Wednesday, 31 December 2014

तिने लग्न मोडलं..

तिने घरी गेल्या गेल्या आई बाबांना हाक मारून समोर बसवून घेतलं. तिचा निर्णय झाला होता पण तो निर्णय त्याला सांगण्यापूर्वी तिला आपल्या आई बाबांना सांगायच होतं. कपडे बदलून हात पाय धुण्याइतका वेळही तिला वाया घालवायचा नव्हता.
"आई, बाबा मला तुमच्याशी बोलायचय."
"भांडण झालम का कौस्तुभशी तुझं"बाबांनी थट्टेच्या स्वरूपात म्हटलं.
"मला कौस्तुभ बरोबर लग्न करायचं नाहीये."
"अग महिन्यावर लग्न आलं आणि आज असं का म्हणते आहेस अचानक? काय केलं त्याने?"आईने काळजीने विचारलं.
"मला त्याच्या सवयी नाही आवडत."
"अग दोन माणसांच्या सवयी नेहमीच वेगळ्या असतात. थोडं फार अ‍ॅडजस्ट करायलाच लागतं. तुझ्या आईला नाही का घर अगदी स्वच्छ लख्ख लागतं आणि मला नाही जमत म्हणून काय आम्ही लग्न मोडलं का? तुझी आई आवरते आहे आणि तिने पसारा कॉर्नर बनवला आहे माझ्यासाठी."
बाबा नेहमीच मस्करीच्या मूडमध्ये असत.
"अग तू आज त्याच्य मित्राच्या लग्नाला गेली होतीस ना मग काय झालं तिथे?"
"बाबा हे आजचं नाही आहे, मी लग्न ठरण्याआधीपासून पाहाते आहे आणि आज त्याचा कळस झाला."
"अग काय झालं ते बोल ना, नुसतं गोल गोल काय फिरते आहेस." आई
"आज त्याच्या मित्राचं केव्हिनच्या लग्नाची होतं. पार्टी एकदम मस्त होती, भरपूर खायला प्यायला. हो अगदी प्यायला सुद्धा होतं. आणि जेवणात भरपूर प्रकारचं नॉन व्हेज होतं "
"अच्छा म्हणजे तो नॉन व्हेज खातो आणि ड्रींक्स घेतो का? आणि म्हणून तुला लग्न मोडायचं आहे का?"
"आई नॉन व्हेज मीसुद्धा खाल्लय. मी त्यावर टिका करत नाहीये. तू ऐकणार आहेस पूर्ण का मधे मधे प्रश्नच विचारत राहणार आहेस."
"नमनाला घडाभर तेल ओतू नकोस, लवकर सांग काय ते."
"आई लग्न ठरल्यापासून आम्ही जेव्हा जेव्हा फिरायला गेलो आहोत तेव्हा तेव्हा मी पाहिलय त्याचं लक्ष माझ्याकडे कमी आणि आजूबाजूच्या मुलींकडे जास्त असतं. मी कधी फारसं मनावर घेतलं नाही. शिवाय दर वेळी हॉटेलात खायला गेल्यावर तीन चार डिशेस मागवायच्या आणि अर्थातच सगळं खाऊन होत नाही त्यामुळे त्या फुकट घालवायच्या. आज सुद्धा तसच झालं. एक तर केव्हिनच्या पार्टीत ड्रींक्स होते. हा बराच प्यायला त्यासोबत त्याने बरेच स्टार्टर्स खाल्ले. पार्टीत डान्स चालू होता तर तो डान्स करायलाही गेला. केव्हिनच्या बायकोची ज्युलीची एक मैत्रिण होती तिच्यासोबत डान्स करत होता. परक्या मुलीशी लगट करावी ती किती? काही सीमाच नाही. त्या मुलीनेच कंटाळून डान्स पार्टनर बदलला. तिच्याशी डान्स करून झाल्यावर मग अजून एका मुलीबरोबर डान्स केला त्याने, तेव्हाही तेच. मला पाहूनच संताप आला.
त्याचा डान्स करून झाला, मग आम्ही दोघं जेवायला गेलो, मी त्याला म्हणत होते, तुझ्या मित्रांसाठी जेवायचं थांबूया, पण त्याने जेवायला घेतलं. पूर्ण ताट भरून फक्त नॉन व्हेज. अर्धसुद्धा खाल्लं नसेल बाकीच फेकून दिलं. तेव्हा आम्ही दोघांनीच जेवायला घेतलं होतं. मग केव्हिन आणि ज्युली जेवायला बसले तेव्हा मित्रांसोबत पुन्हा हा जेवायला बसला, पुन्हा तेच, ताट भरून जेवण घेतलं पण अर्ध्याहून जास्त फुकट घालवलं. शेवटी मी त्याच्या मित्राशी परमिंदरशी बोलले, ह्या त्याच्या सवयीबद्दल, तो म्हणाला, कौस्तुभ नेहमी असाच वागतो, खूप डिशेस मागवतो, खूप वाढून घेतो, आणि फुकट घालवतो. पूर्वी तो ड्रींक्स सुद्धा फुकट घालवायचा. तो जेवायला सोबत असला की त्याचे मित्र त्याच्या आधी वाढून घेतात आणि त्याला जास्तीची कोणतीही ऑर्डर द्यायला बंदी असते. तरी त्याने जर ऑर्डर केलेच तर त्याचं बील त्यालाच भरायला लावतात. परमिंदर केव्हिन श्रीराम आणि कौस्तुभ इंजिनियरिंगपासून एकत्र आहेत. परमिंदर म्हणाला गेली दहा वर्ष तरी त्याचं वागणं बदललं नाही. एकदा तर त्याच्या मित्रांनी त्याला मानसोपचार तज्ञाकडेही नेलं होतं. त्याने सांगितलं ह्याला कोणताही आजार नाहीये, फक्त पैशाचा माज आहे.
मला किळस आली हे सगळं पाहून आणि ऐकून आणि म्हणून मी ठरवलय मी कौस्तुभशी लग्न करणार नाही. आता मला प्लीज हे सांगू नका की स्वभाव बदलेल आणि एवढ्याश्या कारणासाठी लग्न मोडायची गरज नाही. मी अशा माणसासोबत आयुष्य काढू शकत नाही. तेव्हा आता आपण बसून हे ठरवू की त्याच्या घरी हे कसं कळवायचं. "
अशा तर्‍हेने इतर सर्व गोष्टी मेळ खात असतानाही जुईने लग्नाच्या एक महिना आधी स्वतःच लग्न मोडलं. कौस्तुभच्या घरी लग्न का मोडलं ह्याचं कारण सांगताना जुईच्या आईवडिलांना खूप त्रास झाला, पण जुईने ठरवलं होतं खोटं बोलायचं नाही. कौस्तुभ आणि जुईचे घर जवळ जवळ असल्याने त्यांच्या कुटुंबियात मित्रमंडळी कॉमन होते.त्या कॉमन मित्रमंडळींपैकी कोणीच जुईसाठी स्थळ आणले नाही.
यथावकाश जुईच लग्न झालं. कौस्तुभचं लग्न देखील झालं परंतु आजही कौस्तुभचे आईवडिल जिथे शक्य असेल तिथे - कॉमन मित्रमंडळींमध्ये जुईला दोष देतात.
तिचं चुकलं की बरोबर हे तुमचं तुम्हीच ठरवा.

शाळेतलं प्रेमप्रकरण.............

आजकाल लहान - लहान पोरांच्या प्रेम भावनेवर (तसेच इतर भावनेवर) मोठाले चित्रपट निघत आहेत... त्यातही त्याचे वातावरण ग्रामिण आहे तेव्हा शहरातले रितायर्ड म्हातारे अशा चित्रपटाचा खुपच आंनद घेत आहेत.... आज - काल चांगलं - वाईट असं काहीच राहलं नाही... कारण बाजार महत्वाचा.... पैसा मिळविणं महत्वाचं.... आपलं मत लोकांना पटवुन सांगता आलं की त्यातुन बरचं काही मिळविता येतं.... हे नविन कौशल्या बाजारात येत आहे.
.... कसं वातावरण होतं गावातल्या शाळेत विस-पंचविस वर्षापुर्वी.
आठव्या वर्गातली गंमत.
गावातल्या शाळेत इंग्रजी भाषेची नेहमीच बोंब असते... तशी त्याही शाळेत होती. आठव्या वर्गात शिकणार्‍या मुला-मुलीला सहसा शब्दाचे स्पेलिंग येत नव्हते...तसेच त्याचे मराठीतले अर्थ हि माहिती नव्हते... तेव्हा या वर्गातली एक मुलगी त्याच वर्गातल्या मुलाला शाळेची सुट्टी झाल्यानंतर वर्गातुन बाहेर निघतांना " I LOVE YOU समिर " म्हणाली .... त्या मुलाला तिचं बोलणं ऐकु आलं पण अर्थ कळाला नाही.... जवळच्या एका मुलाने ते बोलणं ऐकलं .... कारण तो त्याच्या सोबतच होता... समिर त्याला म्हणला " काय म्हणत होती ती?" तो त्यावर हसत म्हणाला... मला काय माहित.
दुसर्‍या दिवशी ती मुलगी वर्गात आल्या-आल्या परत त्याच्या जवळ जावुन हसत " I LOVE YOU " म्हणाली... त्यावर समिर चांगलाच वैतागला, पण ती पोरगी त्याच्या पेक्षा चांगलीचं दणकट होती, म्हणुन तिला तो काही बोलला नाही.... पण तिचं असं जवळ येऊन बोलणं त्याला आवडलं नाही.
एकदाचे शिक्षक वर्गात आले, काही बागचा-पुढचा विचार न करता समिर शिक्षकांना म्हणाला..." हि चिंगी दोन दिवसापासुन मला सारखं I LOVE YOU ... I LOVE YOU ... म्हणुन राहली... आता तिला तुम्हीच समजावुन सांगा!"
त्यावर ते शिक्षक बोलले... मला यातलं काहिच कळत नाही...कारण ते इंग्रजीत आहे... तेव्हा त्या विषयाचे शिक्षक आले की तु त्यांना विचार..." हे ऐकुन चिंगी हसली... समिर हिरमुसला.... सारा वर्ग हसायला लागला.
दुपारची सुट्टी झाली... मुलं घरी जेवायला निघली ... तेव्हा वर्गात कोणी नाही हे पाहुन चिंगीने संधी साधली आणी परत त्याला I LOVE YOU म्हणाली.
आता समिरचा राग अनावर झाला... त्याने चिंगीच्या भावना समजवुन न घेता ... सरळ शिक्षकांच्या खोलीत गेला, तिथे इंग्रजीचे शिक्षकही आराम करत होते.... गुरुजी ती चिंगी मला सारखं I LOVE YOU म्हणुन शिव्या देऊन राहली... हे ऐकुन इतर शिक्षकही हसयला लागले.
इंग्रजीचे शिक्षक म्हणाले ... जा, चिंगीला बोलावुन आण!
थोड्याच वेळात चिंगी तिथं हजर झाली.... शिक्षक तिला बोलले.." चिंगे I LOVE YOU म्हणुन तु या सम्याला का शिव्या देऊन राहली?"
"मी त्याला कुठं शिव्या देऊन राहली .... मी तर त्याला माझं त्याच्यावर प्रेम ....."
प्रेम शब्द ऐकल्या बरोबर शिक्षकाने चिंगीच्या कानाखाली लगावली... आणि सम्यालाही एक ठेऊन दिली.
...
....तेव्हा I LOVE YOU म्हणजे खुपच कठीण शब्द आहे असं सम्याला वाट्लं, नंतर ती दोघही गाल चोळीत घरच्या दिशेने जेवायला निघली.

स्वप्न आणि वास्तव

मॅनेजरसाहेबांनी रोहनच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि ते म्हणाले,"रोहन, मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. मला हे सांगायला आनंद वाटतो कि तू आपल्या कंपनीचा स्टार सेल्समन आहेस. जर आपल्या प्रत्येक सेल्समनने तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर कंपनी ची प्रचंड प्रगती होईल." मॅनेजरसाहेबांचे बोलणे ऐकून रोहनची छाती अभिमानाने भरून आली. "आणि हि आहे तुझ्या कष्टांची पावती, तुझे अप्रेजल लेटर.", असे म्हणत मॅनेजरसाहेबांनी एक एन्वलप पुढे केले. रोहन चा आनंद गगनात मावेना. त्याने थरथरत्या हातांनी एन्वलप घेऊन उराशी घट्ट कवटाळले. "अरे जरा उघडून तर पहा.",मॅनेजरसाहेब हसत म्हणाले.रोहनने धडधड्त्या छातीने आणि थरथरत्या हातांनी एन्वलप उघडले. आतला कागद उघडला आणि वाचायला सुरुवात केली. "कंपनी ला हे कळविण्यास दुःख होत आहे कि वाईट परफॉर्मंसमुळे आपल्याला कामावरून काढून टाकण्यात येत आहे." रोहन चमकला. "सर, याचा अर्थ काय?" त्याने मॅनेजरसाहेबांकडे पहात विचारले. एव्हाना रोहन कडे पाहून मंद स्मित करणाऱ्या मॅनेजरसाहेबाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मंद प्रेमळ स्मिताचे रुपांतर गडगडाटी खुनशी हास्यात झाले. "मूर्ख माणसा, याचा अर्थ तोच, जो तू लेटर मध्ये वाचलास. स्टार कसला, अरे तू तर फ्लॉप सेल्समन आहेस. कुठल्याच महिन्यात तू टार्गेट पूर्ण केले नाहीस. याचा परिणाम शेवटी हाच होणार" असे म्हणून मॅनेजरसाहेबांचे हास्य अधिकाधिक विकट होत गेले."नाही, हे साफ खोटे आहे",रोहन कानांवर हात ठेवून जोरात किंचाळला आणि.... आणि त्याच क्षणी त्याचे डोळे उघडले. त्याला दरदरून घाम फुटला होता. सरिता त्याला हलवून विचारत होती" अहो काय झाले?असे किंचाळलात कशाला? काही वाईट स्वप्न पाहिलेत का?"
"हो, ते एक वाईट स्वप्नच होते.अग काही कळत नाही. मी माझ्या कंपनीमध्ये एक यशस्वी सेल्समन आहे.पण मला सतत अशी अपयशाची स्वप्ने का पडतात?" "जाऊ दे ना.तुम्ही प्रत्यक्षात यशस्वी आहात. त्यामुळे अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करा.", सरिताने रोहनला समजवायचा प्रयत्न केला. "अगं दुर्लक्ष तरी किती करू? गेल्या काही दिवसात अश्या स्वप्नांची फ्रीक्वेन्सी वाढली आहे. काही तरी कायम स्वरुपी उपाय करायला हवा, ज्याने अशी स्वप्ने पडणे कायमचे बंद होईल. " "हो",सरिताने त्याला दुजोरा दिला.
असेच काही दिवस गेले.परिस्थिती फारशी बदलली नाही. उलट अधिकाधिक बिघडली. सरिताने एके दिवशी तिच्या खास मैत्रिणीला निशाला घरी बोलावले. कदाचित ती मार्ग सुचवेल अशी तिला आशा वाटली.निशाने सारे शांतपणे ऐकून घेतले.शेवटी ती म्हणाली,"अगं, अशी स्वप्ने पडतात बर्याचदा. त्याचे मनावर घेण्याचे कारण नाही. अश्या स्वप्नांचा विचार करणे त्यांनी थांबवले पाहिजे. तुझा नवरा यशस्वी सेल्समन आहे, त्यामुळे उगाचच काळजी करण्याची गरज नाही." सरिता यावर काहीशी गप्प झाली. तिला काही तरी बोलायचे होते, पण बोलावे कि नाही असा विचार ती करत होती. शेवटी मनाचा हिय्या करून ती बोलली,"निशा, तिथेच तर खरा घोळ आहे." "म्हणजे?",निशा सरिताच्या या बोलण्यावर बुचकळ्यात पडली. तिने प्रश्नार्थक नजरेने सरिताकडे पाहिले.सरिता बोलू लागली,"अगं मागच्या आठवड्यात मला यांच्या ऑफिस मधला सहकारी भेटला. त्याने मला काही वेगळेच सांगितले. रोहन स्टार सेल्समन वगैरे काही नाही. त्याचा कामातला परफॉर्मंस सामान्य आहे. "काय सांगतेस काय? "आता चकित होण्याची वेळ निशाची होती, "म्हणजे तुझा नवरा तुझ्याशी खोटे बोलतो." "कदाचित अगदीच तसे बोलता येणार नाही.रोहनला मी जेवढे जाणते त्यावरून सांगते, कि तो स्वप्नांच्या दुनियेत वावरणारा माणूस आहे.ऑफिसमध्ये परफॉर्मंस चांगला होत नसल्यामुळे तो असमाधानी असावा, त्यामुळे त्याने दिवास्वप्ने पाहायला सुरुवात केली असावी ज्यात तो स्वताला स्टार सेल्समन समजू लागला. पण आता प्रॉब्लेम हा आहे कि तो स्वप्नांची हि दुनियाच इतकी खरी मानायला लागला आहे. त्याच्यासाठी स्वप्न आणि वास्तव यातली सीमारेषा धूसर झाली आहे." "अच्छा!",निशा म्हणाली,"हा प्रॉब्लेम आहे तर.." "अगं नाही",सरिता म्हणाली,"प्रॉब्लेम इथेच संपत नाही." "म्हणजे?",निशाचा गोंधळ काही संपला नव्हता. "अगं, अश्या या परीस्थीती मध्ये त्यांनी खरतर दिवास्वप्ने बघणे बंद करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पण त्याच्या डोळ्यात आता वेगळेच खूळ शिरले आहे." "आता आणखी काय नवीन?",निशाने विचारले.
अगं याच्या डोक्यात लेखक बनण्याचे खूळ शिरले आहे. काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी मासिकात त्याने केतन भगतची मुलाखत वाचली. त्याने मुलाखतीत म्हटले, "फॉलो युवर ड्रीम्स, तुमची स्वप्ने पूर्ण करा." झाले, यांनी ते नको तितके सिरीयसली घेतले. जॉब सोडतो आणि पूर्ण वेळ लेखक बनतो म्हणताहेत.ऐकायलाच तयार नाहीत.काही दिवसापूर्वी रात्र रात्र जागून कसलीशी कादंबरी लिहिली म्हणे. अगं त्या केतन भगत चे ठीक आहे. त्याची बायको आहे आय आय एम वाली.भले त्या केतनची पुस्तके नाही खपली तरी ती त्याला आयुष्यभर पोसू शकेल. पण यांना हे कळेल तर शपथ.शिवाय केतनला पैसा मिळाला तो इंग्रजी पुस्तके लिहून. पण हे लिखाण करणार मराठीमध्ये. मराठी लिखाणात कुठला आलाय पैसा. मला एक तरी मराठी लेखक दाखव जो पूर्ण वेळ लेखक होता. एक तर सध्या रिसेशनच्या काळात हातात असलेला जॉब टिकवणे लोकांसाठी कठीण झाले आहे. आजूबाजूला रिसेशन मुळे जॉब गमावलेल्यांच्या गोष्टी ऐकल्या कि फार भीती वाटते. पण हे काही ऐकायलाच तयार नाहीत."
"अरे देवा",निशासुद्धा आता पुरती विचारात पडली.अचानक तिला मार्ग सुचला."सरिता, माझ्या ओळखीचे एक सायकीयाट्रीस्ट, आहेत, डॉ. बर्वे. आपण त्यांचा सल्ला घेतला तर?" "हं..",सरिताला निशाच्या बोलण्यात अर्थ जाणवला.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. ह्या वेळेला कोण आले असेल सरिताला प्रश्न पडला. तिने दरवाजा उघडला. दारात एक मध्यमवयीन सुखवस्तू दिसणारे गृहस्थ उभे होते. "रोहन काळे साहेबांचे घर हेच का?",त्यांनी पृच्छा केली. "आपण?", सरिताने विचारणा केली. रोहनला साहेब म्हणणारे हे गृहस्थ कोण असा तिला मनात विचार पडला होता. "आत आले तर चालेल ना?",त्यांनी विचारले. "माफ करा. याना आत." ते गृहस्थ आत येऊन खुर्चीवर बसले."आपण त्यांच्या पत्नी का?"त्यांनी विचारले."हो",सरिताने म्हटले. त्यांनी खिशातून एक एन्वलप काढले. "काळे साहेब घरात नाहीत?", त्यांनी विचारले. "नाही, ते ऑफिस मध्ये गेले आहेत." "काय, ते अजूनही ऑफिसला जातात?",त्या गृहस्थांनी विचारले. "म्हणजे? काय म्हणायचे आहे तुम्हाला?"सरिताच्या काळजात धस्स झाले. "रोहनचा जॉब सहीसलामत आहे कि नाही? आणि जर जॉब गेला असेल तर तो ऑफिस च्या नावाखाली गेला तरी कुठे?",तिच्या मनात एका क्षणात नाना प्रकारचे विचार येऊन गेले. तेवड्यात ते गृहस्थ हसत म्हणाले, "अहो वहिनी, गैरसमज नको. मला म्हणायचे होते कि त्त्यांना आता जॉब करायची काय गरज आहे? आता जॉब सोडायला सांगा." "म्हणजे?",सरिताने गोंधळून विचारले. निशाच्या चेहऱ्यावर सुद्धा गोंधळ होता. "हा घ्या चेक पाच लाखांचा",त्या गृहस्थांनी चेक पुढे केला."काय पाच लाख? पण कशाबद्दल?" "घ्या, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही?",आता बुचकळ्यात पडण्याची पाळी त्या गृहस्थांची होती.
"अहो वहिनी, काळे साहेब आता सेलेब्रिटी झाले आहेत. स्टार रायटर. एक प्रसिद्ध लेखक.मी मेहता प्रकाशनचा मालक. तीन महिन्यांपूर्वी काळे साहेबांनी त्यांच्या एका कादंबरीचे हस्तलिखित माझ्याकडे दिले. खरेतर आमची संस्था फक्त प्रतिथयश लेखकांचीच पुस्तके छापते. मी ते बाड खरतर अडगळीतच टाकणार होतो. पण सहज वाचायला गेलो आणि वाचतच गेलो. जादू आहे वहिनी काळे साहेबांच्या लेखणीत. सरस्वतीचे वरदान आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली. नुसती माउथ पब्लिसिटी. वाचकांच्या नुसत्या उडया पडल्या पुस्तकावर.गेले दोन महिने पुस्तक बेस्ट सेलर लिस्ट वर पहिल्या नंबर वर आहे. हजारो वाचकांनी ऍडवांस बुकिंग केले आहे पुढील आवृत्तीसाठी."
न राहवून निशाने विचारले,"हि कादंबरी आहे तरी कशाबद्दल?" मेहतांनी उत्साहाने सांगू लागले,"अहो, ही कथा आहे एका सेल्समनची. तो सेल्समन म्हणून फारसा यशस्वी होऊ शकत नाही. याचे दुखः लपवण्यासाठी तो त्याला हव्या असलेल्या यशस्वी आयुष्याची कल्पना तो करू लागतो. आपण यशस्वी सेल्समन झाल्याची दिवास्वप्ने पाहू लागतो. आणि त्यात तो इतका गुंततो कि सत्य आणि स्वप्न यात त्याची गल्लत होऊ लागते. स्वप्नातले आयुष्य खरे असल्याचे त्याला भास होऊ लागतात. आयुष्यातल्या अश्या वाईट पॅचमधून तो जात असताना त्याच्या वाचण्यात एक मुलाखत येते. त्या मुलाखतीतला संदेश त्याला भावतो,"फॉलो युवर ड्रीम्स, तुमची स्वप्ने पूर्ण करा." त्याच्या मनातली पूर्वीपासून सुप्त असलेली लेखक बनण्याची इच्छा उसळून वर येते. तो हे त्याची फॅमिली आणि मित्र यांच्याशी बोलतो,पण ते त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याला या वेडेपणापासून परावृत्त करू पाहतात. पण आता त्याचा निश्चय ठाम असतो. तो त्याची पहिली कादंबरी लिहितो आणि प्रकाशकांचे उंबरठे झिजवतो. बर्याच ठिकाणी निराशा पदरी पडल्यावर शेवटी एक प्रकाशक ती प्रकाशित करतो आणि.... रेस्ट­ इज हिस्ट्री...." मेहता पुढे बरेच काही बोलत होते. सरिता भान हरपून ऐकत होती. नकळत एक चुकार अश्रू तिच्या गालावर ओघळला. तो अश्रू अर्थातच आनंदाचा होता..

भ्रमभारीत"

)
दुपारचे दोन वाजले. अक्षांश जरा जड डोक्यानेच झोपेतून उठला. आई ने त्याला म्हटले, "चल फ्रेश हो. जेवून घे. "
अक्षांश कालची नाइट शिफ्ट करून सकाळी सातला घरी आला होता. त्याच्या अंगात काळा टी शर्ट होता, त्यावर "व्हाय'रस'? टेक ज्यूस! " असे लिहिलेले होते. कॅब दाराशी सोडून गेल्यानंतर झोपेच्या धुंदीतच तो पायर्‍या चढून वर आला, बेल वाजवताच त्याच्या आईने दार उघडले आणि तो बेडवर आडवा झाला होता.
आता दुपारी त्याला आपोआप जाग आली होती. झोपेच्या धुंदीत त्याला आईचे "फ्रेश, जेवण" एवढेच ठळक आणि नीट ऐकू आले. त्याने समोरच्या खिडकीतून पाहिले असता जरा अंधारून आल्याचे त्याला जाणवले. खिडकीतून पूर्णपणे पलीकडचे दिसत नव्हते कारण खिडकीसमोरच एक मोठे झाड होते. आता फक्त सहा तासांनंतर पुन्हा नाइट शिफ्टला कंपनीत त्याला नेण्यासाठी कॅब येणार होती. तो कॉल सेंटर मध्ये कामाला नव्हता तर टेक्निकल सपोर्ट चे त्याचे काम होते. नेटवर्किंग सपोर्ट. चोवीस तास सातही दिवस सपोर्ट. म्हणून शिफ्ट. पण, शेजारचे लोक शिफ्ट ड्यूटी असली म्हणजे बहुतेक कॉल सेंटर मध्ये काम असावे असेच गृहीत धरत. तसा तो सहसा त्यातला फरक इतरांना समजावून सांगण्याच्या फंदात पडायचा नाही.... पण हे काय? आज जरा डोके दुखतेय? नेहमी पेक्षा जरा जास्तच. का?
अक्षांश फ्रेश होवून आला. त्याने टीव्ही ऑन केला. आईने किचनमध्ये जेवण गरम करायला घेतले. तीवाही वर "माय टीव्ही न्यूज" चॅनेल लागले होते. म्हणायला ते न्यूज चॅनेल होते पण त्यावर न्यूज वगळता इतरच काहीबाही दाखवत होते. " ये देखिये असली भूत. भूतहा तसवीरें. अगर आप भूतों पे विश्वास नही करते, तो ये प्रोग्राम आपके लिये है. अगर आप भूतों पे विश्वास करते है तो भी यह ये प्रोग्राम आपके लिये है. देखिये कैसे एक घर में एक भूत ने मचाया हडकंप.. देखते रहिये ब्रेक के बाद! "
"काय वात आणलाय यांनी बाप रे. डोकं भेंगाळलंय नुसतं. आई SSS", तो ओरडला, "रिमोट कुठे आहे? "
स्वयंपाक घरात अन्न गरम करत असताना आईचे लक्ष किचनच्या खिडकी बाहेर खालच्या बाजूला असणार्‍या एका भाजीवाल्याकडे गेलं. आईचे लक्ष नाही पाहून अक्षांश ने स्वतःच रिमोट शोधला आणि "फायदे की आवाज" चॅनेल लावला. त्याने गुंतवलेल्या शेअर्स चे भाव खालच्या सरकणार्‍या पट्टीवर येईपर्यंत तो वाट पाहू लागला.
आई त्याचे समोर येऊन म्हणाली, " अरे अक्षांश, ऐक. अन्न गरम करून वाढून ठेवले आहे. खाऊन घे. मी जरा भाजी घेऊन येते, गाडीवाल्याकडून. दोन चार दिवसांसाठी. आज रात्रीसाठी डबा नेणारेस की कॅन्टिन मध्येच खाणार? म्हणजे त्यानुसार मी आतासाठी सुद्धा भाजी आणते... "
"आई... सरक बाजूला. माझा शेअर सरपटत निघून जाईल... मी रात्री जेवेन कॅन्टिन मध्येच किंवा बाहेर कुठेतरी! "
"बरं! " असे म्हणून आई खाली निघून गेली. अक्षांश किचनमधून ताट वाढून टीव्ही समोर आणून जेवण करू लागला.
त्याने गुंतवणूक केलेला शेअर आहे त्याच किमतीत होता. आठशे रुपये! ना कमी, ना जास्त. जेवताना सहज म्हणून खिडकी कडे लक्ष गेले असता, त्याला दिसले की पाऊस वेगाने बरसायला लागला होता. विजा चमकत होत्या. अचानक कोण जाणे त्याची नजर झाडावर खिळली. खिळूनच राहिली, डोळ्यांच्या पापण्या न हलता! त्याला दोन शून्य दिसले. पुसटसे. अस्पष्टसे. त्या शून्यांकडे तो शून्यात हरवल्यासारखा बघत राहिला. विजेच्या लखलखाटात ते दोन शून्य स्पष्ट दिसायला लागले. त्यापैकी एका शून्यांत एक मानवी कवटी आपल्याच धुंदीत हसत होती. दुसर्‍या शून्यात आणखी एक कवटी होती. तीच्या चेहेर्‍यावर प्रथम खिन्नता आणि विषाद व नंतर कारुण्य, वैषम्य असे भाव दाटायला लागले. विषाद आणि खिन्नता जेव्हा त्या कवटीच्या चेहेर्‍यावर दिसली तेव्हा ती सगळ्यात भेसूर कवटी वाटत होती. वीज मावळली. नंतर लख्ख अंधार! केवळ अंधार. पुन्हा वीज कडाडल्यावर तेथे कुरळ्या केसांचा एक अस्पष्ट चेहरा आकार घ्यायला लागला. समोर काय दिसतंय आणि का दिसतंय असा विचार अक्षांश च्या डोक्यात यायच्या आधीच त्याचे विचार थिजून गेले होते.... दृष्टी तर थिजली होतीच. फक्त समोर काहीतरी अमानवी दिसत होते, याची जाणीव मनाच्या कोपर्‍यात त्याला होत होती.
"त्सामिना मीना एह एह, वक्का वका एह एह, त्सामिना मीना झांगलेवा, धिस टाइम फॉर आफ्रिका! " असा रिंगटोन त्याच्या मोबाइलमध्ये वाजल्यावर त्याची ती नजर बंद करून टाकणारी तंद्री भंग पावली.
"हॅलो! " अक्षांश भेदरलेल्या अवस्थेत म्हणाला.
"हॅलो अक्स! अरे दचकलास की काय माझ्या फोनने? झोपला होतास का? "
"नाही रे. काही नाही. असंच आपलं! बोल तू! " त्याला आलेल्या अनुभवाला मुद्दाम विसरत तो म्हणाला.
"मी म्हटलं की येतोस का माझे घरी? थोड्या गप्पा गाणी आणि थोडी रपेट मारून येऊ या अफाट शहरात! आज मला आज थोडे खासगी काम होते, म्हणून सुटी घेतली होती पण आता ते काम झाले आणि मी फ्री आहे. मधुरा पण फ्री आहे. ती सुद्धा येते आहे कारण तीच्या रूम पार्टनर्स दोन्ही सुद्धा बाहेरगावी गेल्यात! " पलीकडून अभय बोलत होता.
"हे मनातलं बोललास. जेवण संपवून मी निघालोच. " आता पावसाचा जोर कमी झाला होता.
जेवण आटोपून, रेनकोट घालून, हेल्मेट घेऊन आणि दरवाज्याला लॅच लावून तो खाली निघाला. आई ने भाजी घेतलेली दिसत होती आणि ती कुणा शेजारच्या ओळखीच्या स्त्रीशी बोलत घराच्या एका ओट्यावर छताखाली बसली होती.
बाइक स्टार्ट करून त्याने घराची चाबी आईकडे फेकली आणि ओरडला, "आई, मी जरा येतो अभयकडे जाऊन SSS ही चाबी घे...! " चाबी आईजवळ ओट्यावर पडली.
आई त्याला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली, " ठीक आहे. संध्याकाळी ये लवकर घरी, सात साडेसात पर्यंत!! " पावसाच्या धारा कापत फक्त "घरी लवकर" एवढाच आवाज त्याचे पर्यंत पोहोचला.
(२)
पाऊस कमी असला तरी अंधारून आलेले होते. आता तो शहराबाहेरील निर्जन रस्त्यावर होता. अक्षांशच्या बाइक चा वेग जसजसा वाढत होता तसतसा बाइकच वेगदर्शक काटा मात्र विरुद्ध दिशेने फिरतोय असे लक्षात आल्यावर तो हादरला आणि त्याने त्या वेगदर्शकाच्या काचेत पाहिले. तर तेव्हा मात्र काटा योग्य दिशेनेच जात होता. मग, आधी दिसले ते काय होते? भास? आणि हे काय? आता मात्र काचेत त्याने जे पाहिले त्यामुळे त्याच्या तोंडातून आरोळी सुद्धा निघू शकली नाही इतका तो हादरला. त्याचे हेल्मेट घातलेले प्रतिबिंब त्याला दिसले खरे पण हेल्मेट च्या आत पिवळी कवटी होती... अचानक अनुभवलेल्या या भयाने तो सैरभैर झाला आणि त्याने हेल्मेट काढून बाजूच्या झुडुपांत फेकले. त्याची बाइक थोडक्यात पडता पडता वाचली आणि त्या अंधार्‍या झुडुपांत त्या हेल्मेट च्या आत मात्र एक जळणारी पिवळी कवटी हसत होती. आता पाऊस बंद झाला होता. अभयचे घर अजून दोन किलोमीटर होते. तो निघाला. हा भयप्रद अनुभव त्याला मनापासून हादरवून गेला. आता हे नक्की मी अभयला सांगतो, असे ठरवून तो अभयच्या घरी पोहोचला. मधुरा आलेली होती. तिने काळी थ्री फोर्थ जीन्स आणि लाल तंग टी शर्ट घातलेला होता. अभयने जिन्स आणि हिरवा टी शर्ट घातला होता.
ते कॉलेजपासूनचे मित्र आणि बॅचलर्स. शिकले याच शहरात, जॉबपण याच शहरात. त्यामुळे वरचेवर भेटणे व्हायचे. अभयच्या रुम मध्ये नवीन गाणी ऐकत त्या तिघांनी दुपार घालवली. मग त्यांनी संध्याकाळी हॉटेलमध्ये जायचे ठरवले.
"डिलक्स डिनर डायजेस्ट" म्हणजे थ्रीडी मध्ये संध्याकाळी डिनरच्या वेळेस दिवसातले दोन विचित्र अनुभव अक्षांशने सांगितले.
अभय: "हे बघ मित्रा, आपण जिवंत असताना मेलेल्या माणसांच्या गोष्टी कशाला करायच्या? एन्जॉय यार. ही मधुरा बघ. मस्तपैकी आठवडाभर आपले काम व्यवस्थित करते. पैसा कमावते. नंतर त्या अंकेश बरोबर मस्त एन्जॉय पण करते. नंतर ही सुद्धा जाणारेय यूएस ला. लोक कुठल्या कुठे चाल्लेत. तू आपला करत बसलास भूत भूत.... "
मधुरा : "अक्षांश, खरे सांगायचे तर विज्ञानाकडे या गोष्टीचं पण उत्तर आहे. याला भास असे आपण म्हणतो. मनात विचार जास्त झाले की असे होते, लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली की देशाचे जसे होते तसे! मन एका मर्यादे पलीकडे जास्त विचार सहन करू शकत नाही. "
अभय: "किंवा मनात एकाच प्रकारचे विचार जास्त गर्दी करू लागलेत की सुद्धा असे भास होतात, जसे एखाद्या देशात हुकूमशाही पद्धतीच्या लोकांची संख्या जास्त झाल्यावर देशाचे जसे होते तसे, बरोबर ना मधुरा? "
मधुरा हसली.
अक्षांश: " अरे पण, माझ्या मनात तशा प्रकारचे काही विचार नव्हतेच... खरं सांगायचं तर, कोणत्याच प्रकारचे विचार नव्हते मनात!.. तरीही असे कसे होईल? "
मधुरा: "अशा वेळेस आपलं सुप्त मन जागृत होतं आणि आपल्या मुख्य मनाला विचार पुरवतं! गॉट इट? आता चल पार्टीची मजा खराब करू नको... तिकडे बघ! "
स्टेजवर आकर्षक गायिका मादक स्वरात गाणे गात होती. तिघांची ती संध्याकाळची सोबत त्यांनी मस्त मजेत घालवली. नंतर थोडे डिजे वर थिरकून मग एकमेकांना बाय बाय करून ते तिघे आपापल्या घरी गेले.
रस्त्याने येताना अक्षांशला जेथे हेल्मेट फेकले होते ती जागा आल्यावर तिकडे लक्ष देण्यावाचून राहवले नाही. तेथे हेल्मेट नव्हते. पण बाइक थांबवून कुतूहल म्हणून त्याने त्या झुडपांत पाहिले. तेथे शांतता होती. हेल्मेट कुठेच नव्हते. तो पुन्हा रस्ता ओलांडून बाइक कडे वळला तेथे एक आश्चर्य त्याची वाट बघत होते. बाइकच्या हॅण्डलला त्याचे तेच येताना फेकून दिलेले हेल्मेट लावलेले त्याला दिसले. त्या निर्जन ठिकाणी एखाद दुसरीच बाइक जाता येताना दिसत होती. एक बाइकस्वार अक्षांशपासून थोड्या अंतरावर थांबला कारण त्याला मोबाइलवर एक कॉल आला होता. गाडी बाजूला लावून तो मोबाइलवर बोलू लागला. बोलता बोलता त्याचे लक्ष अक्षांशकडे गेले. अक्षांशकडे सहजपणे त्याचे लक्ष गेले असता डोळ्यात आणि चेहेर्‍यावर विचित्र कुतूहलमिश्रित भाव तरळले आणि त्याचे डोळे विस्फारले.
अक्षांश ने अभयला कॉल केला आणि म्हटले, "माझे आलेले अनुभव मी सांगितल्यावर तुम्ही हसत होतात? अरे मी तुम्हाला सांगितले होते ना त्या फेकून दिलेल्या हेल्मेटबद्दल! ते आता मला इथेच सापडले! पुन्हा! या इथे... "
आणि त्याचे वाक्य अपूर्ण राहिले कारण ते हेल्मेट आता तेथे नव्हते. त्याच्या तोंडातून पुढे शब्द फुटत नव्हता. त्याने मोबाईल बंद केला. त्याचे मनात विचार आला की आपण त्या दुसर्‍या बाइकवरच्या माणसाला विचारूया की हेल्मेट त्याने तरी जरूर आपल्या गाडीवर पाहिले असेल. पण तो बाइकवाला तेथे नव्हता. बाइक चा आवाज सुद्धा न येता आता येथे उभा असलेला तो बाइक्सवर अचानक कुठे गेला होता?
... त्याने भेदरलेल्या अवस्थेत बाइक सुरू केली आणि मागे वळून न पाहता, वेगाने तो घरी पोहोचला. आठ वाजणारच होते. आलेल्या अनुभवाबद्दल आता तरी आईला सांगायचे नाही असे त्याने ठरवले. आईशी जुजबी बोलून तो रात्रपाळी साठी कॅब च्या पिकअप पॉइंटकडे निघाला. नाइट शिफ्ट करून झोपेत बाइक चालवणे धोकेदायक असल्याने त्याने कॅब सेवा स्वीकारली होती.
कॅबमध्ये बसल्यावर अभयचा मेसेज होता त्याच्या सेलवर आलेला त्याने पाहिला: "व्हॉट्स द मॅटर, ड्युड? ""
अभयला त्याने मेसेज पाठवून दिला: "नथिंग सीरियस. जस्ट आय वाज जोकिंग! "
अभय ने लिहिले: "गुड दॅट इट वॉज अ जोक! रिलॅक्स अन डू वर्क! गुड नाइट... "
(३)
"त्सामिना मीना एह एह, वक्का वका एह एह, त्सामिना मीना झांगलेवा, धिस टाइम फॉर आफ्रिका! " ऑफिसमध्ये त्याने नुकतेच कॉम्प्युटरवर लॉगीन केले होते आणि तेवढ्यात डेस्कवर ठेवलेला सेलफोन वाजला.
"अरे अक्षांश्... मै नही आ रहा हूं आज. थोडी तबियत ठीक नही है..! " पलीकडून अभिषेक होता.
" ठीक है यार. चल फिर आराम कर. "
"अरे सिर्फ वो तीन टी़टी है मरे नाम के, वो बस जरा रिझोल्व कर देना. वैसे मैने मेल डाला हुवा है युजर्स को! अगर कॉल आता ही है तो युजर्स को इन्फोर्मेशन बता देना. डेस्क्टॉप पे अभि न्यू करके एक डॉक्युमेंट है... उसमे लिखा हुवा है की क्या इन्फर्मेशन बतानी है. मैने मॅनेजर को मेल डाल दिया है की आज मै नही आ पाऊंगा... चल बाय! " फोन कट!
अक्षांश मनात म्हणाला, "घ्या! म्हणजे आज हा येणार नाही. माझे काम डबल झाले. आणि येस... रोस्टर नुसार या प्रोजेक्टचे आम्हीच दोघे नाइटला होतो... वेळेवर हा आजारी पडला म्हणजे या युनिटमध्ये आणि या बिल्डिंगच्या या सातव्या फ्लोअरवर मी एकटाच... पूर्ण रात्र..!! बोअर होणार! हम्म! माझे मेल आता चेक करतो... पाहू किती वर्क लोड आहे आज रात्री! " तो मेल चेक करू लागला. दीड वाजेपर्यंत हातातली सगळे कामे त्याने आटोपली. सगळे कॉल अ‍ॅड्रेस केले. आता नवीन एखादे टीटी आले किंवा कस्टमरचा कॉल आला तरच काम असणार होते आणि दर अर्ध्या तासाने करावयाची रूटीन चेक अ‍ॅक्टिव्हिटी. त्याला थोडी डुलकी लागायला लागली. त्याने समोर भिंतीवर लावलेल्या तीन पैकी भारतातली वेळ दाखवणार्‍या घड्याळात पाहिले. सगळे अंक इंग्रजीत होते. रात्रीचे दोन चाळीस वाजले होते. मिनिट काटा आठवर होता. इतर दोन घड्याळे युके आणि यूएस मधली वेळ दाखवत होते. आठवर असलेला मिनिट काटा गळून पडला. आठ चा आकडा दोरखंडाने बनलेला होता आणि त्याची आठ बनवणारी गाठ सुटून आठ शून्य बनले. शून्याच्या आत तोच अस्पष्ट आणि कुरळे केस असलेला चेहरा.... दुपारी झाडावर पाहिलेला.... त्यानंतर नऊ आणि सहा अंक घड्याळाच्या मध्यभागी आले. सहा जवळ नऊ आला आणि उलटा झाला. आता सहा आणि नऊ यांनी एकमेकांना आरशात पाहिल्यासारखी स्थिती होती..... नंतर सात अंक भूकंप झाल्यासारखा हालू लागला आणि एखाद्या सिंहाप्रमाणे इकडे तिकडे येरझारा घालू लागला..... ते पूर्ण घड्याळच अस्वस्थ झाले होते.... तीन वाजले!
"ट्डींग" असा डेस्कटॉप वर आवाज आला आणि त्याने पाहिले चॅटिंग मध्ये त्याचा यूएस मधला मित्र आवान होता. "हे अक्स. यू फ्री? " घड्याळात पाहिलेल्या त्या भासाचा अर्थ लावण्यापूर्वी त्याची तंद्री भंग पावली. त्याने आवान ला टाईप केले: "येस. एक मिनिटांत येतो... " कॉफी व्हेंडींग मशीन मधून त्याने गरमागरम इलायची चहा चे बटण दाबले आणि वाफाळता कप घेऊन डेस्क वर आला. बरे झाले हा ऑनलाईन आहे. यूएस मध्ये आता दिवस आहे. आता चहा घेऊन झोपेवर पण नियंत्रण ठेवता येईल आणि याच्याशी बोलत बोलत टाईमपास होईल. भास पण होणार नाहीत!! आवान त्याचेसोबत इंजिनियरिंगाला होता. मग नंतर सात वर्षे त्यांची भेट झाली नव्हती. तो लगेच यूएस ला निघून गेला होता. तेथे कसल्याशा फायनान्शियल फर्म मध्ये जॉईन झाला होता. फेसबुक वर भेट होत होती. अधून मधून. त्या दोघांच्या आवडी निवडी, वैचारिक पातळी सारखी होती.
अक्षांश:"बोल रे. कसे काय चाल्लेय तिकडे? "
आवान: "अक्स. फसलोय रे. जाम फसलोय. "
अक्षांश:""का? काय झालं? "
आवान:"आमच्या फर्म चं दिवाळं निघालं. इतर दुसरीकडे नोकरी मिळेनाशी झाली आहे... "
अक्षांश:"अरे तिकडेच माझा कझिन आरव असतो. बघ तो काहीतरी मदत करू शकेल तर! मी पत्ता देतो... "
आवान: " नाही रे! उशीर झालाय! "
अक्षांश:"" म्हणजे? "
आवान: "अरे! शेअर्स मध्ये गुंतवलेले माझे सगळे पैसे बुडाले. यूएस आणि इंडियन मार्केट मधले सगळे! "
अक्षांश: "हा यार. आपण दोघांनी पैसे गुंतवलेला तो शेअर वाढतच नाहीये. कित्येक महीने झाले. "
आवान: "अरे मी खूप धोका पत्करून त्यात पाच लाख गुंतवले होते...! त्या वेळेस फर्म डबघाईला जाणार असा अंदाज बांधला जात होता. त्या वेळेस मी तुला या शेअर मध्ये किती रुपये गुंतवले ते सांगितले नव्हते कारण तू मला तसे करू दिले नसते... तो शेअर पूर्वी सोळाशे ला होता आता आठशेलाच झालाय! सगळी कडे नुकसानच नुकसान.... "
अक्षांश:"असे? मी काय मदत करू शकतो? शक्य ते मी करेन. त्याच शेअर मध्ये मी पण गुंतवले पण, त्या वेळेस आठशे च होता आताही आठशेच! "
आवान: "मदत? आता उशीर झालाय! फक्त एकच काम कर... "
अक्षांश: "अरे असे काय निगेटिव्ह बोलतोस? आपण गोष्टी सावरू शकतो! "
आवान: "हाहा... शक्य नाही. फक्त एकच काम कर, मी तुला एक ईमेल केलंय. त्याची अ‍ॅटॅचमेंट फाइल ओपन कर, प्रिंट कर आणि माझे घरी दे. त्याचा पासवर्ड पण मी मेलमध्ये पाठवलाय"
अक्षांश: "अरे पण इकडे ये ना भारतात. येथे तुला जॉब मिळेल. "
आवान: "आता उशीर झालाय... हे सगळे मी घरी सांगितले नाही. मी येथे एका संस्थेत पैसे पण गुंतवले होते. तेही बुडाले. घरी कोणत्या तोंडाने हे सांगणार? कर्ज होते.... बँका मागे लागल्या होत्या! तुला चॅटिंग वर मिळवण्यासाठी मला किती आटापिटा करावा लागला माहितेय? एवढं सोपं नाहीये ते! आत्मा शरीरातून निघून गेल्यावर किंवा आत्मा स्वतः आपण बळजबरीने बाहेर काढल्यावर मग एखाद्या मित्राशी चॅटिंग करून निरोप कळवणं एवढं सोपं नाहीये.... सगळं उलटं झालं होतं.... माझी गाडी वेगाने चाललीय असं वाटत होतं मला. पण प्रत्यक्षात तिचा वेग कमी कमी होत जाऊन ती थांबली... सगळे माझे निर्णय बूमरॅन्ग झाले सात आकड्यासारखे... मार्गच सापडत नव्हता.... आठ आकड्यात अनंतपणे गाडी चालवावी... तसे! फिरून परत त्याच त्याच जागी.... अनंतपणे!!! "
"म्ह... म्हणजे", थरथरत्या हाताने अक्षांशने टाईप केले, "तू तू जिवंत नाहीस? "
आवान:
"नाही. दोरखंडाची फार मदत झाली मला आत्म्याला मुक्त करण्यासाठी...
चल बाय... सी यू टुमारो असे मी म्हणत नाही... मी गेले आठ तास झाले जग सोडून गेलो आहे!
त्या आधी मला खूप प्रकर्षाने वाटत होते की तुला हे सांगावे.... पण अशा रसातळाला गेल्यावर माणसाचा असा गोंधळ उडतो ना... वेळेवर काही नीट सुचतच नाही.... तुला कॉल करता आता असता... पण, मनाचा फार गोंधळ उडाला होता... तुझा बदललेला नंबर माझेकडे नव्हता... शेवटी वेळेवर जे सुचले नाही ते वेळ निघून गेल्यावर सुचले...
पण मी सांगतो... येथे हे फार वेगळे जग आहे बाबा!! येथे खिन्नता, विषाद, कारुण्य असे खूप काही आहे....
आता माणसे घाबरून जातात मला. मी तुझ्याशी चॅटिंग करताना कीबोर्ड आणि माऊस आपोआप चालत असल्याने शेजारचा माणूस बेधुद्ध पडला.. ते असूदे!
कधीतरी पुन्हा मी चॅटिंग करेन तुझ्याशी... गरज पडेल तशी! बाय! मी अजून काही जणांचा हिशेब चुकता करून मग अवकाशात जाणार...
तुला एक सांगतो... तो आठशे वाला शेअर उद्या विकून टाक्... अकरा वाजेच्या आत... नाहीतर बुडशील!!! "
.... अन तो ऑफलाईन झाला. हाच तो कुरळ्या केसांचा अक्षांशचा मित्र!
सुन्न होवून अक्षांश विचार करत राहिला. एखादा अणू किंवा रेणू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज (धन किंवा ऋण भार) धरतो... तसाच तो कालपासून भ्रमभारीत झाला होता... पण आता त्या भ्रमभारापासून तो मुक्त झाला होता. जे काय सगळे कालपासून तो अनुभवत होता ते याच साठी....?!
कालचे बोलणे त्याला आठवले, "..... अक्षांश, खरे सांगायचे तर विज्ञानाकडे या गोष्टीचं पण उत्तर आहे. याला भास असे आपण म्हणतो. मनात विचार जास्त झाले की असे होते, लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली की देशाचे जसे होते तसे! मन एका मर्यादे पलीकडे जास्त विचार सहन करू शकत नाही....... मनात एकाच प्रकारचे विचार जास्त गर्दी करू लागलेत की सुद्धा असे भास होतात, जसे एखाद्या देशात हुकूमशाही पद्धतीच्या लोकांची संख्या जास्त झाल्यावर देशाचे जसे होते तसे, बरोबर ना मधुरा?.... अरे पण, माझा मनात तशा प्रकारचे काही विचार नव्हतेच... खरं सांगायचं तर, कोणत्याच प्रकारचे विचार नव्हते मनात!.. तरीही असे कसे होईल...... अशा वेळेस आपलं सुप्त मन जागृत होतं आणि आपल्या मुख्य मनाला विचार पुरवतं! गॉट इट? आता चल पार्टीचा मजा किरकिरा करू नको... तिकडे बघ! "
अक्षांश मनात म्हणाला, "नाही मधुरा... सुप्त मनालासुद्धा कधीतरी कुणीतरी विचार पुरवतो... ते विचार बाहेरून कुठून तरी आपल्या मनात शिरतात आणि त्यामुळे भ्रम होवू शकतात... ते साधे विचार नसतात. ते विशिष्ट ध्येयाने भारीत विचार असतात... "
.... त्याने ईमेल चेक केला. नुकताच एक ईमेल आला होता. सोबत अ‍ॅटॅच्ड डॉक्युमेंट होती. ईमेलमध्ये फाइलचा ओपन करण्यासाठीचा पासवर्ड लिहिला होता...8697"
... शेजारी डेस्कवर त्याचे हेल्मेट होते. ते शांत होते!!

असं घडू शकतं?

माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे
उणे लिंपायला माझे लावी सुगंधाचे लेणे
आपल्या सहावीत शिकणार्‍या नातवाला पाठ्यपुस्तकातील ही कविता जाधव बाई अगदी तन्मयतेने शिकवत होत्या. कवितेचा भावार्थ सांगताना मध्येच त्यांचे डोळे पाणावत होते. नातवाने विचारले देखील की "आजी, तुला तुझ्या आईची आठवण येतेय का गं?" त्या निरागस जीवाच्या पाठीवरुन मायेने हात फिरवत बाईंनी कविता पूर्ण शिकवली.
आईची आठवण येतेय का म्हणून विचारणार्‍या या चिमुरड्याला काय सांगणार होत्या जाधव बाई? आठवण तर झालीच होती आणि त्या आठवणीनेच तर ८३ वर्षीय जाधव बाईंच्या मनावर झालेल्या जखमेवरील खपली काढली होती. पण खपली तरी खरंच धरली होती का? आयुष्यभर ती ओली जखम भळभळतच तर होती, अन असं काही निमित्त झालं की मनाचा डोह पार ढवळून टाकायची ती. आजचा दिवसही असाच बेचैनीत जाणार तर आणि रात्र तळमळत कढावी लागणार.
४०-४५ वर्षे होऊन गेली असली तरी अगदी काल-परवाच घडल्यासारखा आठवतोय तो दिवस..........
शनिवारची दुपार. तीन-साडेतीनचा सुमार. अर्ध्या दिवसाची शाळा सुटुनही आता बराच वेळ झाला होता. मुले पांगली होती. आवारात शुकशुकाट. जाधव बाईं शिक्षकांच्या खोलीत आपले काम आवरुन निघायच्याच बेतात होत्या. त्यांचे सहकारी केव्हाच निघून गेले होते. बाईंनीही उरलेले तक्ते घरी जाऊन बनवू असा विचार करुन आपली पर्स उचलली आणि बाहेर आल्या.
नेहमीच्या सवयीनुसार सगळी मुले गेली की नाही हे बघायला एकदा त्यांनी आपल्या सातवीच्या वर्गात नजर टाकली आणि त्या थबकल्या. कुणी एक विद्यार्थी बाकावर डोके ठेवून झोपी गेल्याचे त्यांना दिसले. बाईंनी जवळ जाऊन निरखून पाहिले. अरेच्या! हा तर मंगेश शिंदे. "मंगेश, अरे बरं नाही का वाटत बाळा? अजुन घरी नाही गेलास तो? ", बाईंनी प्रेमाने विचारले. त्याच्या कपाळाला हात लावून त्याला ताप वगैरे नाही ना याचीही खात्री करून घेतली. अचानक बाईंनाच समोर पाहून मंगेश गडबडला. काय उत्तर द्यायचे ते त्याला सुचले नाही. "बाई, काही नाही हो, असाच थांबलो होतो. तुम्ही व्हा पुढे, मी निघेन थोड्या वेळात", असे काहीसे बोलून त्याने वेळ मारुन न्यायचा प्रयत्न केला.पण बाईंनी काही त्याचा पिच्छा सोडला नाही."वा रे वा, अशी कशी जाईन मी तुला इथे एकट्याला सोडून? तू चल बरं माझ्याबरोबर". आता मात्र मंगेशची पंचाईत झाली. काय करावे, काय बोलावे ते न सुचून ते बारा वर्षांचं कोवळं पोर हमसून हमसून रडू लागलं. "बाई, मला घरी धाडू नका हो. माझी आई मारेल हो मला", असं पोटतिडकीनं बोलू लागलं.
जाधव बाई त्याच्या जवळ बसल्या. त्यांनी मंगेशला थोपटून शांत केले, प्यायला पाणी दिले. हजार्-पंधराशे वस्तीच्या या लहानश्या गावच्या ग्रामपंचायतीच्या शाळेत घडणारे हे असले प्रकार काही बाईंना नवीन नव्हते. कधी कुणाला मारुन-मुटकून शाळेत पाठवले जाई तर कधी शाळेत न जाता कामावर यावे म्हणून मारले जाई. पण मंगेश या दोन्ही प्रकारांत मोडत नव्हता. मंगेशचे वडील सैन्यात नोकरीला होते आणि वर्षातून एकदा - दोनदाच ते घरी येत असत. मंगेश आणि त्याची आई असं त्यांचं कुटुंब. एकुलत्या एका मुलाने खूप शिकावे हीच इच्छा होती आई-वडीलांची. मंगेशही मन लावून अभ्यास करत असे. मग आज असे काय झाले या पोराला? जाधवबाईंचे मन विचाराधीन झाले. मंगेशला विश्वासात घेऊन बोलते करायचाही बाईंनी बराच प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्याच्या रडण्यामागचे आणि त्याहीपेक्षा घरी न जाण्यामागचे कारण काही बाईंना समजले नही.
"मंगेश, अरे घर म्हटलं की हे सारं चालायचंच बाळा, तुझी आई एकटी सारी घरची-बाहेरची कामं करत असते, हो की नाही? चिडली असेल जरा. त्यामुळे कदाचित मारेन वगैरे म्हणाली, त्यात काय रे एव्हढं रागवायचं? आईच आहे ना? मग, चल थांबव बघू रडणं आणि चल माझ्याबरोबर. मी बोलते हो तुझ्या आईशी", हे शब्द ऐकताच मात्र मंगेश थरथरु लागला. "नको बाई नको, आईला काही सांगू नका हो. मी जातो घरी पण आईला नका ना बोलू यातलं काही", मंगेश कळवळला. "बरं बरं नाही हं सांगणार मी आईला", असे बोलत बाईंनी त्याला शांत केलं, त्याचं दप्तर उचललं आणि दोघं शाळेच्या आवारातून बाहेर पडली.
जाधव बाईंनी मंगेशला घरी पोचवले, त्याच्या आईच्या ताब्यात दिले आणि त्या स्वतःच्या घरी गेल्या. मंगेशच्या आईला अर्थातच त्यांनी काही सांगितले नाही. तो दिवस आणि नंतरचा रविवारचा दिवस गेला आणि सोमवारी पुन्हा शाळा नेहमीप्रमाणे भरली.
जाधव बाई वर्गात आल्या, हजेरी घेण्यास सुरुवात झाली. रोजच्यासारखेच आजही कितीतरी बाक रिकामे होते. हा का नाही आला शाळेत? त्याला बोलावून आण असे सांगण्यात बाईंचा रोज अर्धा तास जात असे. काही द्वाड मुले तर मधल्या सुट्टीत खिचडी खाऊन झाली की मागच्या दाराने पळून जात आणि दुसर्‍या दिवशी काहीबाही सबबी सांगत. चालायचंच... पटावर हजर/गैरहजर असे नमूद करीत बाई एकेकाचे नाव पुकारत होत्या. मंगेश शिंदे......वर्गात सामसूम. बाईंनी नजर उंचावून मंगेशच्या बाकाकडे पाहिले. जागा रिकामी.... पठ्ठ्या परवा घरी जायला तयार नव्हता आणि आज शाळेतच नाही आला...बाई स्वतःशीच हसल्या. गुणी पोर आहे, नियमितपणे शाळेत येतो. आज असेल काहीतरी काम असा विचार करुन बाईंनी अभ्यासाला सुरुवात केली.
हा दिवस गेला आणि नंतरचे अजुन दोन. सतत तीन दिवस मंगेश शिंदे गैरहजर. तेव्हा मात्र बाईंनी वर्गातल्याच एका मुलाला त्याच्या घरी जाऊन बघून यायला सांगितलं. दुसर्‍या दिवशी बाईंनी त्या मुलाकडे चौकशी केली मंगेशबद्दल. तो म्हणाला, "बाई, मंग्या घरी बी न्हाई. त्याची आय म्हनली की मामाकडं धाडलाय त्येला". "मामाकडे? असं मध्येच? आणि तेही शाळा बुडवून? कधी समजणार या लोकांना शिक्षणाचे, शाळेचे महत्व? इतका बुडलेला अभ्यास कसा भरुन काढेल हा आता?" बाईंनाच काळजी.
बघता- बघता आठवडा व्हायला आला. मंगेश शाळेत परत आलाच नाही. परिक्षेचे वेळापत्रकही लागले. आता मात्र बाईंचा संयम सुटला. सोन्यासारख्या पोराचे अभ्यासाचे दिवस वाया जात होते.शाळा सुटल्यावर त्यांनी स्वतःच मंगेशच्या घराकडे मोर्चा वळवला.
"मंगेशच्या आई, आहात का घरात?", जाधव बाई घरचा बंद दरवाजा ठोठावत म्हणाल्या. अचानक त्यांची नजर दाराशी ठेवलेल्या पुरुषी पादत्राणांवर पडली. आतून मंगेशची आई लगबगीने, काहीशा भेदरल्या नजरेने बाहेर आली. दारातच बाईंशी बोलू लागली. "अहो मंगेशची आई, मंगेशची परीक्षा जवळ आलीये आणि त्याला मामाकडे पाठवलंत? बरा आहे ना तो?". "व्हय जी बरा हाय तर. त्येचा मामा त्याला घेवून गेलाय तालुक्याला आन तो आता तालुक्याच्या मोट्या शाळंला जातो नव्हं का?" मंगेशच्या आईने खुलासा केला. "तालुक्याच्या शाळेत? आणि तुम्हाला इथे एकटीला सोडून?", हे नवीनच काहीतरी कानांवर पडत होते. "तर काय हो बाई, त्येचं शिक्षन महत्वाचं नव्हं का? मी काय बापडी राहीन एकली". त्येला शिकवायचा हाय न्हवं..." "हो तेही खरंच म्हणा, शाळेत जातोय ना, मग झालं तर, बरं वाटलं हो ऐकून". बाईंची नजर मात्र त्या पायताणांवरुन हटेना. मंगेशच्या आईचे तिथे लक्ष जाताच तिचा चेहरा पांढराफटक पडल्याचे बाईंच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. "माडी साफ करत व्हते बगा तवा धन्याची पायतानं पडली हो", न मागता खुलासा केला गेला." असु दे असु दे, येते मी" म्हणत बाई बाहेरच्या बाहेर परत फिरल्या पण डोक्यांत असंख्य प्रश्नांचे मोहोळ घेऊन.
त्या दिवशी शनिवारी बाई मंगेशला भेटल्या त्या शेवटच्या. पोर घरी पाठवू नका म्हणून गयावया करत होतं, कारणही सांगत नव्हतं आणि असा अचानक मामाकडे पाठवला त्याला? तो ही कायमचा? आणि मी घरी गेल्यावर त्याची आई एव्हढी अवघडलेली का वाटली? घरातही घेतलं नाही तिनं? विचारचक्रात अडकलेल्या बाईंना अचानक तो दिवस लख्खपणे आठवला. त्या दिवशी मुलांना निबंध लिहायला शिकवत होतो आपण. विषय दिला होता "मामाचा गाव". मुलांनाच याबद्दल प्रश्न विचारुन निबंध खुलवायची कला शिकवत होतो. तेव्हा मंगेश म्हणाला होता की बाई मला मामाच नाही मग त्याचा गाव कुठुन येणार? बापरे !!.... पोटात खड्डा पडला बाईंच्या. इथे काहीतरी नक्कीच पाणी मुरतंय याचा सुगावा लागला.
बाईंच्या शिक्षकी पेशामुळे या आणि आसपासच्या गावांत तशा बर्‍याच ओळखी. त्यांच्याच वर्गात शिकलेला त्यांचा एक माजी विद्यार्थी शेजारच्या गावात पोलीस पाटील होता. बाईंनी त्याची मदत घ्यायचे ठरवले. त्याला समक्ष भेटून सर्व प्रकार कानांवर घातला. बाई तुम्ही निश्चिंत रहा, आम्ही नक्कीच या प्रकरणाचा छडा लावू असे पोलिसांनी बाईंना आश्वस्त केले.
त्याच रात्री चंबुगबाळे आवरुन गाव सोडून जात असलेल्या मंगेशच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्यासोबत शेजारच्या गावातील एक तरुण होता. पोलिसी खाक्या दाखवताच बाई पोपटासारखी घडाघडा बोलू लागली आणि स्वतःच्या कुकर्माचा कबुलीजवाब देती झाली.
या तरुणाशी तिचे सूत जुळले होते. नवरा गावात नसल्यामुळे तो तिच्या घरीही येत असे. एकदा मंगेशने या दोघांना पाहिले. अडनिड्या वयात नको ते बघितल्यामुळे मंगेश खवळला. पत्र लिहून बापाला सारे सांगेन अशी तंबी त्याने आईला दिली आणि तु जर तुझ्या बापाला कळवलेस तर मी तुला ठार मारीन अशी धमकी आईने त्याला दिली. याच कारणाने मंगेश घरी जाण्यास धजत नव्हता. बाईंनी घरी पोहोचवल्यानंतर त्याचे आईशी परत कडाक्याचे भांडण झाले आणि आपले पाप लपवण्यासाठी त्या बाईने पोटच्या गोळ्याचा जीव घेतला, त्याला दोघांनी मिळून रात्री गावाबाहेर पुरले. ती जागा दाखवताच पोलिसांनी मंगेशचा पुरलेला देह बाहेर काढला. दोघांवरही खूनाचा आरोप सिद्ध होवून शिक्षा झाली दोघांना.
……आणि त्यानंतर अशा कित्येक रात्री बाईंनी तळमळत काढल्या होत्या. खरंच असं कधी घडू शकतं? जिने जन्म दिला ती आई अशी वैरीण होऊ शकते? मातेच्या ममतेचे, त्याग, बलिदानाचे गोडवे गाणार्‍यांनी कधी बघितली असेल अशी आई? आपण का नाही मंगेशच्या बोलण्याकडे लक्ष देऊन वेळीच कृती केली? जी पावले सात दिवसांनंतर उचलली ती त्या पहिल्या दिवशीच का नाही उचलावीशी वाटली आपल्याला? कदाचित ते लेकरू वाचलं असतं. हे आणि असे अनेक जर-तर. पण आता काहीच इलाज नव्हता. कुणालाही काहीही न सांगता, ना कसली तक्रार करता एक निरागस, गोजिरवाणे फूल तर उमलण्यापूर्वीच कोमेजुन गेले होते.

थ्रील....!!!!!

कधी कधी काही काही आठवणी आपला कधीच पिच्छा सोडत नाहीत. अगदी सावलीसारख्या आपल्याशी जोडल्या गेल्या असतात. अशीच एक आठवण माझ्याही आठवणीत आहे. जी आजही मला रात्रीची झोपू देत नाही. आजही ती रात्र माझ्यासमोर अगदी जशीच्या तशी उभी आहे. आजही तो झाला प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो.
माझ नाव अमोल परब. गोष्ट तशी साधारण दहा बारा वर्षापूर्वीची. मी नुकताच बी.ई. पास आऊट झालो होतो. ते ही फर्स्ट क्लास विथ डिक्टिंशन. भरीसभर म्हणून मुंबई युनिर्व्हसिटीमधुन तिसराही आलो होतो. घरच्यांच्या आणि खासकरून बाबांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते फार खुश झाले होते. येता जाता प्रत्येकासमोर माझे कौतुक करत होते. अगदी काय करू आणि काय नको असे झाले होते त्यांना. तशी मला फ़र्स्ट क्लासची गेरेंटी होती पण युनिर्व्हसिटी मधून तीसरा बिसरा येईन याची कल्पना मलाही नव्हती. मी मिळवलेल्या ह्या यशाबद्दल बाबा मला बाईक घेण्याच्या तयारीत होते. पण मला ती माझ्या पैश्याने घ्यायची होती. जवानीचा अव्यवहारी जोश दुसर काय. पण कुणाच ऐकतील ते बाबा कुठले? त्यांनी सरळ माझ्या मित्रांना गाठलं. अंकुर गायकवाड आणि अमोल परवडी हे माझे शाळेपासुनचे मित्र त्यांना माझ्या सगळ्या आवडीनिवडी माहिती होत्या. अंकुरने नुकतीच सहा महिन्यांपुर्वी नवीन बजाज डिस्कव्हर घेतली होती आणि परवडी तर दहावीला असल्यापासुनच त्याच्या वडिलांची हीरोहोंडा चालवायचा. बाबांनी अगदी योग्य माणसं निवडून लगोलग पुढच्याच आठवड्यात मला माझी आवडती बजाज पल्सर गिफ़्ट देऊन टाकली. आता मीही माझा पुर्वीचा तोरा सोडून मोठ्या खुशीने बाईक एन्जॉय करू लागलो. हळुहळु मला माझ्या बाईकचा आणि बाईकला माझा अंदाज येऊ लागला. वर दररोजच्या प्रेक्टिसमुळे रस्त्यावरचा कोन्फ़िडंसही बर्यापैकी वाढला होता. अश्याच एका वीकेंडला मी परवडीकडे गेलेलो असताना तिथे अंकुरही बसला होता. बराच वेळ आम्ही गप्पा मारत होतो की अचानक अंकुरने परवडीला विचारलं
"आज नक्की ना?"
"अरे आज शनिवार आहे ना... मग जाउया की नक्की पण बाकीचे तयार आहेत काय?" परवडीने विचारले.
" हो रे ...... चप्पा आणि चिनू दोघेही तयार आहेत. फ़क्त ह्यावेळेस चप्पा बोलला की बाईक त्याला चालवायचीय निदान येताना तरी"
"ठीक आहे मी माझी बाईक देईन त्याला चालवायला " परवडी अगदी सावकाराच्या अर्विभावात म्हणाला.
मला कसलाच संदर्भ लागत नव्हता मी हळूच विचारले.
" काय रे कुठे चालला आहात एकटे एकटे ?"
" एकटे कुठे चांगले चौघेजण आहोत की...." सवयीप्रमाणे अंकुरने पीजे मारला.
" तेच विचारतोय कुठे चालला आहात चौघेजण???" मी त्याच्याकडे दुर्लक्ष्य करत विचारलं.
" अरे कुठे नाही रे, हल्ली आम्ही दर एक-दोन महिन्यानी गोराईला पलिकडे उत्तन रोड्वर बाईक चालवायला जातो......रात्रीचे. सॊल्लीड मज्जा येते मोकळ्या रस्त्यावर सुसाट बाईक चालवायला." परवडीने माझ्या शंकेचे निरसन केले
" हम्म....इट्स साउंड्स थ्रीलींग..... ए मग मी पण येउ काय रे.......?" मी उत्सुकतेने विचारलं.
" अरे ये की, पण तुला तुझी बाईक आणायला लागेल कारण आम्हा दोघांच्याही बाईक्स फ़ुल्ल आहेत" अंकुर बोलला.
अनायसे बाबा कालच आठवड्याभरासाठी गावी गेले होते. आज रात्री मित्रांसोबत बाहेर जेवायला जातोय हे कारण सांगुन घरुन रात्रीची बाईक चालवायची परमिशन अगदी सहज काढता येण्यासारखी होती. मनातल्या मनात सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळत आहेत कि नाही ह्याची खातरजमा करुन मी माझ कन्फ़र्मेशन देउन टाकले.
" रात्री बरोबर आठ वाजता जेट्टीवरवर भेट. जास्त उशीर करु नकोस. रात्री साडे बाराची शेवटची बोट असते पलिकडुन.’ परवडीने ताकिद दिली.
बोरिवलीच्या पश्चिमेला समुद्राच्याकिनारी गोराई गाव वसलेलं आहे. तसा तो भाग फ़क्त बोरिवलीपासुन लवकर पोहचता येत म्हणुन फ़क्त बोरिवलीत गणला जातो. अस म्हणायला मुख्य कारण म्हणजे बोरिवली शहर परिसर आणि गोराई गाव ह्यामध्ये पसरलेली गोराई खाडी. गोराईची ही खाडी काही जास्त रुंद नाही. अजुनही इथे पुर्वीपासुन रहदारीचे साधन असलेल्या डिझेल बोटीच चालतात. ह्या बोटीमधुन माणसेच काय तर दुचाकी वहानेही आरामात एका किनार्यावरुन दुसर्या किनार्यावर नेता येतात. खर तस गोराई गाव भायंदरशी भुप्रदेशाने जोडलेल आहे पण भायंदरवरुन गोराई गावात जायच म्हणजे चांगलाच वळसा पडतो. भायंदरवरुन एक रस्ता सरळ गोराई गावात येतो तिथुन तो पुढे मनोरीला जाउन संपतो. ह्याच रस्त्यावर मध्येच गोराईसारखे एक गाव लागते तेच हे "उत्तन". ह्या रोडला त्यामुळेच काही लोक उत्तनचा रस्ता असे ही बोलतात. हा एक फ़ार मोठ्या पल्ल्याचा रस्ता आहे. दिवसादेखिल तिथे भायंदर ते गोराई ही एस.टी सोडली तर वहानांची वर्दळ तुरळकच असते. मग रात्रीची तर गोष्टच सोडा. अश्या ह्या सामसुम रस्त्यावर नाईट बाईकिंगच्या "थ्रील" चा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक होतो. कधी एकदा आठ वाजताहेत असे मला झाले होते.
*************************************************************************************************************************
मी ठरलेल्या वेळेवर गोराई जेट्टीवर पोहचलो. ठरल्या वेळेवर पोहचणार्यापैकी मी एकटाच होतो. पलिकडे गोराईला जाणारी बोट आत्ताच जेट्टीवरुन सुटली होती.मगासपासूनचा गोंगाट आता थोडा निवळला होता. थोड्याच वेळात बाकीचे सगळे आले. अंकुरच्या बाईकवर मागे चिनू तर परवडीच्या मागे चप्पा बसला होता. आजच्या ट्रिपला मलापण आलेला पाहून ते दोघे म्हणजेच चप्पा आणि चिनू दोघेही खुश झाले. सुरुवातीचे नमस्कार चमत्कार झाल्यावर माझ्या नवीन बाईकचे कौतुक सुरु असतानाच मगासचची बोट फिरून परत जेट्टीला लागली. प्रथम लोकांना चढायला देऊन मागाहून आम्ही चढलो. बोटीवरल्या एका माणसाने आमच्या बाईक्स बोटीवर चढवून दिल्या. तसा पल्ला जास्त लांबचा नव्हता मोजुन पंधरा ते वीस मिनिटांचा प्रवास. पण तो ही माझ्या जीवावर आला होता. माझी पलिकडे गोराई गावात बाईक घेउन जायची ही पहिलीच वेळ होती. पाण्यावरुन संथ पणे जातानाही बोटीच्या हेलकाव्यामुळे मला बोटित बाईक धरून उभं रहाताना फार कसरत करावी लागत होती. शेवटी एकदाचा तो प्रवास संपला. बोट आता गोराई गावाच्या जेट्टीला लागली होती. मगासच्याच क्रमाने सुरुवातीला बोटितली प्रवासी उतरले मग आम्ही आणि सगळ्यात शेवटी आमच्या बाईक्स. बोटितल्या मगासच्या अनुभवामुळे आमच्या बाइक्स बोटीत चढवणार्या आणि उतरवणार्या त्या काकांबद्दल मला एकदम आदर वाटु लागला. माझी बाईक सगळ्यात शेवटी खाली उतरवून ते जात असताना मी स्वत:हुन त्यांच्या हातावर दहाची एक नोट ठेवली. ते थोडासे गडबडले. बहुदा अशी बक्षिसी मिळायची त्यांचीही ही पहिलीच वेळ होती.
"साल्यांना फ़ुकटच्या सवयी लावू नकोस रे .."
त्या इसमाची पाठ वळल्या वळल्या अंकुरने माझ्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. मी परवडीकड़े पाहिल तर त्याच्याही नजरेत मला अंकुरच्या वैतागाचे समर्थन दिसले. उत्तरादाखल मी फ़क्त मान डोलावली. एव्हाना आमच्या अगोदर उतरलेली माणसे बाहेर उभ्या असलेल्या रिक्षामधुन आपापल्या मुक्कामावर कधीच मार्गस्थ झाली होती. आम्हाला इथवर घेउन आलेली बोटही आता इकडले दोन तीन प्रवासी घेउन पुन्हा बोरीवलीच्या दिशेने निघाली. आता जेट्टीवर आम्ही पाचजण आणि आमच्या तीन बाईक्स एव्हढेच उरलो होतो. पाठीमागे बोरिवलीची जेट्टी स्पष्ट दिसत होती. मुंबई शहर आणि गोराई गाव ह्यातला फरक मला समोरासमोर दिसत होता. समोरच्या किनार्यावर रोषनाईचा सूर्य तळपत असताना इथल्या किनार्यावरचा उरला सुरला उजेडही जाता जाता ती बोट आपल्यासोबत घेउन गेली होती.
"हम्म्म.... चला निघुया......." परवडीने बाईक सुरु करताना म्हटले.
लगोलग सगळ्याच्या बाईक सुरु झाल्या. मगासच्याच जोड्या होत्या तश्याच कायम होत्या म्हणजे अंकुरच्या मागे चिनू आणि परवडीच्या मागे चप्पा. माझ्या बाईक चालवण्याच्या स्किलवर अजुन तेव्हढा कुणाचा कोन्फ़िडंस नव्हता हे मला माहिती होते म्हणुन मीही त्यांच्यापैकी कुणाला माझ्या गाडीवर बसा म्हणून आमंत्रण दिलं नाही. जेट्टीच्या तोंडाशी असलेल्या गेट ओलांडुन गोराई ते भायंदरपर्यंतच्या प्रवासात इतकी वर्ष आजतागायत एकट्याचीच मोनोपॉली असणार्या त्या गोराईच्या रस्त्यावर आम्ही आमच्या बाईक्स पळवु लागलो. हा रस्ता तिकडचा एकमेव हमरस्ता असूनदेखिल एकाच वेळी फ़क्त दोन कार पास होतील एव्हढ्याच रुंदीचा होता. रस्त्यावर एकाबाजुला एका विशिष्ट अंतरा अंतरावर आणि खासकरून वळणावर काही ट्युबलाईटस लावल्या होत्या. तेव्हढाच काय तो प्रकाश होता त्या रस्त्यावर. आमच्या बाईक्स वेगात पळत होत्या. सुरुवातीला परवडीची बाईक, मध्ये माझी आणि शेवटी अंकुरची अशी सिक्वेन्स होती. मोकळ्या रस्त्यावर पहिल्यांदाच अशी बाईक चालवायला मिळत असल्याने माझी अवस्था वारा प्यायलेल्या वासरागत झाली होती. स्वत:ला इतरासमोर प्रुव्ह करण्याच्या नादात मी एक्सिलेटर दिला आणि उजव्याबाजुने परवडीला ओव्हरटेक केल. आता मी पुढे, मागे परवडी आणी शेवटी अंकुर असा क्रम झाला. मी साईड मिररमध्ये पहात मी नेहमीच पुढे कसा राहिन ह्याची काळजी घेत होतो. थोड्या वेळाच्या ड्राईव्हनंतर समोर एका वळणावर काही दिवे लुकलुकताना दिसले. गावाची हद्द सुरु झाली होती बहुतेक. गावात शिरल्या शिरल्याच पहिल्या काही मिनिटातच एक तिठा लागला. तिठ्याच्या मधोमध डाव्या बाजुला मनोरी आणि उजव्या बाजुला उत्तन असा मार्ग दाखवणारा बोर्ड होता. मला पुढचा रस्ता माहिती नव्हता. मी बाईक स्लो केली. त्या बोर्डाच्या बाजुलाच एक चहावाला होता. तो तिथ होता म्हणून ह्या गावात ह्यावेळेस कुणीतरी जाग आहे अस म्हणायला वाव होता.
"उजवीकडे........"
परवडीे गाडी न थांबवताच पुकारा करत पुढे निघुन गेला. मागोमाग अंकुर गेला. जाता जाता चिनु मला चिडवून गेला. आता मगासच्याच क्रमवारीत मी शेवटला होतो. उजवीकडे वळल्यानंतर चारपाच घरांनंतर एक ही घर नव्हत मला नवल वाटलं कि एव्हढ्या चार पाच घरांच्या आवारातच गावाची हद्द कशी संपली. गावाची हद्द संपल्यासंपल्या रस्त्या शेजारच्या ट्युबलाईट्सनीही स्वत:चा आमच्या सोबतचा प्रवास आता आवरता घेतला होता. रस्त्यावर आता आमच्या हेडलाईट्सचाच काय तो एकमेव प्रकाश होता, बाकी जिथे नजर जाईल तिथे नुसता काळोखच काळोख. एव्हाना गाव मागे पडल होत. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुरदुर पर्यंत मानववस्तीचा कुठलाच पुरवा दिसत नव्हता. रस्तानेही आपल सरळसोट व्यक्तिमत्व सोडुन दिल होत. प्रत्येक अर्ध्याएक किलोमीटर नंतर अवघड वळण तरी येत होती नाहीतर चढण तरी. मागे बसलेला चिनु आणि चप्पाला आता कंठ फ़ुटला होता. त्याची अखंड बडबड चालु होती. आजुबाजुचे रातकिड्यांची किरकिर, सोबत आमच्या बाईक्सची घुरघुर आणि त्यात चप्पा व चिनुची बडबड. अंकुर आणि परवडीही त्यांना अधुन मधुन प्रतिसाद देत होते. ह्या पुर्ण प्रवासात मी एकटाच असा होतो की ज्याच सगळं लक्ष्य हे फ़क्त आणि फ़क्त रस्त्यावर होत. पण रात्री बाईक चालवायची मजा काही औरच होती. सभोवतालचा काळोख मी मी म्हणत अगदी अंगावर येत होता आमच्या तिन्ही गाड्याचे हेडलाईट्स त्याच्या मुजोरीपुढे थिटे पडत होते.
आणि अचानक..............
पुढच्या दोघांनी मला काही कळायच्या आत आपापल्या गाड्यांचे हेडलाईट्स ऒफ़ करुन टाकले आता फ़क्त माझ्याच बाईकच्या हेडलाईट्सचा प्रकाश होता. चप्पाने ओरडुन सांगितले
" अमोल.........हेडलाईट्स ऒफ़ कर.........."
" काय्य्य्य्य्य्य...................." मी गोधळलेलो. हे अस कायतरी माझ्यासाठी एकदम नविनच होतं
" अरे येडया......हेडलाईटस ऒफ़ कर........." चप्पा वैतागुन डाफ़रला.......
मी लाईट्स ऒफ़ केले. इतका वेळ दबा धरुन बसलेल्या आजुबाजुच्या त्या काळोखाने लाईट बंद केल्या केल्या माझ्यावर झडप घातली. मला दोन सेकंदासाठी समोरच काही दिसतच नव्हतं. डोळ्यांच्या समोर एक हिरवा प्रकाश साचुन राहिला होता. परवडी आणि अंकुर मात्र अगदी सराईतपणे बाईक चालवत होते. हळुहळु माझी नजरही आता ह्या अंधुक प्रकाशाला सरावली होती. आता रस्त्यावर अंकुर आणि परवडीच्या टेल लाईटसचा अंधुकसा प्रकाश माझ्यासमोर पळत होता. त्याच्याच जोरावर मीही माझी बाईक पळवत होतो. लाईटस बंद केल्याने मला एक गोष्ट समझली होती की वाटत होता तितका आजुबाजुचा काळोख गडद नव्हता. मी वर पाहिल तर चंद्र पुर्ण भरात होता. छान चांदण पडलं होत. त्यांचा प्रकाश खुप नसला तरी मनातुन काळोखाची भिती काढण्या इतपत नक्किच होता. चंद्राच्या त्या निळ्या प्रकाशात आजुबाजुच्या सगळ्या गोष्टी निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स दाखवत होत्या. समोरचा रस्ता एका नदिसारखा वाटत होता आजुबाजुच्या झाडे, समोर दिसणारी टेकडी हे सगळे काळसर निळ्या केनव्हासवर गडद जांभळ्या रंगाने रंगवल्यासारखे दिसत होते. ह्या निळसर अंधारात समोरच्या टेल लाईटच्या अंदाजाने बाईक चालावायला आता मलाही फ़ार थ्रिलिंग वाटत होतं. समोरुन छातीला भिडणारा गार वारा डोक्यात अजुन उन्माद वाढवत होता. अचानक आजुबाजुच्या शांत वातावरणात परवडीने गाडीला दिलेला एक्सिलेटर घुमला. अंकुरने मिळालेल्या ह्या इशारतीवर स्वत:च्या बाईकाचा नेक्स्ट गिअर टाकला. पुढच्याच क्षणाला त्या दोनही टेल लाईटस वेगाने माझ्यापासुन दूर जाउ लागल्या. मला कळेपर्यंत ते बरेच दूर गेले होते. माझ्याकडेही आता वेग वाढवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. आता आमच्या बाईक्स मगासच्यापेक्ष्या बर्याच वेगात पळत होत्या. मला त्यांच्यासोबत स्पीड राखताना दमछाक होत होती. परवडी आणि अंकुर कमालीच्या वेगाने आपापल्या बाईक्स पळवत होते. मला समजुन चुकले की मी बाईक चालवण्याच्या बाबतीत त्याच्यापेक्षा कितीतरी लेव्हल मागे होतो. मघाशी मी त्याना ओव्हरटेक केल्याच्या आगाऊपणाची त्यांनी सव्याज परतफ़ेड केली होती. पुढच्याच एका वळणावर त्या दोन्ही टेल लाईट्स उजवीकडे झपकन वळल्या. मला रस्त्याचा नीट अंदाज येत नव्हता, मी उगाच रिस्क नको म्हणुन बाईक थोडी हळु केली आणि सावधपणे ते वळण निगोशियट केले. वळण पुर्ण केल्याकेल्या थोड सावरल्यावर समोर नजर टाकली तर माझी चांगलीच फ़ाफ़लली. मला माझ्या समोर आतापर्यंतच्या माझ्या गाईड लाईन्स असलेल्या त्या टेल लाईटसच दिसत नव्हत्या. मी अतिशय काळजीपुर्वक पाहिल पण माझी शंका खरी ठरत होती. अंकुर आणि परवडी मला मागे एकटा सोडुन फ़ार पुढे निघुन गेले होते. ह्या अंधारात अश्या निर्जन जागेवर रात्रीच्या अश्या वेळेस मी अगदी एकटा आहे ही कल्पना डोक्यात येताच भितीची एक लहर अंगातुन वहात गेली. मी गाडीचे हेडलाईट्स ऒन केले आणि होर्न वाजवू लागलो. त्या निशब्द परिसरात माझ्या बाईकच्या होर्नचा आवाज केव्हढ्यानं तरी वाजत होता. पण त्या आवाजाने मला आधार मिळण्याऐवजी तो आवाज मला माझा एकटेपणा अजुन जाणवून देत होता. मी आता गाडी जोरात चालवून त्यांना गाठायचा प्रयत्न करु लागलो.
जवळपास पाच दहा मिनिटे सलग चालवूनसुध्दा त्याचा काही हासभास लागला नाही. मला वाटत होते त्याहीपेक्षा ते लोक फार पुढे निघून गेले होते. मला तर विश्वासच बसत नव्हता की अस कस काय होउ शकत? त्या वळणा अगोदर माझ्या नजरेसमोर असणारी ही माणसे काही क्षणात अशी एकाएकी गायब कशी काय होउ शकतात? मला तर काही सुचतच नव्हत. तेव्हढ्यात इतका वेळ न सुचलेली गोष्ट माझ्या लक्ष्यात आली. मी त्यांना फोन लावायचा ठरवला. गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. तशी खर तर एव्हढी खबरदारी घ्यायची काही गरज नव्हती. कारण त्या अख्ख्या रस्त्यावर माझ्या आणि माझ्या बाईकच्या व्यतिरिक्त दुसर कुणीही नव्हत पण तरीही मी नवशिक्या ड्राईव्हर असल्याने ट्राफ़िकचे सगळे नियम पाळण्याची मला तेव्हा सवय होती. घरून निघतानाच मोबाईल बैटरी शेवटच्या घटका मोजत होती आणि आता पाहिलं तर तिने केव्हाच दम सोडला होता. माझा त्यांना गाठायचा हा प्रयत्नही फोल ठरला होता. आता मात्र ही खरच माझ्यासाठी चिंतेची बाब होती. साला मी ह्यांच्यासोबत इथे यायलाच नको हव होते. हे साले अस काहीतरी करणार आहेत हे मला अगोदर माहिती असते तर मी अजिबात आलो नसतो. पण आता हा विचार करण्याची वेळ निघुन गेली होती. मी आठवायचा प्रयत्न करू लागलो की रस्त्यात मधे कुठे एखादा फाटा तर लागला नव्हता ना? मी रस्ता तर चुकलो नव्हतो ना? लगोलग मेंदुने तर्कशुध्द उत्तर दिल की अजिबात नाही कारण जेट्टीपासुन इथवर येईपर्यंत गावातल्या त्या तिठ्याखेरिज दूसरा कुठलाच रस्ता दिसला नव्हता किंवा तशी काही खूणही आढळली नव्हती.आणि दूसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दळभद्री वळण येण्याअगोदर पासून एक गोष्ट मला जाणवली होती की रस्त्याच्या दुतर्फा दगडांच्या ज्या कुंपणवजा भिंती घातलेल्या होत्या, त्या अजुनही मला सोबत करत होत्या. सध्याच्या ह्या परिस्थितीत आता माझ्याकडे फ़क्त दोनच पर्याय होते. एक तर तडक मागे फिरायचं किंवा इथून पुढे त्यांच्या मागावर जायचं. मी पुढे जायचं ठरवलं त्याला दोन कारणं होती. एकतर माझा मोबईल बंद होता आणि दुसर म्हणजे मला वाटत होत की मी त्यांच्या सोबत नाही हे आता त्यांच्याही लक्ष्यात आले असणार. माझा फोन बंद आहे हे कळल्यावर ते मला शोधायला मागे फिरले असतील तर वाटेतच आमची गाठ पडेल. मी बाईक स्टार्ट केली आणि पुढे निघालो. मला अजुनही अस वाटत होत की हे लोक साले माझी मस्करी करत असणार बहुतेक. देव करो आणि तसेच व्होवो मनातल्या मनात देवाला हाक मारली. बाईक चालवून थोडावेळच गेला असेल की मला एक आशेचा किरण दिसला. मला समोर रस्त्याच्या डाव्याबाजुला उजेडासारखं काहीतरी दिसत होत. एक बल्ब जळत होता. एस.टी महामंडळाच्या विनंती थांब्यासारखं काहीतरी होत. मी गाडी थोडी स्लो केली. तो थांबा जस जसा जवळ येउ लागला तस मला दिसल की त्या थांब्यावर दोन व्यक्ति उभ्या आहेत. तिथे एक 30-35 ची बाई आणि एक 5-7 वर्षाची मुलगी उभी होती. चला कुणीतरी माझ्याशिवाय इथे आहे ही भावनाच मनावरचा बराचसा ताण हलका करुन गेली. पण मागोमाग मेंदुने सावधानीचा इशारा दिला. की एव्हढ्या रात्री ह्या दोघी अश्या निर्जन रस्त्यावर अश्या अवेळी कुठल्या बसची वाट बघताहेत? काही लफ़डं तर नाही ना? मी वेळेचा अंदाज बांधला तर आता कमीत कमी 10:30 तरी वाजायला हवे होते. चल काहीतरीच काय अश्या गोष्टी रात्रीच्या बाराच्यानंतर बाहेर पडतात अस कुणीतरी सांगितलेले आठवले आणि आता तर बाराला अजुन वेळ होता. त्यांच्याकडुन काही मदत मिळते का? किंवा माझे मित्र इथून पुढे जाताना त्यांनी पाहिलय का? ह्याची चौकशी करण्यासाठी मी गाडीचा वेग अजुन मंदावला आणि गाडी रस्त्याच्या अगदी डाव्या बाजुला आणली. माझी गाडी जस जशी त्याच्या जवळ जाऊ लागली तशी मला एक गोष्ट जाणवलीं की त्या दोघी माझ्याकडे टक लावून बघत होत्या. मलाही त्या आता स्पष्ट दिसत होत्या. दोघिहीजणी तिकडच्याच कुठल्यातरी रहाणार्या वाटत होत्या. त्या बाईने साधी सहावारी साडी नेसली होती पण ती साडी थोड़ी अस्त्यावस्त किंवा घाईघाईत नेसल्यासारखी वाटत होती. तिच्या केसांचा बुचडा बहुतेक सुटल्यासारखा वाटत होता. एका हातात प्लस्टिकची पिशवी आणि दुसऱ्या हाताने तीने त्या मुलीचा हाथ पकडला होता.ती मुलगी तिच्या डाव्याबाजुला उभी होती. थोडक्यात सांगायच तर ती बाई थोडी \विचित्रच वाटत होती. त्या मुलीने एक ड्रेस की काहीतरी घातला होता. दोघी एकदम शांत उभ्या होत्या एकटक माझ्याकडे पहात जणुकाही इतका वेळ ज्याच्यासाठी थांबल्या आहेत तो मीच आहे. थांब्यावर अडकवलेला बल्ब नेमका त्या दोघींच्या डोक्यावर होता. दिव्याखाली अंधार ह्या म्हणीनुसार त्या दोघींचे ही चेहरे मला नीटसे दिसत नव्हते. मी त्यांच्यासमोर गाड़ी थांबवणार एव्हढ्यात मला त्या दोघींची एक गोष्ट नजरेला खुपली. त्या छोट्या मुलीने जो ड्रेस घातला होता तो शाळेचा होता. पाठीमागे दफ्तर होते. वेण्या व्यवस्थित पाठीमागे बांधलेल्या होत्या, गळ्यात वोटर बोटल होती. मुलगी एकतर शाळेत जायच्या तयारीत होती किंवा नुकतीच शाळेतुन सुटली होती अश्या पेहरावात होती. थोडक्यात ती मुलगी अगदी अप टु डेट होती पण तिच्यासोबतच्या बाईच्या अगदी परस्पर विरोधी. आता मी त्यांच्या बरोबर समोर आल्याने मला त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. दोघीचेही चेहरे पांढरे फ़ट्ट्क होते. त्यांच्या चेहऱ्यावर कुठले म्हणजे कुठलेच भाव नव्हते. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या दोघीच्या परस्पर विरोधी असताना त्या दोघींमध्ये एक गोष्ट मात्र सेम होती ती म्हणजे त्या दोघींच्याही कपाळावर डोळ्यांच्या वरच्या भागावर एक मोठी खोक पडल्यासारखी वाटत होती. कुठल्यातरी मोठ्या अपघाताची निशाणीसारखी. त्यांचे डोळे अजुनही माझ्यावरच रोखलेले होते. हा सगळा प्रकार नेमका काय असू शकतो हे मला समजायला अजुन कुठल्याही पुराव्याची गरज नव्हती. मी त्यांच्यासमोर जेमतेम थांबायला आलेली गाड़ी पुन्हा जोरात सुरु केली आणि सुसाट सुटलो. न राहून मी पुढे जाऊन पुन्हा एकदा मागे वळुन पाहिले तर त्या दोघी अगदी तश्याच उभ्या होत्या अगदी शांत माझ्यावर नजर रोखुन. माझी तर आता चांगलीच तंतरलेली. मी जेव्हढ्या जोरात चालवू शकत होतो तितक्या जोरात बाईक पळवत होतो. माझी अवस्था इकडे आड़ आणि तिकडे विहीर अशी झाली होती. पुढे कुठे जायचयं हे माहीती नव्हतं आणि पाठीमागे त्या दोघी उभ्या होत्या. कुठली अवदसा सुचली आणि आज हे असलं थ्रील अनुभवायला आलो. मोठा बाईकर समझतो स्वत:ला. मी स्वत:च स्वत:ला शिव्याची लाखोली वहात होतो. सद्यपरिस्थीत मला ह्याशिवाय दुसर काही सुचतही नव्हते. मला खुप रडायला येत होत. डोळ्यांसमोर सारख्या त्या दोघीच येत होत्या. तेव्हढ्यात कुणीतरी मागुन माझ नाव घेतल्यासारखे वाटले. पहिल्यांदा मला वाटलं की मला भास झाला असावा.
"अमोल......."
पण आत्ताचा हां आवाज अगदी स्पष्ट आला होता. हो... कुणीतरी मागुन माझ्याच नावाचा पुकारा करत होते. मी थांबुन मागे वळुन पहाणारच होतो पण पुन्हा मला त्या दोघीची आठवण झाली. त्या माझ्या मागावर येउन मला बोलावत तर नसतील... ह्या विचारासरशी भितीची एक सणक मणक्यांतुन पार डोक्यात गेली. नाही...अजिबात मागे वळुन पहायचे नाही मी घाबरून अजुन जोरात बाईक पळवु लागलो. आता तो आवाज परत आला नाही. माझी खात्री पटली की म्हणजे त्या दोघीच मला बोलवत होत्या तर. याचाच अर्थ की त्या अजुनही माझ्या मागावर होत्या.
हे राम ......देवा प्लीज सोडव मला ह्या सगळ्यातुन. मी मनातल्या मनात कुलादैवतेला साकडं घातलं. मी बाईक चालवता चालवता एका हाताने माझे डोळे पुसत होतो.
"अमोल....."
अचानक माझ्या उजव्या बाजूने अगदी जवळुन हाक ऐकू आली. मी दचकून बाजुला पाहिल तर....
ते परवडी आणि अंकुर होते. परवडी बाईक चालवत होता आणि अंकुर मागे बसला होता. मला तर माझ्या डोंळ्यावर विश्वासच बसत नव्हता. मी अविश्वासाने त्याच्याकडे पहात होतो.
"अरे... बघतोस काय चुतिया.... गाडी थांबव पहिली......"
परवडीच्या आवाजाने मी भानावर आलो. मनातून त्या दोघांचा संशय येत होता. पण आता गाडी थांबवण्याखेरिज माझ्याकडे दूसरा काही पर्याय नव्हता. तस ही आता त्या दोघांनी आता मला गाठलच होत. मी गाडी साईडला घेतली. परवडीची बाईक माझ्यासमोर येउन थांबली. दोघेही उतरून माझ्याकडे आले. दोघेही जाम भडकलेले होते.
"कुठे चालला होता रे तू?? आणि होतास कुठे इतका वेळ??"
अरेच्चा साले, इतका वेळचा माझा हा प्रश्न हे लोक मलाच विचारत होते.
"साल्या.....बराच वेळ तुझी काही चाहुल लागली नाही म्हणून आम्ही मागे वळुन बघितलं तर तू गायब झालेला. आम्हाला वाटल तू आमच्या मागेच आहेस. आम्ही बाईक्स स्लो केल्या तरी तु काही आला नाहीस. गाड्या साईडला घेउन बराच वेळ तुझी वाट पाहिली तरी काही उपयोग झाला नाही. सरतेशेवटी तुझा फोन ट्राय केला तर तो पण स्विच्ड ऑफ़. आम्हाला तुझी काळजी वाटायला लागली. मग आम्ही ठरवल की दोघांनी पुढे जाऊन शोधायचं आणि दोघांनी मागे जाउन. ज्याला तू पहिला सापडशील त्याने दुसर्याला फ़ोन करून कळवायच. आता बोल ना कुठे होतास तू इतका वेळ??" परवडी मला विचारत होता. त्याच्या बोलण्यातुन त्याची माझ्याविषयीची काळजी स्पष्ट कळत होती. मी काहीच बोललो नाही. आता त्याची हालत बघता त्यांना मगासचा घडलेला प्रकार कितपत समजेल हा मोठा प्रश्न होता आणि तसही जे काही घडलं होत ते सांगायची ही वेळही नव्हती अन जागाही. अंकुरने लगोलग चप्पाला फोन लावला आणि मी भेटल्याच सांगुन टाकल.
"तुम्ही कुठे आहात......OK.........नको आता पुढे नका येऊ......तुम्ही आहात तिथेच उभे रहा आम्ही येईपर्यंत" एव्हढ बोलून त्याने फ़ोन कट केला.
" पहिल मला सांग तू आमच्या पुढे कसा काय आला? आणि तू साल्या जेव्हा आम्ही पाठून हाका मारत होतो तेव्हा थांबला का नाहीस? ऐन वक्ताला गाडीचा हॉर्न बंद पडला आणि त्यात तू ही तुझी बाईक मायकल शुमाकर सारखी पळवतोय" मला त्याही परिस्थीतीत अंकुरचं जनरल नॉलेज पाहून हसू आले. मला हसताना पाहून अंकुर अजुन भडकला. तो काही पुढे बोलणार तेव्हढ्यात
"चल बे ......ह्याला नंतर बघू अगोदर जेट्टीवर पोहचायाला लागेल. साडेबाराची लास्ट बोट असते. ती चुकली तर वाट लागेल. चल अमोल लवकर आणि मघाशी जशी चालवलीस तशीच जोरात बाईक चालव आणि हो आता आमच्या पुढे रहा आणि राईट मिरर मध्ये आम्हाला ठेव..." परवडीने मला इन्स्ट्रक्शन्स देऊन बाईक स्टार्ट केली. मी म्हटल " प्लीज माझी बाइक कुणी चालवेल का?" त्या दोघांनी एकामेकांकडे वैतागुन बघितलं. अंकुरने माझ्याकडून बाईकचा ताबा घेतला. मी गुपचुप त्याच्या मागे बसलो. आता त्या दोनही बाईक्स वाऱ्याच्या वेगाने जेट्टीच्या दिशेने पळत होत्या. अंकुरच्या मागे बसून परत जाताना मला जाणवलं की मी ह्या सगळ्या घडामोडीत बराच पुढे आलो होतो. परतीच्या मार्गावर तो मगासचा विनंती थांबा कुठे दिसतो का ते मी पहात होतो. पण बराच वेळ होऊनदेखिल तो काही दिसत नव्हता. मगाशी त्या थांब्यावरुन पुढे जाताना लागलेल्या वेळेनुसार परतीच्या वाटेवर एव्हाना खरंतर तो यायला हवा होता.
जाऊ दे..... मरू दे....साला तो विषयपण नको आणि ती आठवणपण. मी थकून अंकुरच्या खांद्यावर डोक टेकलं.
**************************************************************************************************************************
अचानक मला बाईकचा स्पीड कमी होत असल्याचा जाणवला.अंकुरच्या खांद्यावरुन समोर पाहिल तर रस्त्याच्या कडेला एक बाईक साईड लाईट ऑन करून उभी होती. आणि त्याच्या शेजारी दोन व्यक्ति एकामेकांना अगदी बिलगुन उभ्या होत्या. लांबुन बघताना एखाद कपल अंधाराचा फ़ायदा घेउन काहीतरी चाळे करतय अस वाटत होत. दोन्ही गाड्याचे हेडलाईट्स एकदम त्यांच्यावर पडले आणि समोरचे दृश्य पाहून आम्ही गडबडुन गेलो. समोर चिनूला बहुतेक फ़िट आल्यासारखी वाटत होती. त्याने डोळे फिरवले होते. दात कचकच वाजवत तोअंगाला एकसारखे झटके देत होता. त्याला त्या परिस्थितीत आवरताना चप्पाची हालत खराब होत होती. आम्ही धावत त्यांच्याकडे पोहचलो आणि विचारलं काय झालं?
आधी इथनं चला मग सगळं सांगतो" रडवेल्या आवाजात चप्पा म्हणाला.
परवडीच्या बाईकवर मध्ये चिनुला बसवून चप्पा त्याच्या मागे बसला. आता माझी आणि अंकुरची बाईक रिकामी होती. आता परत जाताना सगळ्यांत पुढे परवडी, मागे मी आणि सगळ्यांत शेवटी अंकुर असा सिक्वेंस होता. जवळपास वीस पंचवीस मिनिटात आम्हाला आमच्या समोर जेट्टीचा गेट दिसू लागला आणि सोबत बोटिचा निघण्याअगोदर ह्या दिवसाताला शेवटचा होर्नही ऐकू आला. त्या बरोबर अंकुरने बाईकचा हॉर्न वाजवायला सुरुवात केली. मला अंकुरच्या ह्या प्रसंगावधानाचं कौतुक वाटलं. बोट आमच्यासाठी जेट्टिवर थांबली होती. आम्ही बोटिजवळ पोहचलो. मगासचे काका मला पाहून तत्परतेने पुढे आले आणि माझी बाईक उचलून आत ठेवली. आता ह्या शेवटच्या फेरीला प्रवासी म्हणुन आम्ही पाचजणच होतो. बाकी बोटिचा ड्राईव्हर आणि ते काका असे दोघेच जण होते. चिनू आता बर्यापैकी सावरला होता. पण त्याची थरथरी काही अजुन कमी झाली नव्हती. सगळे एकदम शांत होते. कुणी कुणाशी काही एक बोलत नव्हते.
"काय झाले रे चिनुला????" अंकुरने शांततेचा भंग करत चप्पाला विचारले.
"अहं....." चप्पा कसल्यातरी तंद्रीतुन बाहेर आल्यासारखा बोलला. चप्पाने एकवेळ आम्हा तिघांकडे पाहिल आणि सगळ्यांत शेवटी चिनूकडे पाहून सांगायला सुरुवात केली.
" आयला काय झालं, कसं झालं तुम्हाला काय सांगु? कळतच नाहीय मला. अंकुर तुझा फोन आला तोवर आम्ही अमोलला गावापर्यंत शोधून आलो होतो. पण अमोल काही सापडला नाही. तिठ्यावरच्या चहावाल्याकडे इथून एखादी ब्लेक पल्सर पास झाली काय याची चौकशी केली. त्याने सांगितले मघाशी तुम्हा तिघांच्या गाड्या गेल्या तेव्हढ्याच त्यानंतर इथून कुठलीच गाडी गेली नाही. आम्हाला आता अमोलची सॉलिड काळजी वाटायला लागली. मला काही सुचत नव्हतं. चिनू म्हणाला आपण परत मागे जाऊ आणि पुन्हा एकदा रस्त्यावर अमोलला शोधू. मला चिनुच म्हणण पटलं. आम्ही परत निघालो. डोक्यात नको नको ते विचार येत होते. अमोल असा कसा काय गायब झाला काहीच कळत नव्हतं . आम्ही रस्त्याच्या कडेला निरखून पहात होतो. पण काही उपयोग होत झाला नाही. एव्हाना आम्ही अमोल जिथून शेवटचा दिसला होता त्याच्याही पुढे निघून आलो होतो. तेव्हाच तुझा मला फोन आला की अमोल सापडला म्हणुन आणि तू सांगितलस की आहात तिथे थाबुंन रहा म्हणुन. अमोल सापडला हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. मी लागोलग ही गोष्ट चिनुला सांगितली. तोही खुश झाला. आम्ही आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे गाडी फिरवून उभे राहिलो. गाडी बंद केली. सिंगल स्टेण्ड्ला गाडी उभी केली आणि साईड लाईट ऑन करून आम्ही एका आडोश्याला जाउन हलके होउन आलो. आजुबाजुचा परिसर अगदी निवांत होता. बाईक बंद केल्यावर तर आजुबाजुच्या शांततेत अजुन भर पडली होती. चंद्राच्या प्रकाशात आजुबाजुचा परिसर अगदीच स्पष्ट नाही पण बर्यापैकी व्हिजिबल होता. मी सहज वर पाहिले तर आज पोर्णिमा असल्यासारखे वाटले. मी आणि चिनू एकामेकांशी गप्पा मारत तुमची वाट पाहू लागलो. तेव्हा माझ लक्ष्य चिनुच्या मागे जाणवलेल्या हालचाली कड़े गेले. तिथे अंधारात रस्त्याच्या कडेला दोन आकृत्या उभ्या होत्या. त्यातली एक आकृती एका बाईची आणि दूसरी आकृती लहान मुलीची होती. मी गडबडुन पुन्हा पाहिले तर तिथे कुणीच नव्हते मला वाटलं की मला भास् झाला बहुतेक. मी पुन्हा गप्पा मारायला सुरुवात केली. पुढच्याच क्षणाला चिनुच्या ड़ोक्यामागे काहीतरी फ़डफ़डताना दिसलं. मी निरखून पाहिल तर एक 30-35 ची बाई चिनुच्या मागे एका हाताच्या अंतरावर उभी होती. तिच्यासोबत एक मुलगी पण होती. शाळेचा ड्रेस घालून. दोघी एकदम विचित्र दिसत होत्या. मला अचानक शांत झालेला पाहून चिनू नेही मागे वळुन पाहिले. त्या दोघींना पहाताच घाबरून चिनू दोन पावलं मागे सरकला आणि मला येउन धड़कला. त्या दोघी मात्र आहेत त्या जागेवर अगदी शांत आणि निश्चल उभ्या होत्या. चंद्राच्या प्रकाशात त्याचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. दोघिंचेही चेहरे एकदम निर्जीव होते. त्यांच्या कपाळावर कसलीतरी मोठी खोक पडलेली दिसत होती. त्यांनी त्यांचे डोळे आमच्यावर रोखलेले होते. आमची तर वाचाच बंद पडली होती. घश्याला कोरड पडल्यासारखे वाटतं होते. जोरदार ओरडावेसे वाटत होते पण भीतीने तोंडातुन शब्दच फुटत नव्हता. इतक्यात त्या छोट्या मुलीने एकाएकी जोरदार किंचाळ्या फोडायला सुरुवात केली. त्या निशब्द वातावरणात तिच्या त्या किंचाळ्यांचा आवाज केवढ्यानं तरी घुमत होता. आम्हाला तर आमचे कानच बसल्यासारखे वाटले. अचानक तिच्या किंचाळ्याचा आवाज थांबला. आम्ही त्यांच्याकडे पाहिले तर त्या तश्याच शांत आणि निर्विकार उभ्या होत्या आमच्याकडे टक लावून पहात. आता ती बाई अचानक जोरजोरात हसायला लागली. त्यावेळेला तीचे ते अस बेसुर हसणे अंगावर काटा आणतं होत. आमची तर भीतीने बोबडीच वळली होती. अचानक ती बाई हसता हसता रडायला लागली. स्वत:चा उर दोन्ही हातांनी बडवायला लागली. तिचे दोन्ही हाथ मोकळे पाहून, आमचं लक्ष्य मघापासून तिचा हाथ धरून उभ्या असलेल्या तिच्या त्या मुलीकडे गेले तर ती जागेवर नव्हती मी इकडे तिकडे पाहिले तर ती उलटी होऊन पाठिची कमान करून दोन्ही हात तिने जमिनीला लावले होते पण सगळ्यात विचित्र म्हणजे ह्या असल्या पोझिशन मध्ये तिचा चेहरा उलटा असायला हवा होता. पण नाही तो सरळच होता. ती आता खेकड्यासारखी चालून आमच्याभोवती घिरट्या घालत होती. आमच्या भोवती घिरट्या घालताना ती मुलगी अगम्य भाषेत काहीतरी बडबडत होती. मध्येच आमच्याकडे पाहात दात विचाकावुन फिसकारत होती. तिच्या डोळ्यांच्या बाहुल्याच गायब झाल्या होत्या. इकडे ती बाई स्वत:चा उर बडवता बडवता आता जोरदार घुमायला लागली होती. तिच्या केसांनी तिचा चेहरा आता पुर्ण झाकला होता. तीच रडणं अगदी असह्य होत होते. आम्ही अगदी रडकुंडिला आलो होतो. अचानक चिनू थरथरायला लागला मला काही कळायच्या अगोदर चिनू एकदम हातपाय झाडायला लागला ते पाहून त्या दोघी अजुन जोरजोरात हसायला लागल्या. मी घाबरून जोरात ओरडलो " चिनू………"
माझा आवाज मला स्वत:लाच केव्हढ्याने तरी ऐकू आला. आजुबाजुला पाहिलं तर सगळं एकाएकी एकदम शांत झालं होतं. मी आजुबाजुला नजर टाकली. घाबरून त्या दोघी कुठे लपल्या आहेत का? ते पाहू लागलो. पण आता त्या रस्त्यावर मी आणि चिनू शिवाय दुसरे कुणीच नव्हते. तेव्हढ्यात दुरून दोन लाईटस आमच्या दिशेने येताना दिसल्या. जवळ आल्यावर कळल की त्या तुमच्या बाईक्स होत्या. तुम्ही आलात आणि विचारायला लागलात की काय झालं म्हणून. आता हे सगळं मी तुम्हाला तिथ कसं सांगणार....."
एव्हढं बोलून चप्पा रडायला लागला. मी चप्पाला जवळ घेतलं. अंकुर आणि परवडीच्या चेहर्यावर भिती स्पष्ट दिसत होती. चप्पानेही तत्कालीन परिस्थीतीत तेव्हा काहीही न सांगण्याचा माझाच पर्याय निवडला होता. पण चप्पाने त्या दोघींचा विषय काढताच मला त्या दोघींचे चेहरे पुन्हा डोळ्यांसमोर दिसू लागले. आजच्या रात्रीच हे थ्रील आम्हा सगळ्यांना भलतचं भोवलं होत.
" कुठं गेला होता रे तुमी सगली इतक्या रातच्याला......" त्या बाईक उतरवणार्या काकांनी मला विचारलं. मी उत्तर दिल नाही. बहुदा त्यांनी आमच बोलण ऐकल होत.
" नका सांगु.....पण तुमच्या बोलण्यावरुन मला समदं कळलय की तुमी कुठं जाउनश्यान आला ते. पुन्यांदा असा शानपना करू नका. तुमच्या आई बापाची पुण्याई म्हणुनश्यान सस्तात वाचलात. अरे निदान दिस बगुन तरी निघायच. अरे...आज पोर्णिमा हाय ना रे. काय बर वाईट झाल असत तर कोण जिम्मेदार होत....." आम्हाला आमची चुक कळत होती. समोर चिनू अजुनही थरथरत होता. काकांनी चिनुकडे पाहिलं आणि म्हणाले" आदि ह्या पोराला पाणि पाजा आणि ह्याला घरात नेण्या अगुदर ह्याच्यावरून तीन येळा नारल ओवालुन काढा. आणि तो नारल कुठल्यातरी तिठ्यावर नेउन फोडून टाका. आणि हो.... नारल फोडून माघारी येताना काय बी झाल तरी मागं वळुन पाहायच नाही..... समझलात काय?" आम्ही माना डोलावल्या. बोट बोरिवलीच्या जेट्टीला लागली. आम्ही खाली उतरलो. काकांनी आमच्या बाईक्स उतरवून दिल्या. मी काकांना पुन्हा दहाची नोट पुढे केली तर काकांनी माझा नोट धरलेला हात हातात घेतला आणि म्हणाले
" नको राजा मला पैका नको फकस्त तुमी लोक सवताला जपा. असल जिवावरच धाडस पुन्यांदा कंदि करू नका. माझ लई नुसकान झाल हाय ह्या असल्या तुमच्या खेळापाई .....अरे तुमच्या एव्हढाच होता रे तो............" एव्हढ बोलून काकांनी शर्टाच्या बाहिने आपले डोळे पुसले आणि बोटीत चढले.
परवडीने माझ्या खांद्यावर हात ठेवून निघायचा इशारा केला. बाहेर येईपर्यंत कुणी कुणाशी बोलत नव्हते. चिनूला घरी सोडायची आणि काकांनी सांगितलेले सोपस्कार पुर्ण करायची जबाबदारी परवडीने घेतली. चप्पा अंकुर सोबत निघाला. मी घरी पोहचेपर्यंत एक वाजला होता. आईने दरवाजा उघडला. आईने मला काही विचारण्या अगोदरच मी तिला मिठी मारली. आईने काय झाल विचारल्यावर मग सांगतो अस निसटत उत्तर देऊन गुपचुप वर आपल्या खोलीत गेलो.
आज ह्या गोष्टीला वर्ष लोटली. सगळेजण आज देवाकृपेने सुखरूप आहेत. त्या रात्रीच्या त्या अनुभवानंतर रात्रीचे ते थ्रील कायमस्वरूपी बंद झाली. आता आमच्यापैकी कुणीही त्या रात्रीविषयी चुकार शब्दही काढत नाही. पण मला ठावूक आहे की ती रात्र दररात्री माझ्याच काय तर आम्हा सगळ्यांच्या आठवणीत जागी असते.

Tuesday, 30 December 2014

मनातल्या मनात ……मनातल्या मनात …… 

आपल्या प्रत्येकाच्या आत एक गलगल्या असतोच असतो, अखंड बकबक करणारा, या विषयावरून त्या विषयावर माकडासारख्या उड्या मारत भटकणारा, उडाणटप्पू, गुंड, गोड, निष्पाप, विचारी, अविचारी इत्यादी इत्यादी. "व्हाय वुमन...."मध्ये वाचलं होतं की म्हणे, बायका दिवसाकाठी वीसहजार शब्द किमान बोलल्याखेरीज तोंड बंद करत नाहीत (श्शी फ़क्त?) तर हे झालं प्रकट शब्दांचं अकाऊंट पण मनातल्या मनात जे अखंडीत चालू असतं त्याचं काय? असो. विषय उगाच गंभीर होण्याआधी पुन्हा आपल्या मूळ पदावर यावं झालं. तर मुद्दा काय? की मनातल्या मनात बोलण्याचा. या बोलण्याला नां कसला काही ताळच नसतो. कुठून विचार सुरू होतात आणि कुठे फ़िरत, भटकत जातात...सगळंच गमतिचं. कधी कधी वाटतं या मनातल्या संवादाची फ़ोटोकॉपी काढता आली तर दुसरं विनोदी लिखाण वाचण्याची गरजच नाही. तसं कशाला? हा एक मासलाच घ्या नां, उगाच आपलं नमनाला घडा कशाला? नाही का?
चला मग गलगले निघाले.......
गलगले थांबा. निघालात काय असे गडबडीनं. वाचकांना संदर्भसुची नको का द्यायला? त्यांना काय समजणार हे सगळं काय चाललंय ते? तर नमुना म्हणून दर शनीवारची मुलीला शाळेत सोडून येईपर्यंतची तीस मिनिटं इथे दिलेली आहेत. तसं सगळंच डिट्टोसेम लिहिलेलं नाही, जरा एडिटिंग केलेलं आहे (गलगले मनातल्या मनात झालेल्या संभाषणाचं कसलं आलंय डोंबलाचं एडिटिंग?) तर गलगले कंसातून बाहेर आलेले आहेत आणि गलगल्यांनी सूचना संपविल्या आहेत.......

चला आवरा आवरा धावा...उशिर झाला, गाडी अजिबात सुरू नाही होत...झाली झाली चला आता सुसाट....आली कुत्री आडवी आलीच लगेच. मनेकाला काय सांगायला होतं कुत्री बिचारी असतात म्हणून इथे अंगावर धावून येतात तेंव्हा पाय वर घेऊन गाडी चालवायची वेळ येते त्याचं काय?.....परवा अशी आली धावत गाडीकडे....घाबरून पाय पोटाशी घेतले आणि मग लक्शात आलं की अरेच्चा, आपण तर कारमध्ये आहोत आणि काचा वर आहेत. पण श्र्वास थांबला नां सेकंदभर, त्याचं काय?......ओढणी बांधलीय नां मागे? नाहीतर अडकायची कुठेतरी.....अरे हा रस्त्याकडेचा पत्रा काढला की, आत केव्हढी दाट झाडी आहे....झाडं का तोडतात?.....अरे देवा, आता इथेही ट्रॅफ़ीक जॅम....चल बाबा लवकर पुढे, ये बाईकवाल्या तुलाही आत्ताच मध्ये तडमडायचं होतं?....हं सुटलो एकदाचे, पाच मिनिटाच्या रस्त्यावर पंधरा मिनिटाचा प्रवास....रस्ते काय उकरतात सारखे, पुन्हा खड्डे बुजवतही नाहीत.....आता वळायचंच की उजवीकडे....हा पॅच बाकी मस्त आहे. शांत, थंड. व्वा, काय बरं वाटतंय मनाला. तसा काही फ़ार उशिर नाही झालेला..... आज आता पुस्तक वाचून संपवायलाच हवं घरी जाऊन मस्तपैकी संपवून टाकू, काम बिम राहिलं बाजुला. कित्ती दिवस झाले असे निवांत घालवून....आई गं काय मस्त ड्रेस आहे. तिला छान दिसतोय....आला आणखी एक खड्डा आला. किती वर्षं झाली हा खड्डा इथेच आहे.....आता गाडी कुठे लावावी? कधीच का जागा मिळत नाही इथे? कसे लावतात लोक गाड्या? फ़टकवायला हवं सगळ्यांना.....भाजीपण घ्यायचीय जाता जाता....कोणती भाजी घ्यावी बरं? पालेभाजीच घ्यावी एखादी......मिळाली की जागा पार्किंगला.... चला सुटले बाई एकदाचे.......आई गं...घरातून निघाल्यापासून किती बोलले मनातल्या मनात. यावर एकदा लिहायला हवं. किती दिवस झाले ब्लॉग लिहून.किती विषय नुसतेच सुरू करून सेव्ह करून सोडून दिलेत. ते काही नाही आता ते सगळे विषय पूर्ण करायचेच. होतं काय की असं काहीतरी लिहायचं सुचतं आणि मग सुचतच जातं पण त्यावेळेस ब्लॉग लिहिण्याइतका वेळ नसतो आणि लिहिण्यासाठी आवर्जून बसलं की हे इतकं सगळं सुचत नाही. आजकाल जरा कंटाळाच येतोय नाही पण? पूर्वी नियमानं लिहिलं जायचं...आता का असं झालंय?तसं तर तो पण विषय राहूनच गेलाय लिहायचा, तो फ़सवणुकीचा, मग तो ढापूगिरीचा, ती घरसाजवटीची एक लिंक शेअर करायची होती तीपण राहिली. काय मस्त होतं पण ते बाथरूम, काय मस्त फ़ील होता, रोजवालीचं इंटिरीयरपण मस्त आहे नाही? शांत आणि थंडावा देणारं. प्रभानं या आठवड्यात बाथरूम घासून घेतलं नाही का? उद्या नक्की विचारायला पाहिजे. प्रभा बरी आहे. टिकली आहे कामावर. काम ठीक ठीक करते पण नियमीत तर आहे. कामवाल्या बायका हा पण एक स्ट्रेस ट्रिगर आहे हं. असल्या तरी वैताग नसल्या तरी. स्ट्रेसवरचं ते आर्टिकलपण भारी होतं. त्यावरपण लिहायचं राहिलंच की. उत्साहानं लिहायला घेतलं तर इंटरनेटनं दगा दिला. कॊम्प्युटरवाल्याला आता घरी बोलावून एकदा काय ते बघायलाच हवं. अ‍ॅण्टीव्हायरसपण संपलाय...ई हे म्हणजे घरातली साखर संपलीय असं म्हटल्यासारखं वाटलं. अग्गं बाई खरंच की घरातली साखर संपलीय आता जाता जाता घेऊनच जाऊ. काय करावं ईडनमध्ये घ्यावी का? की डी मार्टमध्ये एखादी चक्कर टाकावी? नकोच डीमार्टमध्ये गेलं तर आणखी दहा गोष्टी घेण्याचा मोह होणार. नकोच. किंवा सरळ संध्याकाळी मोअरमध्ये चक्कर मारावी नाहीतरी परवा लॉक न लॉकचे डबे घ्यायचे राहिलेच होते. जरा वेळ काढून जावं म्हणजे निवांतपणानं बघता येईल. कोणी सोबत येतंय का विचारावं का? तेव्हढाच टाईमपास.....अरे देवा या सगळ्यात गेलं ना ईडन मागे जाऊ दे आता घरूनच मागवावं...घराची किल्ली घेतली ना मघाशी गडबडी? आई गं..घरातून निघताना गॅस बंद केला होता नां? आता घरी गेल्यावर काय दिसणार आहे कोणास ठाऊक? नाही नाही केला होता वाटतं बंद.....बघा आजपण वॉचमन गायब आहे मस्त गेट उघडं टाकून. कोणी आत घुसलं, काही झालं तर काय करणार? आई गं काय ऊन अर्ध्या तासात झीट निघाली नुसती. व्वा. लॉबीत आल्यावर कसं मस्त थंडगार वाटतंय......

हुश्श...आता बास झालं. मनातल्या मनात बोलायचा कंटाळा नाही येत पण बोटं वैतागली बटनं बडवून. 

अरे हो जाता जाता सांगायचंच राहिलं. उपरोक्त मनोगताला कसलेही साहित्यिक नियम लावू नका. ही एक चम्मतग आहे. वाचा सोडून द्या. नाही समजली तर आणखिनच गम्मत. शिवाय नेहमीप्रमाणेच मनालाही लावून नका घेऊ.

हेच का म्हणावं स्त्रीचं वेगळेपण?


आमच्या एका नातेवाईकांकडे दिवाळीनिमित्त आम्ही सगळे जमले होतो. छान गप्पांना ओघ रंगात आला होता. इतक्यात माझ्या बहिणीने विषय काढला की बघा आपली निशा यावर्षी एमबीएला मेरिटमध्ये आली! निशा माझी मावस बहीण. एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक! सगळे म्हणाले वा! लग्नानंतर शिकणे म्हणजे कौतुकच. इतक्यात माझी एक वहिनी म्हणाली, त्यात काय एवढे कौतुक. आजकाल तर डिगर्‍या या अशाच सगळ्या ओळखीने मिळतात! खरे तर ही वहिनी साधारण शिक्षण झालेली! निशा अवाकच झाली. तिचा चेहरा एकदम उतरून गेला. वातावरणाचा सूरच बदलून गेला. खरे त ती काही बोलू शकत होती, पण संस्कारांमुळे ती गप्प बसली. मला आश्‍चर्य वाटलं. का म्हणून स्त्रियाच या स्त्रीच्या वैरी असतात? कुणाचं मन दुखवण्यासारखं महापातक नाही.
दुसरा एक प्रसंग! काय गं अर्चना तुझ्या मुलीचा काय रिझल्ट लागला? अगं एक विषय बॅक राहिला! अरेरे वाईटच झाले. माझी अनुजा बघ मेरिटमध्ये आली. कशाला मुलांची तुलना करायची? कुठल्याही कार्यक्रमाला गेले की असले महाभाग असतात. अय्या! किती लठ्ठ झाली गं. लठ्ठपणामुळे हार्टअटॅक येतो बरं किंवा किती काळी दिसते गं अथवा किती वेडी साडी घातली गं ई. अशा संवादामुळे मन वैतागून जातं. खरंच असं वाटतं की आयुष्य हे किती सुंदर आहे. यात आपल्याला करण्यासारख्या खूप छान गोष्टी असतात. मग आपण असल्या निरर्थक गोष्टींमध्ये का वेळ घालवितो? आपण कुठेही आनंदासाठी जमतो म्हणूनच चांगल्या गोष्टी कराव्यात जेणेकरून आपण दुसर्‍यांना आनंद देऊ शकू! स्वत:ही आनंद घ्या व दुसर्‍यांना पण आनंदाने जगू द्या.
आमच्या ओळखीचे एक कुटुंब रवींद्र गंधे व डॉ. भाग्यश्री गंधे यांनी मैत्रबन नावाची अतिशय भव्य व सुंदर संस्था वृद्धांसाठी सुरू केलेली आहेत. असे अनेक लोक आहेत की जे सामाजिक जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडत आहेत. मला वाटतं की प्रत्येकानी आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ हा चांगल्या कार्यासाठी खर्च करावा! प्रत्येकच स्त्रीला नोकरी करणे शक्य नाही तेव्हा छान पुस्तकांचं वाचन करणे, ट्युशन्स घेणे, कुकिंगचे क्लासेस, मॅरेज ब्युरो इ. अनेक कामे त्या करू शकतात. जेणे करून त्यांना मानसिक समाधान मिळू शकेल.
स्त्रियांसाठी काही नम्र सूचना
१) कृपया कुणावरही व्यक्तिगत टीका करू नये. विशेषत: कुणाच्या रूपाला अथवा कपड्यांना नावे ठेवू नये.
२) कुणाच्याही व्यक्तिगत व घरगुती भांडणात अजिबात पडू नये, कारण ही भांडणे म्हणजे पाण्यावरचे बुडबुडे असतात. सगळे एकच राहतात व आपण वेडे ठरतो.
३) आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ हा चांगल्या क्रिएटीव्ह कार्यासाठी खर्च करा जसे- समाजकार्य, कुकिंग वा आपल्याला ज्या गोष्टीची आवड असेल तो!
४) ‘‘वाचाल तर वाचाल’’ वाचण्यासारखे सुख व आनंद कशातच नाही. तुम्ही वाचनाला एकदा सुरुवात केली की बघा कशा भारावून जाल.
५) कुणी जर शिकत असेल वा चांगलं कार्य करत असेल तर त्याचं कौतुक केलं नाही तरी चालेल, पण कृपया टीका करू नये. (आपण ते करून बघा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!)
६) कुणाच्याही पाठीमागे कुणाची टीका करू ने. सुचना द्यायच्या असतील तर नम्रपणे द्या.
७) दुसर्‍यांचेही बोलणे ऐकून घ्यावे. one way communication नको!
८) दवाखान्यात पेशंटला भेटायला गेल्यावर लवकर उठावे फार पाल्हाळ बोलू नये.
९) आपली अहंकारी वृत्ती कमी करावी. I am the best हे मनातून काढून टाकावे. जे खरंच हुशार असतात त्यांना ते दाखविण्याची आवश्यकताच नसते.
१०) आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रीणींशी मर्यादेत व कमीच बोलावे.
११) आपल्या मुलांशी मैत्रीणीचे नाते ठेवावे. त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास ठेवावा. त्यांच्यावर शंका घेणे म्हणजे आपल्या संस्कारावर शंका घेणे होय.
१२) कुठल्याही घरगुती अथवा कमी शिकलेल्या स्त्रीला कमी लेखू नये. कारण हाऊसवाईफ होणे म्हणजे सगळ्यात दिव्य कार्य असतं. प्रत्येकामध्येच काहीतरी गुणवत्ता ही असतेच.
१३) जुन्या शास्त्राप्रमाणे विधवा स्त्रीला प्रत्येक गोष्टीचा अधिकार दिलेला आहे. तिला कुठल्याही कार्यक्रमात तुच्छ लेखू नका वा तिचं मन दुखावू नका. मग आपल्या शिक्षणाला काय अर्थ राहिला!
१४) ज्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असते त्यावरच बोलावे उगाच अर्धवट बोलून आपले अज्ञान दाखवू नये.
१५) प्रत्येक स्त्रीने आपले स्वतंत्र अस्त्तिव अवश्य जपावं. तिची स्वत:ची एक स्वतंत्र ओळख असावी. आयुष्यात काहीतरी कार्य व सामाजिक जबाबदारी अवश्य पार पाडावी.
३ STEPS FOR HAAPY LIFE
1. Don’t stress yourself with useless people who don’t deserve to be an issue i your life.
2. Never invest too much emotions at one thing because if you do you will end up hurting yourself .
3. Learn to live without worries, because God will take eare of evertything
TRUST AND HAVE FAITH