Friday, 20 January 2012

कॉलेजमध्ये

कॉलेजमध्ये रुजताना


आम्हा भावंडांच्या शिक्षणासाठी म्हणून आम्ही पुण्यात आलो. शाळेत ५ वर्षं आणि ज्युनियर कॉलेजमध्ये २ वर्षान काढल्यावर इंजिनीयरिंगसाठी बाहेर जायची वेळ आली. खरं तर मी पुण्यासारख्या मोठ्या शहरातून एका लहान गावात असलेल्या कॉलेजमध्ये चालले होते. त्यामुळे मनात इम्प्रेशन असं होतं की आपण भारी असणार. (आपण कसे ग्रेट किंवा भारी आहोत असं समजून घ्यायला आपल्याला किती आवडतं नाही!) पण ती समजूत किती चुकीची होती हे तिकडे पोहोचल्या पोहोचल्या लगेच जाणवलं.

त्याचं मुख्य कारण तेव्हा मी पुण्यात राहत असले तरी १५-१६ वर्षांपूर्वी वातावरण तसं बरंच बाळबोध होतं. त्यात मी आधी मराठी माध्यम आणि नंतर सप सारख्या कॉलेजमध्ये शिकलेले होते. आणि माझ्या कॉलेजमध्ये उत्तर भारतातले आयआयटी  किंवा तत्सम कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेले बहुतांशी विद्यार्थी होते.

आणि जे उत्तर भारतीयांना ओळखतात त्यांना हे नक्कीच माहित असेल की त्यांच्या कडे फार पूर्वीपासून दिखावा करण्यावर फार भर असतो. माझा एक वर्ग-मित्र (उत्तर भारतीयच) होता. तो तर सांगायचा की तिकडे लोकांना भले खायला काही नसेल पण आव असा आणतील की काजू-बदाम ह्या खेरीज दुसरं ते काही खातंच नाहीत.  असो.

पुण्याबाहेर त्यामुळे अर्थातच हॉस्टेलमध्ये राहणं आलं. तिथे २४ तास उत्तर भारतीयांबरोबर रहायचं असल्याने आणि त्यात त्यांचं प्राबल्य असल्याने त्यांच्याशी जुळवून घेणे हे एक आव्हान होतं. आपण एका देशाचे नागरिक असलो तरी त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीमध्ये मला बराच फरक जाणवला.

अगदी बारीकसारीक फरक सांगायचे झाले तर सुरुवातीचे काही दिवस आमचं हॉस्टेलमध्ये रॅगिंग झाले त्यात घडलेले काही किस्से. रात्रीची जेवणं झाली की आम्हाला म्हणजे पहिल्या वर्षाच्या मुलींना खाली बोलावण्यात येई. (आमच्याकडे हॉस्टेलची दुमजली बिल्डींग होती. आणि आमची व्यवस्था वरच्या मजल्यावर होती.) रॅगिंगच्या काळात आमच्यावर बरेच निर्बंध तसेच नियम होते. त्यातला एक नियम म्हणजे सिनियर्स समोर जाताना ओढणीसह पंजाबी ड्रेस ह्याच पोषाखात जायचे. तसेच पायात बाथरूमच्या स्लीपर्स असता कामा नये. सर्वात पहिल्या दिवशी असेच आम्हाला बोलावल्यावर आम्ही आमचा जामानिमा करून पोहोचलो.
   
सर्वप्रथम आम्ही नियमांप्रमाणे तयार होवून आलोय की नाही ह्याची पहाणी झाली आणि त्यात माझ्या चपला रिजेक्ट झाल्या. मी ज्या चपला बाहेर वापरायच्या म्हणून आणलेल्या त्या चपला माझ्या सिनियर्सनी बाथरूमच्या स्लीपर्स म्हणून नापसंती दर्शवली. (माझ्या चपलांचं डिझाईन स्लीपर्स सारखं होतं :(). आणि इथेच मला एक धक्का मिळाला.

त्यानंतर आमची ओळख परेड चालू झाली. अर्थातच हिंदीमधून. माझं हिंदीचं ज्ञान हे फक्त पाचवी ते सातवी असं शाळेत शिकलेले आणि उर्वरित हिंदी पिक्चर बघून असेल तेवढेच होते. स्वतःची ओळख सांगताना वडिलांचे नाव सांगणे अपेक्षित होते. मी माझ्या फर्ड्या हिंदीमध्ये चालू केले की 'मेरे पापा का नाम ___ हैं'. झालं. माझ्या सिनियर्सने विचारलं की 'तुम अपने पिताजीको रिस्पेक्ट नहीं देते'. मग पुन्हा माझी टेप चालू की 'मेरे पिताजी का नाम ___ हैं'.        

एकूणच मला जाणवलं आहे की महाराष्ट्रामध्ये वागण्या आणि बोलण्या मध्ये औपचारिकता कमी असते. आपण दुसर्यांना आदर देतो पण बर्याच गोष्टी इंप्लिसिट असतात. मराठी मध्ये दुसर्याला संबोधताना आपण सर्वसाधारणपणे 'तू' किंवा 'तुम्ही' वापरतो. पण हिंदीमध्ये 'तू', 'तुम' आणि 'आप' अशी संबोधने असतात. अश्या बर्याच गोष्टी तिथे नव्याने शिकाव्या लागल्या.

हिंदी भाषा आणि हिंदी भाषिकांची संस्कृती समजावून घेणे हा कॉलेजमध्ये रुळण्याचा एक भाग होता. अश्या अनेक गोष्टी होत्या ज्या नव्याने समजावून घेऊ लागल्या. त्या बघू नंतरच्या भागात सांगण जमल्या तर.

No comments:

Post a Comment