Tuesday 1 July 2014

एक सॉरी.................





बसमधून उतरता उतरता तो बोलला.....
"सॉरी..माफ करा....जे काही झाले ते मुद्दाम नाही केले मी."
"सगळेच पुरुष सारखेच तुम्ही....बेशरम...बाई दिसले कि आले लांडगे धावत."
हे काल घडले.
"अहो सौभाग्यवती..लक्ष कुठे आहे तुमचे?इतक्या कुठे रमलात तुम्ही?"
"काही नाही हो....असंच....बसले होते शांत."
आता यांना कसे सांगू कि, माझ्या मनात काय चाललंय ते.समजून घेतील का ते?
'बायकोचा मित्र आणि नवऱ्याची मैत्रीण' हि दोन असून नसलेली नाती आहेत.ज्यांना कधीच समाज मान्य करत नाही.
समाजच काय तर...?आपणही कधी मान्य करत नाही...करणार नाही.
कालचा काल आपल्याला कालच विसरता का येत नाही? असा कसा पाठलाग करतो तो आपला?
काल तो भेटला....भेटला कसला?...दिसला...तो प्रसंग घडला...सॉरी बोलला नि गेला....
पण तो खरंच गेला कि अजून हि मागे तसाच बाकी आहे?
अनोळखी माणसं हि एकदम अचानक अशी ओळखीच्या माणसापेक्षा जास्त जवळची कशी वाटू लागतात?
जवळ जवळ बसूनही जवळ असतो का आपण?कि असेच दूर भटकत असतो आपण ?
एखाद्या प्रसंगातल्या काही क्षणांच्या भेटीमधले काही क्षण अख्या आयुष्यातल्या सर्व क्षणांवर अश्या कुरघोडी कशी करतात?
एखादी नवीन आवड आपल्या जुन्या आवडीला आपल्यापासून दूर करते का ?
एकाच वेळी दोन गोष्टी नाही आवडू शकत का माणसाला?
श्या....उगाच घडला कालचा प्रसंग.कोण तो?कुठुन आलेला..?माझ्याच समोर उभा का राहिला.?
वाऱ्याने माझाच पदर का उडवावा?उडवावा तो उडवावा...वर तेव्हाच त्याचे लक्ष माझ्याकडे का जावे?
चला गेलेच लक्ष...मला कळलेय कि तो बघतोय...हे कळल्यावर त्याने नजर हि फिरवली....
फिरवली तिथपर्यंत ठीक होते.पण माझा रागावलेला चेहरा बघून हि त्याने मला सॉरी बोलायची हिंमत दाखवावी???
आणि असा न आवडलेला प्रसंग असूनही तो विसरून न जाता मी तो सारखा सारखा का आठवावा?????
श्या.....झोप येणार कि नाही आज???अजितला कळले तर काय वाटेल त्याला?
आपल्या आवडत्या गोष्टीकडे आपले कितीही दुर्लक्ष झाले तरी चालते.....
पण आपल्या आवडत्या गोष्टीचे आपल्याकडे झालेले दुर्लक्ष आपल्याला कधी हि सहन होत नाही.
आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये आलेले भागीदार आपले मित्र बनणे कठीणच असते....बनलेच तर त्यात समजूतदारपणाचा खोटा आव आणावा लागतो.
एकदम लांबचे उदाहरण कशाला????
आपली बायको आपल्यापासून आपल्याच मुलामुळे लांब गेलीय हे पुरुष कसे सहन करतो हे त्याचे त्यालाच माहित.
माझे खूप प्रेम आहे अजितवर...तो हि खूप जपतो मला....
पण का माहित नाही बसमधला तो जो कुणी होता तो डोक्यातून जातच नाहीयेय माझ्या.उद्या पुन्हा दिसेल का तो??
उद्या नाही....नंतर कधी तरी दिसेल का?"
दोन-तीन दिवस तसेच गेले...पण अस्मीला तो काही दिसला नाही...पण तिसऱ्या दिवशी मात्र....
"तोच आहे का तो???होय...तोच...तोच आहे तो...तसा दिसायला ठिकठाक आहे....एकदमच काही बव्लात नाही दिसत...सर्वसाधारण दिसतो.
कपड्यावरून कमावत असेल चांगला असेही वाटतेय. असो ना? मला काय करायचंय?... त्यादिवशी खूप राग आला त्याचा...पण आज काहीच वाटत नाहीयेय.
बोलावसं वाटतंय त्याच्याशी...पण असं कसं बोलणार...अरे.....तो चक्क हसला माझ्याकडे बघून...तो हसला....पण मी हि का म्हणून त्याला हसून साद द्यावी?...हे काय होतंय मला..."
अस्मी मनातल्या मनात धावत होती...कारण माहित नव्हतं....थांबवता येत नव्हतं...
थोड्या दिवसांपूर्वी ज्याचा प्रचंड राग आला होता...आज त्याच्याच बाजूला अस्मी बसली होती.
पण दोघांमध्येही अंतर होते...त्या मधल्या अंतरात 'संस्कार' बसले होते....
"श्री....मला एक सांगशील...?
एखाद्या दिशेने धावत गेलं कि बाकीच्या दिशांकडे पाठ होते...पण दोन्ही दिशा हि जवळ हव्या असतील तर...?
दोन माणसं पुरतील इतकी जागा नसते का रे मनात ? कुणी दुसरा आवडला म्हणजे पहिल्यावर अन्याय केला असे असते का रे?
'लग्न झालं म्हणजे माणूस कधी पुन्हा प्रेमात पडूच शकत नाही' असे असते का? सांग ना रे श्री...
मी अजितला फसवतेय का रे...? पण आपण कधी आपली मर्यादा नाही सोडलीय...
सांग ना लवकर....बस येईल आता...पुन्ह हे सगळे विचारायला एकांत मिळेल कि नाही शंकाच आहे."
"सांग ना रे श्री...चुकतेय का मी...?"
"तू माझ्यासोबत येशील?? पळून जावूया का आपण? माझ्याकडे तिकीट पण आहेत बँगलोरची..."
"म्हणजे?"
"इतके कठीण वाक्य बोललो का मी? तुला प्रश्न नाही कळला? कि कळला पण ऐकलेल्यावर विश्वास नाही पटला"
अस्मी दचकली...अचानक घडले कि हे असंच होतं...रोजची हवा पण अनोळखी वाटू लागते.
"नाही येऊ शकत मी.माझे अजितवर खूप प्रेम आहे"
"आणि माझ्यावर?"
"माहित नाही..."
"छान.....प्रेम नाहीयेय मग तू इथे माझ्या बाजूला यावेळी का बसली आहेस?"
"माहित नाही...."
श्रीच्या डोळ्यांत पाणी होते...अन चेहऱ्यावर हसू होते...'कोल्ह्याचे लग्न' लागले होते...उन्हात पाऊस पडतो ना...अगदी तसे..
"अस्मी....तुझ्या या माहित नसण्यातच उत्तरं लपली आहेत.... तुझी पण आणि माझी पण...
तू हलके केलेस मला....तुझे उत्तर 'हो' असे असते ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो.
विचित्र होती ना आपली भेट?तुझा पदर ढळला होता..एक पुरुष म्हणून मी तिथे पाहिले....
तुझ्या ते लक्षात आल्यावर तू पदर ओढून घेतलास हि तुझी शालीनता होती.माझी चूक मला कळली नि मी नजर फिरवली हा माझा सभ्यपणा होता.
पण तरीही तुला सॉरी बोलावं असं मनापासून वाटलं मला.तुझ्या ढळत्या पदरापेक्षा तुझ्या सावरत्या पदरामुळे आवडलीस तू मला."
"श्री....रडू नको...माफ कर मला..."
"त्या दिवसापासून खूप स्वप्नं पाहीली मी तुझ्यासोबत...स्वप्नात तू दिसलीस पण नंतर नजर तुझ्या गळ्यातल्या मंगळसुत्रावर गेली....
आणि स्वप्नांचा बंगला पत्याच्या घरासारखा तुटला....आपलीच स्वप्नं कधीकधी आपल्या मालकीची नसतात.
एकवेळ अशी आली कि, वाटू लागलं....तुझा हात धरावा आणि पळून जावं.
मी विचार केला,वाटले कि.....तुझ्या आणि माझ्यामध्ये तुझे मंगळसूत्र येतंय....
पण नंतर कळलं कि, तुझ्या आणि तुझ्या मंगळसूत्राच्या मध्ये मी येतोय.
थोडा वेळ विचार केला,अजितच्या जागेवर उभं राहून पाहिलं...सहन नाही झालं...
संपूर्ण आयुष्यात माणूस खूप स्वप्नं बघतो, त्यातली काहीच स्वप्नं पूर्ण झालेली पाहण्याची संधी त्याला मिळते.
पण स्वतःच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या या स्वप्नांचा चुराडा झालेला कसा बघवेल त्याला..?
आयुष्यात इतकी माणसं येतात, पण एखादाच मनाला वेड लावतो.एखाद्यामुळेच आपल्याला जगणं आवश्यक वाटू लागतं.
आणि असा काळजाचा तुकडा आपण हिरावून न्यायचा....का? कशाला ?...कुणी हक्क दिलाय आपल्याला हे करायचा?"
"आता या क्षणी तुला खूप राग येत असेल ना रे अजितचा आणि माझा?"
"अस्मी या डोळ्यांत पाणी आहे...त्या पाण्याने तू मला अंधुक दिसतेयस...पण म्हणून या पाण्याचा राग कसा करू मी?
पाणी हि माझं आणि डोळ्यासमोरची तू हि माझी.....सॉरी....वाक्य चुकलं....माझी नाहीस तू...
हे मन किती विचित्र असतं ना अस्मी?
मला तू हवी आहेस...पण तुला माझं बनवताना मी दुसऱ्या कुणाचा तरी हक्क कसा हिरावून घेऊ?
तुझा हात माझ्या हाती यावा म्हणून मी दुसऱ्या कुणाचा हात मोकळा कसा करू ?
तू हवी आहेस मला..खूप खूप हवी आहेस...आकाशाकडे बघ किती जागा आहे????मोजता येतेय का? डोळ्यांत मावतंय का आकाश?इतकी हवी आहेस तू मला.
त्रास होतोय खूप....दूर सारताना तुला...पण तू माझ्या हक्काची नसताना हि मला इतका त्रास होऊ शकतो तर, तुला गमावल्यावर अजितचे काय होईल?
काय त्याची चूक....?इतकीच ना कि तो तुझ्यावर खूप प्रेम करतो????....
प्रेमाच्या बदल्यात प्रेम फार कमी वेळा मिळतं...तुला मिळालं हे तुझं भाग्य समज.
मनातल्या मनातच मनाची फुट पडली तर कुठे जायचं माणसाने?
एक मन सांगतंय कि, तुला घेऊन जावं कुठे तरी दूर....संसार थाटावा.पण तेच मन हेही सांगतंय कि,
'स्वत:च्या घरात तुळस लावण्यासाठी दुसऱ्याच्या वृंदावनातली माती काढायची नसते.
पावित्र्य देण्यात असतं, मिळवण्यात असतं...पण हिसकावण्यात नसतं.'
चल अस्मी. मी जातो.'येतो' असे नाही म्हणणार मी. कारण आता यापुढे मी तुझी आयुष्यात कधीच नाही येणार.
मी बँगलोरला जातोय..कायमचा ..एकटाच....मी एकच तिकीट काढले होते...
तू 'हा' बोलली असतीस तर माझी निवड चुकली असे समजून हरून गेलो असतो
आणि 'नाही' बोललीस तर निवड योग्य ठरली असे समजून जिंकून गेलो असतो...पण एकटाच गेलो असतो हे मात्र नक्की.....
प्रत्येक युद्धात ज्याची त्याची जिंकण्याची व्याख्या वेगळी असते.....
तू जिंकवलंस...मलाही आणि अजितला हि....बघ ना..अजित इथे नसूनही तू त्याची बाजू संभाळतेयस...त्याची बाजू लढवतेयस....
आपलं खरं अस्तित्व आपण नसताना असतं....
काळजी घे स्वत:ची आणि अजितची...तू दिलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मनापासून आभारी आहे..."

श्री जात होता....ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती.
श्रीने कमावलं कि गमावलं होतं? कि गमावून कमावलं होतं ? अस्मीचं पावित्र्य अस्मीकडेच शाबूत होतं कि नव्हतं?
अजित जिंकला होता कि हरला होता? श्री कुणाला जिंकवून गेला होता? स्वत:ला कि अजितला?
वादळ संपलं होतं का? कि अस्मिच्या मंगळसूत्राने ते जखडून ठेवलं होतं..?वादळ असं कधी बांधून ठेवता येतं का?
"आज उशीर झाला यायला तुला....?काम जास्त होते का ऑफिसमध्ये ?"
"हम्म....काम जास्त होतं."
अजित मनातल्या मनात म्हणाला,"हल्ली कामं बसस्टॉपवर करतात वाटतं..कोण असेल बरं तो?"

No comments:

Post a Comment