Sunday 1 April 2012

 

दोन हृदयं.

"किती व्यवस्थीतपणे माझ्या आजोबांनी माझी समजूत घातली."
दिनकर बालचिकित्सा तज्ञ आहे.त्याचे आजोबा अलीकडेच गेले.दिनकरचं आजोबावर खूप प्रेम होतं.मला तो नेहमीच आजोबांच्या गप्पा सांगायचा. ह्या भेटीत तो मला त्याच्या लहानपणी आपल्या आजोबांशी केलेल्या एका चर्चेची आठवण काढून सांगत होता.
मला म्हणाला,
"माझे आजोबा निवृत्त झाल्यावर आपल्या जुन्या घरी कोकणात येऊन राहिले.शाळेला सुट्टी असताना कधी कधी वेळ काढून मी आजोबांना भेटायला कोकणात त्यांच्या घरी रहायला जायचो.
आजोबांच्या झोपायच्या खोलीला लागुनच माझी झोपायची खोली होती.पण ती माझी खोली स्वयंपाकघराला लागून होती.
त्या माझ्या भेटीत एकदा मध्य रात्री स्वयंपाक घरातून भांड्यांचा आवाज आला.माझ्या आजोबांनी सफेद लेंगा घातला होता.वरती मलमलची पैरण होती.माझ्या आजोबांना त्या वयातही डोक्यावर भरपूर केस होते.ते विसकटलेले दिसत होते.
आजोबांनी पितळेच्या डब्यातून एक साखरेचा लाडू एका बशीत काढून घेतला.थोडं दुध कपात गरम करून घेतलं.
मी माझ्या बिछान्यावरून उठून स्वयंपाक घरात येऊन एका खुर्चीवर मिणमीणते डोळे करीत बसलो आणि त्यांना म्हणालो,
"आजोबा?मध्य रात्रीची तलफ काय?"
त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू आणि दोन्ही गालावरच्या खळ्या खुललेल्या पाहून मला गम्मत वाटली.
"रात्रीचे दोन वाजले वाटतं!.काय थोडा लाडू खाणार?"
त्यानी गालात हसं ठेवूनच मला विचारलं.
"नको थॅन्क्स.एखादं फुलपात्र भरून पाणी पितो."
डोळे चोळत मी त्यांच्याकडे पहात होतो.
"आठवतं तू आणि तुझी बहिण माझ्या कचेरीत येऊन"
आजोबा मला आठवण काढीत सांगत होते.
"आणि तुझी आजी तुमच्याबरोबर,थालीपिठं,लोण्याचा गोळा आणि थरमॉसातून गरम कॉफी देऊन पाठवीत असायची?"
"आणि थालीपिठं खाऊन झाल्यावर मुखशुद्धी म्हणून ताज्या शहाळ्याच्या कातळ्या द्यायची."
मी आजोबांच्या आठवणीत भर घालून म्हणालो.
"तू शहाळ्याचं पाणी एका बाटलीत घेऊन यायचास.कधी तुझी आजी मला आवडतं म्हणून, कुळथाची पिठी उकड्या तांदळाचा भात आणि तोंडाला लावायला भाजलेला सुका बांगडा आणि त्यावर खोबर्‍याच्या तेलाचे दोन थेंब टाकून घेऊन यायचास?."
आजोबा आणखी आठवण काढून म्हणाले.
कुळथाची पिठी आणि सुकाबांगडा हे समिकरण त्यांच्या लय आवडीचं.पण अलीकडे त्यांना ते खायला मिळालं असेल का कुणास ठाऊक.
"तो तुमचा कार्डीआलॉजीस्ट काय म्हणाला?
असं मी विचारल्यावर मला आजोबा म्हणाले,
"माझं एक हृदय इतकं काही चांगलं नाही."
त्यांच्या जाड भुवंया जरा वर गेल्या.
"तो मठ्ठ स्नायु तितकासा चांगला नाही."
मला म्हणाले.
"आणि तुमचं दुसरं हृदय?"
मी लागलीच त्यांना प्रश्न केला.
चेहरा जरा प्रसन्न करून म्हणाले,
"मस्त! ते हृदय नेहमीच अर्ध्या भरलेल्या ग्लासातून पितं.मी अजून जीवंत आहे.मी खेडवळ आहे.तुझी प्रेमळ आजी अजून माझ्याबरोबर आहे.माझी दोन मुलं आहेत.तुम्ही नातवंडं आहात.हो! ते हृदय छान आहे."
मी थोडा मोठा झाल्यावर माझ्या आणि माझ्या आजोबांच्या आयुर्वृद्धिबद्दल विचार करायला लागलो.त्यांना काय वाटत असेल ह्याचा विचार माझ्या मनात यायचा.
त्या मध्य रात्री त्यांचा अर्धा लाडू संपता संपता मी त्यांना विचारलं.
ते खांदे उडवीत मला सांगू लागले,
"ते तसंच असतं.आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत यातना आणि पीडा असतात.अगदी तान्ह्यांना पोटदुखी असते,लुटुलुटु चालणार्‍या मुलांना पडण्याची भीती असते,विद्यार्थी दशेत टेस्टसची,कुमार वयात प्रिय आणि प्रियाबद्दल काळजी,तरुणाना काम आणि पैसा नंतर मुलांच्या काळज्या, शिवाय प्रत्येकाला दंगे धोपे आतंकवादी यांची भीती असते आणि हे असं चालायचंच.नुसता बदल आणि बदल.सवय होते.आणि पुन्हा बदल होत रहातो."
मी आजोबांना विचारलं,
"तुम्हाला कधी थकवा येतो का?"
"जर मला थकवा आला तर मी एक डुलकी काढतो.
आजोबांनी मला उत्तर दिलं.
"मला म्हणायचंय,म्हातारं व्ह्यायला होतंय म्हणून,जगण्याचा कंटाळा येतो म्हणून विचार येऊन थकवा येतो का?तुम्ही म्हातारे होत चालला आहात ह्याचा विचार येऊन मी उदास होतो"
मी आजोबांना म्हणालो.
"कदाचीत तुझी तुलाच भीती वाटत असावी."
ते म्हणाले.
"मला आठवतं मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो तेव्हा असे विचार आल्यावर चिंतामुक्त व्ह्यायचा प्रयत्न करायचो.असं हे होतच असतं.तसं लक्षात येणं जरा कठीणच असतं.आठवणी व्यतिरिक्त सर्वकाही जाऊ द्यायचं."
ते मला पुढे असं म्हणाले.
"मग मन एव्हडं भीत का असतं?"
मी आजोबांना म्हणालो.
मला म्हणाले,
"कारण तू अजून तेव्हडा मोठा झाला नाहीस.तुला जे माहित आहे त्यापेक्षा तुला जे माहित नाही ते जास्त भीतीदायक आहे."
किती व्यवस्थीतपणे माझ्या आजोबांनी माझी समजूत घातली.आता मी बालचिकित्सक तज्ञ म्हणून काम करीत असताना मी बर्‍याच आईवडीलाना पाहिलेलं आहे की ते आपल्या मुलांना रोग होऊन आजारी पडण्याच्या शक्यतेने किती चिंतातूर असतात.
आणि जेव्हा रोगनिदान होतं,अगदी धक्कादायक असलं तरी,ते समजल्याने त्यांचं मन थोडं चिंतामुक्त होतं.कारण दैत्याचं नाव सापडल्यामुळे तसं होत असावं.
"माझ्या खोलीतला तो भिंतीवरचा फोटो तू पहिलास ना?"
माझे आजोबा म्हणाले,
"तो माझ्या कॉलेजमधला माझा फोटो आहे.काळे भोर केस.तिच वेळ होती आम्ही निरनीराळ्या गावाला सहलीला जायचो.ब्रिटीशांना देशातून हाकलून द्यायची चळवळ चालू झाली होती.प्रत्येक दिवस रोमांचक असायचा.माझ्या आजोळी मी माझ्या आईला भेटायाला गेलो होतो.माझ्या आजोबांची ती शुश्रूषा करीत होती. आता मी जगाचा विचार करून जास्त शोधाशोध करीत नाही किंवा अर्थ काढीत बसत नाही.जे आहे ते आहे."
आजोबांनी उसासा सोडला.जणू आपलेच विचार बोलून त्यांना हायसं वाटलं असावं.
"माझी काळजी करू नकोस."
ते म्हणाले,
"किंवा तुझी पण.चिंतामुक्त होऊन आनंदी रहायला खूप गोष्टी आहेत.जमेल तेव्हडा लाभ घे.
नक्की तुला लाडू खायचा नाही?"
अलीकडेच माझे आजोबा हृदयविकाराचा झटका येऊन गेले.तो स्नायु कुचकामी झाला होता.पण त्यांच्या दुसर्‍या हृदयाने कशाशीही समझोता केला नाही."

No comments:

Post a Comment