Thursday, 23 May 2013

समोरच्याला वागण्याची एक संधी द्या!


आपण सगळ्यांपेक्षा वेगळेच आहोत, असे लग्न झाल्यानंतर प्रत्येकालाच वाटत असते. आपणच जगात सर्वात आनंदी, सुखी आहोत आणि आपल्यात कधी भांडण होणे शक्यच नाही; पण कालांतराने दोघांचे खरे रूप समोर यायला लागते. कडू गोळी साखरेच्या मुलाम्यात लपेटलेली, आणि साखरेचा मुलामा हळू हळू संपतोच. जिभेवर रेंगाळतो तो फक्त कडवटपणाच. नाती ही अशीच असतात का? दोघांमधले सामंजस्य का संपते? ती कुठे कमी पडते? त्याला का हे सगळे सांभाळून घेता येत नाही?

खूप कमी पुरुषांमध्ये सांभाळून घेण्याची ताकद असते. हळव्या मनाचे पुरुष फार कमी सापडतात. इतरांची काळजी घेणे हा गुण त्याच पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो. गमतीचा विषय म्हणजे असे पुरुष सगळ्यांचीच काळजी घेतात. त्यांना असंख्य मैत्रिणीसुद्धा असतात.

निसर्गाची कमाल म्हणा किंवा देवाची कृपा, जोड्या या परस्परविरोधीच तयार झालेल्या असतात. अती काळजी करणारी स्त्री असली की तिच्या वाट्याला नेहमी हेळसांडच येते. नव-याचे दुर्लक्ष, प्रेमाचा आणि काळजीचा अभाव. तिची अपेक्षा मात्र त्याच्याकडून कायम अशीच असते की त्याने कधी तरी माझ्यासाठी काळजीचे शब्द तोंडातून काढावे; पण कितीही प्रयत्न केले तरी तो आपला निर्विकार.

असेही पुरुष असतात जे घराची, मुलांची, बायकोची आपल्या सर्व कामात तडजोड करून काळजी घेत असतात. आणि त्यांच्या जोडीदाराच्या बाबतीत विचार केला तर त्या बायका ढिम्म असतात. जाऊद्या ना, तो करतोय ना, मग आपल्याला लक्ष द्यायची काय गरज? मजेची गोष्ट म्हणजे असे पुरुष सगळ्यांच्या आजारपणात स्वत:हून लक्ष देतात, काळजी घेतात. पण जेव्हा स्वत: ते आजारी पडतात तेव्हा त्यांच्या पार्टनरकडून त्यांना काळजीचा हात मिळत नाही.

love station
अति काळजी करणारी व्यक्ती स्वत:ला नेहमी सर्वगुणसंपन्न समजत असते. त्या व्यक्तीच्या मते तिला सर्वच जमत असते. अशा वेळेस समोरच्याने काही सांगितलेले त्याला पटत नसते. त्या व्यक्तीला आपल्या कार्यावर शंका घेतल्यासारखे वाटते. परिणामी या व्यक्तीचा पार्टनर अजूनच अलिप्त राहायला लागतो.

नको बाबा, मी केलेले काहीच हिला /याला पटत नाही. त्याच्यापेक्षा काही न केलेले बरे आणि हा / ही दुर्लक्ष करतात म्हणून हे आपले मनातल्या मनात धुसफूस करत बसतात. तात्पर्य काळजी घेणारी व्यक्ती स्वत:च्या हातात सर्व अधिकार घेऊन बसते आणि त्याच्या अधिकारक्षेत्रात पार्टनरने केलेली लुडबूड त्याला चालत नाही. त्याला सल्ला किंवा मदत नको असते; पण सहकार्य मात्र हवे असते.

अंतर्मुख होऊन विचार करून तसेच एकमेकांशी संवाद साधून अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात. पण संवाद हा केवळ संवादच असला पाहिजे, त्या संवादात एकमेकांच्या त्रुटींवर बोट ठेवताना खूप काळजीपूर्वक वागले पाहिजे. नाहीतर याचा उलट परिणाम होऊ शकतो.

भारतात नाती तशी कमीच तुटतात; पण सर्वात मोठे स्वीकारण्याचे सत्य म्हणजे आपल्या भारतात दोघे एकमेकांबरोबर खूप तडजोड म्हणून किंवा घरगुती अडचणीमुळे एकमेकांच्या नुसते बरोबर राहत असतात. एकमेकांच्यात साथसोबत राहत नाही. हे असे नाते कायदेशीररीत्या तुटलेले नसले तरी मनाने ते फार आधीच तुटलेले असते. मन मारून लोकलाजेस्तव ते एकत्र राहत असतात. काही थोड्या लोकांनाच प्रेम अनुभवायला मिळते; पण त्यातही गडबड होणार नाही, याची शाश्वती नाही.

आपल्या जीवनसाथीचे आपल्यावर प्रेम आहे; अन्यथा ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करतच नाही, हा आपल्या सोयीने अर्थ काढून मोकळे होण्यापेक्षा समोरच्याला वागण्याची एक संधी द्या!

No comments:

Post a Comment