Tuesday 10 February 2015

पाच वाजता

   शेवटची पंगत अडीचला संपली. मी या शेवटच्याच पंगतीत होतो. माझे जेवण जास्त झाले. तसे लग्नातले माझे जेवण नेहमीच जास्त होते. दर रविवारी कोणाचे तरी लग्न असायला पाहिजे असे मला नेहमी वाटते. मी वरपक्षाच्या खोलीत आलो आणि लवंडलो. झोप येत होती पण चष्मिस किरणने लागूच दिली नाही.  गावाकडच्या गोष्टी सांगून तो मला रिझवायचा प्रयत्न करत होता. मी हं हं करत होतो. सांगता सांगता तो कधीतरी सटकला. मलाही डोळा लागला. केव्हातरी अर्धवट झोपेत मिहीर, मुक्ता येऊन मला उठवायचा प्रयत्न करून गेले. 
    चारच्या सुमारास डोळे उघडले. चहा कधी येणार, अशी कुजबूज सुरु झाली होती. कपांचा किणकिणाट ऐकू येत होता पण चहा दिसत नव्हता. या खोलीत जवळचे नातेवाईक तेवढे दिसत होते. बाकीचे पहिल्या दुसऱ्या पंगतीनंतर घरी गेले होते. या खोलीत कुणी झोपले होते, कुणी बाहेर चक्कर टाकायला गेले होते. कुणी नुसतेच जांभया देत होते. मी  बाहेर आलो. बेसिनवर जाऊन तोंडावर पाणी मारले. तेवढ्यात रोहनने मला पकडले. या रोहनला त्याच्या आईने माझ्यावर सकाळपासून सोडलेले होते. दर तासाला त्याच्या मनगटावरचा एक दोरा तरी सुटतो किंवा त्याचा करगोटा तरी तुटतो. तसे झाले की, त्याची आई त्याला माझ्याकडे घेऊन येते. मी त्याचा तो तुटलेला संसार बांधू लागलो. इथून वधूपक्ष खोलीच्या आत जे बोलणे चालले होते, ते पुसट पुसट ऐकू येत होते. मागून प्राजक्ताचा आवाज आला. हिच्याशी माझी आता चांगलीच मैत्री झाली आहे. लग्नात ओळख झाली. नात्यातलीच निघाली. काही जण म्हणतात, लांबून बहीण लागते. संजयदादाने नवी बाईक घेतली आहे आणि त्याने ती आणली आहे, हे सांगायला ती आली होती. एकदम भारी आहे, असे म्हणाली. मी तिच्याबरोबर कार्यालयाच्या खाली गेलो. तिथे मिहीर, मुक्ताही होते. मिहीर, मुक्ताशी आम्ही सकाळी लग्न लागायच्या आधी कार्यालयाखालीच थोडावेळ पकडापकडी खेळलो. फार मजा आली. संजयदादा त्याच्या भावांना बाईकबद्दल सांगत होता. आम्ही पण त्याची बाईक सगळीकडून पाहून घेतली. ‘वा, संजूदादा, आता शायनिंग ना...’ असे बरेच म्हणून झाले. तेवढ्यात मिहीरने बातमी काढली – अजून काही विडे शिल्लक राहिले आहेत. आम्ही पुन्हा वर पळालो. मला जीन्समुळे नीट पळता आले नाही. ही जीन्स तशी मी फार वेळा घालत नाही. दोनच महिन्यांपूर्वी घेतली आहे. सगळ्यांनी हळूच एक एक विडा खाऊन घेतला. लाल तोंडांनी आमची चहाडी केलीच. लगेच वंदूआत्याने प्रत्येकी एक धपाटा घातला. वंदनाआत्याला आम्ही वंदूआत्या म्हणतो. "आत्या, तुला आम्ही वंदू. तुला आम्ही वंदू" असे म्हणत तिची चेष्टा करतो. मग तीही, "अरे पाया पडायला लावीन तुम्हाला, नुसते वंदू नका मला." असे गंमतीत म्हणते. ' ए चला, चहा आला..' असे म्हणत कोणीतरी आले. दोन्ही पक्षांच्या खोलीतून सगळे बाहेर पडले. सगळ्या लोकांनी चहा प्यायला आणि काहींनी दोनवेळा प्यायला. हे जे काही लोक होते, त्यांना मी मागच्या एका लग्नातसुध्दा दोनदा चहा पिताना पाहिले होते. काहींनी बिनधास्तपणे दोनदा मागितला, काहींनी गुपचूप. मलाही दोनदा प्यायचा होता पण मी हल्ली तसे करत नाही. दुसऱ्यांदा घेताना कोणीतरी बघते आणि म्हणते, ‘दोनदा दोनदा ! अजून वेळ आहे तुला एवढा चहा प्यायला.’ पुन्हा सगळा वधूपक्ष घोळक्याने खोलीत गेला. नवऱ्यामुलीला तिघींनी ' घेतलास का गं चहा ’ असे विचारले होते.
     तिच्या चेहऱ्यावर आता सकाळचा रंग नव्हता. बाहरेची उन्हे हळूहळू कलत चालली होती.
     तितक्यात ‘गाडी आली, गाडी आली’ असा ओरडा झाला. नवरा-नवरीला नेण्यासाठी एक खास गाडी असते, तीच बहुतेक. मागच्या एका लग्नातही अशीच एक गाडी होती. या गाडीवर नेहमीच गुलाबाची फुले असतात. कोणीतरी ती छान सजवलेली असते. सजवणारा प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने सजवतो. मला असलीच एखादी गाडी गुलाब सोडून दुसऱ्याच काही फुलांनी सजवायची आहे. कोणते फूल शोभेल ? सजवायला काय कोणतेही फूल चालेल पण कोणालाही दुसरे फूल आवडणार नाही. गुलाबाची सवय झाली आहे सगळ्यांना. मी, प्राजक्ता, मुक्ता, मिहीर, चष्मीस किरण..आम्ही सगळे गाडी बघायला गेलो. हळूहळू एक एक बॅग दोन्ही बाजूंच्या खोल्यांमधून खाली येऊ लागली. मी परत वर गेलो. कार्यालयाचे व्यवस्थापक आणि वधूपक्षाच्या लोकांमधे काहीतरी बोलणे होत होते. एक एक जण तयार होऊन बाहेर पडू लागला होता. मी उगीच वरपक्ष खोलीत जाऊन डोकावले.  दोघे तिघेच होते आत. तेही निघण्याच्या तयारीत होते. मी पटकन बाहेर पळालो. मी असा खोलीत सापडलो की, कोणीतरी मला काहीतरी काम सांगते आणि ते मला अजिबात आवडत नाही. बहुतेक नातेवाईकांनी सकाळपासून माझी चौकशी केलेली होती. अशा वेळी एखादा कोणीतरी राहिलेला येतो आणि चौकशी करतो. आत्ताही असाच एक जण आला आणि खूप प्रश्न विचारले. लोकांची धावपळ चालली होती. ' काही विसरलं का बघा रे...' असे जवळजवळ प्रत्येकजण म्हणत होता. अगदी मोजकेच लोक इथे कार्यालयात राहिले होते. वरपक्षाचे काही आणि वधूपक्षाचे काही. संपूर्ण दिवसभर त्या वधूपक्षाच्या खोलीतले आवाज मोठे असतात. संध्याकाळी मात्र ऐकू येईनासे होतात. संध्याकाळी त्या खोलीचे काहीतरी वेगळे होते. नवरीमुलगी  बाहेर आलेली होती आणि एका घोळक्यात थांबलेली होती. कुणाच्या तरी खांद्यावर तिचे डोके होते. भोवताली चार-पाच बायका होत्या. बरेच रुमाल पर्सेसमधून बाहेर पडलेले होते. कार्यालयातल्या जेवायला वाढणाऱ्या बायका, झाडणारे मुलगे सगळे पाहात होते. त्यांना जवळजवळ रोजच हे दृष्य पाहावे लागते तरीसुध्दा दर संध्याकाळी तितक्याच तन्मयतेने ते हे दृष्य पाहात असतात, याचे मला नेहमी आश्चर्य वाटते. 
    "वरद, काय बघतोस ?" मी जवळ आलेल्या प्राजक्ताकडे पाहिले. 
     कोणास ठाउक, किती वेळ मी पाहात होतो. मलाही आईची हाक ऐकू आली. जाण्यापूर्वी मी त्या रिकाम्या कार्यालयातल्या जमिनींकडे पाहिले. अक्षता, फुले, दोरे असे पसरले होते. भिंतीवरच्या घड्याळात पाच वाजायला काही वेळच बाकी होता. खाली आलो. गाडीत सगळे आपापल्या जागा पटकावून बसले होते. नवरी मुलगी म्हणजे माझ्याच एका भावाची बायको. माझी वहिनी. आज त्याचे तिच्याशी लग्न झाले. ती खाली आली. ते दोघे त्या गुलाबाच्या गाडीत बसले. ती आता काचेच्या आत होती आणि तिच्या माहेरचे लोक काचेबाहेर. ते सगळे चूपचाप पाहात होते. मी इकडचा होतो तरीही मला त्या  लोकांकडे पाहून  कसेतरी झाले. इकडचेही दिवसभर खिदळणारे लोक आत्ता शांतपणे पाहात होते. सकाळी नाश्त्यापासून संध्याकाळचा चहा घेईपर्यंत लग्नाला आलेले सर्व लोक आनंदात असतात. त्यापैकी काही लोक पाच वाजता दुःखी होतात. एरवीही पाच वाजतात पण कार्यालयात वाजलेले पाच फार चमत्कारिक असतात. यावेळी कार्यालय सोडावे लागते आणि ही लग्न झालेली मुलगी जुन्या लोकांना सोडून काही नव्या लोकांबरोबर चाललेली असते.  
     "काय वरद, तुमच्या वर्गात मुलीबिली आहेत की नाही"
     "असणार, असणार."
     " असल्या तरी तो थोडीच सांगणार आहे तुम्हाला ?"
     गाडीत सगळ्यांनी माझी चेष्टा करायला सुरुवात केली.
     आईने सगळ्यांना दटावले, "ए, चावटपणा बास करा रे. इतक्यात काहीही शिकवू नका त्याला, आत्ता कुठे तो नववीत गेलाय."   
     काही मिनिटातच गाड्या सुटणार होत्या. सहा वाजता कार्यालय बंद होणार होते. आणखी काही दिवसांनी पुन्हा एक लग्न होणार होते आणि त्याही दिवशी संध्याकाळचे पाच वाजणार होते.  

No comments:

Post a Comment