छोटेछोटे धबधबे, देवदार वृक्ष आणि समोर हिमालयाची पवित्र शिखरं हे सगळं आवडत होतं. मुलांना आम्ही बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं होतं. 

आमच्या बंगल्याची खिडकी आऊटऱ्हाऊसच्या बाजूलाच उघडत असे. मला तिथून रहीमच्या घरात काय चाललंय ते दिसायचं. रहीम आजीची जरा जास्तच काळजी घ्यायचा असं मला वाटायचं. खरं म्हणजे त्याच्या आईची तब्बेतही यथातथाच होती. पण मुलांचा ओढा बहुधा आजीकडे जास्त असतो असं मला वाटतं. कदाचित त्याच्या सुप्त मनात आजीच्या पेन्शनचाही विचार येत असेल. आजी गेली की पेन्शन बंद! मग एवढ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार असेही विचार त्याच्या मनात येत असावेत. परवाच त्याला आजीशी बोलताना ऐकलं होतं, "आजी, अल्मोड्याला चाललोय अर्ज भरायला. आजोबांनी दिलेला शब्द मोडला. पण तू तसं करायचं नाहीस बरं का. सांगून ठेवतोय." मला कुणी तरी सांगितलं होतं की रहीमच्या आजोबांनी त्याला दिलेला शब्द मोडला होता! रहीम दहा वर्षांचा होता तेव्हाची गोष्ट. आजोबा तेव्हा रजा घेऊन घरी आले होते. तेव्हा त्यांनी रहीमला पुढच्या वेळी तुझ्यासाठी खेळातली बंदूक नक्की घेऊन येईन असं सांगितलं होतं. पण ते आलेच नाहीत! आली ती त्यांची पेन्शन आणि एक भली मोठी काळी पेटी!        

रहीम खूप दिवस आजोबांवर रागवून बसला होता. त्याच्या आजोबांना आपली ड्यूटी करताना दहशतवाद्यांची गोळी लागून मृत्यू आला. मग ते आपला शब्द कसा काय पाळणार? हे काही कुणी रहीमला किती तरी वर्षं पटवून देऊ शकलं नव्हतं. असो. रहीमचा आजीवर मात्र विश्वास होता. आजीची तब्बेत जरा इकडे तिकडे झाली की तो आजीला आठवण करून द्यायचा. म्हणायचा, "आजोबांच्या सारखं काही करायचं नाही!" त्यावर आजीबाई पण आत्मविश्वासानं सांगायच्या, "अरे, माझ्यावर विश्वास ठेव. मी  तुझ्या आजोबांसारखी नाहीये. शिवाय देव जरी मला ओढून न्यायला लागला तरी डॉक्टरसाहेब मला जाऊ देतील का?"

आज सकाळी आजीचा रक्तदाब खूप वाढला होता. तिला हॉस्पिटलात भरती केलं आणि मी काही इंजेक्शनं दिली. डेहराडूनहून एक हृदयरोगतज्ञ आठवड्यातून एकदा हॉस्पिटलमध्ये यायचे. शेवटी त्यांच्याशी पण बोललो. त्यांनी रक्तदाब पाहिला तेव्हा तो अगदीच खाली गेला होता. त्यांनीही दुसरी इंजेक्शनं दिली पण त्याला आजीच्या शरीरानं काहीच प्रतिसाद दिला नाही. 

मला वाटलं रहीमच्या मनाची आता तयारी केली पाहिजे. मी त्याला माझ्या खोलीमध्ये बोलावलं आणि म्हणालो, "हे बघ रहीम, आजी आता सीरियस आहे. आपल्याला ह्या गोष्टी स्वीकारायला पाहिजेत. आजीनं मला शब्द दिला होता, तरी असं झालं, तसं झालं ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. तू आता लहान नाहीस. इतकी वर्षं हॉस्पिटलमध्ये काम करतोयस. तर हे समजून घे. शिवाय तुझ्या शिक्षणाची काळजी करू नकोस.  कोणत्याही परिस्थितीत तुझं शिक्षण चालू राहील. आम्ही आहोत नं त्यासाठी!"

रहीम दरवाज्याच्या जवळच उभा होता, तो लगेच बाहेर सटकला. त्याला माझं बोलणं पटलं असावं. कुठे तरी एका कोपऱ्यात बसून रडत असेल. मी खोलीतून बाहेर पडून मागे वॉर्डच्या बाजूला गेलो तर रहीम नेहमीसारखा तिथे काम करत होता.

घरी जाण्यापूर्वी मी पुन्हा आजीला पहायला अतिदक्षता विभागात गेलो. सिस्टर ऑक्सिजनचं सिलिंडर बदलत होती. मी रक्तदाब पाहण्याचा प्रयत्न केला पण तो घेताच येत नव्हता. मी पत्नीला बोलावणं पाठवलं. ती  हॉस्पिटलच्या दुसऱ्या टोकाला होती. आज तिला एक ऑपरेशन होतं आणि भूल देण्यासाठी अल्मोड्याहून एक डॉक्टर आले होते. तरी ती धावत आली. आम्ही दोघांनी मिळून आजीला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. ती तिच्या ऑपरेशनसाठी गेली आणि मलाही दुसरीकडून बोलावणं आलं. 

मधल्या वेळात सिस्टरनं नाडी पाहिली. पूर्ण खात्री करून घेऊन  मी न सांगताच ऑक्सिजनचं सिलिंडर वगैरे काढून टाकलं. एवढ्या वेळात रहीम मला भेटला नाही. हा रहीम म्हणजे एक वेगळाच माणूस होता. खरं तर मला त्याला भेटणं नकोच वाटत होतं! त्याची समजूत कशी घालायची? तेवढ्यात अकाउंटंट म्हणाला, "तो पुस्तक आणायला गेलाय." नॅन्सी आणि भूल देणारे डॉक्टर पण आले. थोड्याच वेळात इतर सिस्टर्स, कंपाउंडर, अकाउंटंट, आया -सगळेच तिथे जमा झाले. सगळे माझ्याकडे बघत होते आणि मी त्यांच्याकडे! दोन मिनिटांनी मी जरा जोरात म्हटलं, "सगळे आपापल्या कामाला जा बघू!"     

ते गेले आणि आणि दोनच मिनिटांत रहीम आला. वेटिंग रूममध्येच सिस्टर्सनी त्याला घेरलं आणि सांगायला लागल्या, "रहीम, मन घट्ट कर, धीरानं घे...." रहीम म्हणाला, "काय बोलताय राबिया आंटी, माझी आजी आपला शब्द कधीही मोडणार नाही. तुम्ही रडताय कशाला? कमाल आहे. लोकांचा माझ्यावर विश्वासच नाही." असं बोलत बोलत तो आजीच्या बिछान्याजवळ गेला. मी पण तोपर्यंत तिथे पोहोचलो होतो. रहीमनं आजीच्या खांद्याखाली अलगद हात ठेऊन तिला जरासं उचललं आणि म्हणाला, "चल आजी. आपण जरा वेटिंग रूममध्ये जाऊ. इथे फार कोंदटल्यासारखं होतंय." आणि काय आश्चर्य! त्या विझलेल्या डोळ्यात चमक आली, खोल गेलेले गाल जरासे हलले आणि क्षीण आवाजात दोन शब्द ऐकू आले, "चल बाळा."  दुसऱ्या क्षणाला ती शंभर वर्षांची आजी रहीमच्या आधारानं वेटिंग रूममध्ये चालली होती!

सगळे डॉक्टर्स, सिस्टर्स  आणि मी स्तंभित होऊन ते पाहात राहिलो!

No comments:

Post a Comment