Tuesday 10 February 2015

चहा











पूर्वी चहा करण्याची पद्धत किती छान होती ना! पाण्यामध्ये साखर घालून मग ती विरघळली की चहाची भुकटी घालायची. चहा करण्यासाठी एक वेगळे भांडे पण असायचे. त्या भांड्याला दोन कान असायचे. हे भांडे गॅसवर ठेवले की बरेच वेळा ते तिरके व्हायचे व त्यातला चहा बाहेर यायचा किंवा चिमट्याने पकडताना चहा गाळायच्या वेळेस एखाद वेळेला सांडायचा. चहाचे हे भांडे मला खूप आवडायचे. सर्व बाजूने गोल गरगरीत  असायचे हे भांडे !





या भांड्यामध्ये चार ते पाच कप चहा होत असे. पाण्यामधली साखर विरघळून चहाची भुकटी टाकली की थोडावेळ उकळू द्यायची. ही उकळी काही वेळा भर्रकन यायची. उकळीमुळे चहा भांड्याच्या बाहेर येऊ नये म्हणून गॅस बारीक करायला लागायचा. चहाच्या भांड्यावर ठेवायला एक झाकणही असायचे. सकाळचे मुख्य दूध तापले की ते नेहमी बाजूला ठेवलेले असायचे. त्यावर झाकण, तेही जाळीचे ! मुख्य दुधातले चहासाठी वेगळ्या भांड्यात दूध काढून ते तापवायचे व नंतर झाकण ठेवून मुरवलेला चहा गाळला जायचा. सकाळी उठून आई जेव्हा चहाच्या पाण्याचे आधण ठेवायची तेव्हा आईच्या आम्हाला उठवण्यासाठी हाका सुरू व्हायच्या. आई म्हणायची चहाचे आधण ठेवले आहे. दात घासून चहासाठी हजर व्हा म्हणजे पहिल्या वाफेचा चहा प्यायला मिळेल. आम्ही पण पटकन उठून हात पाय तोंड धुऊन व राखुंडीने खसाखसा दात घासून फरशीवर पाट मांडून चहा प्यायला बसायचो. बशीत ओतल्यावरही हा चहा कधी थंड झालेला पाहिला नाही. गरम गरम चहा प्यायला की खूप तरतरी येत असे.




चहा कपबशीत ओतल्यावर थोड्यावेळाने घेतला की त्यातली मजा निघून जायची. त्यावर थोडी साय धरायला लागायची. मग असा सायीचा चहा आम्हालाही अजिबात आवडायचा नाही. अगदी सुरवातीला आम्ही दोघी बहिणी चहा करायला शिकलो ते याच जुन्या पद्धतीने. नंतर नंतर बाकीच्या चुलत मामे बहिणींचे बघून आमची चहाची पद्धत बदलली. बाकीच्या सर्व स्टेप्स गाळून चहाचे पाणी, साखर चहा व दूध एकदम एकत्र करून उकळवायला लागलो. नंतर मग तो एकेका कपात गाळण्याने गाळून द्यायचा. अशा पद्धतीने केलेला चहा आईला अजिबात आवडायचा नाही. ती म्हणायची दूध किती नासता गं तुम्ही. अशा पद्धतीने चहाच्या लाल रंगाचा भडकपणा घालवण्यासाठी दूध खूप लागते.






जेव्हा आमच्या घरी पाहुणे येत असत तेव्हा आई मोठ्या पातेल्यातून चहा करायची आणि तो दुसऱ्या पातेल्यात गाळून ठेवायची. याला आई कोरा चहा म्हणायची. एकदा हा कोरा चहा करून ठेवला की ज्याप्रमाणे जो उठेल त्याला वेगळ्या पातेल्यात दूध गरम करून त्यात हवा असेल त्याप्रमाणे कोरा चहा घालून करून द्यायची. आई म्हणते की असा कोरा चहा करून ठेवला की त्याची मूळ चव बदलत नाही. दूध घालून मोठ्या प्रमाणात चहा करून ठेवला आणि नंतर तो गरम करून प्यायला दिला तर चहाची चव पूर्णपणे बदलते.





या कपबश्या पण किती छान असायच्या. ६ कप आणि ६ बश्या असा ठरलेला सेट असायचा. त्यातले काही कप आणि काही बश्या फुटल्या की दुसरा सेट आणि तो सुद्धा बोहारणीकडून ठरलेला असायचा. तिच्याकडे खूप छान छान कपबश्यांचे सेट असायचे. आधीच्या सेटमधल्या उरलेल्या बश्या झाकण ठेवायला उपयोगी पडायच्या. नुसते उरलेले कपही उपयोगाला यायचे. कोणाला अगदी अर्धा कप किंवा घोटभर चहा हवा असेल की मग तो या उरलेल्या कपातून दिला जाई.




कपबश्या जाऊन मोठाले मग आले. मगातून चहा यायला लागले तेव्हा चहाची मजाच गेली पण काही वेळेला एखादे बैठे काम करता करता अधून मधून एकेक घोट करत मगातले चहा बरे वाटायला लागले. या चहाच्या पद्धती पण किती वेगवेगळ्या. जितक्या पद्धती तितक्या वेगवेगळ्या चवी. कोणी जुन्या पद्धतीने चहा करतो, तर कोणी सर्व एकत्र घालून म्हणजे चहा पाणी साखर दूध घालून उकळवतो तर कोणी अर्धे पाणी व अर्धे दूध घालून त्याला उकळी आली की त्यात चहा घालतो. कोणी चहात सदैव आले घालतात तर कोणी चहाचे मसाले. मला आले घालून चहा खूप आवडतो. प्रत्येक घरी चहाचा एक खास ब्रँड ठरलेला असतो आणि त्याचा त्याला खूप अभिमान असतो. आम्हाला दोघांना टाटा चहा खूप आवडतो.



माझे लग्न झाले तेव्हा घरातली  माणसे व शिवाय आला गेला, पाहुणे रावळे असायचे. कोणी आला की प्रत्येकाला विचारायचे कोणी चहा घेणार का? प्रत्येक जण जास्त नको अगदी थोडा, अर्धा कप नाहीतर घोटभर. मला कोणी घोटभर चहा म्हणाले की खूप राग यायचा. घोटभर चहा काय घेता! घ्यायचा तर अर्धा कप घ्या किंवा कपभर नाहीतर घेऊच नका ना ! तर कोणाला एक कप चहा घेतला की अजून आहे का? अशी विचारणा व्हायची. मग मी नेहमीच २ ते ३ कप जास्तीचा चहा करायचे. माझ्या सासरी चहाचे एक भांडे कायम उकळत असायचे. इथे अमेरिकेत आल्यावर मात्र चहाची चव फारशी येत नाही. का कोण जाणे पण इथे ऐन कुडकुडणाऱ्या थंडीमध्येही अजिबात चहा प्यावासा वाटत नाही. याउलट भारतात असताना ऐन रणरणत्या उन्हातही खूप चहा प्यावासा वाटायचा. अभ्यास करताना, घराची पूर्णपणे झाडलोट करताना, आफीसमध्ये चहा हा हवाच. चहाने खूप तरतरी येते व कामाचा उत्साह वाढतो. चहा सर्वांना आवडतोच असे नाही. काहीजण मात्र अट्टल चहा पिणारे असतात. त्यांना कधीही चहा हवाच असतो. अगदी मध्यरात्री उठून जरी त्यांना कुणी चहा हवा का? असे विचारले तर लगेच माना डोलावतील.





तर असा हा चहा ! कपबश्यातून मगात गेला, गॅस व इलेक्ट्रिक शेगड्यातून मायक्रोवेव्ह मध्ये शिरला आहे. न आता चहाच्या भुकट्या राहिल्या न आता ते दाट दूध राहिले. चहा आता फक्त नावाला उरला आहे. 

No comments:

Post a Comment