Monday, 29 December 2014

शेत.....भर दुपारची वेळ , उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होत होती , सुर्य जणु आकाशातुन आग ओकत होता. वार्‍याची हलकिशी झुळुकदेखील उन्हाने भाजणार्‍या अंगाला सुखावत होती. आबा शेतावर गेलेला होता आणि राधाक्का मागे परसात चुलीवर जेवण बनवीत होती .
आज शिर्‍याची (उर्फ श्रीकांत) खुप आठवण येत होती तिला , म्हणता म्हणता किती वर्षे सरली , त्याला घराबाहेर पदुन पण किती वर्षे झालीत आता आठवत पण नाही.........झटकन ती भूतकाळात हरवली. आबा शिर्‍याला चांगले शिक्षण मिळावे म्हणुन आपल्या शेतात दिवसरात्र राबत असे. जमिनीला कस कमी झाल्यामुळे शेतात जास्त पिक येत नसे ,नांगरायला बैल नव्हता पण आबा स्वतःला नांगराला जुंपुन जमिन नांगरत असे. येईल ती कमाई स्वत:च्या संसाराला कमी पण शिर्‍याच्या शिक्षणाला लावत असे एकच इच्छा मनात ठेवुन की शिर्‍याला एक चांगले भविष्य द्यायचे , त्याला खुप मोठा करायचे .आबाने आणि मायने खुप कष्टाने आपल्या शिर्‍याला वाढवले होते , स्वतःच्या पोटाला चिमटा घेउन त्याचे शिक्षण केले होते .
आता तो खुप मोठा इंजिनाअर झाला होता , त्यांच्या गावातला पहिला वहिला !!! मुंबई शहरात राहत असे शिर्‍या , वर्षातुन एकदा-दोनदा घरी येणे तेवढेच ......बाकी त्याला रोज गावच्या टेलिफोनबुथवरुन ती दोघे फोन करत , त्याची ख्याली खुशाली विचारत, तो घरी कधी येणार हे काकुळतीने विचारत तेव्हा श्रीकांत आपल्या कामाचे कारण त्या दोघांना सांगत असे.
आपला शिर्‍या मोठा माणुस झालाय , आपल्या शिर्‍याला खुप काम असते त्यामुळे तो आपल्याला भेटायला वारंवार येउ शकत नाही असे म्हणत आबा तिचे आणि स्वतःचे सांत्वन करत असत .
पण नात्याचा तो धागा तुटत चालला आहे ह्याची राधाक्काला जाणिव झालेली होती तिने मुलावरचा मोह कधीच सोडुन दिला होता , आता ती फक्त आबाच्या समाधानासाठी उसन्या बळाने मुलाचे गोडवे गात असे कारण ती करणार तरी काय आबाचा दोनच गोष्टीत लई जिव एक म्हणजे त्याचा पोर शिर्‍या आणि दुसरे म्हणजे त्याचे शेत. या दोघांत जितका जीव तितकाच त्या दोघांचा अभिमान आबाला !! पोराने त्याच्या कष्टाला फळ आणले तर त्या शेताने त्याला आयुष्यभर साथ केली होती .
तेवढयात दारावर कसली तरी खटखट झाली आणि राधाक्का भानावर आली . आबा जेवायला आलले असतील म्हणुन ."अवं आली" असा होकार देत दाराकडे जाऊ लागली . दार उघडल्यावर पाहते तर काय आजुबाजुला कुणी नाही , तिला वाटते लहान मुलांनी उगाच खेळात दरवाज्याची कडी वाजवली असेल असा विचार करत ती दरवाजा बंद करणार तोच तिचा शिर्‍या अचानक तिच्या समोर येतो आणि बिलगतो. ...कितीतरी दिवसांपासुन शिर्‍याला पाहण्यासाठी आसुसलेल्या तिच्या डोळ्यांची तहान आज शिर्‍याला समोर पाहुन समाधानाने शमली ..तिच्यातल्या मृतवत झालेल्या आईला आज पुन्हा जाग आली.
राधाक्का : ये लेका रं , ये .....तुला पाहुन लय समाधान वाटलं बघ जिवाला.....
शिर्‍या : अगं आई काय आपले उगाच येतो ना मी दरवर्षी त्यात काय !! या वेळेस जरा लवकर आलो एवढेच.......
राधाक्का : अरं तुला आईचं काळीज नाय कळायचे लेका ! बरं पाणी आणत्ये मी .
शिर्‍या : अगं आई नको आणुस माझेजवळ आहे पाणी !!!!! अगं आपल्या विहीरतल्या पाण्यात क्षार खुप आहे ना त्यामुळे मी हे मिनरल वॉटर आणलेय उगाच घसा खराब व्हायला नको.......
राधाक्का : बरंय बाबा , आता तुला जे वाटते ते ठिक्....बरे हातपाय धु , आता थोड्या वेळात आबा येतील , मी पानं लावती तेवढ्यात ...
शिर्‍या : हो गं आई !
आपले भरलेले डोळे पुसत राधाक्का कामाल लागली , आपण शिर्‍याबद्दल किती चुकीचा अंदाज केलेला असा विचार करत ती मनातल्या मनात स्वत:ला दोष देत होती . आपल्या लेकराला अजुन माया आहे आई-बापाची नाही तर एरवी कितींदा सांगुन येणारा शिर्‍या या वेळेस मात्र स्वतःहुन कसा आला होता , माझा शिर्‍या आपल्या मायबापाला विसरला नाही , ह्याचा तिला खुप आनंद झालेला होता.
पण या वेळेस मात्र शिर्‍या स्वतःहुन आलेला होता , माझा शिर्‍या आपल्या मायबापाला विसरला नाही , ह्याचा तिला खुप आनंद झालेला होता. त्याने आणलेली साडी ती कितीतरी वेळा हरखुन पाहत होती. त्याच्या आवडीचा आजचा स्वयंपाक करायला आता लागलेली होती .
तव्यावर भाकरी टाकता टाकता माय विचार करीत होती , आता आपले कष्टाचे दिवस संपलेत आपला लेक आता मोठा माणुस झालाय , उरलेली आयुष्याची काही वर्षे त्याच्यासोबत त्याचा सुखी संसार पाहु आणि मग सुखाने डोळे मिटु. आपण यावेळेस बोलु त्याच्याशी यावेळेस शहरी त्याच्यासोबत राहण्याबद्दल , नाहीतरी आबांच्या तब्येतीची काळजी आपण आता एकटे घेउ शकत नाही , हा सोबत राहिला म्हणजे किती मोठा आधार होउन जाइन आपल्याला. आता आपला शिर्‍या किती छान दिसतो हजार स्थळ येतील त्याला चालुन येतील...
शिर्‍या : अगं आई आबा केव्हा येतील गं?
राधाक्का: अरे एवढा काय उतावळा झालयेस रं, येइल की तुजा बा, त्यास्नी तर ठाउक नाय की तु आलाय ते..लई खुष होतील बघ ते .सारखं आपलं माझा शिर्‍या , माझा शिर्‍या करत राहतात बगं !!! गावकर्‍यांना पण तुझे कौतुक सांगत राहतात बाबा....
शिर्‍या : अगं तसे नवे ...मला त्यांच्याशी बोलायच होतं गं महत्वाच.......
राधाक्का: काय येवढ महत्वाच बोलायचेय तुला...सध्या माझ्याशी बोल की ..किती दिवसांनी आलायेस , तुझा एक एक शबुद आयकाल गोड वाटत बग , कशी छान भाषा आहे रे तुझी ..लेका धन्य केलं र आमच्या कष्टाचे....!!!
शिर्‍या : अगं आई , मी शहरात राहतो तिथे सगळेच अशी भाषेत बोलतात त्यात काय येवढं....माय शेतात पिक येत की नाही , मिळकत आहे की नाही काही?
राधाक्का: लेकरा , आपले शेत चांगले आहे रे , त्यात तुझा आबा त्याचे तर जग आहे ते शेत म्हंजी...इतकी वर्ष गेली , लोकांनी आपली शेतं विकुन नवे उद्योग सुरु केले जमिनीत कस नाही म्हनुन पण तुझ्या आबाने शेत विकले नाही , त्याने त्या शेतात सोने उगविले रे.!!! ते शेत म्हणजे तुझ्या आबाचा जिव की प्राण आहे रं...स्वत:च्या रगतांन जमिन कसलिय रं तुज्या बानं ....जाउन बग जरासं , हिरवीगार पिकं डोलतांना दिसतील ..
शिर्‍या : आबांना येउ दे , मग बघु !
असे म्हणत शिर्‍या कसल्या तरी विचारात मग्न झाला.
राधाक्का शिर्‍याला सांगत होती त्यातला एक न एक शब्द खरा होता...आबांना ते शेत शिर्‍याईतकेच प्रिय होते...ते शेत म्हणजे आबाचा जिव की प्राण होतं.आपल्या पोट्च्या पोराप्रमाणे आबा त्याचा सांभाळ करत असत्..वय झाले तरी आबा अजुन शेतात एकटा राबतो , कारण ते शेत त्याचे विश्व होते , त्या मातीतला प्रत्येक कण त्याच्या आयुष्याचा एक एक श्वास होता.
थोडा वेळ जात नाही की लगेच आबा येतात . समोर शिर्‍याला पाहुन आबाच्या डोळ्यांना दोन दोन धारी लागतात्...शिर्‍या शिर्‍या करत आबा त्याच्या शिर्‍याला घट्ट मिठी मारतो ...शिर्‍या आपला छोटासा शिर्‍या आता केवढा मोठा झालाय....तो आता कसा साहेब दिसतो एकदम्...आपली मेहनत फळास आली शेवटी. लेक गावच्या मातीला अजुन पण विसरला नाहिए...तो आला आहे आपल्यासाठी , आपल्या मायबापासाठी. आबाला तर आकाश ठेंगणे झाले होते..
राधाक्का: अरे शिर्‍या , तू आणि आबा या की जेवायला , पान लावतेय मी..
आबा: आलोच गं बये , आज तर तुझा लेक आलाय म्हणजे काही तरी झक्क बनवलं असणार की नाय???
शिर्‍या: आलोच आई.
दोघे जेवायला बसतात आणि माय दोघांसाठी गरम भाकरी बनवुन वाढु लागली ....
आबा : कसा आहेस लेका..तब्येत तर लय खंगली रं तुझी...खातोपितो की नाय??
श्रीकांत : खातो की आबा...भरपुर खातो आबा....
आबा : मंग , अंगावर काय मास नाय लेका....तिकडच शहरी हायब्रिड खाणं असत रे.... जरा जास्त दिवस राहुन जाय, आपल्या शेतातल पिकाच अस्सल कसदार जेवण कर बघ कशी तब्येत सुधरते ते.....
अरं सोनं आहे आपले शेत.......
आबांच बोलणे ऐकुन शिर्‍याचा हातातला घास हातातच राहीला.....
जेवणे उरकली .शिर्‍याच्या ख्यालीखुशालीच्या गप्प झाल्यात. राधाक्का आज खुप दिवसांनी आबांना इतके खुश पाहत होती.
शिर्‍या: आबा त्या शेताबद्दलच बोलायला आलोय मी...आबा , मी एका मुलीवर प्रेम करतो पण ती आपल्या मानाने फारच श्रीमंत आहे . . तिच्या बाबांनी मला एक ऑफर दिली आहे की तु स्वतःची फॅक्टरी काढ , मी तुला त्यात मदत करेन पण तुला काही रक्कम जमवावी लागेल ..त्यानंतर मी माझ्या मुलीशी स्वत:हुन लग्न लावुन देइन्...मला तिच्याशीच लग्न करायचे आहे ,मला आता नोकरी करायचा कंटाळा आलेला आहे , मला स्वत:ची एक फॅक्टरी काढायची आहे आणि त्यासाठी मला पैसे लागणार आहे ...म्हणुन मी विचार केला की असेही तुमचे वय झालेले आहे , आता शेताचे काम तुम्हाला सोसवत नसेल , उगाच त्या शेतावर जावे लागते , आणि मी आता एवढा इंजिनीअर काय शेतात राबणार काय !!! त्यापेक्षा ते शेत विकुन दिलेले बरे!! बरेच मोठे आहे नाही तरी बर्‍यापैकी पैसे येतील बघा , नाहीतरी या भागात कुठे असली कसदार जमीन आहे , बर्‍यापैकी गिर्‍हाईक येतील ....
माझे तर एक दोन जणांशी बोलणे पण झालेले आहे ते चांगली रक्कम द्यायला तय्यारदेखिल आहे ...येणार्‍या पैशात माझे फॅक्टरीचे काम पण होउन जाइन आणि उरलेल्या पैशात तुम्ही दोघे आरामात राहु शकाल , आणि मी आहेच की एकदाचे माझे सारे सेट झाले की घेउन जाईन तुम्हा दोघांना माझ्याकडे काय!!!!!!!!
आबाचा घास घशातच अडकला. शेत विकायचे म्हटल्यावर आबाचा जिव कासाविस झाला . ते शेत त्याचे जीवन होते . त्या मातीतल्या प्रत्येक कणाकणाशी त्याचे आयुष्य बांधील होते . काय नव्हते दिले त्या शेताने त्याला , ते शेत त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक सुखदुखाचे साक्षीदार होते . आणि आज तेच शेत विकायचे , हे आबाला पटत नव्हते . पण तो आपल्या मुलाला नकार देउ शकत नव्हता . तरी आपला एक अशक्त प्रतिकार करण्याचा त्याने प्रयत्न केला.
आबा: अरे त्यात काय , मागल्या वर्षाच्या पिकाचे बर्‍यापैकी पैसे उरलेत ल्येका , हवा तेवढा घे की , पण हे शेत विकु नकोस लेका...
शिर्‍या : आबा, ते असतील किती पैसे काहीतरी हजार , त्यात काय होणार आहे !!! फॅक्टरीचे गेट पण बनणार नाही त्यात !! आबा ऐका माझे , ही जमीन नाही सोने आहे सोने...लाखो रुपये द्यायला तय्यार आहेत लोक हिचे ....आबा माझी फॅक्टरी तर बनेलच पण तुमचे म्हातारपण अगदी सुखात ऐशाआरामात जाईल , ना तुम्हाला शेतात राबावे लागणार ना उन्हातान्हात भटकावे लागणार ....आईला पण आता एकटीला काम सोसवत नाही एवढे.....ऐका आबा ऐका ही सोन्यासारखी संधी सोडु नका....तुमची काळजी घ्यायला मी आहे की ...का उगाच त्या शेतात जिव घालताय........?
आबांनी आपला आवंढा गिळला. त्यांचा जिव त्या उभ्या असलेल्या शेतात अडकलेला होता. किती पावसाळे पाहिले त्यानी आपल्या आयुष्याचे , ह्याच शेतात....त्याच्या आयुष्याची सारी कमाई होती ते शेत म्हणजे....
आणि तेच आज त्याला विकावे लागणार होते. पण तो शिर्‍याला नाही म्हणू शकत नव्हता...शेवटी विचार केला की ही सारी कमाई ज्याच्यासाठी केली त्यालाच उपयोगात नाही आली तर काय कामाची !!! त्याचंच आहे हे सगळे ....असल्या विचारात शेवटी आबा ने होकार दिला....
झाले ....दोन दिवसात शेताचा व्यवहार झाला...आयुष्यभर स्वतःच्या रक्ताने कसलेले ते शेत आता आपल्या परके झाले होते . स्वतःच्या लेकराला दुर केल्यावर जसे एखाद्या आईला वाटते तसे आबाला आज वाटत होते...पण आपल्या मुलाच्या भविष्यासाठी , त्याच्या सुखासाठी त्याने आपले शेत विकले. पण अजुन पण त्याचा जिव त्या शेतात अडकलेला होता. माय ने तर श्रीकांत बद्दलची आशाच सोडलेली होती...तिला फक्त आबाची चिंता होत होती. श्रीकांतच्या हट्टासाठी त्याने शेत विकले तर होते पण त्यासोबत आबाची लयाच गेली होती..शेताची काळजी व्यवस्थित घेतली जात नव्हती...पिकाला किड लागली होती...पिक आधिच काढायला हवे होते आता पिक नाही चारा उरला होता...आबाला ते पहावत नव्हते , पण आपल्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या त्या शेतातुन त्याचा पाय निघत नसे.....
आबा आणि माय रोज शेतावर जात असत , शेताच्या कुंपणाजवळ तास न तास उभे राहत....ते शेत म्हणजे त्यांचे लेकरु होते...पण आता ते आपले राहिले नाही ही भावना आबाचा जिव घेत असे...त्यांची तब्येत ढासळली होती ...एकच तर कारण होते त्यांच्या जगण्याचे आणि तेही आता राहिले नव्ह्ते..माय चा जिव तिळतीळ तुटत असे........
दिवस गेलेत , महीने गेलेत ,श्रीकांतची फॅक्टरी सुरु झालेली होती , त्याचे लग्नही झाले , पण त्यात तो आपल्या आईबापाला विसरला होता.. स्वतःच्या अडाणी आईवडिलांना आपल्या हाय प्रोफाइल सोसायटीत न्यायला त्याला लाज वाटत असे , त्याच्या श्रीमंत घरातल्या बायकोला आपले सासुसासरे लो क्लास वाटत असत....आबा आणि माय दोघांना हे कळालेले होते की शिर्‍या आपल्याला काही आता भेटणार नाही...आता त्याचे स्वतःचे जगच वेगळे झालेले आहे..
आणि असेच एक दिवस आबा शेतावर गेले सोबत माय पण होती..त्यादिवशी आबा भरभरुन बोलत होते , शेतात घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्द्ल ते बोलत होते...माय आबांना खुप दिवसांनी असे बोलतांना पाहत होती , ती दोघे आज खुप दिवसांनी हसली होती...सुर्य पश्चिमेकडे कललेला होता .संधीप्रकाशात त्यांचे ते शेत सोनेरी रंगाने न्हाउन निघाले होते , सुखाने ती दोघे त्या देखाव्याकडे पाहत होती..आता आपल्या आयुष्याची संध्याकाळ अशीच निवांत जावी एकमेकांच्या साथीने एवढेच त्यांची इच्छा राहीली होती....आणि आता दोघे अशीच निवांत बसलेली होती की अचानक त्या शेताला आग लागली !! काही कळायच्या आधीच सारे शेत पेटले , माय जोर जोरात किंचाळायला लागली , मदतीसाठी धाव मागु लागली अन बाजुला पाहते तर काय आबाचा देह निश्चल पडलेला दिसला , माय कोसळली .."अवं उठा की , उठा ना आपल्या शेताला वाचवा की , अवं आपलं शेत जळतय की....." पण आबाच्या चेहर्‍यात काहीच फरक पडला नाही , त्याच्या निर्जीव डोळ्यात शेताला लागलेल्या आगीच्या ज्वाळा फक्त दिसत होत्या , ते शेत गेले आणि आबालाही सोबत घेउन गेले..आबाचा जिव खरेच त्या शेतात होता....समोर आपल्या पतीचा निश्चल देह पाहुन माय मनातुन कोसळली , आता तिच्या आयुष्यात जगण्याचा बहाणाच रहिलेला नव्हता , आबा नाही मग आपण आपण का जगायचे, कोणासाठी जगायचे ....आणि आता ती हळुहळू एक एक पाउल टाकीत त्या शेतात शिरली........

No comments:

Post a Comment