Saturday, 21 April 2012

डोळ्यात पाणी आणणारी कथा!!!!

'आई, बटन तुटलंय ग शर्टचा...आणि बघ ना किती खराब झालाय तो...' महेश दारातून ओरडतच येत म्हणाला. महेशचा आवाज ऐकून तिने पटकन रिकाम्या डब्याचं झाकण लावलं. डाळ उरलीच नव्हती डब्यात. तसंच डबा बाजूला ठेवत ती महेशकडे वळली. महेश पोळीच्या डब्यात कालची उरलेली पोळी आहे का ते बघत होता. 'आई, पोळी नाही? ' महेशच्या प्रश्नावर तिला भडभडून आलं. कसनुसा हसत ती म्हणली. 'करणार रे पोळी. जा, तू बाबा आले का बघून ये'. 'कुठे गे...ले बाबा?' महेशचा पुढचा प्रश्न. तोंडावर आलेला उत्तर तिने थांबवलं, आणि सावकाश ती म्हणाली, 'तुला नावं शर्त आणायला.' महेशचा चेहेरा खुलला. तो नाचतच अंगणात जाऊन बाबांची वाट पाहू लागला.
तिने शेगडी पेटवली. तांदळाच्या डब्यात उरलेला मूठभर भात तिने कुकरमध्ये शिजवायला लावला. शिजवतानाच त्यात थोडे कांदे आणि मसाला घातला. कुकर व्हायची वाट पहात ती ओट्याजवळ उभी राहिली. कुकर नवर्याने हौसेने आणलेला. घरातला बाकीचं सगळंच मोडून झालं होता, तेवढा एक कुकर तिने अजून विकला नव्हता. बाकीचं समान असंच कुणी दिलेला लग्नात. तेव्हा जे कोणी यायचं काय काय घेऊन यायचं, आणि तीही आल्या-गेल्याचा करण्यात रमून जायची. पण मग २ वर्षात... तिला त्या दिवसाच्या आठवणीने गरगरल्यासारखं झालं. अजूनही तिला खोटं वाटायचं, एखाद्या स्वप्नासारखा. तिला मिठीत घेऊन गुदमरवणारा नवरा जेव्हा त्याचा एक थोटा हात आणि तुटका पाय घेऊन केविलवाण्या चेहऱ्याने घरी यायचा तेव्हा तिला उन्मळून जायला व्हायचं. अपघातातून सावरल्यावर तिने त्याला सरकारी दाखला आणून एखादी नोकरी करण्यासाठी सुचवला. महेश तेव्हा जेमतेम वर्षाचा होता. नवर्याने ऐकलं नाही. त्याचे मित्र यायचे आधी आधी, काही करण्यासाठी सुचवून पाहायचे. तो झिडकारायचा , म्हणायचा, 'पांगळा आहे म्हणून दया नको तुमची.' मग महेशकडे आणि दाराआडून पाहणाऱ्या तिचा निरोप घेऊन आलं माणूस निघून जायचा. काहीच सुचला नाही कि तो कुबड्यांवर स्वतःला ढकलत ढकलत निघून जायचा कुठेतरी. मग घरी यायचं घामाघून होऊन, तिच्याकडे बघायचाही नाही. भरपाईचे पैसे घराखर्चात आणि महेशाला शाळेत घालण्यात संपले. महेशाची शाळा सुरु झाल्यावर तिने उमेदीने स्वत नोकरी करू पाहिली. पण तिने आणलेलं काही तो खायचा पण नाही. महेशला सांगायचा कि तो काम करेल, त्याला खूप मोठा करेल. त्याला हसवायचा. आणि मग स्वताचे डोळे टिपत आकाशाकडे बघत बसून रहायचा. एक दिवस त्याने गाडीखाली जीव द्यायचा प्रयत्न केला. लोकांनी वाचवला, घरी आणला. तेव्हापासून तो अजून आक्रसत गेला. ती जवळ आली कि रडायचा. तुझ्या जीवावर जगतो, मरू पण शकत नाही आपल्या मर्जीने म्हणायचा. ती कामावर गेली कि निघून जायचा कुठेतरी. कोणाकडून तरी पैसे मागून महेशला काही घेऊन यायचा. एक दिवशी कोणीतरी म्हणाला कि जगतो कसा मस्त बायकोच्या जीवावर. ते जिव्हारी लागल्यागत घरी आला, आणि तिला नोकरी सोडायला लावली.
मग घर रिकामं होत गेला. महेशचा रिझल्ट लागला शाळेचा आणि आता ५वित प्रवेश घ्यायचा होता. भरायला पैसेच नव्हते. उद्यापासून शाळा सुरु होणार होती. महेश विचारायचा पुस्तक, वही, कंपासपेटी केव्हा घ्यायची. ती वेळ मारून न्यायची. मग बाबाकडे गेला कि बाबा त्याला काय काय सांगून रिझवायचा.
तिने कुकर उतरवला. ताटे घेतली. तेवढ्यात महेशचा बाहेर आवाज आलं, 'आई, बाबा आले. आणि मला नवा शर्ट आणि पुस्तक पण आणलंय.' गोष्टींचं पुस्तक घेऊन महेश तिला बिलगला. त्याच्या खांद्यावर नवर्याने नवा शर्ट पांघरला होता. तिला आवडणारा आकाशी रंग.... 'आणि बाबांनी हे तुला दिलंय. तिने पिशवी घेतली. त्यात एक फूल आणि डबा होता श्रीखंडाचा. तिने फूल ओट्यावर बाजूला काढून ठेवलं.
काल रात्री त्यांचं बोलणं झालं. तिने त्याला उरलेले पैसे दिले होते.
कुबड्या भिंतीच्या कडेला टेकवून तो खाली बसला. महेश त्याच्या बाजूला बसून पुस्तक वाचत होता. तिचे डोळे उगाच भरून येत होते. तिने ताटात भात वाढला. कडेला श्रीखंड वाढलं.
तेवढ्यात मनी आली दारातून आणि म्याव म्याव करत महेशच्या पायात जाऊन बसली. महेश तिचे लाड करत तिला गोष्ट सांगायला लागला. आणि ते वेडं मांजर पण मान त्याच्या मांडीवर ठेवून जसं ऐकायला लागलं.
किती दिवसाने ते गप्पा मारत मारत एकत्र जेवले. खूप दिवसांनी आज गोड खायला होतं. महेशने आवडीने श्रीखंड खाल्लं. आणि मनूने पण महेशच्या ताटातलं श्रीखंड खाल्लं. जेवण झाल्यावर गप्पा मारत ते तिथेच बसले. मनू महेशच्या मांडीवर गुपचूप झोपली होती. हळूहळू बाबाची गोष्ट ऐकता ऐकता बाबाच्या कुशीत महेश झोपून गेला. तिने ताटे उचलली. कुकर आणि श्रीखंडाचे रिकामे भांडे बेसिन मध्ये ठेवले. ओट्यावरचे फूल तिने हातात घेतलं आणि नवर्याकडे पाहिलं. तो भिंतीला मान टेकवून झोपला होता. त्याचा रापलेल्या गालांवर, खुरट्या दाढीत त्याच्या डोळ्यांतून ओघळलेले अश्रू लपले होते. तिने ते फूल घेतलं, आपल्या बाजूला ठेवलं आणि तिथेच लवंडून ती झोपली........
दुसर्या दिवशी पेपरात आलेल्या बातमीत अपंग तरुणाची बायको आणि मुलासह आत्महत्या एवढाच मथळा होता. त्यांची घरभर विखुरलेली स्वप्नं, त्यांच्या गप्पांचे आवाज, गोष्टीचं नव पुस्तक, एकदाच घातलेला आकाशी शर्ट, मरून पडलेलं मांजर आणि तिच्या कुशीत सापडलेलं कोमेजलेलं फूल ह्यांचा उल्लेख तसा महत्वाचा नसतोच म्हणा....

No comments:

Post a Comment