Tuesday, 22 July 2014

ती आई होती म्हणून.....

३ तास होऊन गेले तरी गाडी जागची हलत नाही हे पाहून नेहाची अस्वस्थता शिगेला पोहोचली. या ओव्हरहेड वायर्सना तुटायला आजचाच मुहुर्त बरा साधायचा होता, ती मनातल्या मनात धुसफुसली. पण असा त्रागा करून काही उपयोग होणार नाही हे जाणवून ती शक्य तितक्या संयमाने गाडी सुरु होण्याची वाट पहात बसली.
जळगांवमध्ये चाळीसगांवच्या पुढे खर्डा नामक एका गावातील सुधारणांची पाहणी करुन अहवाल सादर
करण्याची ऑर्डर मिळाली होती नेहाला वरिष्ठांकडून, म्हणूनच हा प्रवास-प्रपंच.
या अचानक झालेल्या खोळंब्यामुळे गाडी मुक्कामाच्या ठिकाणी अगदी अपरात्री पोहोचणार होती. बरं, गावंही लहानसं, मूलभूत सोयीच केवळ असलेलं, त्यामुळे मध्यरात्री आपण मुक्क्कामी कसे पोहोचणार हा घोरच होता.
तब्बल चार-साडेचार तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर गाडीने शिट्टी वाजवली आणि नेहाचा जीव भांड्यात पडला. अपेक्षेप्रमाणे गाडी मध्यरात्री १.३० च्या सुमारास खर्डा येथे पोहोचली. नेहा एकटीच उतरली या आडगावी, फलाटावर चिटपाखरू नाही. स्टेशन मास्तरांच्या कचेरीत जाऊन नेहाने गावाकडे जाण्याचा मार्ग, हॉटेलचा पत्ता वगैरे विचारून घेतले, पायीच जावे लागेल, वाहनाची सोय नाही हेही समजले तिला.
गुडूप अंधारात हरवलेल्या पाऊलवाटेवजा एकमेव कच्च्या रस्त्यावरून नेहा चालू लागली. दूरवर मिणमिणते दिवे दिसत होते, एकंदर तेथपर्यंत चालण्याशिवाय पर्याय नव्हता तर... या अनोळखी गावी आपण मध्यरात्री एकट्या चाललोय, कुठून कुणी आडवे आले, चोरी वगैरेच्या उद्देशाने चाकूचा धाक दाखवून तर...? भीतीने गाळण उडाली नेहाची. नाही म्हणायला रातकिड्यांची किर्र - किर्र होती साथीला आणि मधुनच उडणारी वटवाघळे.... अवचित येणारी वार्याची झुळूक आणि पानांची सळसळ....बाकी सन्नाटा....
किती भयाण वाटतंय... घसा सुकला नेहाचा. शक्य तितक्या झपाझप पावले टाकून वस्ती गाठायची अशा प्रयत्नांत ती चालू लागली आणि अचानक काही कळायच्या आत एक तीव्र वेदनेची सणक मस्तकापर्यंत भिनली नेहाच्या, पायाला कुठल्याशा दगडाची ठेच लागली होती, "आई गं" नेहा कळवळली आणि तोल जाऊन खाली पडत असलेल्या नेहाला हाताचा आधार मिळाला. नेहाने दचकून पाहिले तर एक शांत, प्रसन्न चेहरयाची स्त्री तिला आधार देत होती. साडी, ठसठशीत कुंकू, वत्सल नजर अशी ती स्त्री पाहून नेहाला आईचीच आठवण झाली आणि मनोबळ मिळालं. त्या स्त्रीने नेहाची विचारपूस केली. नेहाने सर्व सांगून हॉटेलची चौकशी केली.
"आगं पोरी,चल तर खरी माज्यासंगं आन हाटल कशापायी गं या सखूचं घर असताना? , चल गुमान माज्या घरला" असे म्हणत तिने नेहाला हाताला धरुन सोबत नेले. काही अंतर चालल्यावर एक पिंपळपार लागला आणि तिथून वळसा घेताच एक बैठा वाडा दॄष्टीपथात आला. अंगणात छोटेसे तुळशीवृंदावन व त्यापाशी दिवा तेवत होता. नेहा काहीशी धास्तावलेलीच, अशा अनोळखी व्यक्तीच्या घरी जाणे योग्य नाही असे वाटत होते तिला. पण तसेही इथे तर सारेच अनोळखी त्यापेक्षा बाई-माणसाबरोबर जाणे बरे असा विचार केला नेहाने . बाईही तशी साधीच वाटत होती. काही छक्के - पंजे तिच्या मनातही नसतील हे जाणवले नेहाला. सखूबाई बळेच नेहाला हाताशी धरून वाड्यात प्रवेशली.
छोटंसं सुबक घर, जुन्या काळातलं वाटावं असं. बैठकीच्या खोलीत नेहाला बसवून सखू तिच्यासाठी पाणी घेऊन आली. नेहाची जखम धुवून तिला मलमपट्टी करून दिली. नेहाला संकोच वाटू नये याची सखूमावशी काळजी घेत होती. या अनोळखी गावी कसलीही ओळख-देख नसतांना दाखवलेल्या या जिव्हाळ्याने नेहा गहिवरुन गेली. म्हणाली, "सखूमावशी, मी एकटी त्या रस्त्यावर फार घाबरले होते, देवासारख्या धावून आलात माझ्या मदतीला, खूप उपकार झाले." सखूमावशी म्हणाल्या,"द्येवावर इस्वास हाय व्हय तुझा?'" "हो तर" नेहा बोलली, "माझी आई म्हणते," त्याच्यावर विश्वास असू द्यावा, तो येतोच कोणत्या न कोणत्या रुपात आपल्या मदतीला, जशा आज तुम्ही आलात माझ्यासाठी".
"लई गुनाची हायेस गं" असं म्हणत सखूमावशीनी तिच्या चेहरयावरुन हात फिरवला आणि कानशिलावर बोटे मोडली. नंतर मावशींनी तिच्यासाठी गरमागरम भाकरी भाजल्या. पिठलं, भाकरी, मिरचीचा ठेचा असे गावरान जेवण जेवून नेहा तृप्त झाली. तिने सखूमावशींना विचारले की " तुम्ही एकट्या रहाता का इथे? आणि अशा अपरात्री रस्त्यात काय करत होतात?" सखूमावशी थबकली, म्हणाली, "न्हाय बा, माझी बी येक लेक हाय तुज्यावानी, बूकं शिकलेली, शेरात कामाला असते न्हवं का. आन म्या तुझी हाक ऐकुन आले शान बघायला कोन ते, तर तू व्हतीस". तु आज माझ्या पोरीच्याच खोलीत झोप कशी."
इतके बोलून सखूमावशींनी नेहाला आपल्या लेकीच्या खोलीत नेले. खोली साधी, नीटनेटकी, एका भिंतीवर एका तरुणीचे तैलचित्र होते. हीच ती सखूमावशींची मुलगी असावी असा अंदाज बांधून नेहा आजच्या सबंध दिवसातल्या घडामोडी आठवत पलंगावर विसावली. काही वेळातच तिचा डोळा लागला.
सकाळच्या उन्हाची तिरीप चेहरयावर पडल्यामुळे नेहाला जाग आली. चांगलंच उजाडलं होतं, आपल्याला निघायला हवं सरपंचांच्या कचेरीत, नेहाने विचार केला व ती भराभर आवरू लागली. सखूमावशींचा कानोसा घेत ती बाहेर आली, पण त्या कुठेच दिसेनात घरात आणि हो रात्री इतके छान वाटणारे घर आता दिवसा उजेडी विचित्र वाटत होते, जणू काही कैक वर्षे माणसाचा वावरच नसावा असे.... तिची नजर सखूमावशींना
शोधत होती, राहण्या-खाण्याचे पैसे तर त्यांना द्यायलाच हवे होते. आधार दिल्याबद्दल आभारही मानायचे होते. आपण तर आज सबंध दिवस कामाच्या धांदलीत असू आणि लगेच संध्याकाळच्या गाडीचे परतीचे तिकीट आहे आपले, तेव्हा आताच सखूमावशींचा निरोप घेणे योग्य.
सामान घेऊन नेहा बाहेर अंगणात आली आणि खाडकन घराचा दरवाजा बंद झाला. नेहा दचकलीच त्या आवाजाने. अंगणही सुने-सुने वाटत होते, तुळस साफ वठली होती, रात्री हे सर्व आपल्याला किती सुंदर सारवल्यासारखे वाटले होते. पण इथे तर पालापाचोळा, धूळ यांचेच साम्राज्य दिसतंय. नेहा अवाक होऊन विचार करत करतच काही अंतरावर असलेल्या पिंपळपारापाशी पोचली.
पारावर काही गावकरी बसले होते. त्यांना विचारून तिने सरपंचांची कचेरी गाठली. आता सरपंचांकडूनच सखू मावशीचा ठावठिकाणा शोधून काढू. हजार - बाराशेंच्या वस्तीचं तर हे गाव, नक्की ओळखत असतील तिथली लोकं सखूमावशींना असा विचार करतच नेहा कचेरीत प्रवेशली.
सरपंचांना ओळख सांगताच त्यांनी तिचे स्वागत केले व तिला हवी असलेली सर्व कागदपत्रे दाखवण्यास सुरुवात केली. काम उरकत असतानाच सरपंचांनी नेहा रात्री कुठे राहिली याची चौकशी केली आणि नेहाला सखूमावशींची पुन्हा आठवण झाली. तिने रात्रीचा सारा वृत्तांत कथन केला आणि सखूमावशी कुठे असतील आता तेही विचारले. सरपंच व इतर सहकारी अवाक होऊन हे सारे ऐकत राहिले. त्यांचा विश्वास बसत नव्हता नेहाच्या बोलण्यावर मात्र सखूमावशींचे नेहाने केलेले वर्णन मिळतेजुळते होते.
विचारमग्न झालेले सरपंच स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटू लागले, "आली असेल, सखूच आली असेल, आपल्या पोरीला नाही वाचवू शकली बिचारी, पण लेकीसारख्या तुम्हाला मदत करायला तत्परतेने आली, आईचं काळीज आहे ना शेवटी....."
नेहाला काही उलगडा होईना, तिने खोदून खोदून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शेवटी काहीही न बोलता सरपंचांनी एक रजिस्टरवजा बाड तिच्यापुढे धरले आणि त्यातील एका ओळीवर तिचे लक्ष वेधले.
त्यात आठ वर्षांपूर्वीची तारीख असलेली एक नोंद नेहाला मिळाली:-
मयत व्यक्तीचे नाव- श्रीमती सखूबाई थोरात
मृत्यूचे कारण- मुलीच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्यामुळे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

2 comments: