Wednesday 23 January 2013

स्वर्गात बांधलेल्या गाठी

ती त्याला रेल्वे स्टेशनवर भेटली,आपल्या मैत्रीणीला रेल्वे स्टेशनवर सोडायला आली होती.तिला बघताच हा तिच्या चेहर्यात अशा प्रकारे हरवुन गेला की जसं भोवरा फुलाच्या सुगंधात हरवुन जातो.
एक वेगळाच मोह तिच्या चेहर्यात होता.
ती जाऊ लागली,तो तिच्या मागेमागे जाऊ लागला.पण अचानक ती गर्दीत कुठे गायब झाली हे कळलंच नाही त्याला,त्याने शोधायचा खुप प्रयत्न केला पण ती काही सापडली नाही.
थोड्या वेळानंतर त्याला लक्षात आलं की आपल्याला ज्या ट्रेनमध्ये बसायचं होतं तीची वेळ जवळ जवळ होत आली होती.गडबडीने तो प्लॅटफॉर्मच्या दिशेने धावलापण ट्रेनही निघुन गेली होती.
मुलगी ही गेली आणि ट्रेनही...
काही दिवस तो तिला विसरुच शकला नाही,तिच्या आठवणीत काही दिवस तसेच गेले.तो तिला जवळ जवळ विसरलाच होता कि,ती पुन्हा दिसली त्याला मंदिरात जाताना .
चालु एस टी तुन याने उडी मारली.आणि कधी मंदिरात जाऊन माहीती नसणारा हा,पहील्यांदा याने मंदीरात पाय ठेवले.तिथलं वातावरण खुपच मोहक होतं.
ती देवाला नमस्कार करत होती.हा ही तिच्या शेजारीच उभा राहुन प्रार्थना करण्याचा आव आणत तिच्याकडे चोरुन पाहत उभा होता.तिचं ते मोहक रुप पाहुन त्यानेही डोळे मिटुन देवाला प्रार्थना केली की,माझ्या आयुष्याची साथीदार म्हणुन मला हीच मुलगी मिळो.
त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा पुन्हा एकदा ती मुलगी निघुन गेली होती.तो पुन्हा एकदा तिला शोधतच राहीला,...
काही दिवसांनंतर त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.दोन तीन वर्षे मग अशीच निघुन गेली तो तिला थोडाफार विसरला होता.पण कुठेतरी याच्या मनातल्या भावना तिच्याप्रतीतशाच होत्या.
याच्या आईवडीलांनी याच्यासाठी मुली पाहण्यास सुरुवात केली,पण काही केल्या याला कुठली मुलगी पसंतच पडत नव्हती.त्यामुळे एक दिवस याच्या आईवडीलांनी याला वधु वर सुचक मेळाव्यात पाठवलं.
मनात नसतानाही आई वडीलांच्या आग्रहाखातर तो मेळाव्यात गेला.खुपच गर्दी होती तिथे,प्रत्येकजण एकमेकांशी ओळख करुन ओळख वाढवण्याचा प्रयत्न करत होते.हा मात्र तिथे एकाजागी शांत उभा होता.लक्ष लागत नव्हतं.
कधी एकदा ईथुन बाहेर पडतोय असं झालं होतं त्याला.
तेवढ्यात कोणीतरी मागुन त्याला हाक मारली,त्याने मागे वळुन पाहीलं,तर तीच मुलगी तिथे उभी होती,जिचा चेहरा हा मनात ठेवुन जगत होता.कोणीतरी शांत परिसरात शंखानाद केल्यावर जसा आवाज व्हावा.तसाच आवाज तिला पाहील्यावर याच्या हृदयाच्या तारा हेलावुन होत होता.
ती म्हणाली,माझं नाव साक्षी मी मुळची सातार्याची,पण मुंबईला जॉब करते.इथे माझे काका काकु असतात.मी पदवीधर आहे,तर ही अशी आहे मी तुमच्या विषयीही काही सांगाना.त्याला कायबोलावं हे समजतच नव्हतं,डोळे झाकुन पाहीलेलंस्वप्न डोळे उघडताच समोर दिसावं...अशी केविलवाणी अवस्था त्याच्या मनाची झाली होती.
पण किती दिवसांनी तो उत्स्फुर्तपणे बोलु लागला.ओळख वाढवली आणि शेवटी त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं.आणि ही गोड बातमी दोघांच्याही आई वडीलांनाही कळवली,बोलणी झाली आणि लग्नही अगदी थाटामाटात झालं.
भेटी नशिबात नव्हत्या पण साथ मात्र नशिबात होती....
मित्रांनो काहीजण असतात ज्यांच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात.
पण काहीजण असे असतात,त्यांच्या गाठी स्वर्गात तर बांधलेल्या असतात पण तो स्वर्ग त्यांनी स्वतःच्या हातांनी घडवलेला असतो.......


No comments:

Post a Comment