जीवन एक गाणे...!!!
जीवन म्हणजे काय...??? हा प्रश्न जर आपण केला तर असे दिसेल कि या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुरूप बदलत असते. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन,आकलन, संस्कार ते संकल्पना भिन्न आहेत. कारण प्रत्येकाला स्वतःची दृष्टी आहे आणि त्याच प्रमाणे त्याला तशी सृष्टी भासत असते. मानले तर जीवन म्हणजे एक मुक्त विद्यापीठ....कारण अजूनही आपण विध्यार्थी आहोत
दृष्टीकोन, आकलन, संस्कार तसेच संकल्पना यांच्या मर्यादा ज्ञात आहेत. आपल्याला आपल्यातील अपूर्णत्वाची जाणीव तसेच भान असते ज्ञानाची तसेच अज्ञानाची कल्पना-जाणीव सुद्धा आहे. सामान्यतः ज्ञान मिळाले म्हणजे अज्ञान नाहीसे झाले असे समजण्यात येते कारण ज्ञान व अज्ञान यांना विरुद्धार्थी शब्द समजण्यात येते. मात्र विरुद्धता त्याठिकाणी परस्पर पूरकता देखील आहे.
ज्ञाना विना अज्ञान तसेच अज्ञान विना ज्ञान यांचे आकलन होत नाही. ज्ञानाला प्रकाशाची उपमा देण्यात येते तसेच अज्ञानाला अंधाराची उपमा देण्यात येते. प्रकाश आला म्हणजे अंधार नाहीसा होतो का ...?? असा जर का प्रश्न केला तर उत्तर एकच अंधार कधीही नाहीसा होत नाही तर प्रकाशामुळे त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही इतकेच तसेच प्रकाश किरण जिथे पर्यंत पोहचतात त्याच ठीकाणाचा अंधार आपल्याला जाणवत नाही. प्रकाशामुळे अंधार अप्रत्यक्ष स्वरूप धारण करतो ...तसेच प्रकाश नाहीसा होताच पुन्हा अस्तित्व प्रकट करतो प्रत्यक्ष स्वरूप धारण करतो हे अगदी निर्विवाद.
आपलं जीवन अर्थपूर्ण असावं, जीवनात काही तरी चांगले- वेगळं करावं, ही प्रेरणा आपल्याला जात्याच उपजत असते. पण तरीही बहुसंख्य माणसांना खऱ्या खुऱ्या आनंदाचा- सुखाचा शोध लागत नाही आणि आपल्या जीवनाचे प्रयोजन समजत नाही, ही पण एक वस्तुस्थिती आहे. आज भौतिक संपन्नतेच्या जगात लौकीकार्थानं सुखोपभोगाला तोटा नाही. तरीही मग आज आपण इतके अस्वस्थ का..???माणसाला जर खरं सुख मिळायचं असेल तर सर्व प्रथम माणसाचे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते हवे. ...प्रत्येकानं आपल्या आवडीचं काम केलं पाहिजे व काही प्रमाणात अंगमेहनत केली पाहिजे. तरच शांत सुखाची झोप लागते. आणिक एक गोष्ट म्हणजे, जिव्हाळ्याचे समाधानी कौटुंबिक जीवन शेवटची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ‘जीवाचे मैत्र’. वेगवेगळ्या लोकांशी स्नेह-मैत्रीचे संबंध ठेवणे. व्यक्ती व समाजाचे सुख एकमेकांत गुंतले आहे व निसर्गाशी समरस होऊन त्याचा विध्वंस न करता एकरूप होण्यात आहे.
जीवनाचा प्रवास सकारात्मक असावा पण त्या बरोबर नैतिक आणि पारमार्थिक सुद्धा असावा मग तो नक्की सुखाचा आणि समृद्धीचा होतोच कारणं जिथे प्रेम जिव्हाळा भावना असतात तोच तर खरा संसार........!!!
अवघाची संसार सुखाचा..
स्त्रोत -श्री.शिरीष दातार.
No comments:
Post a Comment