Tuesday 13 November 2012



बलिप्रतिपदा.......पाडवा...

लक्ष्मीपूजनानंतर येतो पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहुर्त म्हणून हा महत्वाचा दिवस आहे. या दिवसापासून शुभकार्याची सुरवात करण्याची प्रथा आहे. विक्रम सवंत व महावीर सवंत यांचा नववर्षारंभ
यांच दिवसापासून होतो. बळीराजाचा हा स्मरणदिन आहे. बळी हा शेतकऱ्याचा राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक देवांच्या आधी बळी राजाचे नाव घेत त्यामुळे देव संतप्त झाले व त्यांनी विष्णूला साकडे घातले. विष्णूने वामनावतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेला ‘काय हवे ते माग’ बळी बोलला. फक्त त्रिपादभूमी हवी मला वामन उत्तरला. सर्व काय ते बळी उमजला. परंतू शब्द दिला तो त्याने पाळला ‘दिली भूमी’ म्हणून गरजला. वामनाने एका पावलात स्वर्ग, दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली. तिसरे पाउल कुठे ठेऊ असे विचारताच बळीने आपले मस्तक पुढे केले. विष्णूने त्याला पाताळात गाडले. पण एक वर दिला. तो वर समाजाच्या हिताचा होता. जो कोणी बळीप्रतिप्रदेला दीपदान करेल त्याला यमयातना होणार नाहीत. त्याच्या घरी लक्ष्मीचा वास सदा राहील. लक्ष्मीला आपल्या पतीचे कौतुक वाटले म्हणून तीने पतीचे विष्णूचे ओक्षण केले त्याला ओवाळले. ओवाळणी म्हणून विष्णूने हिरे माणके इत्यादी अलंकार घातले. यामुळेच आजही बलिप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळतात व पती पत्नीला भेटवस्तू देतात.
श्रीकृष्णाने आजच्या दिवशीच गोवर्धन पूजेची सुरवात केली. निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची हि सुरवात होती त्यानिमित्त पाडव्याला कृष्ण, गोपिका, गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची पुजा होई. या प्रथेपासून निघालेले किल्ले म्हणजे गड, सैनिक, शिवाजी महाराज यांचे मोठ्या कल्पकतेने देखावे उभारण्याची प्रथा महराष्ट्रात रूढ झाली. यातूनच मुलांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला वाव मिळू लागला.

No comments:

Post a Comment