Thursday, 18 April 2013

एका युवकाची आणि एक मुलीची ओळख फुलांचा गुच्छ सांभाळत तो टॅक्सीत बसला. टॅक्सी त्याच्या इच्छित स्थळी पूढे चालू लागली, तसा तो आठवणींच्या प्रवाहात मागे वाहू लागला.

त्या दिवसांत तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. दिवसभर नोकरी करुन संध्याकाळी अभ्यासाला लायब्ररीत यायचं हा त्याचा नित्यक्रम. नेहमी पुस्तकांत रमणारा तो, अलीकडे मात्र तिच्या विचारांत अधिक रमत होता. ती सुध्दा अभ्यासाला लायब्ररीत यायची, मैत्रिणींसोबत सकाळच्या सत्रात न येता संध्याकाळी यायची. पुस्तकांच्या देवाण-घेवाणीमुळे झालेली त्यांची ओळख, मैत्रीच्या रुपात हळू हळू खुलत होती. लायब्ररीमध्ये यायची वेळ जरी ठरवलेली नसली तरी आल्यावर समोरासमोरच बसणं हे मात्र ठरलेलं.

अशाच एका संध्याकाळी ती आली. पण थोडी उदास होती.
“काय ग, झाली का ख्रिसमसची खरेदी?” त्याने तिला बोलतं करायला विचारलं.
“हो.” तिचा स्वरही जरा नाराजीचा वाटत होता.
“काय काय घेतलंस?”
“नथिंग.”
“काय झालं? चेहरा का पाडून आहेस असा?”
काही क्षण थांबुन ती म्हणाली “आम्ही आज रात्री गोव्याला जातोय. परवा ख्रिसमस आहे ना.”
तिची उदासी घालवायला निघालेला तो आता मात्र स्वतःच उदास झाला होता, पण त्यातही आपल्यापासून दूर जाणं हे तिच्या उदासीच कारण आहे हे ध्यानात येताच क्षणभर सुखावलाही.
“अगं मग उदास होण्यासारखं काय आहे त्यात?”
“अरे.. दॅट मिन्स आता 4-5 डेज आपण…..... ” अस म्हणून तिने शब्द आवरते घेतले. “ hmm,....... तुला काहीच वाटत नाहिये ना?” ती पुढे म्हणाली.
“मला? मला काय वाटयच त्यात?..... किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही मस्त एंजॉय करणार ना.” तिच्या मनात नक्की काय चाललंय हे चाचपडून पहायची संधी त्याने दवडली नव्हती. चेहर्‍यावर खोट्या हास्याची एक रेघ उमटवत तिने पुस्तकात डोकं खुपसलं. काही वेळातच पुस्तकं एकवटत ती म्हणाली “आय एम लिव्हींग नाऊ.”
“इतक्या लवकर?”
“हो जाते, उशीर होईल.” तिची नजर आज उठत नव्हती. कदाचित डोळ्यातलं पाणी लपवत असावी.
उदास तर तोही फार झालेला. तरिही ती जाण्याआधी एकादा तिचा गोड हसरा चेहरा पहावा म्हणून जरा आनंदाचं अवसान आणत तो म्हणाला “मेरी ख्रिसमस! एंजॉय!”
ती हसली खरी, पण अश्रु मात्र डोळ्यांची कडा ओलांडू पहात होता. पण पापण्यांच्या हालचालीत तिने लकबिने तो परतावलाही.
“बरं मग, भेटु नंतर. बाय.” ती म्हणाली.
“बाय. मी तुझी वाट..” अस म्हणत तोही थबकला. त्याचे डोळेच अधिक बोलत होते.
ती निघली. त्याचं उदास मन अभ्यासात तर नक्कीच लागणार नव्हतं. जरा वेळाने तोही निघून गेला.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी लायब्ररीत येण्याचं त्याचं मन नक्कीच नव्हतं पण कारण तर होतं. अभ्यासात स्वतःला गुंतवून घेऊन ४-५ दिवस काढावेत असं ठरवून तो लायब्ररीत आला. आज मात्र कुणाची वाट पहायची नव्हती आणि समोरची खुर्चीही रिकामीच असणार होती. त्याचे डोळे पुस्तकांमधल्या अक्षरावरून फिरत तर होते, पण मन मात्र तिची सुरेख छ्बी रेखाटत होतं. तिचं ते खळखळून हसणं, गालातल्या गालांत गोड लाजणं, तो वाचनात गुंग असताना त्याच्याकडे एकटक पहात रहाणं, आणि त्याचं लक्ष जाताच लगबगिने नजर पुस्तकांत वळवणं. कधीतरी मनातल्या भावना चुकून ओठांवर आल्याच तर बोट दातांमध्ये दाबत तिथुन गडबडीने निघुन जाणं. या त्यांच्यामधल्या सगळ्या मखमली आठवणी ती समोर नसताना त्याच्या मनात दाटिवाटी करत होत्या. अशाच सगळ्या आठवणींची उजळणी करत असताना त्याची नजर सहज वर गेली आणि पहातो तर काय.. ती समोर बसली होती. त्याला स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
“अगं तू गोव्याला जाणार होतीस ना?” त्याने आश्चर्याने विचारलं.
“नाही गेले.”
“का?”
“नाही जावसं वाटलं.”
“अग पण..”
त्या क्षणी काही समजलं नसलं तरी ती कदाचित आपल्यासाठीच गेली नसावी हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिच्या अशा अनपेक्षित येण्याने त्याच्या मनात आनंदाच्या लहरी उमटत होत्या. उठून नाचावं इतका उत्साह संचारला होता त्याच्या शरीरात, पण त्याने मनाला आवर घातला. पुस्तकावर त्याची नजर टिकत नव्हती सारखी फिरून तिच्या चेहर्‍यावर जाई. ती मात्र शांतपणे वाचत बसली होती.

दिवस असेच उलटत होते. पण अलीकडे तिचं लायब्ररीमध्ये नित्याच येणं कमी झालं होतं आणि आली तरीही शांत असायची, कमी बोलायची, तिच्या नजरेतून सतत तिच्या मनावर कसलं तरी दडपण असल्यासारखं जाणवायचं. फार गंभीर वाटायची. तिचं हे असं वागणं त्याला खटकत होतं. त्याने अनेकदा तिचं शांत रहाण्यामागचं कारण विचारण्याचा, तिच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्नही केला होता पण ती प्रत्येक वेळी “काही नाही.” सांगुन टाळायची. बरेचदा तो बोलत असताना त्याच्याकडे फक्त बघत बसयची.

हा हा म्हणता एक दिड महिना उलटला.
‘तिला अपेक्षित असेल माझाकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबूली?…… हो, असेल कदाचित.’
‘मला जे तिच्याबद्दल वाटतं, तेच तिला माझ्याबद्दल वाटतं असेल?…… हो, मला आहे खात्री.’
‘पण जाती धर्माचं काय? मला काही फरक नाही पडत, पण तिला?…… नाही पडणार.’
एका मनाने प्रश्न विचारले…. आणि दुसर्‍याने सोईस्कर उत्तरंही दिली...!

त्याची चलबिचल थोडी कमी झाली, त्याने ठरवलं की ‘व्हेलेंटाइन डे’ला आपल्या मनात ज्या काही भावना आहेत तिच्याबद्दल, त्या तिला सांगायच्या.


तो दिवस येऊन ठेपला. आज ते पहिल्यांदाच लायब्ररीबाहेर एका नवीन रम्य ठिकाणी भेटणार होते. तो फार आतुरतेने तिची वाट पहात येरझार्‍या घालत होता. एवढ्यात ती समोर आली.
“खुप सुंदर दिसतेयस तू आज.” ती शरमली आणि तिने मान पायाच्या अंगठ्यावर वळवली.

हातातलं ते लाल गुलाबाचं फुल पुढे करत तो म्हणाला.
“श्रावणी,
मला काही सांगायचं तुला ...."
"हं, सांग न..."
"श्रावणी....
माझं.....
माझं.... खुप प्रेम आहे तुझ्यावर......
आय लव्ह यु श्रावणी .... आय लव्ह यु सो मच..... !!! ”
तिने चमकून वर पहिलं. हळुवार हात पुढे करत ते गुलाब तिने हातात घेतलं. याच क्षणासाठी आसुसलेल्या त्या नजरेने ती एकटक त्याच्याकडे फक्त पहात होती. तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं होतं. त्याचीही नजर तिच्या चेहर्‍यावरून हटत नव्हती.
“बोल ना काहीतरी.” तो तिचा हात हातात घेत म्हणाला.
ती लगेच भानावर आली, “ मीही खूप प्रेम करते तुझ्यावर.....
आय लव्ह यु टू श्रेयस ” लाजत तिने म्हटले...
त्याच्या आयुष्यातील सर्वात रोमांचित क्षण तो अनुभवत होता.
श्वासांना सांभाळत तो पूढे म्हणाला “कधी पासून?”
“पहिल्याच भेटीपासून..... ” ती म्हणाली.
त्याला आकाश ठेंगणे झालं होतं. त्याने रंगलवलेली स्वप्नं पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर होती. ती स्मितहास्य करत डोळे भरून त्याच्याकडे पहात होती.
“आपण लग्न पुढल्या वर्षी करु.” स्वप्नपूर्तीच्या दिशेने त्याने पहिलं पाऊल टाकलं “तोपर्यंत माझी डिग्री पण पूर्ण होईल आणि तुझी पण. चालेल ना तुला?”
ती नुसती त्याच्याकडे बघत होती, तिला त्याच्या चेहर्‍यावरचा आनंदाचा एकही क्षण हरवायचा नव्हता. पण दुसर्‍याच क्षणी कशाची तरी आठवण झाल्यासारखा तिच्या चेहर्‍यावर अचानक गांभिर्य आलं
“पण.. पण..”
ती खालच्या आवाजात म्हणाली.
“पण काय?”
“मी लग्न नाही करू शकणार तुझ्याशी.”
“काय?”
तिच्या या अनपेक्षीत नकाराने तो गोंधळून म्हणाला. जी स्वप्न काही क्षणांमागे पाहिली होती त्यांच अस्तित्व धोक्यात होतं.
“म्हणजे? पण प्रेम करतेस ना तू माझ्यावर?”
“हो. खुप, इतकं की कदाचितच कुणीतरी करू शकलं असेल.”
“जर, इतकं प्रेम करतेस माझ्यावर तर मग..
मग.. लग्न का नाही करू शकत माझ्याशी?”
त्याने आवंढा गिळला आणि जरा गंभीर आवजात म्हणाला
“मी गरीब आहे म्हणून, की आपली जात वेगळी आहे म्हणून?”
त्याचेही डोळे ओलावले होते.
“अस काय कारण आहे तुझ्या नकाराचं?”
तिच्या नजरेतून प्रेम ओसांडत होतं, तरी पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पहात ती स्तब्ध ऊभी होती. तिच्या डोळ्यातील आता अश्रू गालांवर ओघळत होते
“अग बोल ना काहितरी, की अजून काही वेगळं कारण आहे?”
आता मात्र त्याच्या आवाजाचा रोख चढत होता. तिच्या या अशा गप्प रहाण्याने त्याला अधीक चीड येत होती. तरीही स्वतःला सावरत तो परत एकदा प्रश्न करणार, तेव्हढ्यात ती म्हणाली “जाते मी.”
“जाते? मला हे असं कोड्यात टाकून?”
“मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवय श्रावणी”
“मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केलंय,
अँड विल ऑल्वेज लव्ह यु.”
त्याचा चेहरा आपल्या हातांमध्ये भरून घेत ती म्हणाली. तिच्या नजरेतले हे असे भाव या आधी त्याने कधीच पाहिले नव्हते.
“पण मी नाही देऊ शकत तुझ्या प्रश्नाचं उत्तर.
आणि आता मला जायला हवं खुप उशीर झालाय. मी जाते.”
म्हणत ती वळली, त्याने तिचा हात पकडून तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण त्याची पकड सोडवत पाणावलेल्या डोळ्यांनी तिची पावलं मागे मागे पडत होती.
तिच्या या अशा वागण्याने त्याच्या मस्तकाचा पारा चढत होता.
“काय अर्थ घ्यावा मी तुझ्या या अशा वागण्याचा? माझ्या प्रेमाचा असा अपमानच करायच होता तर आलिसंच का माझ्या आयुष्यात? का दाखवलीस मला इतकी स्वप्न? जी तुला कधी पुर्ण करायचीच नव्हती.
जा तू इथुन. निघुन जा.”
असं म्हणत त्याने तिच्याकडे पाठ वळवली. घडला प्रकार त्याला सहन होत नव्हता. त्याच्या चेहर्‍यावर अश्रुंची धार लागली होती.
तरी स्वतःच्या रागावर आवर घालत तिला परत एकदा समजवण्यासाठी म्हणून तो वळला, पण तिथे कुणीच नव्हतं. ती गेली होती. तो तसाच काही क्षण स्तब्ध उभा होता. तिच्या प्रेमाचा होकार मिळाला म्हणून आनंदून जावं की तिच्या लग्नाच्या नकाराने दुःखी व्हाव हे त्याचं त्यालाच समजेनासं झालं होतं. तो तसाच निराश, निर्विकार, शुन्यात नजर लावून एका दगडवर बसून राहीला.
हळू हळू अंधार वाढू लागला, शेवटी जड पावलांनी तो घरी परतला.

रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागला नाही. गेली संध्याकाळ त्याच्या डोक्यात थैमान घालत होती. मनात विचारांच काहूल माजलं होतं. ‘का केलं असावं तिने अस? मग इतक्या महिन्यांमध्ये जे आमच्यामध्ये घडत होतं ते काय होतं? मी तिला ओळखायला चुकलो का?…. नाही.. ती अशी नाही. पण मग तिचा हा असा लग्नाला नकार, काय कारण असेल? तिला कुणीतरी दुसरं…. नाही…नाही…’ त्याला मनातही या गोष्टिंचा विचार करवेना. पण तिच्या आजच्या वागण्याचं गुढ त्याला उलघडत नव्हतं. एका क्षणासाठीही या विचारांतून तो आपली सुटका करून घेत नव्हता. ती परत कधी एकदा समोर येते असं त्याला झाल होतं. परंतु दुसर्‍या दिवशी तिच्या येण्याची वाट बघेपर्यंत त्याच्याजवळ पर्यायही नव्हता.

दुसर्‍या दिवशी तो वेळेत लायब्ररीत आला, मात्र वेळ उलटून गेली तरिही ती आली नव्हती. त्याच्या जीवाची घालमेल वाढत होती. तिच्या वाटेवरून त्याची नजर क्षणासाठीही हटत नव्हती. पण ती नाही आली. पुढील ४-५ दिवस असच चालू होतं. ‘ती का येत नाहीये? का अस वागतेय ती माझ्याशी?’ त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी वाढत होती. सततच्या विचाराने तो फार हैराण झाला होता. पण त्याचा निर्णय पक्का होता, काहिही झालं तरी तिच्या नकाराचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं आणि कसही करून लग्नासाठी तिचा होकार मिळवायचाच हे मनाशी त्याने पक्कं ठरवलं होतं.

मागचा पुढचा काहीच विचार न करता त्याने सरळ तिच्या घरचा रस्ता धरला. पण आता त्याच्या समोर एक नवीन प्रश्न होता तो, अचानक त्याला समोर पाहून ती कसं वागेल याचा.
‘जर तिला माझं असं घरी अचानक येण आवडलं नाही तर, आणि तिच्या घरचे? पण माझ्याजवळ दुसरा पर्यायही नाहिये.’
जस जसं तिचं घर जवळ येत होतं त्याच्या मनावरचं दडपण वाढत होतं आणि तिला बघायची आसही. एव्हाना तो तिच्या घरी येऊन पोहोचला. बेल वाजवणार तेव्ह्ड्यात त्याचं लक्ष दारावरच्या कुलूपाकडे गेलं. काही क्षण विचार केल्यावर त्याला शेजार्‍यांना विचारून पाहणं सोईस्कर वाटलं. त्याने शेजारच्या दरवाजा खटखटवला. एका वयस्कर स्त्रीने दरवाजा उघडत प्रश्न केला. “कोण पाहिजे?”
“हे तुमच्या शेजारी राहणारे कुठे बाहेर गेले आहेत का?” त्याने श्रावणीच्या घराकडे बोट दाखवत विचारलं.
“तू कोण?”
“मी श्रेयस, श्रावणी चा फ्रेंड, ४-५ दिवसांपूर्वी ती भेटली होती, त्यानंतर लायब्ररीत आली नाही म्हणून आलो तर घर बंद.”
“काय? किती दिवसांपूर्वी?”
“साधारण ४-५ दिवसांपूर्वी.”
“तू कोणत्या श्रावणीबद्दल बोलतोयस नक्की? पत्ता बरोबर आहे ना?” त्या स्त्रीने खात्री करायला विचारलं.
“हो काकू तिनेच पुर्वी सांगितला होता मला.” त्याने विश्वासाने सांगितलं.
“तू काहितरी चुकतोयस. हे घर श्रावणीचेच आहे पण तुझी फ्रेंड श्रावणी कोणीतरी वेगळी असावी.”
“नाही काकू हाच पत्ता आहे. ती एम. ए. करतेय ना आणि रोज लायब्ररीत यायची अभ्यासाला.”
“हो पण...... पण, हे कस शक्य आहे?” ती स्त्री जरा विवंचनेत पडली.
“का? काय झालं? असं का म्हणताय तुम्ही?”
“हे घर गेले दिड महिना बंद आहे. श्रावणी आणि तिचं कुटुंब ख्रिसमससाठी गोव्याला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला, फार भिषण अपघात होता. सगळे जागीच ठार झाले. मग कशी भेटेल ती तुला?”
“ क.... काsssय?”
असं मोठ्याने ओरडत त्याने हाताच्या मुठी आवळल्या त्याचा श्वास त्याच्या कंठात अडकला, त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्या बाईचे शब्द त्याच्यावर आभाळ होऊन कोसळले होते. त्याच्या हातांनी बाजूला असलेल्या खांबाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला पण त्याची पकड निसटून तो खाली कोसळला. त्याला सावरायला ती स्त्री पुढे आली पण तो आधार नाकारत कसातरी उठून उभा राहीला... त्याला धड बोलताही येत नव्हते, तो कसातरी अडखळत बोलला,
"तुम्ही खोटे बोलताय का? .....
हे असं होणं कसं शक्य आहे?..... अहो आम्ही गेले दीड महिने झाले भेटतोय केवळ गेले चार पाच दिवस झाले ती नाही भेटली.... म्हणून तर आलोय मी.... " ती स्त्री त्याच्या कडे तो कदाचित वेडा आहे अशा नजरेने बघत होती..... ती म्हणाली "हे बघ, मला वाटतेय तुला काहीतरी भास झाला असावा, मी खरे तेच सांगितले आहे तुला.... त्यांना जाऊन आता दीड - दोन महिना होत आलाय...... आता तर त्यांचे कोणी नातेवाईक पण इथे राहत नाहीत " त्याची अवस्था पाहून त्या स्त्री ने त्याला पाणी आणून दिले... पण, तो ते नाकारून जड पाऊलांनी परत तिच्या घराजवळ आला. फाटका आडून ते बंदिस्त घर पहाताना त्याच्या पापण्या लवत नव्ह्त्या. मन सुन्न झालं होतं शरीर गोठून जावं तसा तो एका जागी खिळून उभा होता. त्या स्त्रीचे आघाती शब्द त्याचं मन स्विकारू पाहत नव्हतं, पण ते सतत परावर्तीत होऊन त्याच्या कानावर आदळत होते. एकाएकी वास्तवाची जणीव व्हावी तसा एका जोराच्या हुंदक्यासरशी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले
“श्रावणी ss….”
आणि तो ओक्साबोक्षी रडू लागला...."

“साहेब ह्या समोरच्या रस्त्याने घेऊ ना गाडी?”
टॅक्सी ड्राइव्हरच्या प्रश्नाने तो एकदम भानावर आला, डोळे पुसत त्याने होकारार्थी मान हलवली. .... "
माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली,
ती केवळ माझ्या प्रेमाच्या कबुली साठीच मृत्यूनंतर देखील परत आली होती....."
" जर त्या दिवशी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं नसतं तर…..
पण तेच ऐकायला तर तिचा जीव माझ्यात अडकून राहीला होता....
श्रावणी.... परत ये एकदाच....
" नेहमीप्रमाणे त्याच्या मनाचे तेच खेळ सुरु झाले.....

“बस, थांबव इथे.. .
” स्मशानभूमी येताच पाकिटातील पैसे काढत तो म्हणाला.
“साहेब, रीटर्न साठी थांबू का?”
“नको, मला वेळ लागतो,
भरपूर बोलयचं असत तिच्याशी.
” म्हणत तो टॅक्सीबाहेर उतरून तिच्या ग्रेव्हच्या दिशेने चालू लागला.

No comments:

Post a Comment