Thursday 22 January 2015

"बायको"........


"बायको"
तिचं आपल्या आयुष्यात येणं,
किती किती सुखद असतं..
या नात्याला श्वासांशिवाय,
दुसरं कुठलंच नाव नसतं...
एका सुंदर क्षणी आपल्या,
घरामध्ये येते "ती"...
तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला,
भेट म्हणून देते "ती"...
किती सहज बनवत जाते,
ती प्रत्येकाशी नातं....
बघता बघता अनोळखी घर,
तिचंच बनून जातं....
सुखामध्ये दुःखामध्ये,
'ती'च सोबत असते ना..
सगळं सहन करून ती,
तुमच्यासाठीच हसते ना...?
सकाळपासून रात्रीपर्यंत,
राबत असतात तिचे हात...
सासू-सासरे, मुलं, घर..
सतत असतं तिच्या मनात...
चहा, दूध, नाष्टा, डबे,
आंघोळीला गरम पाणी...
प्रत्येकाची करून कामे,
तिची मात्र मधाळ वाणी....
सगळ्यांत शेवटी झोपते ती,
सगळ्यांच्याही आधी उठून...
दिवसभर राबण्यासाठी,
ताकद एवढी आणते कुठून...?
घरामधलं सगळं आवरून,
कामांसाठी बाहेर पळते....
घरामध्ये नसते तेंव्हाच,
तिची खरी किंमत कळते...
घर होतं अस्ताव्यस्त,
घरामध्ये नसते जेंव्हा....
तिच्याशिवाय व्हायचं कसं...?
मनात आपसूक येतं तेंव्हा...
म्हणूनच ती परत येते,
घरामध्ये पदर खोचून....
बोलून दाखवते मलाच ती,
वरती हे टोचून टोचून...
की, "मी म्हणून टिकले..., दुसरी
केव्हाच गेली असती पळून....
माझे महत्त्व येत नाही,
अजून कसे तुम्हांला कळून...?"
राग-लोभ, रुसवे-फुगवे,
उणी-दुणी, मानपान...
प्रत्येकाला घेते समजून,
जुळवून घेते कित्ती छान...
थकूनभागून आल्यावर ती,
हसून, चहा देते आणून...
दिवसभराचे आपले कष्ट,
अलगदपणे घेते जाणून....
सगळं भांडण विसरून जेंव्हा,
घराशी ती एकरूप होते...
घर तिचंच होऊन जातं,
जेंव्हा ती कुशीत घेते.....
आयुष्यभर उपयोगी पडतं,
नेहमी तिचंच संसारी धोरण....
म्हणून प्रत्येक घरात सजतं,
"बायको" नावाचं मखमली तोरण....
ती आहे म्हणून आहे,
आपल्या घरादाराला किंमत....
तिला विरोध करण्याची इथं....
कुणात आहे हिंमत....?
कुठून येतात आयुष्यात आपल्या,
इतक्या समजूतदार मुली.....?
उगाच नाही म्हणत...
" घरोघरी मातीच्याच चुली...!!!"

क्षणांचीही साथ नव्हे,
साताजन्मांची ही सोबत असते....
"नवरा" आयुष्यभर "नवरा"च राहतो,
"नवरी मुलगी" मात्र "बायको" बनते....




प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता
.......... 
("चांदणझुलामधून... )

Saturday 3 January 2015

सुख दुखतंय...!!!

निवांत बसण्याच्या एखाद्या क्षणी मन उगाचच काहीतरी विचार करत राहतं.
इच्छाही नसते खरंतर. पण त्या विचारांच्या स्पीडशी आपण मॅच नाही करू शकत
स्वतःला.. फरफटत जात राहतो. एक वेगळंच युद्ध चालत राहतं आपलं. कुठल्या
कुठल्या आठवणी सगळं सावरलेलं आवरलेलं उस्कटून विस्कटून टाकत दात विचकटत
आपल्याभोवती पिंगा घालत राहतात..

आजच का व्हावं असं? बरं चाललंय की सगळं. घरी-दारी, शेजारी- पाजारी सगळं
उत्तम आहे. हसरं घर आहे, जिवाचे जिवलग आहेत, मायेची माणसं आहेत...
तरीसुद्धा ही टोचणी कशाची? अपूर्णतेची ही जाणीव का म्हणून? चला.. बास
झालं.. एका वेळी ठरवून एकाच गोष्टीवर विचार करायचा... सतरा भुंगे एकत्र
नकोत.. पण नाही.. माझा हट्टीपणा मनात आलाय की काय आज?? मी सांगितलेलं
काहीच ऐकत नाहीये ते.. मी वेड्यासारखी हताश होतेय त्याचा हा चमत्कारिक
अट्टाहास बघून...

काय बरं सांगत होते मी... पाहिलं, हे असं करतंय मन... आता इथे तर लगेच
कुठे भलतीकडेच... किंवा गायबच अचानक... एखाद्या थंड शिखरावर वगैरे बसतंय
जाऊन... ढोंगी... आगाऊ... आत्ता मी रडवेली झाले न, की मग त्याचा जीव
भांड्यात पडेल... काय करणार आपण तरी.. स्वभाव असतो एकेकाचा..
स्वभाव??? कोणाचा स्वभाव?? मनाचा??? माझ्या मनाचा?? म्हणजे माझाच न??
नाही पण.. मी कुठे असं वागते? मला नाही आवडत कोणाला उगीचच रडवायला!! मग
कोणाचा स्वभाव आहे हा?? आणि तो माझ्या मनाचा कसा झाला?? कुठून आला तो
त्याच्यापाशी? म्हणजे माझं मन मला न सांगता असं एकटच फिरायला जातं??

भरकटत भरकटत भलभलत्या माणसांना भेटतं; आणि मग त्यांचे स्वभाव घेऊन येतं??
एक एक एक मिनिट.. मला नक्की वाईट कशाचं वाटत होतं?? पुन्हा विसरले मी...
मळभ आलं होतं म्हणून?... हं.. आठवतंय थोडं थोडं.. गळ्यापर्यंत काहीतरी
आलंय, श्वास अडकेल की काय असं वाटतंय.. आपलं सगळं चुकतंय.. वागणं
चुकतंय.. दिसणं चुकतंय, हसणं चुकतंय, बसणं चुकतंय.. कदाचित, कदाचित
‘असणंच’ चुकतंय.. पुन्हा एक उसासा!!! एक अश्रू सुद्धा.. आतून खराखुरा
उमाळा येतोय... काय करावं?? कधी कधी स्वतःच स्वतःची समजूत नाही काढू
शकत.. पुरे नाही पडू शकत आपण..

तेवढ्यात बाजूचा फोन वाजतो.. ओळखीचं एखादं नाव स्क्रीन वर फ्लॅश होतं..
रडता रडता आपल्याच नकळत हसतो आपण.. तो एकच आवाज ऐकून इतका वेळ भयभय
करणारं येडपट मन शांत होतं एकदम.. मळभ दूर जातं जातं...आणि पाऊस कोसळायला
लागतो, झिम्माड... आपले उमाळे, उसासे समजून घेत फोनवरचा तो आवाज
गालातल्या गालात हसतो हलकेच...आणि हळुवारपणे म्हणतो..."काही नाही...तुला