Tuesday, 24 January 2012

अनुभव कथा सासुबाई..........

अनुभव कथा
सासुबाई
    ''अभिनंदन मि. काळे, तुमची मिसेस प्रेग्नंट आहे. तसे दोन महिने होऊन गेले आहेत. पण ह्या फार अशक्त दिसतात. तेव्हा वेळच्यावेळी चेकअप करत जा. आणि हे बघा मिसेस काळे मी काही औषध टॉनिक लिहून देतो ती घेत जा, मनावर कुठलेही दडपण ठेऊ नका, भरपुर खात जा, मि. काळे त्यांना आनंदीत ठेवण्याचे महत्वाचे काम तुमचे आहे''.  डॉ. मटकर हसत हसत म्हणाले.
    मी आई होणार ही किती सुखद भावना होती. लग्नाला दिडच वर्ष झाले होते. आमच घर तस लहान म्हणजे बैठच आहे. दोन खोल्या नंतर किचन मग संडास बाथरुम. आम्ही दोघे, ह्यांचे मोठे भाऊ, वहिनी त्यांचा एक मुलगा ह्यांची आई एवढी माणसे ह्या घरात राहतो. कसे ते विचारु नका. बाहेरील रुम ही रात्री आमची बेडरुम बनते, फक्त जायच्या यायच्या वाटेवर पडदा लावावा लागतो. पुढच्या रुममध्ये मोठे दिर-भावजय त्यांचा मुलगा किचनमध्ये आई झोपतात. मोठे दिरही सरकारी खात्यात कारकुन आहेत. आमचे हे एका प्रायव्हेट कंपनीत अकाऊंटस् डिपार्टमेन्टला आहेत तर मी ही एका कंपनीत टायपिस्ट म्हणून आहे.
    आमच्या माहेरची परिस्थीतीही फार चांगली नव्हती. त्यामुळे लग्न ठरवतांना काही गोष्टी ऍडजस्ट केल्या.  हे एवढंस घर एवढी माणस असे बघुनही ते मी ऍक्सेफ्ट केल.  इतक्यात तर काही आम्ही दोघे कुठे वनरुम कीचनचा ब्लॉकही घेऊ शकत नव्हतो.  त्यामुळे एक मुल लौकर होऊ द्यावे हा निर्णय आम्ही दोघांनी घेतला.
    ''घरी गेल्यावर काय सांगायच ?'' मी ह्यांना विचारले.
    '' - S- अजुन रिपोर्ट यायचाय म्हणून सांगु''.
    ''कां ? अस खोट कां सांगायचय ? ते आनंदित नाही होणार ?''
    ''अग तुला माझी आई म्हणजे काय आहे माहित आहे नं ? लगेच आज नको सांगुस'' ह्यांनी दरडावले.
    खरच - सासुबाई म्हणजे एक अजब चिज आहेत.  म्हणजे तशा त्या पेमळ ही आहेत पण खुप मुडी.  कधी एकदम प्रेमात येतील तर कधी छोटया छोटया कारणावरुनही रागावतील.  ह्यांचे वडील म्हणजे सासरे हे लहान असतांना अल्पशा आजारात गेले.  तेव्हापासून सासुबाईंनी काबाडकष्ट करुन ह्या दोन्ही मुलांना मोठे केले - पण ह्याचा एक मोठा तोटा असा झाला की त्यांच वागण असं बनत गेल की त्या सांगतील तेच घरात व्हायला हवं - कारण तेच बरोबर दोन्ही मुलांनाही त्यांनी ती आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत ह्याचीच दक्षता घेतली.
    ''काय - काय म्हणाले रे डॉक्टर ?'' घरात गेल्या गेल्या आईंनी ह्यांना वारले.  बघा म्हणजे हा असा प्रश्न खरतर त्यांनी मला विचारायला हवा, पण विचारला ह्यांना.
    ''रिपोर्ट येईल 1-2 दिवसात म्हणाले''
    ''कसले हल्लीचे डॉक्टर रिपोर्टवर विसंबतात.  माझ्यावेळी गोदुआल्याने नुसते हात पोटावर ठेऊन सांगितले की मला कितवा महिना आहे ते.  आणि अग माझी दोन्ही बाळंतपण, घरातच झाली - ह्याच घरात - आमच्या वेळी नव्हती थेट ही हॉस्पिटल्सची''.
    ''अग आई तुमच्यावेळी तशा सोई नव्हत्या म्हणून आणि आता आहेत तर त्याचा लाभ नको का करुन घ्यायला ?'' हे म्हणाले.
    ''आणि हे बघ ती जर प्रेग्नंट असेल तर आधी टेस्ट करुन घे.  मला मुलगाच हवा - मुलगी चालणार नाही - मलाही दोन मुलच - मोठयालाही एक मुलगा - तेव्हा तुलाही मुलगाच हवा - बघ हो नाहीतर'', सासुबाईंच्या ह्या वाक्याने मला धडकीच भरली.  हे कसले बोलणे.  अजुनपर्यंत असला काही विचार माझ्या डोक्यातच आला नाही.  मला मुल होणार एवढयावरच मी खुष होते.  तो मुलगा की मुलगी हा विचारच माझ्या मनात आला नाही.
    माझ्या डोक्यात तिडिकच गेली, मी ताडकन बोलले, ''हे बघा मी कसलीही टेस्ट बिस्ट करणार नाही, आधीच सांगुन ठेवते.
    ह्यावर फक्त सासुबाईंनी रागारागाने माझ्याकडे बघितल.
    चार दिवसांनी ह्यांना परत विचारुन झाले काय आला रिपोर्ट ? तो पॉसिटीव्ह आहे अस ह्यांनी सांगितल्यावर त्यांची भुणभुण सुरु झाली.  तु टेस्ट करुन घे टेस्ट करुन घे. पण कधीही खंबीरपणे उभे राहणाऱ्या ह्यांनी ह्या बाबतीत मला आईला साफ सांगुन टाकल - असल आम्ही काहीही करणार नाही.
    बस त्या दिवसापासून त्यांच माझ्याशी वागणच एकदम बदलुन गेल. माझ्याशी मोकळेपणाने बोलेचनात.  मी म्हटले ठीक आहे - थोडे दिवस रुसवा धरतील.  मुल झाल की आपोआप बदलतील.  पण दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी सासु म्हणजे काय असते ते दाखवायला सुरुवात केली.  इतके दिवस नुसते गोष्टीत अशी खाष्ट सासु वाचलेली - तशीच आपल्या नशिबी आहे की काय ! पण नाही ह्या आधी त्यांनी खाष्टपणा कधी केला नाही.  आता एकाच घरात 3 बायका म्हटल्यावर कधी भांडयाला भांड वाजणार पण असा दुरावा त्यांनी कधीच दाखवला नाही.  त्या दिवशी संध्याकाळी मी ऑफिसमधुन येतेय तो ह्या सासुबाई स्वैपाकघरात.  नाहीतर आत्ता पर्यंत सकाळचा स्वैपाक मोठÎ जाऊबाई करायच्या, त्या घरातच असत.  त्यामुळे मला ऑफिसची घाई म्हणून त्या सकाळी करत मी संध्याकाळी.
    ''हे काय आज तुम्ही का करताय ?'' मी विचारले.
    ''आजपासून संध्याकाळचामीच करीन.  अग तुला आता जपायला नको का ? नाहीतर लोक म्हणतील घरात दोन दोन बायका असून हिला अडचणीच्या वेळी कामाला लावलात''.
    ''अहो लोक कशाला असल काही म्हणतील, अहो माझा तेवढाच वेळ जाईल उठ बसही होईल,  आणि हे काय ही भाजी कोणी आणली ?''
    ''मीच, आता तु संध्याकाळी येतांना भाजी नको आणुस, सरळ घरी येत जा.  मीच करेन सर्व.
    मला तर रडुच यायला लागले.  रात्रि मी ह्यांना हे सर्व सांगितले. सकाळी ऑफीसला जाताना ह्यांनी हलक्या आवाजात आईला सांगितले - ''अग आई अस काय करतेस, अजुन तिला होतय तो पर्यंत तिला काम करु दे की''.
    दिवस भर ऑफिसमध्ये तोच विचार.  एक स्त्रि ही दुसऱ्या स्त्रिचा - म्हणजे घरातलीचा इतका दुःस्वास का करते ? विचार करुन डोक बघिर झाल. मी पेग्नंट झाले काय आणि एका छोटयाशा गोष्टीवरुन सासुबाई इतके करतात काय ? एकदा वाटत की जाऊ दे त्यांच्या मनासाखरे करु, पण म्हटले कां ! ही फक्त माझी माझ्या नवऱ्याची खाजगी गोष्ट आहे.  आम्हाला ह्या घरात एवढाही हक्क नाही ? नाही, ह्यांना थोडा धडा शिकवलाच पाहिजे.     
    संध्याकाळी घरी येऊन बघतो तर त्या बाहेरच्या रुममध्ये होत्या.  म्हटले डोक ठिकाणावर दिसतेय.  मी कपड बदलले - फेश होऊन स्वैपाकघरात गेले आणि बघते तर काय, भाजीच - कोशिंबीर सर्व चिरुन ठेवले होते - गॅसवर पातेल - डाव - ओटयावर मिसळणाचा डबा - तांदुळ घुवुन कुकरमध्ये ठेवलेले. फक्त कुकर गॅसवर ठेवायचा बाकी - ही काय नवीनच तऱ्हा - माझ्या अंगाचा नुसता तिळपापड झाला.
    ''हे बघा - एवढी सगळी तयारी केलीच आहे तर तुम्हीच स्वयंपाक करुन घ्या - मला नाही असल जमणार'' अस त्यांना सांगुन मी बाहेरच्या खुर्चीवर येऊन विमनस्करपणे बसले.
    खरतर आज सकाळपासूनच मला बर वाटत नव्हत.  दिवसभरच्या कामाने त्याहीपेक्षा मानसिक क्लेशाने दमुन गेले होते.  संध्याकाळी 5 मिनिटे नुसती आडवी पडेन म्हटले तर ते सुध्दा ह्या घरात शक्य नव्हत.  रात्रि मी खुप रडले.  आता ह्या घरात माझा जीव घुसमटायला लागला होता.  साधी रडायचीही चोरी.  कारण आत आवाज ऐकु जाईल म्हणून रडणसुध्दा नुसते अश्रु सांडुन.  खरच मला तर कळेनासच झाल होत.
    पुढच्याच रविवारी सासुबाईंच्या नात्यातले जेवायला येणार होते.  तसे त्यांचे ते मामा - दुर बडोद्याला राहायचे.  वय होते पण खुरखुरीत - असत. तब्येत सांभाळुन होते. ते येणार म्हणून आम्ही दोन्ही सुनांनी चांगला सकाळपासून  स्वयंपाक तयार ठेवला.
    ''अरे वा ! अशी वांग्याची भाजी मी आमच्या लहानपणी शेतावर खायचो अशी आत्ता ही म्हणजे वा ! कोणी केलीय ?''  सासुबाईंच्या मामांनी विचारले - ''हि ही आमच्या मोठया सुनेने, सुगरणच आहे अग स्नेहा स्नेहा'' - जाऊबाई बाहेर आल्या - त्यांनी हसत हसत कौतुकाचा स्विकार केला -
    ''आणि ही बासुंदी ......''
    ''हे घ्या ही भाजी घ्या आवडलीय नं - आणि आमटी पण'' - सासुबाईंनी त्यांना पुढच बोलुनच दिल नाही.  बरोबर आहे ती मी केलीय आणि माझ सर्वांच्या देखत कौतुक करुन कस चालेल ?  त्या दिवशी मला जेवणच गेला नाही.
    तो सर्व आठवडा असाच टेन्शनमध्ये गेला.  ऑफसमध्येही काम घरी असली तऱ्हा - माझ्या डोक्याचा विचार करुन भुगा व्हायची वेळ आली - आणि मग नको तेच झाल - मला ब्लिडींग सुरु झाल.  लगेच डॉक्टर - हॉस्पिटल - त्यांनी मला सक्तिची पुर्ण एक महिना विश्रांतीची शिक्षा दिली.
    तो संपुर्ण महिना म्हणजे मला तुरंगातली शिक्षाच होती.  एकवेळ मी ऑफीसमध्ये जात होते तर तेवढेच थोडा वेळ मनातले तेच तेच विचार कामामुळे डोक्यातच यायचे नाहीत - थोड चेंज वाटायचे.  आता तर दिवस रात्र त्यांच्याच ताब्यात.  मनात एवढी प्रचंड भिती वाटत गेली - कारण कुणालाही मुलगा झाला की त्या आनंदाने ही बातमी सांगत पण कुणाला मुलगी झाल्याचे बातमी अगदी दुःखाने सांगत.
    मोठया जाऊबाईंना ही मी हे सर्व सांगायचा प्रयत्न केला पण त्यांच ही सासुबाईंपुढे काही चालत नसे.  आर्थिक-मानसिक सर्वच बाजूंनी त्या लाचार होत्या -
    कधी एकदा मी आईकडे जाईन अस मला झाल होत - पहिल बाळंतपण असल्याने आईच्या जवळच हॉस्पीटलमध्ये नांव घातल होत पण आता शारिरीक-मानसिक ओढाताण माझ्या प्रयत्ना पलिकडे गेली होती. ह्यांचा मानसिक आधार होता पण तो हे प्रश्न सोडवु शकत नव्हता.
    आम्ही ठरवल की ऑफीसला आधी 2 नंतर 2 असे 4 महिने रजा घ्यायची, भले बिनपगी झाली तरी चालेल. 
    पण ह्या सर्व मानसीक म्हणा का शारिरीक त्रासाने मला आईकडे 8व्या महिन्यात रहायला जायच्या 2 दिवस आधीच प्रिमॅच्युअर डिलिव्हरी झाली.
    आधि शरिराचा आक्रोशणारा कणनकण नंतर एका चेतने पलिकेडे गेला - मला मुलगा झाला होता 3.5 पौंडाचा.  झाल्यावर त्याला एकदाच जवळ घेतला. डोळे भरुन पाह्यला.  खरच एवढया छोटया करता काय काय आपण कष्ट काढतो - पण त्याच्या कोवळ्या स्पर्शाने सर्व विसरायला झाल.
    ''घरी कळवलत ?''
    ''हो''
    ''सासुबाई ......
    ''खुष आहे, तु जास्त काळजी करु नकोस, सर्व ठीक होईल''
    ठीक कसल - दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी दुध पाजतांना सतत उलटून पडायला लागल - म्हणून परत चेकींग केले - तेव्हा कळले की त्याला कावीळ झाली आहे.  अरे बापरे हे काय नवीन आता माझ्या पुढे दैवाने वाठलय ? माझा मुलगा - मला - माझ्याकडे देतच नाहीत - त्याला एका वेगळ्या रुममध्ये ठेवलाय - त्यातुन दुसऱ्याच दिवशी त्याला श्वासोश्वास करण्यास त्रास होऊ लागला - काळानिळा पडायला लागला - म्हणून परत तिथून 2 दिवसांच्या बाळाला मोठया हॉस्पीटलमध्ये हलवल - परत सर्व टेस्ट झाल्या तेव्हा कळल की त्याच्या हृदयातली व्हॉलव्ह बरोबर काम करीत नाही.  प्रिमॅच्युअर झाल्याने हृदयाची वाढ बरोबर झालेली नाही तो विक आहे - परत ऑपरेशन कराव का काय, ते ही एवढया लहान मुलावर ? डॉक्टरांचे काही ठरत नव्हते.  परत ऑपरेशन म्हणजे पैसाही भरपुर लागणार होता. 
    मी इथे हॉस्पीटलमध्ये फक्त वेडी व्हायचीच बाकी होते.  आजूबाजूच्या सर्वांजवळ आपापली मुल होती - त्या त्याच्याशी हासत होत्या - पाजत होत्या - एक आयुष्यातला फक्त बायकानांच मिळणारा आनंद उपभोगत होत्या - आणि मी- दोन दिवसात मी मुलाला काय ह्यांनाही भेटले नाही.  त्यांची सारखी धावपळ सुरुच होती.  मुलाला बघायला त्याला दुधपाजण्याच्या विचारानेच नुसते छातीत भडभडुन यायचे - पण त्याला काय होतय हे कुणीच मला सांगत नव्हते -
    चौथ्या दिवशी मला कळल की तो गेला - गेला - गेला म्हणजे माझ्या डोळ्यातल पाणीच सुकुन गेल - मला रडताही येत नव्हत - एकदाच फक्त एकदाच मी त्याला हातात घेतला होता - बस एवढाच त्याचा माझा संबंध - अरे त्याच्या करता गेले 8 महिने मी सर्व प्रसंगांना तोंड देत होते - माझ्या पोटचा गोळा इतका अल्पायुषी - कसल सुख - डोहाळ्याचे डिलिव्हरीचे - देवही इतका निष्ठुर कि एखाद्या निरागसाला फक्त 4 दिवस श्वासोश्वास करायची परवानगी- 
    झाला प्रकार विसरु म्हटले तरी विसरु शकत नव्हते - पुढे 2 महिने आईकडेच होते.  आता परत त्या घरात जायची इच्छाच होत नव्हती - पण जावे तर लागणारच होते. त्या घरात - त्या सासुबाईंसमोर -
    घरी गेल्यावर महिन्यानी एक दिवस आम्ही तिघच घरात असताना म्हणाल्या -
    ''अग माझा मुलगा म्हातारा आहे की तु म्हातारी झालीस - व्हायचे ते होवुन गेले ते विसरुन जा - आता परत मुलगाच होऊ दे - आधि पासूनच तुझी मी नीट काळजी घेईन''.
    मातृत्व ह्या उदात्त भावनेपेक्षा मुलाची आई ह्या संकुचीत विचारांच्या ह्या बाईबद्दल माझ्यात कसली भावनाच उरली नाही.

No comments:

Post a Comment