Monday, 29 December 2014

"स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे काय? "
स्त्री! विश्वकर्त्यानं आपल्या कुंचल्यानं चितारलेलं अतिशय लोभस चित्र! या स्त्रीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात असलेली प्रजनन शक्ती; जी अन्य कोणामध्येही नाही. हिचं विश्वरूप म्हणजे मातृत्व! अशा विविध गुणांनी नटलेली स्त्री साहजिकच आपल्या आपल्या अस्तित्वाला खूप जपत असते. नेहमी साऱ्यांवर मायेची पाखरण करीत असली तरी जेव्हा तिच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा मात्र ती आक्रमक बनते. अगदी सायाळ प्राण्याप्रमाणे. एरव्ही शांत असलेला हा प्राणी त्याला कुण्या शत्रूची नुसती चाहूल जरी लागली तरी आपल्या अंगाभोवतीचं काटेरी कवच फुलवून प्रतिकारासाठी सज्ज होतो. तशीच स्त्री पण सज्ज होते. त्यातून तिचे गुण-दोष प्रगट होतात. तिच्या स्वभावातल्या विविध छटा पाहायला मिळतात. तसं तिचं व्यक्तिमत्त्व अनाकलनीयच! प्रसंगी जीवाला जीव देईल तर प्रसंगी कालीमातेचं रूप धारण करून दुष्टांचा संहारही करेल. पण तरीसुद्धा मला वाटतं की, हिला बहुधा निसर्गाचा शाप असावा. कारण एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या सहवासात येते तेव्हा इतर भावनांपेक्षा वैरत्वाची भावनाच तिच्यात असल्याचे आपणास प्रकर्षाने जाणवते.

अगदी रोजचेच पाहा ना, तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलाला सांभाळून, वाढवून, पुढे मोठ्या हौसेनं त्याचं लग्न लावून सून घरी आणते. पण नव्याची नवलाई सरली की साध्या साध्या कारणांवरून मतभेदाला सुरुवात होते. आईला स्वतःच्या मुलाच्या प्रेमात वाटेकरू नको असतो, तर सुनेला नवऱ्याच्या प्रेमात वाटेकरू नको असतो, किंबहुना दोघींनाही कोणत्याच क्षेत्रात आपला वाटेकरू नको असतो. सासूला वाटतं की इतकी वर्षे या घरासाठी, कुटुंबासाठी झिजले, झटले; हे घर नावारूपाला आणलं. त्यामुळं या घरावर माझीच सत्ता/हुकुमत हवी. सुनेचा शहाणपणा तिथं नकोय. अन् इकडे सुनेला वाटतं की माझं सारं सोडून नवऱ्यासाठी या घरात आले तेव्हा हे सारं माझ्याचं हक्काचं आहे. आता इथं माझ्या तंत्रानंच सारं घडायला हवं. तिथं मधेमधे सासूबाईंची लुडबूड कशाला? इतके दिवस त्याच होत्या ना? अशा प्रकारे दोघीही स्वतःचं अस्तित्व जपण्यात घराचं घरपण हरवून बसतात व एकमेकांपासून दुरावतात.तसेच लग्नापूर्वी आपुलकीने व एकमेकींच्या ओढीने राहत असलेले भाऊ लग्नानंतर एकमेकांपासून दूर जातात. याला जबाबदार स्त्रियाच असल्याचं बहुतांशी आढळून आलेलं आहे. म्हणजे सासू-सुनांतील कलहामुळे पुत्रप्रेम दुरावते तर जावांच्या स्वार्थी-अहंकारी वृत्तीमुळे भाऊ भाऊ दुरावतात. हे कौटुंबिक जीवनात घडतंय, तर सामाजिक पातळीवर सुद्धा आपण पाहतो की, एखाद्या लाचार, असहाय्य मुलीला फसवून तिला कुमार्गाला लावून किंवा तिची विक्री करून स्वतःची खळगी भरणारी स्त्री ही स्वार्थीच म्हणावी लागेल. बरं अशा पतीत स्त्रियांचा उद्धार करायचं म्हटलं तरी किती स्त्रियांचा प्रतिसाद मिळेल? नगण्या! अगदी माझ्या सहित...हे शत्रुत्व फक्त वर्तमान काळातच आहे असं नाही, तर रामायणात, पेशवाईत, शिवकालीन युगात जरी डोकावलं तरी चित्र काय फारसं  निराळं असेल असं नाही. फक्त स्वरूप वेगळं होतं एवढंच. स्वराज्याच्या संस्थापकाला घडविणाऱ्या जिजाऊंची मतप्रणाली महाराणी सोयराबाईंना जाचक वाटून त्यांच्यात मत-भिन्नता असल्याचे दाखले इतिहासात आढळतात. पेशव्यांच्या घराण्यांतील 'ध' चा 'मा' करणारी आनंदीबाई! केवळ ते पोर जावेचं होतं म्हणून हे वैर. रामराज्यात कौशल्येचा पुत्र राम, म्हणजे सवतीचा मुलगा गादीवर नको असे कैकेयीला सुचविणारी मंथरा, एका स्त्री बद्दल दुसऱ्या स्त्रीच्या मनात विष पेरते व त्यास्तव कैकेयी रामाला १४ वर्षे वनवासात पाठविते. इथली गंमत तरी पहा, की मंथरेचा स्त्रीद्वेष तर कैकेयीचा सवती-मत्सर! म्हणजे कोणत्याही दृष्टिकोनातून किंवा नात्यातून पाहता सगळीकडे शत्रुत्वाची भावनाच प्रामुख्याने दिसून येते.
याही पलीकडे जाऊन अत्यंत अमानुष व घृणास्पद कृत्य म्हणजे स्त्रीभ्रूणहत्या! ही गोष्ट इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते. कितीही नाही म्हटलं तरी १०० पैकी ९५% स्त्रियांना/मातांना/सासवांना मुलगाच हवा असतो. परिणामी जल-परीक्षण करून मुलीची हत्या होते. अगदी कायद्याने बंदी असूनसुद्धा! अर्थात आधीपेक्षा आता याचं प्रमाण कमी झालंय. पण ते पूर्णपणे थांबावं असं वाटतं. वरचेवर मुलींच्या संख्येच्या टक्केवारीत घट होत असल्याचंही आढळून आलंय. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तरी हे बंद व्हायला हवं.

थोडक्यात, आज इतका काळ लोटला, स्त्री प्रगत झाली, तिची प्रत्येक क्षेत्रातली घेतलेली गरूडझेपही अत्यंत कौतुकास्पद आहे. तरी तिच्या स्वभाव-गुणांत फारसा फरक झाला असावा असं वाटत नाही.
तर... एकंदरीत कौटुंबिक जीवनातलं तिचं अस्तित्व पाहिलं जसं - सासू-सुना, जावा-जावा, नणंद-भावजया, सवती-सवती, प्रसंगी बहिणी-बहिणी सुद्धा - इथं स्त्रीचं खुजंपण दिसतं. सामाजिक जीवनात म्हणजे तिला कुमार्गाला लावणं, वेश्या बनविणं वगैरे इथं स्त्रीचा स्वार्थ दिसतो. तर ऐतिहासिक किंवा राजकीय पातळीवर पाहिल्यास तिथेही तिचा अहंकार आणि खोटी प्रतिष्ठा हीच तिच्या शत्रुत्वाला कारणीभूत असल्याचे आढळून येते.
हे सारं नमूद करताना मनस्वी खेद होतो. पण त्यामुळे वस्तुस्थितीत तर बदल होत नाही ना? खेदानं का होईना स्त्री ही स्त्रीची शत्रूच आहे असंच म्हणावी लागेल. तरीपण भाबडं मन आशा करतं की कालांतरानं का होईना बुद्धिवाद, व्यवहार व सम्यक ज्ञानाच्या आधारे हिच्यात बदल होत गेला तर किती बरं होईल, नाही का?

No comments:

Post a Comment