Wednesday 31 December 2014

स्वप्न आणि वास्तव

मॅनेजरसाहेबांनी रोहनच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि ते म्हणाले,"रोहन, मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. मला हे सांगायला आनंद वाटतो कि तू आपल्या कंपनीचा स्टार सेल्समन आहेस. जर आपल्या प्रत्येक सेल्समनने तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर कंपनी ची प्रचंड प्रगती होईल." मॅनेजरसाहेबांचे बोलणे ऐकून रोहनची छाती अभिमानाने भरून आली. "आणि हि आहे तुझ्या कष्टांची पावती, तुझे अप्रेजल लेटर.", असे म्हणत मॅनेजरसाहेबांनी एक एन्वलप पुढे केले. रोहन चा आनंद गगनात मावेना. त्याने थरथरत्या हातांनी एन्वलप घेऊन उराशी घट्ट कवटाळले. "अरे जरा उघडून तर पहा.",मॅनेजरसाहेब हसत म्हणाले.रोहनने धडधड्त्या छातीने आणि थरथरत्या हातांनी एन्वलप उघडले. आतला कागद उघडला आणि वाचायला सुरुवात केली. "कंपनी ला हे कळविण्यास दुःख होत आहे कि वाईट परफॉर्मंसमुळे आपल्याला कामावरून काढून टाकण्यात येत आहे." रोहन चमकला. "सर, याचा अर्थ काय?" त्याने मॅनेजरसाहेबांकडे पहात विचारले. एव्हाना रोहन कडे पाहून मंद स्मित करणाऱ्या मॅनेजरसाहेबाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मंद प्रेमळ स्मिताचे रुपांतर गडगडाटी खुनशी हास्यात झाले. "मूर्ख माणसा, याचा अर्थ तोच, जो तू लेटर मध्ये वाचलास. स्टार कसला, अरे तू तर फ्लॉप सेल्समन आहेस. कुठल्याच महिन्यात तू टार्गेट पूर्ण केले नाहीस. याचा परिणाम शेवटी हाच होणार" असे म्हणून मॅनेजरसाहेबांचे हास्य अधिकाधिक विकट होत गेले."नाही, हे साफ खोटे आहे",रोहन कानांवर हात ठेवून जोरात किंचाळला आणि.... आणि त्याच क्षणी त्याचे डोळे उघडले. त्याला दरदरून घाम फुटला होता. सरिता त्याला हलवून विचारत होती" अहो काय झाले?असे किंचाळलात कशाला? काही वाईट स्वप्न पाहिलेत का?"
"हो, ते एक वाईट स्वप्नच होते.अग काही कळत नाही. मी माझ्या कंपनीमध्ये एक यशस्वी सेल्समन आहे.पण मला सतत अशी अपयशाची स्वप्ने का पडतात?" "जाऊ दे ना.तुम्ही प्रत्यक्षात यशस्वी आहात. त्यामुळे अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करा.", सरिताने रोहनला समजवायचा प्रयत्न केला. "अगं दुर्लक्ष तरी किती करू? गेल्या काही दिवसात अश्या स्वप्नांची फ्रीक्वेन्सी वाढली आहे. काही तरी कायम स्वरुपी उपाय करायला हवा, ज्याने अशी स्वप्ने पडणे कायमचे बंद होईल. " "हो",सरिताने त्याला दुजोरा दिला.
असेच काही दिवस गेले.परिस्थिती फारशी बदलली नाही. उलट अधिकाधिक बिघडली. सरिताने एके दिवशी तिच्या खास मैत्रिणीला निशाला घरी बोलावले. कदाचित ती मार्ग सुचवेल अशी तिला आशा वाटली.निशाने सारे शांतपणे ऐकून घेतले.शेवटी ती म्हणाली,"अगं, अशी स्वप्ने पडतात बर्याचदा. त्याचे मनावर घेण्याचे कारण नाही. अश्या स्वप्नांचा विचार करणे त्यांनी थांबवले पाहिजे. तुझा नवरा यशस्वी सेल्समन आहे, त्यामुळे उगाचच काळजी करण्याची गरज नाही." सरिता यावर काहीशी गप्प झाली. तिला काही तरी बोलायचे होते, पण बोलावे कि नाही असा विचार ती करत होती. शेवटी मनाचा हिय्या करून ती बोलली,"निशा, तिथेच तर खरा घोळ आहे." "म्हणजे?",निशा सरिताच्या या बोलण्यावर बुचकळ्यात पडली. तिने प्रश्नार्थक नजरेने सरिताकडे पाहिले.सरिता बोलू लागली,"अगं मागच्या आठवड्यात मला यांच्या ऑफिस मधला सहकारी भेटला. त्याने मला काही वेगळेच सांगितले. रोहन स्टार सेल्समन वगैरे काही नाही. त्याचा कामातला परफॉर्मंस सामान्य आहे. "काय सांगतेस काय? "आता चकित होण्याची वेळ निशाची होती, "म्हणजे तुझा नवरा तुझ्याशी खोटे बोलतो." "कदाचित अगदीच तसे बोलता येणार नाही.रोहनला मी जेवढे जाणते त्यावरून सांगते, कि तो स्वप्नांच्या दुनियेत वावरणारा माणूस आहे.ऑफिसमध्ये परफॉर्मंस चांगला होत नसल्यामुळे तो असमाधानी असावा, त्यामुळे त्याने दिवास्वप्ने पाहायला सुरुवात केली असावी ज्यात तो स्वताला स्टार सेल्समन समजू लागला. पण आता प्रॉब्लेम हा आहे कि तो स्वप्नांची हि दुनियाच इतकी खरी मानायला लागला आहे. त्याच्यासाठी स्वप्न आणि वास्तव यातली सीमारेषा धूसर झाली आहे." "अच्छा!",निशा म्हणाली,"हा प्रॉब्लेम आहे तर.." "अगं नाही",सरिता म्हणाली,"प्रॉब्लेम इथेच संपत नाही." "म्हणजे?",निशाचा गोंधळ काही संपला नव्हता. "अगं, अश्या या परीस्थीती मध्ये त्यांनी खरतर दिवास्वप्ने बघणे बंद करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पण त्याच्या डोळ्यात आता वेगळेच खूळ शिरले आहे." "आता आणखी काय नवीन?",निशाने विचारले.
अगं याच्या डोक्यात लेखक बनण्याचे खूळ शिरले आहे. काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी मासिकात त्याने केतन भगतची मुलाखत वाचली. त्याने मुलाखतीत म्हटले, "फॉलो युवर ड्रीम्स, तुमची स्वप्ने पूर्ण करा." झाले, यांनी ते नको तितके सिरीयसली घेतले. जॉब सोडतो आणि पूर्ण वेळ लेखक बनतो म्हणताहेत.ऐकायलाच तयार नाहीत.काही दिवसापूर्वी रात्र रात्र जागून कसलीशी कादंबरी लिहिली म्हणे. अगं त्या केतन भगत चे ठीक आहे. त्याची बायको आहे आय आय एम वाली.भले त्या केतनची पुस्तके नाही खपली तरी ती त्याला आयुष्यभर पोसू शकेल. पण यांना हे कळेल तर शपथ.शिवाय केतनला पैसा मिळाला तो इंग्रजी पुस्तके लिहून. पण हे लिखाण करणार मराठीमध्ये. मराठी लिखाणात कुठला आलाय पैसा. मला एक तरी मराठी लेखक दाखव जो पूर्ण वेळ लेखक होता. एक तर सध्या रिसेशनच्या काळात हातात असलेला जॉब टिकवणे लोकांसाठी कठीण झाले आहे. आजूबाजूला रिसेशन मुळे जॉब गमावलेल्यांच्या गोष्टी ऐकल्या कि फार भीती वाटते. पण हे काही ऐकायलाच तयार नाहीत."
"अरे देवा",निशासुद्धा आता पुरती विचारात पडली.अचानक तिला मार्ग सुचला."सरिता, माझ्या ओळखीचे एक सायकीयाट्रीस्ट, आहेत, डॉ. बर्वे. आपण त्यांचा सल्ला घेतला तर?" "हं..",सरिताला निशाच्या बोलण्यात अर्थ जाणवला.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. ह्या वेळेला कोण आले असेल सरिताला प्रश्न पडला. तिने दरवाजा उघडला. दारात एक मध्यमवयीन सुखवस्तू दिसणारे गृहस्थ उभे होते. "रोहन काळे साहेबांचे घर हेच का?",त्यांनी पृच्छा केली. "आपण?", सरिताने विचारणा केली. रोहनला साहेब म्हणणारे हे गृहस्थ कोण असा तिला मनात विचार पडला होता. "आत आले तर चालेल ना?",त्यांनी विचारले. "माफ करा. याना आत." ते गृहस्थ आत येऊन खुर्चीवर बसले."आपण त्यांच्या पत्नी का?"त्यांनी विचारले."हो",सरिताने म्हटले. त्यांनी खिशातून एक एन्वलप काढले. "काळे साहेब घरात नाहीत?", त्यांनी विचारले. "नाही, ते ऑफिस मध्ये गेले आहेत." "काय, ते अजूनही ऑफिसला जातात?",त्या गृहस्थांनी विचारले. "म्हणजे? काय म्हणायचे आहे तुम्हाला?"सरिताच्या काळजात धस्स झाले. "रोहनचा जॉब सहीसलामत आहे कि नाही? आणि जर जॉब गेला असेल तर तो ऑफिस च्या नावाखाली गेला तरी कुठे?",तिच्या मनात एका क्षणात नाना प्रकारचे विचार येऊन गेले. तेवड्यात ते गृहस्थ हसत म्हणाले, "अहो वहिनी, गैरसमज नको. मला म्हणायचे होते कि त्त्यांना आता जॉब करायची काय गरज आहे? आता जॉब सोडायला सांगा." "म्हणजे?",सरिताने गोंधळून विचारले. निशाच्या चेहऱ्यावर सुद्धा गोंधळ होता. "हा घ्या चेक पाच लाखांचा",त्या गृहस्थांनी चेक पुढे केला."काय पाच लाख? पण कशाबद्दल?" "घ्या, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही?",आता बुचकळ्यात पडण्याची पाळी त्या गृहस्थांची होती.
"अहो वहिनी, काळे साहेब आता सेलेब्रिटी झाले आहेत. स्टार रायटर. एक प्रसिद्ध लेखक.मी मेहता प्रकाशनचा मालक. तीन महिन्यांपूर्वी काळे साहेबांनी त्यांच्या एका कादंबरीचे हस्तलिखित माझ्याकडे दिले. खरेतर आमची संस्था फक्त प्रतिथयश लेखकांचीच पुस्तके छापते. मी ते बाड खरतर अडगळीतच टाकणार होतो. पण सहज वाचायला गेलो आणि वाचतच गेलो. जादू आहे वहिनी काळे साहेबांच्या लेखणीत. सरस्वतीचे वरदान आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली. नुसती माउथ पब्लिसिटी. वाचकांच्या नुसत्या उडया पडल्या पुस्तकावर.गेले दोन महिने पुस्तक बेस्ट सेलर लिस्ट वर पहिल्या नंबर वर आहे. हजारो वाचकांनी ऍडवांस बुकिंग केले आहे पुढील आवृत्तीसाठी."
न राहवून निशाने विचारले,"हि कादंबरी आहे तरी कशाबद्दल?" मेहतांनी उत्साहाने सांगू लागले,"अहो, ही कथा आहे एका सेल्समनची. तो सेल्समन म्हणून फारसा यशस्वी होऊ शकत नाही. याचे दुखः लपवण्यासाठी तो त्याला हव्या असलेल्या यशस्वी आयुष्याची कल्पना तो करू लागतो. आपण यशस्वी सेल्समन झाल्याची दिवास्वप्ने पाहू लागतो. आणि त्यात तो इतका गुंततो कि सत्य आणि स्वप्न यात त्याची गल्लत होऊ लागते. स्वप्नातले आयुष्य खरे असल्याचे त्याला भास होऊ लागतात. आयुष्यातल्या अश्या वाईट पॅचमधून तो जात असताना त्याच्या वाचण्यात एक मुलाखत येते. त्या मुलाखतीतला संदेश त्याला भावतो,"फॉलो युवर ड्रीम्स, तुमची स्वप्ने पूर्ण करा." त्याच्या मनातली पूर्वीपासून सुप्त असलेली लेखक बनण्याची इच्छा उसळून वर येते. तो हे त्याची फॅमिली आणि मित्र यांच्याशी बोलतो,पण ते त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याला या वेडेपणापासून परावृत्त करू पाहतात. पण आता त्याचा निश्चय ठाम असतो. तो त्याची पहिली कादंबरी लिहितो आणि प्रकाशकांचे उंबरठे झिजवतो. बर्याच ठिकाणी निराशा पदरी पडल्यावर शेवटी एक प्रकाशक ती प्रकाशित करतो आणि.... रेस्ट­ इज हिस्ट्री...." मेहता पुढे बरेच काही बोलत होते. सरिता भान हरपून ऐकत होती. नकळत एक चुकार अश्रू तिच्या गालावर ओघळला. तो अश्रू अर्थातच आनंदाचा होता..

No comments:

Post a Comment