Friday 23 March 2012

'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस

एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई.
एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे.
एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. 'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ?
लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, 'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'.

No comments:

Post a Comment