Tuesday 5 April 2016

गरज नाही


डॉ. रुईकर ह्या प्रिन्सिपॉल होत्या. समोर बसलेल्या काव्याच्या वडिलांना त्या कोर्सची माहिती देत होत्या. काव्याही उत्सुकतेने ऐकत होती. काव्याचे वडील एका स्मॉल स्केल युनिटचे मालक होते. आर्थिक परिस्थिती उत्तम होती.
"काय आहे मॅ'म, ग्रॅज्युएशन नंतर हा कोर्स करण्याचे कारण हे आहे की काव्या बिझी राहावी. प्लस तिला त्यातून काही चांगले शिकता आले, ज्याचा पुढे काही फायदा झाला, यू नो, म्हणजे .... काही प्रोफेशनली करता आले तर.... असे बघतोय आम्ही. हा जमाना मल्टिटास्किंगचा आहे तुम्हाला माहीतच आहे. माणसाला वेगवेगळ्या गोष्टी यायला हव्यात असे मी मानतो. त्यामुळे त्या दृष्टीने काही सुचवलंत तर.... म्हणजे.... ते तिला उपयोगीही पडेल आणि तिचा वेळही.... यु नो.... सत्कारणी लागेल"
"शुअर शुअर! मी अ‍ॅक्च्युअली म्हणूनच हा कोर्स सांगतीय तुम्हाला! ह्यात खरे तर एका विशिष्ट विषयाचे किंवा शाखेचे असे सिलॅबस नाहीये. वेगवेगळे विषय आहेत. पार्ट ऑफ धिस, पार्ट ऑफ दॅट! इन फॅक्ट हा कोर्स केल्यानंतर पर्सनॅलिटीमध्ये फार पॉझिटिव्ह फरक पडतो. कॉन्फिडन्स वाढतो. कारण विशिष्टच शाखेच्या अभ्यासामुळे पर्सनॅलिटीवर एक परिणाम झालेला असतो. आता तुम्ही बघत असाल की कॉमर्सची मुले यूझ्वली कोणत्याही घटनेमधील अर्थकारण आधी बघतात. सायन्सची मुले सहसा असे दिसेल की लॉजिकली विचार करण्याचा प्रयत्न करतात. हे वाईट अजिबात नाही. पण एकाच प्रकारची पर्सनॅलिटी होणे हे थोडेसे लिमिटेशन आहे. वन शूड नो बेसिक हिस्टरी, सायन्स, मॅथ्स, लँग्वेजेस, सॉफ्ट स्किल्स आणि बरेच काही काही! इव्हन ह्याचा उपयोग इन्टरव्हिव्ह देतानाही खूप होतो. मी सांगते ना, आमच्याकडच्या सगळ्या मुली प्लेस होतायत गेली तीन वर्षे सलग! ८०% तर कँपसलाच"
"नाही नाही, एक मिनिट, आय बिलिव्ह तुमच्याकडची प्लेसमेन्ट ही बेसिक ग्रॅज्युएशनवर बेस्ड असते, होय ना?"
"ऑफ कोर्स! ते ग्रॅज्युएशन आहे म्हणूनच आम्ही कंपनीजना इन्व्हाईट करू शकतो. पण त्यानंतर हा कोर्स केलेला असल्याने एन्ट्रीच्या बेसिक लेव्हल्स मुली सहज पार करतात. त्यामुळे प्लेसमेन्ट ही निव्वळ ग्रॅज्युएशन देऊ करणार्‍या कॉलेजेसपेक्षा संख्येने आणि दर्जाने, दोन्हीने चांगली असते. वुई आर डीलिंग विथ द बेस्ट एम्प्लॉयर्स इन द इन्डस्ट्री!"
"दॅट इज फाईन मॅ'म, पण समहाऊ आय अ‍ॅम नॉट कन्व्हिन्स्ड!"
"सी वुई हॅव मेनी अदर कोर्सेस. यू कॅन चूझ एनी वन ऑफ देम. पण हा खास मुलींसाठी डेव्हलप करण्यात आलेला कोर्स आहे."
"खरं सांगू का? मला नीट क्लॅरिटीच आलेली नाहीये"
"ओके. हे सिलॅबस! तुम्ही जर बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की सायन्स, मॅथ्स, लॅन्ग्वेजेस, हिस्टरी आणि पर्सनॅलिटी डेव्हलप्मेन्ट, सॉफ्ट स्किल्स, आर्ट अश्या सर्व फिल्ड्समधील बेसिक्स ह्यात पक्की करून घेण्यात येतात. किंबहुना, मी तर म्हणेन की आयुष्याची निश्चीत दिशा ठरवायला हा दोन वर्षांचा कोर्स सुटसुटीत आणि उपयोगी ठरतो. आपला कल कोणीकडे आहे, ह्यापुढे काय करता येईल हे नीट समजू शकते"
"आय....आय डोन्ट गेट यू! ती ह्यानंतर काही करणार नाही आहे. शी विल बी एन्गेज्ड अ‍ॅन्ड विदिन मन्थ्स शी वूड गेट मॅरिड"
"हो पण लग्नानंतर ती काहीतरी करेलच ना?"
"हां म्हणजे तो तिचा निर्णय असेल! तिचा आणि तिच्या नवर्‍याचा! हा हा! आम्ही काय सांगणार?"
"मिस्टर ओम, आमच्या इथल्या मुलींचे करिअर लग्नानंतरच सुरू होते कारण बहुतांशी मुली त्यांच्या लग्नाच्या वयाच्या असतानाच इथे अ‍ॅडमिशन घेतात. आय अ‍ॅम शुअर, तुमच्याही मुलीला लग्नानंतर काही नुसते बसायचे नसेल"
"नाही नाही, ती काहीतरी नक्कीच करेल, पण ...."
"तेच म्हणतीय मी, ती जे करेल ते काय असायला हवे हे ह्या कोर्समधून समजेल"
"नाही पण आत्ताही तिच्या आवडीनिवडी आहेतच की? डान्स आहे, फ्रेंच लँग्वेज आहे, बॅडमिन्टन आहे"
"हो बरोबर, पण...."
"एक मिनिट मॅ'म, एखाद्या विशिष्ट प्रोफेशनकडे कल असलेली अशी मुलगी सासरी धाडून आम्ही किंवा ती काय मिळवणार आहोत? शेवटी ती आणि तिचा नवरा जे काय ठरवतील तेच महत्त्वाचे असणार ना? आमचा आत्ताचा हेतू केवळ ती बिझी राहावी आणि जमल्यास काहीतरी प्रोफेशनल डिग्री मिळावी इतकाच आहे"
"हो मग ते तर शक्य आहेच की? इतर कोर्सेस जे मी दाखवले ते प्रोफेशनलच आहेत. त्यातही प्लेसमेन्ट आहेच."
"बट दे आर टू डिमान्डिंग"
"म्हणजे?"
"म्हणजे वेळ, पैसा, येणे जाणे, अटेन्डन्स, प्रॅक्टिकल्स, आऊट डोअर प्रोजेक्ट्स वगैरे"
"वेल, प्रत्येक कोर्सचे तुम्हाला काही ना काही फायदे आणि काही तोटे वाटणारच"
"ठीक आहे. आम्ही चर्चा करतो घरी, एक दोन दिवसात सांगतो"
"ओह येस, शुअर, प्लीज टेक यूअर टाईम"
वडिल जायला उठले आणि काव्याने प्रथमच तोंड उघडले. तिने थेट रुईकरांनाच विचारले.
"मॅ'म, कोणत्या प्रकारच्या मुली ह्या कोर्सला येतात सहसा?"
काव्याच्या चेहर्‍यावरील कुतुहल पाहून वडिलांना पुन्हा बसावे लागले. रुईकर मॅडम म्हणाल्या:
"पहिली गोष्ट म्हणजे, हा एखादा सबस्टँडर्ड कोर्स आहे असे समजू नकोस. हा खरे तर अतिशय अवघड कोर्स आहे. ह्यातून पुढे गेलेल्या मुलींमधील फरक आम्हाला ठळकपणे जाणवलेले आहेत. इतकेच काय, ड्युरिंग द कोर्सही त्यांच्या आचार-विचारात फरक पडत जातात. आता हेच बघ, ह्या तिसर्‍या सेममध्ये क्रिटिकल थिंकिंग, इन्डिपेन्डन्ट थिंकिंग, डिसीजन मेकिंग हे असे जे विषय आहेत ते शिकवायला बाहेरून तज्ञ येतात. तिसर्‍या सेमनंतर आमच्या मुलींच्या वागण्यात आम्हाला चक्क खूपच पॉझिटिव्ह फरक जाणवतो:
पुन्हा काव्याचे वडील मध्ये पडले. सौम्य पण ठाम स्वरात ते म्हणाले:
"आय हॅव अ प्रॉब्लेम विथ दॅट इटसेल्फ! मुलींच्या विचारसरणीत पॉझिटिव्ह फरक पडणे हे चांगलेच आहे. पण हे क्रिटिकल थिंकिंग, इन्डिपेन्डन्ट थिंकिंग वगैरे हे नेमके काय प्रकार आहेत? माझ्या मुलीला एका जोडीदाराबरोबर सहजीवन जगायचे आहे. कोणताही निर्णय असा स्वतंत्रपणे, एकटीच्याच मताने घेण्याची परिस्थिती तिच्यावर ओढवणार नाहीये. लग्नाआधीपर्यंत आम्ही दोघे तिच्या सोबतीला आहोत आणि लग्नानंतरही आम्ही दोघे प्लस तिचा नवराही आहे"
"तुम्हाला असे वाटते की तिच्या सोबतीला कोणीतरी कायम असणे बरे हेच चुकीचे आहे मिस्टर ओम! ती स्वतः परीपूर्ण असायला हवी असा ह्या कोर्सचा हेतू आहे"
"हो पण सासरी जाऊन हे असे स्वतंत्र विचारसरणीने वागणे वगैरे आम्हाला...."
"स्वतंत्र विचारसरणी म्हणजे नेहमी मतभेदच असतात असे नाही. पण निदान आपले विचार हे तर्कसुसंगत आणि व्यवहारी असायला हवेत ना? कोणावर कोणत्या वेळी काय परिस्थिती ओढवेल हे थोडीच सांगता येते?"
"अहो ते बरोबर आहे मॅडम पण आता काय बोलू ह्याच्यावर? आम्ही, म्हणजे तिचे आई वडील समर्थ आहोत तिचे सगळे करायला"
"आपण तुमच्य अमुलीला समर्थ करायचे आहे, तुम्ही समर्थ आहात म्हणून मुलीला दोन वर्षे कुठेतरी चिकटवायचे आहे असे नाही ना?"
"ते ठीक आहे हो, पण स्वतंत्र विचारसरणी झाली आणि वैवाहिक आयुष्यात मतभेद व्हायला लागले तर काय?"
"ते तसेही होऊ शकतातच की?"
"हो पण त्याला आणखी एक कारण का निर्माण करायचे?"
"कारण हे कारण निर्माण करतानाच तुमची मुलगी आत्मविश्वासाने काही योग्य आणि लाँग टर्मसाठी उचित असे निर्णय घेऊ शकण्यास समर्थ होते"
"अपब्रिंगिंगमध्ये ह्या बर्‍याचश्या गोष्टी कव्हर होतातच की?"
"नाही होत, अगदी कोणत्याही स्तरातील मुले मुली पाहिली तरी ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत तश्या कव्हर होत नाहीत. हा कोर्स डिझाईन करण्यामागे तज्ञांनी प्रचंड विचार केलेला आहे."
"ठीक आहे, आम्ही सांगतो विचार करून"
एकमेकांना अभिवादन करून ओम आणि काव्य हे दोघे रुईकरांच्या केबीनमधून बाहेर आले.
गाडीतून घरी जाताना काव्याला तिचे वडील सांगत होते.
"काही नाही ही सगळी ह्या लोकांनी काढलेली नवी नवी फ्याडं आहेत. एक सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्टचा कोर्स केला की इट इज इनफ! हे फी घेऊन मोकळे होणार आणि मुलींना अर्धवट वयातच स्वतंत्र विचारसरणी वगैरे शिकवणार! म्हणजे आई वडिलांनी शिकवलेले गेले कुठेच! क्काय? त्यात मुलींचा प्रॉब्लेम म्हणजे लग्न करून आणखी तिसर्‍याच कल्चरमध्ये जायचे असते. तिथले सगळे वेगळेच असते. तिथे ना ह्यांचा कोर्स उपयोगी ना माहेरची शिकवण! तिथे काय उपयोगी पडेल तर ऐनवेळी सून पैसे कमवून आणू शकेल की नाही हा मुद्दा! आणि असा लक्षणीय वगैरे फरक म्हणजे काय पडतो म्हणे मुलींमध्ये ह्या कोर्समुळे? ते काय मेझरेबल थोडीच आहे? कोर्स जॉईन करण्यापूर्वी ह्या मुलीचा कॉन्फिडन्स तीस युनिट्स होता आणि तिसर्‍या सेमिस्टरनंतर तो सेव्हन्टी फाईव्ह झाला वगैरे? ज्या मुलींना एकटेच राहायचे आहे, लग्नच करायचे नाही आहे वगैरेंसाठी ठीक आहे"
काव्याला वडिलांचे विचार पटत होते. ती होकारार्थी मान हालवत होती. तिला ते विचार पटतील अश्याच पद्धतीने तिला वाढवले गेलेले होते.
डिप्लोमा इन लिबरल आर्ट्स हा कोर्स जॉईन न करून त्यांनी स्वतःचे जेवढे नुकसान करून घेतले असेल त्यापेक्षाही जास्त नुकसान त्यांनी त्या कोर्सवर एकमेकात चर्चा करताना टीका करून, करून घेतलेले होते. कारण ह्या टीकेतून काव्याचे आणि तिच्या वडिलांचे तेच तेच विचार त्यांच्याच मनात पुन्हा पक्के होत होते जे चुकीचेही असू शकतील ह्याची त्यांना कल्पनाच नव्हती. काव्याने तर मनात ठरवलेलेही होते की मैत्रिणींना सांगायचे. 'नवीन कोर्सच्या नावाखाली स्टुडन्ट्सना जॅक ऑफ ऑल ट्रेड्स करून वाया घालवण्याचा प्लॅन आहे नुसता, पैसे वाया जातील त्या कोर्सला गेलीस तर'!
नवीन विचारांना क्षणभरही मनात स्थानही न देणारे लोक हे कितीही संपन्न असले तरी प्रत्यक्षात मागासच समजले जायला हवेत.
===========

No comments:

Post a Comment