Wednesday, 31 December 2014

असं घडू शकतं?

माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे
उणे लिंपायला माझे लावी सुगंधाचे लेणे
आपल्या सहावीत शिकणार्‍या नातवाला पाठ्यपुस्तकातील ही कविता जाधव बाई अगदी तन्मयतेने शिकवत होत्या. कवितेचा भावार्थ सांगताना मध्येच त्यांचे डोळे पाणावत होते. नातवाने विचारले देखील की "आजी, तुला तुझ्या आईची आठवण येतेय का गं?" त्या निरागस जीवाच्या पाठीवरुन मायेने हात फिरवत बाईंनी कविता पूर्ण शिकवली.
आईची आठवण येतेय का म्हणून विचारणार्‍या या चिमुरड्याला काय सांगणार होत्या जाधव बाई? आठवण तर झालीच होती आणि त्या आठवणीनेच तर ८३ वर्षीय जाधव बाईंच्या मनावर झालेल्या जखमेवरील खपली काढली होती. पण खपली तरी खरंच धरली होती का? आयुष्यभर ती ओली जखम भळभळतच तर होती, अन असं काही निमित्त झालं की मनाचा डोह पार ढवळून टाकायची ती. आजचा दिवसही असाच बेचैनीत जाणार तर आणि रात्र तळमळत कढावी लागणार.
४०-४५ वर्षे होऊन गेली असली तरी अगदी काल-परवाच घडल्यासारखा आठवतोय तो दिवस..........
शनिवारची दुपार. तीन-साडेतीनचा सुमार. अर्ध्या दिवसाची शाळा सुटुनही आता बराच वेळ झाला होता. मुले पांगली होती. आवारात शुकशुकाट. जाधव बाईं शिक्षकांच्या खोलीत आपले काम आवरुन निघायच्याच बेतात होत्या. त्यांचे सहकारी केव्हाच निघून गेले होते. बाईंनीही उरलेले तक्ते घरी जाऊन बनवू असा विचार करुन आपली पर्स उचलली आणि बाहेर आल्या.
नेहमीच्या सवयीनुसार सगळी मुले गेली की नाही हे बघायला एकदा त्यांनी आपल्या सातवीच्या वर्गात नजर टाकली आणि त्या थबकल्या. कुणी एक विद्यार्थी बाकावर डोके ठेवून झोपी गेल्याचे त्यांना दिसले. बाईंनी जवळ जाऊन निरखून पाहिले. अरेच्या! हा तर मंगेश शिंदे. "मंगेश, अरे बरं नाही का वाटत बाळा? अजुन घरी नाही गेलास तो? ", बाईंनी प्रेमाने विचारले. त्याच्या कपाळाला हात लावून त्याला ताप वगैरे नाही ना याचीही खात्री करून घेतली. अचानक बाईंनाच समोर पाहून मंगेश गडबडला. काय उत्तर द्यायचे ते त्याला सुचले नाही. "बाई, काही नाही हो, असाच थांबलो होतो. तुम्ही व्हा पुढे, मी निघेन थोड्या वेळात", असे काहीसे बोलून त्याने वेळ मारुन न्यायचा प्रयत्न केला.पण बाईंनी काही त्याचा पिच्छा सोडला नाही."वा रे वा, अशी कशी जाईन मी तुला इथे एकट्याला सोडून? तू चल बरं माझ्याबरोबर". आता मात्र मंगेशची पंचाईत झाली. काय करावे, काय बोलावे ते न सुचून ते बारा वर्षांचं कोवळं पोर हमसून हमसून रडू लागलं. "बाई, मला घरी धाडू नका हो. माझी आई मारेल हो मला", असं पोटतिडकीनं बोलू लागलं.
जाधव बाई त्याच्या जवळ बसल्या. त्यांनी मंगेशला थोपटून शांत केले, प्यायला पाणी दिले. हजार्-पंधराशे वस्तीच्या या लहानश्या गावच्या ग्रामपंचायतीच्या शाळेत घडणारे हे असले प्रकार काही बाईंना नवीन नव्हते. कधी कुणाला मारुन-मुटकून शाळेत पाठवले जाई तर कधी शाळेत न जाता कामावर यावे म्हणून मारले जाई. पण मंगेश या दोन्ही प्रकारांत मोडत नव्हता. मंगेशचे वडील सैन्यात नोकरीला होते आणि वर्षातून एकदा - दोनदाच ते घरी येत असत. मंगेश आणि त्याची आई असं त्यांचं कुटुंब. एकुलत्या एका मुलाने खूप शिकावे हीच इच्छा होती आई-वडीलांची. मंगेशही मन लावून अभ्यास करत असे. मग आज असे काय झाले या पोराला? जाधवबाईंचे मन विचाराधीन झाले. मंगेशला विश्वासात घेऊन बोलते करायचाही बाईंनी बराच प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्याच्या रडण्यामागचे आणि त्याहीपेक्षा घरी न जाण्यामागचे कारण काही बाईंना समजले नही.
"मंगेश, अरे घर म्हटलं की हे सारं चालायचंच बाळा, तुझी आई एकटी सारी घरची-बाहेरची कामं करत असते, हो की नाही? चिडली असेल जरा. त्यामुळे कदाचित मारेन वगैरे म्हणाली, त्यात काय रे एव्हढं रागवायचं? आईच आहे ना? मग, चल थांबव बघू रडणं आणि चल माझ्याबरोबर. मी बोलते हो तुझ्या आईशी", हे शब्द ऐकताच मात्र मंगेश थरथरु लागला. "नको बाई नको, आईला काही सांगू नका हो. मी जातो घरी पण आईला नका ना बोलू यातलं काही", मंगेश कळवळला. "बरं बरं नाही हं सांगणार मी आईला", असे बोलत बाईंनी त्याला शांत केलं, त्याचं दप्तर उचललं आणि दोघं शाळेच्या आवारातून बाहेर पडली.
जाधव बाईंनी मंगेशला घरी पोचवले, त्याच्या आईच्या ताब्यात दिले आणि त्या स्वतःच्या घरी गेल्या. मंगेशच्या आईला अर्थातच त्यांनी काही सांगितले नाही. तो दिवस आणि नंतरचा रविवारचा दिवस गेला आणि सोमवारी पुन्हा शाळा नेहमीप्रमाणे भरली.
जाधव बाई वर्गात आल्या, हजेरी घेण्यास सुरुवात झाली. रोजच्यासारखेच आजही कितीतरी बाक रिकामे होते. हा का नाही आला शाळेत? त्याला बोलावून आण असे सांगण्यात बाईंचा रोज अर्धा तास जात असे. काही द्वाड मुले तर मधल्या सुट्टीत खिचडी खाऊन झाली की मागच्या दाराने पळून जात आणि दुसर्‍या दिवशी काहीबाही सबबी सांगत. चालायचंच... पटावर हजर/गैरहजर असे नमूद करीत बाई एकेकाचे नाव पुकारत होत्या. मंगेश शिंदे......वर्गात सामसूम. बाईंनी नजर उंचावून मंगेशच्या बाकाकडे पाहिले. जागा रिकामी.... पठ्ठ्या परवा घरी जायला तयार नव्हता आणि आज शाळेतच नाही आला...बाई स्वतःशीच हसल्या. गुणी पोर आहे, नियमितपणे शाळेत येतो. आज असेल काहीतरी काम असा विचार करुन बाईंनी अभ्यासाला सुरुवात केली.
हा दिवस गेला आणि नंतरचे अजुन दोन. सतत तीन दिवस मंगेश शिंदे गैरहजर. तेव्हा मात्र बाईंनी वर्गातल्याच एका मुलाला त्याच्या घरी जाऊन बघून यायला सांगितलं. दुसर्‍या दिवशी बाईंनी त्या मुलाकडे चौकशी केली मंगेशबद्दल. तो म्हणाला, "बाई, मंग्या घरी बी न्हाई. त्याची आय म्हनली की मामाकडं धाडलाय त्येला". "मामाकडे? असं मध्येच? आणि तेही शाळा बुडवून? कधी समजणार या लोकांना शिक्षणाचे, शाळेचे महत्व? इतका बुडलेला अभ्यास कसा भरुन काढेल हा आता?" बाईंनाच काळजी.
बघता- बघता आठवडा व्हायला आला. मंगेश शाळेत परत आलाच नाही. परिक्षेचे वेळापत्रकही लागले. आता मात्र बाईंचा संयम सुटला. सोन्यासारख्या पोराचे अभ्यासाचे दिवस वाया जात होते.शाळा सुटल्यावर त्यांनी स्वतःच मंगेशच्या घराकडे मोर्चा वळवला.
"मंगेशच्या आई, आहात का घरात?", जाधव बाई घरचा बंद दरवाजा ठोठावत म्हणाल्या. अचानक त्यांची नजर दाराशी ठेवलेल्या पुरुषी पादत्राणांवर पडली. आतून मंगेशची आई लगबगीने, काहीशा भेदरल्या नजरेने बाहेर आली. दारातच बाईंशी बोलू लागली. "अहो मंगेशची आई, मंगेशची परीक्षा जवळ आलीये आणि त्याला मामाकडे पाठवलंत? बरा आहे ना तो?". "व्हय जी बरा हाय तर. त्येचा मामा त्याला घेवून गेलाय तालुक्याला आन तो आता तालुक्याच्या मोट्या शाळंला जातो नव्हं का?" मंगेशच्या आईने खुलासा केला. "तालुक्याच्या शाळेत? आणि तुम्हाला इथे एकटीला सोडून?", हे नवीनच काहीतरी कानांवर पडत होते. "तर काय हो बाई, त्येचं शिक्षन महत्वाचं नव्हं का? मी काय बापडी राहीन एकली". त्येला शिकवायचा हाय न्हवं..." "हो तेही खरंच म्हणा, शाळेत जातोय ना, मग झालं तर, बरं वाटलं हो ऐकून". बाईंची नजर मात्र त्या पायताणांवरुन हटेना. मंगेशच्या आईचे तिथे लक्ष जाताच तिचा चेहरा पांढराफटक पडल्याचे बाईंच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. "माडी साफ करत व्हते बगा तवा धन्याची पायतानं पडली हो", न मागता खुलासा केला गेला." असु दे असु दे, येते मी" म्हणत बाई बाहेरच्या बाहेर परत फिरल्या पण डोक्यांत असंख्य प्रश्नांचे मोहोळ घेऊन.
त्या दिवशी शनिवारी बाई मंगेशला भेटल्या त्या शेवटच्या. पोर घरी पाठवू नका म्हणून गयावया करत होतं, कारणही सांगत नव्हतं आणि असा अचानक मामाकडे पाठवला त्याला? तो ही कायमचा? आणि मी घरी गेल्यावर त्याची आई एव्हढी अवघडलेली का वाटली? घरातही घेतलं नाही तिनं? विचारचक्रात अडकलेल्या बाईंना अचानक तो दिवस लख्खपणे आठवला. त्या दिवशी मुलांना निबंध लिहायला शिकवत होतो आपण. विषय दिला होता "मामाचा गाव". मुलांनाच याबद्दल प्रश्न विचारुन निबंध खुलवायची कला शिकवत होतो. तेव्हा मंगेश म्हणाला होता की बाई मला मामाच नाही मग त्याचा गाव कुठुन येणार? बापरे !!.... पोटात खड्डा पडला बाईंच्या. इथे काहीतरी नक्कीच पाणी मुरतंय याचा सुगावा लागला.
बाईंच्या शिक्षकी पेशामुळे या आणि आसपासच्या गावांत तशा बर्‍याच ओळखी. त्यांच्याच वर्गात शिकलेला त्यांचा एक माजी विद्यार्थी शेजारच्या गावात पोलीस पाटील होता. बाईंनी त्याची मदत घ्यायचे ठरवले. त्याला समक्ष भेटून सर्व प्रकार कानांवर घातला. बाई तुम्ही निश्चिंत रहा, आम्ही नक्कीच या प्रकरणाचा छडा लावू असे पोलिसांनी बाईंना आश्वस्त केले.
त्याच रात्री चंबुगबाळे आवरुन गाव सोडून जात असलेल्या मंगेशच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्यासोबत शेजारच्या गावातील एक तरुण होता. पोलिसी खाक्या दाखवताच बाई पोपटासारखी घडाघडा बोलू लागली आणि स्वतःच्या कुकर्माचा कबुलीजवाब देती झाली.
या तरुणाशी तिचे सूत जुळले होते. नवरा गावात नसल्यामुळे तो तिच्या घरीही येत असे. एकदा मंगेशने या दोघांना पाहिले. अडनिड्या वयात नको ते बघितल्यामुळे मंगेश खवळला. पत्र लिहून बापाला सारे सांगेन अशी तंबी त्याने आईला दिली आणि तु जर तुझ्या बापाला कळवलेस तर मी तुला ठार मारीन अशी धमकी आईने त्याला दिली. याच कारणाने मंगेश घरी जाण्यास धजत नव्हता. बाईंनी घरी पोहोचवल्यानंतर त्याचे आईशी परत कडाक्याचे भांडण झाले आणि आपले पाप लपवण्यासाठी त्या बाईने पोटच्या गोळ्याचा जीव घेतला, त्याला दोघांनी मिळून रात्री गावाबाहेर पुरले. ती जागा दाखवताच पोलिसांनी मंगेशचा पुरलेला देह बाहेर काढला. दोघांवरही खूनाचा आरोप सिद्ध होवून शिक्षा झाली दोघांना.
……आणि त्यानंतर अशा कित्येक रात्री बाईंनी तळमळत काढल्या होत्या. खरंच असं कधी घडू शकतं? जिने जन्म दिला ती आई अशी वैरीण होऊ शकते? मातेच्या ममतेचे, त्याग, बलिदानाचे गोडवे गाणार्‍यांनी कधी बघितली असेल अशी आई? आपण का नाही मंगेशच्या बोलण्याकडे लक्ष देऊन वेळीच कृती केली? जी पावले सात दिवसांनंतर उचलली ती त्या पहिल्या दिवशीच का नाही उचलावीशी वाटली आपल्याला? कदाचित ते लेकरू वाचलं असतं. हे आणि असे अनेक जर-तर. पण आता काहीच इलाज नव्हता. कुणालाही काहीही न सांगता, ना कसली तक्रार करता एक निरागस, गोजिरवाणे फूल तर उमलण्यापूर्वीच कोमेजुन गेले होते.

No comments:

Post a Comment